चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ सप्टेंबर २०२२

Date : 13 September, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा खर्च १,८०० कोटी रुपये; विश्वस्तांची माहिती :
  • अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. त्यात आता राम मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे १,८०० कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती समोर आली आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या रामजन्मभूमी ट्रस्टची बैठक अयोध्या येथे पार पडली. या बैठकीत आतापर्यंत मंदिराचं झालेले निर्माण, खर्च यावरती चर्चा करण्यात आली. तसेच, तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार राम मंदिर उभारणीसाठी १,८०० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज रामजन्मभूमी निर्माण ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय यांनी व्यक्त केला.

  • त्याचसोबत राम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, शबरी आणि जटायू यांची मंदिरेही बांधण्यात येणार आहे. तर, मंदिराचे सर्व दरवाजे सागवान लाकडापासून बनवले जातील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

  • दरम्यान, यापूर्वी राम मंदिर निर्माणासाठी ११०० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज व्यक्त केला होता. “राम मंदिर तीन ते साडेतीन वर्षांत बांधले जाईल. त्यासाठी ३०० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च येईल. तर, संपूर्ण ७० एकर परिसराच्या निर्माणासाठी ११०० कोटींपेक्षा अधिक खर्च येणार आहे,” अशी माहिती रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी दिली होती.

मोदींच्या वाढदिवशी १२०० भेटवस्तूंचा लिलाव; १०० रुपयांपासून बोलीला सुरुवात, कसा घ्याल सहभाग :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा वयाच्या ७३ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी म्हणजेच मोदींच्या वाढदिवसासाठी भाजपकडून अनेक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबिवण्यात येणार आहेत. यातीलच एक म्हणजे दरवर्षी मोदींच्या वाढदिवस सप्ताहात पार पडणारा लिलाव कार्यक्रम. यंदाही मोदींना भेट म्हणून मिळालेल्या तब्बल १२०० वस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावातून मिळणारे पैसे नमामी गंगे मोहिमेसाठी दान दिले जातील. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची हे चौथे वर्ष आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा लिलाव pmmementos.Gov.In या वेब पोर्टलद्वारे आयोजित केला जाईल आणि १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत हा लिलाव पार पडणार असल्याचे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे महासंचालक अद्वैत गडानायक यांनी सांगितले, या संग्रहालयातच भेटवस्तू प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

लिलावात यंदा कोणत्या वस्तू असणार?

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिलेली राणी कमलापतीची मूर्ती
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेली हनुमानाची मूर्ती आणि सूर्यचित्र
  • हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी भेट दिलेले त्रिशूल यांचा समावेश आहे.
  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट दिलेली कोल्हापूर येथील महालक्ष्मीची मूर्ती
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी भेट दिलेल्या भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्ती
  • पदक विजेत्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट, बॉक्सिंग ग्लोव्हज, भाला आणि रॅकेट
  • चित्रे, शिल्पे, हस्तकला व पारंपारिक अंगवस्त्र, शाल, टोपी-फेटे, औपचारिक तलवारी
  • अयोध्येतील श्री राम मंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृती
एलिझाबेथ यांच्याप्रमाणेच नि:स्वार्थपणे कर्तव्यपालन करू - राजे चार्ल्स ; ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पहिलेच भाषण 
  • आपण घटनात्मक सरकारच्या अनमोल सिद्धांतांचे अनुसरण करणार असून, आपल्या दिवंगत मातु:श्री महाराणी एलिझाबेथ यांनी घालून दिलेल्या नि:स्वार्थी कर्तव्याच्या वस्तुपाठाचे पालन करू, असा संकल्प ब्रिटनचे महाराज चार्ल्स तृतीय यांनी सोमवारी केला. राज्यारोहणानंतर ‘ब्रिटनचे महाराजा’ या नात्याने ब्रिटिश पार्लमेंटला संबोधित करताना ते बोलत होते.

  • लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर सभागृहात ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आणि ‘हाऊस ऑफ लॉर्डस’द्वारे व्यक्त केलेल्या भावनांना उत्तर देताना महाराज चार्ल्स तृतीय यांनी इतिहासाचा आढावा घेतला व आपल्या मातु:श्रींच्या कारकीर्दीतील अनेक प्रतीकांचा उल्लेख केला. ते म्हणाले, की कमी वयातच त्यांच्याकडे महाराणीपद आले.

  • त्यानंतर त्यांनी आपला देश आणि देशवासीयांच्या सेवेसाठी, तसेच संवैधानिक सरकारच्या अनमोल सिद्धांत पालनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. त्यांनी मोठय़ा निष्ठेने या कटिबद्धतेचे पालन केले व नि:स्वार्थी कर्तव्याचा वस्तुपाठ घालून दिला. त्याचे ईश्वर आणि आपल्या सर्वाच्या साक्षीने अनुपालन करण्याचा संकल्प मी करतो. यावेळी त्यांनी पार्लमेंट सदस्यांशी आपल्या संबंधांबाबत भाष्य करत ‘ब्रिटिश पार्लमेंट’ ही देशाच्या ‘लोकशाहीची जीवनव्यवस्था’ असल्याचे सांगून दिवंगत महाराणी व ‘पार्लमेंट’च्या संबंधांचा आढावा घेतला.

आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला कोट्यवधींचे बक्षीस; पाकिस्तानने किती रुपये जिंकले पाहा :
  • एकीकडे देशात बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना चार आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली. वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू खेळी, भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी मात करून सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले.

  • आर्थिक संकटामुळे राजकीय अशांती पसरलेल्या श्रीलंकेला या विजयांनंतर कोट्यवधींचे बक्षिसांची रक्कम मिळाली आहे. आशिया चषकातील उपविजेते पाकिस्तानवरही बक्षिसांचा वर्षाव झाला. या दोन्ही संघांना किती रुपयांचे बक्षीस मिळाले जाणून घ्या.

  • आशिया चषक २०२२ चे विजेते म्हणजेच श्रीलंकेच्या संघाला सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दीड लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. दुसरीकडे, पाकिस्तानला आशियाई क्रिकेट काउन्सिल (ACC) कडून बक्षीस म्हणून सुमारे ६० लाख रुपये मिळाले.

  • याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्येही श्रीलंकेची चांदी झाली. प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणारा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याला सुमारे १२ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. अंतिम फेरीतील सामनावीर ठरलेल्या भानुका राजपक्षेला सुमारे ४ लाख रुपये तर बेस्ट कॅच ऑफ द मॅचसाठी ३ हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे.

संक्षिप्त धावफलक

  • श्रीलंका : २० षटकांत ६ बाद १७० (भानुका राजपक्षे नाबाद ७१, वानिंदू हसरंगा ३६; हॅरिस रौफ ३/२९) विजयी वि. पाकिस्तान : २० षटकांत सर्वबाद १४७ (मोहम्मद रिझवान ५५, इफ्तिकार अहमद ३२; प्रमोद मदूशान ४/३४, वानिंदू हसरंगा ३/२७)

टी २० विश्वचषकात भारत- पाक कधी येणार आमनेसामने? पाहा सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक :
  • आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताचा संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या मैदानात उतरणार आहे. आशिया चषकाप्रमाणेच विश्वचषकासाठी सुद्धा के. एल. राहुलवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाची बांधणी झाली असून यावेळी संघात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याची वापसी झाली आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजा मात्र अजूनही शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरा झाला नसल्याने संघात दिसणार नाही. आयसीसी टी २० विश्वचषकात आता भारताचे सामने कधी असणार याचे वेळापत्रक सविस्तर जाणून घेऊयात..

  • आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर १२ मध्ये आहेत. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यापैकी २ संघांना १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या पात्रता फेरीत आपले बळ सिद्ध करून सुपर १२ मध्ये स्थान मिळवता येणार आहे. टी २० विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत, यामध्ये भारत एकूण पाच सामने खेळणार आहे.

भारताचे टी २० विश्वचषकाचे सामन्यांचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध पाकिस्तान – २३ ऑक्टोबर (मेलबर्न)
  • भारत विरुद्ध (ग्रुप A) मधील उपविजेते- २७ ऑक्टोबर (सिडनी)
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ३० ऑक्टोबर (पर्थ)
  • भारत विरुद्ध बांग्लादेश – २ नोव्हेंबर (एडिलेड)
  • भारत विरुद्ध (ग्रुप B) विजेते – ७ नोव्हेंबर (मेलबर्न)

१३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.