चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ सप्टेंबर २०२०

Date : 13 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोनाविरोधात मोदींची नवी घोषणा :
  • करोना विषाणू प्रतिबंधक परिणामकारक अशा औषधाचा शोध लागेपर्यंत गाफील राहू नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकांना दिला आणि आपला मुद्दा पटवून देण्यासाठी ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’, असा नारा दिला.

  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागांत बांधल्या गेलेल्या १.७५ लाख घरांच्या आभासी गृहप्रवेश समारंभात भाषण करताना मोदी यांनी हा नारा दिला.

  • ‘‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं. दो गज की दूरी, मास्क है ज़रुरी,’’ असे मोदी म्हणाले. मध्य प्रदेशात शुक्रवारी रात्रीपर्यंत ८३६१९ लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून १६९१ लोक मृत्युमुखी पडले आहेत.

करोना काळातील ज्ञान दानाच्या यशस्वी कार्याबद्दल दत्ता मेघे विद्यापीठास पुरस्कार :
  • करोनाच्या संक्रमणकाळात तांत्रिक मदतीने विद्यादानाचे यशस्वी कार्य केल्याबद्दल ‘क्यू एस’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे वर्धा येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठास पुरस्कार देण्यात आला आहे.

  • क्यू एस म्हणजेच ‘क्वॅकरॅली सिमंड्स’ या संस्थेद्वारे जागतिक पातळीवर शासकीय, खासगी तसेच अभिमत विद्यापीठातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता तपासली जाते. त्यानुसार क्यू एस श्रेणी प्रदान होत असते. पुरस्कार हे संस्थेतील संशोधन कार्य व सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी व शिक्षक संवाद, नोकरीच्या संधी, सामाजिक योगदान, जनजागृती, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग व अन्य निकष पाहून दिल्या जातात. संस्थेतर्फे भारतातीलही उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचे अवलोकन व परिक्षण या संस्थेने केले होते.

  • कोविड‑१९ च्या काळात मेघे अभिमत विद्यापीठाने व्यावसायिक अभ्यासक्रमात अवलंबलेली ई‑लर्निंग शिक्षण प्रणाली अत्यंत प्रभावी ठरली. विद्यार्थी व शिक्षक यातील प्रतिबध्दता, शिक्षण व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर आणि नियमीत सराव या निकषावर या विद्यापिठाला पूर्ण गुण प्रदान करण्यात आले. या खेरीज विविध क्षेत्रात प्राप्त केलेल्या यशस्वी योगदानाचीही दखल क्यू एसद्वारे घेण्यात आली होती.

ग्रँडस्लॅम क्षितिजावर आज नव्या ताऱ्याचा उदय :
  • तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही ग्रँडस्लॅम उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिलेला डॉमिनिक थिम आणि पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा अलेक्झांडर झ्वेरेव्ह या नव्या ताऱ्यांना आता ग्रँडस्लॅम उंचावण्याची संधी रविवारी मिळणार आहे.

  • करोनामुळे अमेरिकेत प्रवास करण्यास नकार देणारा राफेल नदाल आणि दुखापतीमुळे वर्षभर टेनिसपासून दूर राहणारा रॉजर फेडरर यांच्या अनुपस्थितीत नोव्हाक जोकोव्हिच अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजला जात होता. पण जोकोव्हिचची अनपेक्षित हकालपट्टी झाल्यामुळे सहा वर्षांनंतर अमेरिकन स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे.

  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रियाच्या थिमने चौथ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असली तरी त्याच्यासमोर यंदा फेडरर, नदाल, जोकोव्हिच या टेनिसमधील मातब्बर त्रिकू टाचे आव्हान नसेल. त्यामुळे कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालण्याची संधी त्याच्यासमोर असेल.

  • झ्वेरेव्हने यावर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. आता अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून त्याने आपली कामगिरी उंचावली आहे. शुक्रवारी थिमने उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा ६-२, ७-६ (९-७), ७-६ (७-५) असा पाडाव केला होता. दोन सेटने पिछाडीवर पडल्यानंतरही झ्वेरेव्हने स्पेनच्या पाबलो बस्टाला ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ अशी धूळ चारली.

दिल्ली विधानसभा समितीकडून फेसबुकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्स :
  • दिल्ली विधानसभेच्या एका समितीनं द्वेषमूलक मजकूरप्रकरणी फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना समन्स बजावले असून १५ सप्टेंबरला समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडिया मंच या संघटनेकडून देशात द्वेषमूलक मजकूराचे प्रसारण रोखण्यात फेसबुककडून आवश्यक पावलं न उचलल्याबद्दलच्या तक्रारींवरुन समितीनं हा निर्णय घेतला आहे.

  • समितीनं शनिवारी निवेदनाद्वारे म्हटलं की, “हे समन्स प्रमुख साक्षीदारांनी दिलेला जबाब आणि त्यांनी नोंदवलेली आक्षेपार्ह माहिती सादर केल्यानंतर बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” दिल्ली विधानसभेच्या शांतात आणि सौहार्द समितीद्वारे हे समन्स वॉलस्ट्रीट जर्नलच्या त्या बातमीनंतर बजावण्यात आले आहे. ज्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे की, फेसबुकच्या भारतातील अधिकाऱ्याने तेलंगणातील भाजपाच्या एका नेत्यावर बंदी घालण्यापासून रोखले होते. या भाजापा नेत्यानं कथित स्वरुपात जातीयवादी आणि चिथावणी देणारी पोस्ट शेअर केली होती.

  • दिल्ली विधानसभेच्या उपसचिवांनी १० सप्टेंबर रोजी पाठवलेल्या नोटीशीत म्हटलं आहे की, “आम्ही तुम्हाला (अजित मोहन) विधानसभा परिसरात समितीसमोर १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता हजर राहण्याचा आदेश देत आहोत. यावेळी मोहन यांचा शपथपत्रावर जबाब नोंदवण्यात येणार आहे, तसेच समितीद्वारे करण्यात येत असलेल्या चौकशीत त्यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

१३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.