चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जानेवारी २०२१

Date : 14 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर :
  • डेमोक्रॅटिक-नियंत्रित प्रतिनिधीगृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध दुसर्‍या महाभियोगावरील चर्चेनंतर महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला.  महाभियोगाचा प्रस्ताव १९७  च्या विरोधात २३२  मतांनी संमत झाला. १० रिपब्लिकन खासदारांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. आता हा प्रस्ताव १९ जानेवारीला सिनेटमध्ये आणला जाईल. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षांवर दोनदा महाभियोग प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

  • अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले. याबाबतचा ठराव २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर झाला होता.

  • “आम्हाला माहिती आहे की अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी देशाविरूद्ध सशस्त्र बंडखोरी करण्यासाठी चिथावणी दिली. त्यामुळे त्यांनी आपले पद सोडले पाहिजे. ते देशासाठी धोकादायक आहेत”, असे महाभियोगावरील चर्चेदरम्यान प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी म्हणाल्या.

  • दरम्यान, ट्रम्प यांच्या विविध सोशल मीडिया अकाऊंन्ट वर बंदी घातल्यानंतर देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य यापूर्वी कधीही अशा प्रकारे धोक्यात नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

भारताबाबतची अमेरिकी धोरणाची कागदपत्रे उघड :
  • सत्तेवरून पायउतार होण्याच्या मार्गावर असलेल्या ट्रम्प प्रशासनाने चीनला काबूत ठेवण्यासाठी आपल्या कारकीर्दीत तयार केलेल्या आणि आकार दिलेल्या भारत- पॅसिफिक धोरणाबाबतची कागदपत्रे गोपनीय यादीतून काढून टाकली. राजनैतिक, लष्करी आणि गुप्तवार्ताविषयक मदतीच्या माध्यमातून ‘भारताच्या उदयाला चालना देण्याच्या’ धोरणाचा यात समावेश आहे.

  • या धोरणातील ठळक बाबींची सर्वानाच कल्पना होती; मात्र ती गोपनीयतेतून बाहेर काढण्याची (डीक्लासिफिकेशन) मुदत २०४२ साली ठरलेली असताना ट्रम्प यांच्या अखेरच्या दिवसांत ती सविस्तर उघड करणे आश्चर्यकारक मानले जात आहे.

  • हे धोरण जाहीररित्या उघड करण्यात आल्यामुळे, चीनबाबत हळूहळू कठोर होत गेलेल्या आणि आकाराला येणाऱ्या अमेरिका- चीन- भारत धोरणाशी सुसंगत वर्तणूक ठेवण्याबाबत आगामी बायडेन प्रशासनावर दबाव वाढणार आहे.

  • ‘आज हे धोरण गोपनीयतामुक्त करण्यात आल्यामुळे पारदर्शकतेसह अमेरिकेची भारत- पॅसिफिकबाबतची आणि या भागातील आमचे मित्रदेश तसेच भागीदार यांच्याबाबतची सामरिक बांधीलकी दिसून आली आहे’, असे ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांनी या दस्ताऐवजासोबतच्या नोंदीत म्हटले आहे.

ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाबाबत रिपब्लिकन पक्षात मतभेद :
  • अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पक्षामध्ये मतभेद झाले. दरम्यान, प्रतिनिधीगृहाने २५ व्या घटना दुरुस्तीनुसार उपाध्यक्षांनी हकालपट्टीची कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.

  • प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले आहे. याबाबतचा ठराव २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर झाला असून पक्षीय पातळीवर हे मतदान झाले.

  • प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असून एका रिपब्लिकन प्रतिनिधीने ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर इतर पाच जण तटस्थ राहिले. याबाबतच्या ठरावात असे म्हटले आहे, की उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी २५ व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ट्रम्प यांना अधिकारपदावरून दूर करावे.

  • यातील २५ वी घटना दुरुस्ती ही पन्नास वर्षांपूर्वी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या खुनानंतर मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार अध्यक्ष जर काम करण्यास सक्षम नसतील तर त्यांच्या जागी उपाध्यक्ष देशाचा कारभार करू शकतात अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार उपाध्यक्ष पेन्स हे मावळते अध्यक्ष ट्रम्प यांना अक्षम ठरवून पदावरून काढून टाकू शकतात. त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

मुश्ताक अली क्रिकेट - जाधव-शेखमुळे महाराष्ट्राचा विजय :
  • केदार जाधव आणि नौशाद शेखच्या नाबाद अर्धशतकांच्या बळावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या क-गटात मंगळवारी छत्तीसगढचा आठ गडी राखून पराभव केला.

  • एफबी कॉलनी ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात छत्तीसगढने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १९२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. छत्तीसगढच्या डावात सलामीवीर रिषभ तिवारी (४४), शशांक चांद्रकेर (४४) आणि कर्णधार हरप्रीत सिंग भाटिया (४२) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर उत्तरार्धात शशांक सिंगने आठ चेंडूंत नाबाद २४ धावा केल्या.

  • त्यानंतर, गुजरातविरुद्धचा सलामीचा सामना गमावणाऱ्या महाराष्ट्राची या सामन्यात २ बाद ३० अशी खराब सुरुवात झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (१५) आणि कर्णधार राहुल त्रिपाठी (१४) लवकर बाद झाल्यानंतर जाधव-शेख जोडीने सामन्याचे चित्र पालटले.

  • जाधव (४५ चेंडूंत नाबाद ८४) आणि शेख (४४ चेंडूंत नाबाद ७८) यांनी छत्तीसगढच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत तिसऱ्या गडय़ासाठी नाबाद १६६ धावांची भागीदारी करीत विजय नोंदवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पुरेसा अनुभव गाठीशी असलेल्या जाधवने पाच चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी केली, तर शेखने १० चौकार आणि दोन षटकार खेचले.

१४ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.