लंडन : नाताळ तोंडावर असताना ब्रिटनमध्ये झालेल्या नाटय़मय सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बहुमताने सत्ता राखली. ब्रिटनमधील राजकीय अस्थिरता या निकालाने संपुष्टात आली असून आता युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा मार्ग (ब्रेग्झिट) सुकर झाला आहे. हुजूर पक्षाला ३६४ तर मजूर पक्षाला २०३ जागा मिळाल्या. मजूर पक्षाच्या पारंपरिक मतदारसंघातही हुजूर पक्षाने नेत्रदीपक विजय संपादन केला हे निकालाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरले.
१९८० मध्ये मार्गारेट थॅचर यांना जसे बहुमत मिळाले होते तशाच विजयाची पुनरावृत्ती करीत ३६० हून अधिक जागा जॉन्सन यांनी जिंकल्या. पुढील महिन्यात ब्रिटनला युरोपीय समुदायातून बाहेर काढण्यासाठी लोकांनी हा कौल दिला आहे. जॉन्सन यांनी सांगितले की, दुसऱ्या जनमताचा धोका आता संपुष्टात आला आहे. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाकडून ‘गेट ब्रेग्झिट डन’ हे घोषवाक्य वारंवार म्हणून घेतले. यावेळी लोकांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता.
मजूर पक्षाचे सत्तर वर्षीय नेते जेरेमी कोर्बिन यांनी सांगितले की, यापुढे कुठल्याही निवडणुकीत आपण नेतृत्व करणार नाही. ब्रेग्झिटबाबत कुठलीही स्पष्ट भूमिका घेण्यात अपयशी ठरल्याने हा पराभव झाल्याचे खापर कोर्बिन यांच्यावर फोडण्यात आले आहे.
न्यूयॉर्क : फोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली- प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला आहे. या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.
यादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा व बायोकॉनच्या संस्थापक किरण शॉ मजुमदार यांचा समावेश आहे.
फोर्ब्सची २०१९ची यादी ‘दी वर्ल्डस् १०० मोस्ट पॉवरफुल विमेन’ या नावाने प्रसिद्ध झाली असून त्यात मर्केल (वय ६५) प्रथम क्रमांकावर आहेत. युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना २९ व्या क्रमांकावर आहेत.
बनावट पासपोर्ट ओळखता यावेत यासाठी नव्याने देण्यात येणाऱ्या पासपोर्टवर ‘कमळ’ चिन्ह छापण्यात आल्याचे गुरुवारी सरकारच्या वतीने लोकसभेत स्पष्ट करण्यात आले. अन्य राष्ट्रीय चिन्हांचाही वापर करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
पासपोर्टवर कमळ चिन्ह छापण्याबाबतचा प्रश्न बुधवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केला होता. केरळमधील कोझिकोडे येथे नवे पासपोर्ट वितरित करण्यात आले त्यावर कमळ चिन्ह छापण्यात आले असल्याचा मुद्दा काँग्रेसचे सदस्य एम. के. राघवन यांनी सभागृहात शून्य प्रहराला उपस्थित केला होता. ही बाब एका वृत्तपत्राने ठळकपणे प्रसिद्ध केली असून हा सरकारी आस्थापनांचे आणखी ‘भगवेकरण’ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का, असा सवाल राघवन यांनी केला.
तेव्हा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.
लंडन : ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार प्रवेश करणार आहेत. सत्ताधारी हुजूर व विरोधी मजूर पक्षाकडून काही भारतीय वंशाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यात अनेक खासदारांनी आपले मतदारसंघ राखण्यात यश मिळवले असून भारतीय वंशाचे एकूण १५ खासदार नव्या सभागृहात असणार हे उघड झाले आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आताच्या निवडणुकीत नेत्रदीपक विजय संपादन केला असून आतापर्यंत सर्वात जास्त विविधता असलेले सभागृह अस्तित्वात येत आहे. त्यात वांशिक अल्पसंख्याक असलेले १० खासदार आहेत. आधीच्या संसदेतील सर्वच खासदार पुन्हा यशस्वी झाले आहेत.
गगन मोहिंद्रा व श्रीमती क्लेअर काँटिन्हो यांनी हुजूर पक्षाच्या वतीने बाजी मारली तर लिबरल डेमोक्रॅटसचे मुनिरा विल्सन व नवेंद्रु मिश्रा प्रथमच निवडून आले आहेत. विल्सन यांनी सांगितले की, आताच्या सभागृहात विविधता असणार आहे. त्यातून सर्वाचा आवाज उमटेल. मूळ गोवेकर असलेल्या काँटिन्हो यांनी सांगितले की, ब्रेग्झिट पूर्ण करण्याची ही वेळ आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.