चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 13, 2021 | Category : Current Affairs


बांगलादेशात ५४३ दिवसांनी शाळा सुरू :
 • बांगलादेशात रविवारी शाळा सुरू करण्यात आल्या असून हजारो विद्यार्थी शाळेत परतले आहेत. करोनामळे ५४३ दिवस शाळा बंद होत्या. पण आता करोनाची परिस्थिती सुधारल्याने शाळा परत सुरू करण्यात आल्या आहेत तसेच लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे.

 • वृत्तवाहिन्यांनी विद्यार्थी त्यांच्या गणवेशात शाळेत उपस्थित असल्याचे दाखवले. मुलांच्या चेहऱ्यावर स्मित  हास्य होते. त्यांनी मुखपट्ट्या घातलेल्या असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. अनेक मुले बराच काळ आधीच शाळेत येऊन बसली होती इतकी त्यांना शाळेची ओढ लागली होती.

 • अनेक शाळांत शिक्षकांनी फुले व चॉकलेट देऊन मुलांचे स्वागत केले. पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश देण्यात आला नाही. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. शिक्षण मंत्री दिपू मोनी यांनी सांगितले की, सुरक्षा उपायांमध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाही.

 • प्रत्येक इयत्तेचे वर्ग आठवड्यात सुरुवातीला एकदाच  होतील व आरोग्यविषयक नियम पाळले जातील. जर संसर्ग पुन्हा वाढेल असे दिसले तर ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यात येतील.

पाकिस्तानकडून काश्मीरबाबत भारतविरोधी कागदपत्रे :
 • काश्मीरमध्ये भारतीय अधिकारी मानवी हक्कांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करणारी कागदपत्रे (दस्तावेज) पाकिस्तानने रविवारी जारी केली आहेत. परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ व मानवी हक्क मंत्री शिरीन मझारी यांच्यासमवेत १३१ पानांची कागदपत्रे जारी केली.

 • त्यासाठी इस्लामाबाद येथे खास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांनी सांगितले, की भारत सरकारचा खरा चेहरा व भूमिका उघड करण्यासाठी भूमिका पार पाडणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. जगातील मोठी लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या देशातील एका भागात मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे.

 • भारताने पाकिस्तानला नेहमीच असे निक्षून सांगितले आहे, की जम्मू काश्मीर हा भारताचा एकात्म भाग आहे.

 • पाकिस्तानने वास्तव स्वीकारले पाहिजे तसेच भारतविरोधी प्रचार थांबवला पाहिजे असेही भारताने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. जम्मू काश्मीर ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे अनेकदा  स्पष्ट करण्यात आले आहे. कुरेशी यांनी सांगितले,की आम्ही आंतरराष्ट्रीय २६ प्रसारमाध्यमांसह भारताचे ४१ व पाकिस्तानच्या १४ जणांसमक्ष ही ११३ पानी कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांनी सांगितले,की आम्ही संयुक्त राष्ट्रांना युद्ध गुन्ह्यात सामील असलेल्या गटांची व व्यक्तींची नावे नोंद करून त्यांच्याविरोधात निर्बंध लागू करण्याचे आवाहन करीत आहोत. भारत काश्मीरमध्ये रासायनिक युद्धही खेळत असून रासायनिक अस्त्रे जाहीरनाम्याचे हे उल्लंघन आहे. त्याची निष्पक्ष चौकशी करण्याची गरज आहे.

“बदलीसाठी कर्मचारी आग्रह करू शकत नाही, तो अधिकार…”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय :
 • सरकारी नोकरी असो वा खासगी नोकरी असो, आपल्यापैकी अनेक कर्मचारी बदलीसाठी प्रयत्न करत असतात. सरकारी नोकरीमध्ये बदलीसाठी एक निश्चित प्रक्रिया आणि नियम देखील असतात. खासगी क्षेत्रात मात्र बदलीवरून अनेकदा मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतं. उत्तर प्रदेशातील अशाच एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बदलीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार इच्छित स्थळी बदली करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना विनंती करता येईल, मात्र विशिष्ट ठिकाणी बदलीचा आग्रह करता येणार नाही”, असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं.

 • सोमवारी झालेल्या या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अमरोहामधील राजकीय महाविद्यालयामध्ये याचिका करणाऱ्या महिला मानसशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम करतात.. मात्र, त्यांना नोएडामध्ये पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये बदली करून हवी होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने यासंदर्भातली त्यांची याचिका १४ सप्टेंबर २०१७मध्ये फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.

 • “एखाद्या कर्मचाऱ्याची एखाद्या ठिकाणी बदली करणे किंवा न करणे यासाठी कर्मचारी आग्रह करू शकत नाही. हा निर्णय नोकरी देणाऱ्यांवर अवलंबून असतो. गरजेनुसार ते या बदल्या करत असतात”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं. दरम्यान, याचिकाकर्त्या प्राध्यापिकेने नोएडामधील ज्या महाविद्यालयात बदली करून मागितली होती, त्याच ठिकाणी त्यांनी २००० ते २०१३ ही १३ वर्ष नोकरी केली होती. त्यावरून देखील न्यायालयाने त्यांना सुनावलं.

राज्यात आज ३,०७५ रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९७.०५ टक्के :
 • गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर गेल्या काही दिवसात रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली होती. राज्यातही अशीच काहीशी स्थिती गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे. मात्र आज राज्यात करोना रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ७५ रुग्णांची नोंद झाली आहे.

 • गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे. दुसरीकडे ३ हजार ५६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २ हजार ८१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०५ टक्के इतकं झालं आहे. राज्यात दिवसभरात ३५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका आहे. राज्यात आता ४९ हजार ७९६ रुग्ण सक्रीय आहेत.

 • राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५८ लाख ३६ हजार १०७ रुग्णांपैकी ६४ लाख ९४ हजार २५४ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे करोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण हे ११.६३ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ७७२ रुग्ण होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर १,९५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

विराट कोहली देणार कर्णधारपदाचा राजीनामा? वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा असणार भारतीय संघाचा कर्णधार :
 • भारतीय क्रिकेट संघात पुढील काही दिवसांत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर एकदिवसीय आणि टी -२० कर्णधारपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रोहित शर्माला मर्यादित षटकांमध्ये भारताचा कर्णधार बनवण्याची शक्यता आहे. कोहली हा सर्व प्रकारच्या खेळासाठी भारताचा सध्याचा कर्णधार आहे.

 • टाईम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय विराट कोहली, जो सध्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे आणि भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने ३४ वर्षीय रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी या विषयावर दीर्घ चर्चा केली आहे.

 • सूत्रांच्या माहितीनुसार, तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाच्या दबावामुळे कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. कोहली असेही मानतो की त्याच्या फलंदाजीला सर्व फॉरमॅटमध्ये अधिक वेळ आणि अधिक वेग आवश्यक आहे. विराट स्वतः याची घोषणा करेल. त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे याची जाणीव आहे. त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जाते कारण त्याला त्याच्या फलंदाजीबद्दल माहिती आहे. २०२२ ते २०२३ दरम्यान भारताला दोन विश्वचषक (एकदिवसीय आणि टी -२०) खेळायचे आहेत, त्यामुळे कोहलीची फलंदाजी महत्त्वाची मानली जात आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल :
 • राजकीय अंदाज-आडाख्यांना चकवा देत आणि चर्चेत असलेल्या नावांवर फुली मारत भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांचे नाव रविवारी जाहीर केले. त्यांचा शपथविधी आज, सोमवारी दुपारी होईल.

 • विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. पटेल एकटेच सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणि वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी सांगितले.

 • मावळते मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. १८२ सदस्यांच्या विधानसभेतील भाजपच्या ११२ पैकी बहुतांश आमदार या बैठकीत हजर होते, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी, त्याचबरोबर सरचिटणीस तरुण चुग बैठकीला उपस्थित होते.

 • भूपेंद्र पटेल हे २०१७च्या विधानसभा निवडणुकीत घाटलोडिया मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार शशिकांत पटेल यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करून निवडून आले होते. त्या निवडणुकीतील हे सर्वांत मोठे मताधिक्य होते.

१३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)