चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ ऑगस्ट २०२१

Updated On : Aug 14, 2021 | Category : Current Affairs


विमान प्रवास महागणार; सरकारनं तिकीट दरात नऊ ते १२ टक्क्यांपर्यंत केली वाढ :
 • विमान प्रवास आजपासून महागणार आहे. सरकारने केवळ दोन महिन्यांतच दुसऱ्यांदा देशांतर्गत विमान तिकीटांच्या किमती ९ ते १२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. नागरी उड्डान मंत्रालयाने गुरुवारी नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार, ४० मिनिटांपेक्षा कमी कालावधीतील उड्डाणांच्या तिकिटांची किंमत २६०० वरून २९०० करण्यात आली आहे. किमतीत तब्बल ११.५३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर, ४० मिनिटांच्या प्रवासासाचे जास्तीत जास्त भाडे १२.८२ टक्क्यांनी वाढवून ८८०० करण्यात आले आहे.

 • ४० ते ६० मिनीटांच्या प्रवासासाठीचे कमीत कमी भाडे ३३०० रुपयांएवजी ३७०० असेल. यामध्ये १२.२४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून शुक्रवारपासून जास्तीत जास्त भाडे हे ११ हजार रुपये असेल. याशिवाय ६० ते ९० मिनीटांच्या प्रवासाचे कमीत कमी भाडे ४५०० असेल. यामध्ये १२.५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर, जास्तीत जास्त भाड्यात १२.८२ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून ते १३२०० असेल.

 • मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार आता ९०-१२०, १२०-१५०,१५०-१८० आणि १८०-२१० मिनिटांच्या देशांतर्गत प्रवासासाठी कमीत कमी भाडे अनुक्रमे ५३०० रुपये, ६७०० रुपये, ८३०० आणि ९८०० असेल. १२०-१५० मिनिटांच्या प्रवासासाठीच्या कमीत कमी भाड्याच्या किमतीत ९.८३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ते ६७०० रुपये करण्यात आले आहे.

देशातील पहिले ड्रोन  संशोधन केंद्र केरळमध्ये :
 • ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालेला असताना  केरळ पोलिसांचे ‘ड्रोन फोरेन्सिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र’ येथे शुक्रवारपासून सुरू झाले आहे.

 • पाकिस्तानने अलीकडेच जम्मूत केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे हे केंद्र ड्रोन प्रकरणांमधील तपासात सहायक ठरू शकणार आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, मानवरहित ड्रोनचे इतर सकारात्मक वापर आहेत, त्याचाही अभ्यास यात केला जाणार आहे.

 • मुख्यमंत्री पिनारायी विजयन म्हणाले की, देशविरोधी शक्ती ड्रोनचा वापर करीत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातून तस्करी, हेरगिरी व दहशतवाद हे मोठे धोके आहेत. पोलिसांसह सर्वच सुरक्षा दलांना हे ड्रोन आव्हान बनले आहेत. केरळ पोलिसांची आता ड्रोन हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये तपासात मदत होऊ शकणार आहे. बेकायदेशीर ड्रोन विमाने ओळखणे हाच केवळ नवीन संस्थेचा उद्देश असून ड्रोनची निर्मितीही केली जाणार आहे. दैनंदिन पोलीस गस्तीसाठीही ही नवी सुविधा वापरली जाणार असल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतही तिसऱ्या लसमात्रेस परवानगी :
 • अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्ती तसेच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या अन्य व्यक्तींना फायझर व मॉडर्ना या लशींची अतिरिक्त तिसरी वर्धक मात्रा (बूस्टर डोस)  देण्यास अमेरिकेच्या नियामक संस्थेने परवानगी दिली आहे. देशात डेल्टा विषाणूचा प्रसार वाढत असून अन्न व औषध प्रशासनाने रात्री ही घोषणा केली.

 • अवयव प्रत्यारोपण, कर्करोग यांच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे अशा व्यक्तींना लशीची अतिरिक्त मात्रा देणे गरजेचे असून त्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. यापूर्वी फ्रान्स आणि इस्रायल या देशांनी अशा प्रकारे अतिरिक्त मात्रा देण्याचे ठरवले आहे. काही औषधांमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना लशीच्या नेहमीच्या मात्रांनी पूर्ण संरक्षण मिळत नाही. परिणामी त्यांना आणखी एक मात्रा देण्याची गरज असल्याचे मान्य करण्यात आले आहे.

 • अन्न व औषध प्रशासनाचे प्रभारी आयुक्त डॉ. जॅनेट वूडकॉक यांनी म्हटले आहे की, आजच्या निर्णयाने डॉक्टरांना ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्यासाठी अतिरिक्त लसमात्रा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांना करोनापासून आणखी संरक्षण मिळू शकते.

 • प्रतिकारशक्ती काही कारणाने कमी झालेल्या व्यक्तींना फायझर व मॉडर्ना या लशींची तिसरी मात्रा दुसऱ्या मात्रेनंतर २८  दिवसांनी देता येईल. पण, जॉन्सन अँड जॉन्सनची लस ज्यांनी घेतली आहे त्यांच्याबाबत काहीच उल्लेख प्रशासनाने केलेला नाही.

उद्यापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार! शिक्षण विभागाची माहिती :
 • करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. यापुर्वी अकरावीची सीईटी रद्द करण्याचा निर्णय उच्च न्ययालयाने दिला होता.

 • इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले होते. दरम्यान, दरम्यान अकरावी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. ११ प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 • ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रमांक देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

…म्हणून टाटा ‘त्या’ १५ खेळाडूंना भेट देणार Altroz कार; कारण वाचून अभिमान वाटेल :
 • ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. रविवारी ऑलिम्पिक संपल्यानंतर पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे आता उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या टाटा मोटर्सने एक मोठी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे इतरांप्रमाणे ही घोषणा पदक विजेत्यांसाठी नसून थोड्यात पदक हुकलेल्यांसाठी म्हणजेच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या खेळाडूंसाठी आहे. टाटा मोटर्स टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या पण थोड्यात पदक हुकलेल्यांना अल्ट्रोज ही महागडी गाडी भेट देणार आहे. या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं असून त्यांनी एक सुवर्ण दर्जाची कामगिरी केली आहे. त्यांच्या कामगिरीने तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळाली असल्याने त्यांच्या सन्मार्थ आम्ही ही छोटी भेट देत असल्याचं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

 • “भारतामध्ये स्वत:ला घडवलेल्या आणि अंत्यत परिश्रमाने, मेहनतीने स्वत:ला सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना धन्यवाद म्हणण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी आम्ही हे करत आहोत. या खेळाडूंना आम्ही आमची सर्वात प्रिमियम हॅचबॅक कार अल्ट्रोज गाडी भेट देणार आहोत. ही गाडी हाय स्ट्रीट गोल्ड रंगातील असून लवकरच ती खेळाडूंना भेट देण्यात येईल,” असं कंपनीने म्हटलं आहे.

 • कंपनीच्या पॅसेंजर उद्योग विभागाचे प्रमुख असणाऱ्या शैलेश चंद्रा यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिलीय. “भारतासाठी ऑलिम्पिक हे केवळ मेडल आणि पोडियमवर उभं राहण्या पुरते मर्यादित नव्हतं. ते अनेकांसाठी त्याहून फार काही होतं. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा सन्मानं करताना आम्हाला आनंद होतं आहे. एवढ्या दबावाखाली खेळताना या खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवलं. हे खेळाडू आपल्या कैशल्याच्या बळावर पोडियमच्या म्हणजेच मेडलच्या फार जवळ पोहचले होते,” अशा शब्दांमध्ये शैलेश यांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

१४ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)