राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ ब्रिटन एक नाणं काढणार आहे. ब्रिटनचे मुख्य अर्थमंत्री साजिद जाविद यांनी ही माहिती दिली आहे. मूळ पाकिस्तानी वंशाचे असलेल्या ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी ब्रिटनच्या रॉयल मिंटला याबाबत आदेश दिले आहेत. महात्मा गांधींचे विचार कधीही विसरले जाऊ नयेत यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात काही पुरस्कारांचे वाटप करण्यात आले, यावेळी जाविद बोलत होते. ते म्हणाले, “गांधींच्या स्मरनार्थ ब्रिटन एक नाणं प्रकाशित करणार आहे हे सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. गांधींनी जगाला जो संदेश दिला तो आपण कधीही विसरू शकत नाही. सत्ता ही केवळ संपत्तीतून किंवा उच्च पदामुळे मिळत नाही. जेव्हा गांधी ब्रिटनमध्ये होते तेव्हा त्यांच्याकडून आपल्या पालकांनी त्यांची मुल्यं आत्मसात केली. ती मुल्य आजही आपण जपली आहेत.”
नुकतीच २ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधींची १५० वी जयंती भारतासह जगभरात उत्साहात साजरी करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील राजकारणात महात्मा गांधी ही व्यक्ती नेहमीच अग्रभागी राहिली. त्यांच्या सत्याग्रह आणि अहिंसा या तत्वांचा जगात गौरव केला जातो. ब्रिटनमध्ये वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या आणि नंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या महात्मा गांधींचे तिथे एक विशेष आदराचे स्थान आहे.
अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत. तर या यादीमध्ये अदानींने आठ स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे.
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार ६२ वर्षीय मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ बिलियन डॉलर (अंदाजे ३ लाख ७० हजार कोटी) इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अदानी यांची संपत्ती १५.७ बिलियन डॉलर (अंदाजे १ लाख १५ हजार कोटी) इतकी आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये उद्योजक हिंदूजा बंधू, बांधकाम क्षेत्रातील पलोनजी मिस्त्री, बँकर उदय कोटक, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव असणारे शीव नादार, गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानिया, गोदरेज कुटुंबिय, पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल, उद्योजक कुमार बिर्ला यांचा समावेश आहे.
तर देशातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सहा जणांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. यामध्ये बायजू या अॅपचे संस्थापक बायजू रविंद्रन, हल्दीरामचे मनोहर लाल आणि मधुसूदन अग्रवाल, टाइल्स व अन्य उत्पादने करणारी जॅग्वार या कंपनीचे मालक राजेश मेहरा यांचा पहिल्यांदाच अव्वल १०० श्रीमंतांमध्ये समावेश झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात दुसऱ्या अनौपचारिक परिषदेत काश्मीर मुद्दा उपस्थित झाला नाही किंवा त्यावर चर्चा झाली नाही अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. दोन्ही नेत्यांच्या चर्चेत काश्मीरचा विषय आला नाही. आमची भूमिका यावर स्पष्ट आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे अशी माहिती गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीत काश्मीर मुद्दावर चर्चा झाली होती. त्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. काश्मीर मुद्यावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनला त्याची कल्पना आहे.
भारताच्या अंतर्गत विषयावर अन्य देशांनी त्यांचे मत नोंदवू नये असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार या आठवडयात म्हणाले होते. इम्रान खान आणि जिनपिंग यांच्या बैठकीनंतर चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनात चीनचे काश्मीरमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार शांततामय मार्गाने तोडगा काढावा असे म्हटले होते.
आर्थिक विकासाचा वेग मंदावलेली भारताची अर्थव्यवस्था वाढत्या तुटीमुळे ‘चिंताजनक’ अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. तिची प्रकृती गंभीर होण्याची चिन्हे आहेत, असा इशारा रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.
अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात झालेल्या ओ. पी. जिंदाल व्याख्यानमालेत रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यववस्थेबद्दल गंभीर भाष्य केले. निश्चलनीकरण आणि घाईघाईत केलेली वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी हेघटकही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्यास कारणीभूत ठरले, असे निदान राजन यांनी केले.
भारताचा विकास दर २०१६च्या पहिल्या तिमाहीत ९ टक्के होता. तेथून तो घसरण्यास सुरुवात झाली. जून २०१९ला संपलेल्या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकासाचा दर गेल्या सहा वर्षांत सर्वात कमी म्हणजे ५ टक्क्यांवर आला. त्यामुळे २०१९-२० या वर्षांसाठी हा दर ६.१ इतका कमी होईल, असा अंदाज रिझव्र्ह बँकेने व्यक्त केला आहे.
आर्थिक विकासाचा दर खूप घसरला असून, वित्तीय तूटही मोठी असल्यामुळे विकासाबाबत फार काही करण्यास वाव नाही. रिझव्र्ह बँकेने व्यक्त केलेला अंदाज हा नजीकच्या काळात या परिस्थितीत बदल होणार नसल्याचेच निदर्शक आहे. राज्ये आणि केंद्र यांच्या ७ टक्के इतक्या एकत्र वित्तीय तुटीपेक्षा प्रत्यक्ष वित्तीय तूट आणखी जास्त असू शकते, असे राजन म्हणाले.
चेन्नईतील चर्चेने भारत व चीन यांच्यात सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी मोदी यांची येथे साडेपाच तास अनौपचारिक चर्चा झाली. त्यानंतर मोदी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
जिनपिंग यांच्याशी दोन दिवसांत ममलापूरम (महाबलीपुरम) या सागर किनाऱ्यावरील निसर्गरम्य ठिकाणी मोदी यांची चर्चा झाली.
जिनपिंग यांनी सांगितले की, एकमेकांची मने जाणून घेत प्रामाणिकपणे चर्चा झाली. ही द्विपक्षीय चर्चा अधिक सखोल व चांगली झाली. भारत व चीन यांच्यातील संबंध विस्तारणे हेच आमच्या सरकारचे ठोस धोरण आहे.
शिष्टमंडळ पातळीवर बोलणीपूर्वी दोन्ही नेत्यांनी जी प्रस्तावना केली त्यातून दोन्ही देशांच्या संबंधांना नवे परिमाण लाभण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर चीन व भारत यांच्यात काही प्रमाणात कटुता असली तरी त्यावर मात करण्याचे संकेत देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन
महत्वाच्या घटना
१७७३: चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
१८८४: ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
१९२३: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली.
१९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
१९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
१९४६: फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
१९७०: फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९८३: अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.
जन्म
१८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९४६)
१९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००१)
१९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२)
१९२५: ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)
१९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९९६)
१९४१: इंग्लिश क्रिकेटपटू जॉन स्नो यांचा जन्म.
१९४३: सऊबर एफ १ चे संस्थापक पीटर सऊबर यांचा जन्म.
१९४८: पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)
मृत्यू
१९६५: डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९९ - ओल्टेन, स्वित्झर्लंड)
१२४०: दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन.
१२८२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १२२२)
१९११: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८६७)
१९३८: पॉपॉय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९४)
१९४५: द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक मिल्टन हर्शे यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)
१९८७: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)
१९९५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल यांचे निधन. (जन्म: १ मे १९१५ - किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)
२००१: कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन.
२००३: नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस यांचे निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.