यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलने रचला इतिहास, बाबर-रिझवान जोडीला टाकले मागे
- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लॉडरहिल येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने ९ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या जोडीने इतिहास रचला आहे. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीची सर्वात मोठी भागीदारी करणारी जोडी बनले आहेत. याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावावर हा विशेष विक्रम नोंदवला गेला होता. या सलामीच्या जोडीने शानदारी फलंदाजी करताना २०२१ मध्ये पहिल्या विकेट्ससाठी १५८ धावांची भागीदारी केली होती.
- इतकंच नाही तर यशस्वी आणि गिल ही युवा जोडी देशासाठी टी-२० फॉरमॅटमध्ये पहिल्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. त्याचबरोबर त्यांनी केएल राहुल आणि रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी साधली. यशस्वी आणि गिलच्या आधी हा विक्रम रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या नावावर होता. २०१७ मध्ये, श्रीलंकेविरुद्ध रोहित आणि राहुल जोडीने पहिल्या विकेटसाठी १६५ धावा जोडल्या होत्या.
यशस्वी आणि गिल यांनी लॉडरहिलमध्ये केला धमाका –
- वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात यशस्वी आणि गिलने बॅटने जोरदार फटकेबाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी लॉडरहिलमधील सर्व कॅरेबियन गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. दरम्यान, यशस्वी जैस्वालने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या. त्याचबरोबर शुबमन गिलने ४७ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ४ षटकार मारत ७७ धावा केल्या. यादरम्यान दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी १५.३ षटकात १६५ धावांची शतकी भागीदारी झाली.
भारताने १८ चेंडू आणि ९ गडी राखून जिंकला चौथा सामना -
- लॉडरहिल येथे खेळला गेलेला चौथा टी-२० सामना भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ असा होता. पण टीम इंडियाने येथे चांगली कामगिरी करत १८ चेंडू आणि नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात विरोधी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून १७८ धावा केल्या होत्या.
राज्यात डोळ्यांच्या साथीचे आठ दिवसांत दोन लाख रुग्ण
- राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरात ११ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या सुमारे चार लाखांवर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर पुणे, जळगाव, नांदेड आणि चंद्रपूरमध्ये प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मागील आठ दिवसांत रुग्णसंख्येत तब्बल दोन लाखांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.
- मागील काही दिवसांपासून राज्यातील डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ दिवसेंदिवस आणखी वाढताना दिसत आहे. राज्यात ३ ऑगस्टला रुग्णसंख्या १ लाख ८७ हजार होती. ती ११ ऑगस्टपर्यंत वाढून ३ लाख ९९ हजार ६०५ वर पोहोचली आहे. म्हणजेच आठ दिवसांत रुग्णसंख्या दोन लाखांहून अधिक वाढली आहे.
- राज्यात ११ ऑगस्टपर्यंत डोळे येण्याचे सर्वाधिक ४४ हजार ३९८ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये ३२ हजार ४६२, जळगाव २५ हजार ७०९, नांदेड २२ हजार ८६० आणि चंद्रपूर १७ हजार ८५१ अशी रुग्णसंख्या आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत ८ हजार ३५७ रुग्ण आढळले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ६ हजार ७२१ रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या ३ हजार ४९० आहे.
“पुण्यात हवेतून चालणारी बस आणण्याचा प्रयत्न असणार”, नितीन गडकरी यांचं विधान
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते चांदणी चौकातील पुलाचे लोकार्पण करण्यात आलं. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. चांदणी चौकातील पुलासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
- नितीन गडकरी म्हणाले, “पुण्यासाठी ४० हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पुण्यात आता डबल इंजिन लागलं आहे. एक दादा होते, आता दोन दादा झाले आहेत. त्यामुळे दोघांनी मनात आणलं, तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास होणारच आहे. पुण्याला पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्त करणार आहे.”
- “पुण्यात काही ठिकाणी हवेतून चालणारी स्काय बस ( डबल – डेकर रेल्वे )आणण्याचा प्रयत्न असणार आहे. हवेतून चालणाऱ्या स्काय बसमध्ये अडीचशे लोक बसतात. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी स्काय बसची मांडणी एकदा पाहावी आणि त्याचा अभ्यास करावा. कारण, पुण्यातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊ शकणार नाही,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
देशभरात ३५ हजार हेक्टरवर पाम लागवड; ११ राज्यांतील ४९ जिल्ह्यांत लागवडीसाठी अभियान
- खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील ११ राज्यांत ४९ जिल्ह्यांत पाम लागवडीसाठी २५ जुलैपासून विशेष मोहीम आयोजित केली होती. त्या अंतर्गत सुमारे ३५ हजार हेक्टरवर पाच लाखांहून अधिक पाम वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
- केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या बाबत आयातीवरील अवलंबित्व कमी करून आत्मनिर्भर होण्यासाठी खाद्यतेल प्रक्रिया उद्योगाच्या मदतीने देशात पाम लागवडीसाठी २५ जुलै ते १२ ऑगस्ट या काळात मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत ११ राज्यांतील ४९ जिल्ह्यांतील ७७ गावांमध्ये सात हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सुमारे ३५०० हेक्टरवर पाच लाखांहून अधिक पाम वृक्षांची लागवड केली आहे. केंद्र सरकार आणि खाद्यतेल उत्पादक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पाम वृक्षांची लागवड, संवर्धन आणि पाम बियांच्या काढणी बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार, खाद्यतेल कंपन्या, शेतकरी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित राज्यांचे कृषी विभाग एकत्रित काम करणार आहेत.
साडेसहा लाख हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट्य
- केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६अखेर देशात साडेसहा लाख हेक्टरवर पाम लागवड करण्याचे उद्दिष्टे निश्चित केले आहे. सध्या आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, कर्नाटक, मिझोराम, नागालँड, ओदिशा, तमीळनाडू, तेलंगाणा आणि त्रिपुरा राज्यांत प्रमुख्याने पाम वृक्षांची लागवड केली जात आहे. पतंजली फूड प्राइवेट लिमिटेड, गोदरेज एग्रोवेट आणि ३ एफ या खाद्यतेल प्रक्रिया कंपन्यांच्या माध्यमातून लागवड केली जात आहे.
‘डीपी’वर राष्ट्रध्वज चित्र लावावे : मोदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी नागरिकांना त्यांच्या व्यक्तिगत समाजमाध्यम खात्यांच्या ‘दर्शनीय चित्रा’च्या (डिस्प्ले पिक्चर-डीपी) जागी राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्याचे आवाहन केले
- मोदींनी आपल्या समाजमाध्यम खात्याच्या ‘डीपी’ राष्ट्रध्वजाचे छायाचित्र लावले आहे.१३ ते १५ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी शुक्रवारी नागरिकांना केले.
चिनी सैन्यमाघारीचा आग्रह; पूर्व लडाखबाबत भारत-चीन उच्चस्तरीय चर्चेची उद्या १९वी फेरी
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उद्या, १४ ऑगस्ट रोजी चीनबरोबर होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेच्या १९व्या फेरीत पूर्व लडाखमधील उर्वरित संघर्षस्थळांवरून सैन्य लवकरात लवकर माघारी घेण्याची मागणी भारत करणार असल्याचे संबंधित सूत्रांनी शनिवारी सांगितले.
- सीमेवरील पूर्व लडाख भागातील भारत-चीनमधील तणाव कमी करण्यासाठी यापूर्वी उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या १८ फेऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे चार महिन्यांनी ‘कॉर्प्स कमांडर’ स्तरावरील चर्चेची १९वी फेरी होणार आहे.
- उर्वरित संघर्षस्थळांवरून सैन्यमाघारीची प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी या चर्चेत सहभागी होणारे भारतीय शिष्टमंडळ करणार असल्याचे आणि चर्चेची ही नवी फेरी चुशुल-मोल्दो सीमेवर भारतीय हद्दीत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- पूर्व लडाखमधील काही संघर्ष स्थळांवर भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यातील तिढा सुमारे साडेतीन वर्षांपासून कायम असतानाही, विस्तृत राजनैतिक आणि लष्करी चर्चेनंतर दोन्ही देशांनी अनेक भागांतून सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी स्तरावरील २३ एप्रिलला झालेल्या १८व्या चर्चाफेरीत भारतीय बाजूने देप्सांग आणि देमचोक येथील मुद्यांवर भर देण्यात आला होता.