चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ मे २०२१

Updated On : May 13, 2021 | Category : Current Affairs


प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती नेमा :
 • प्रत्येक जिल्ह्यात येत्या ४८ तासांत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, लसधोरण स्पष्ट करावे, असे अनेक निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारला दिले.

 • न्या. सिद्धार्थ वर्मा व न्या. अजित कुमार यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशातील करोना हाताळणीबाबतच्या अनेक मुद्यांची दखल घेतली. सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मृत्यूची आकडेवारी ही न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आकडेवारीशी विसंगत असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. गोरखपूर, लखनऊ, प्रयागराज, गौतम बुद्ध नगर, कानपूर येथील नोडल अधिकाऱ्यांच्या अहवालाचा विचार केल्यास सरकारी आकडेवारीपेक्षा वेगळे चित्र दिसते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 • राज्यात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या ९ जिल्ह्यांमध्ये न्यायिक अधिकारी नेमण्याचा आदेश उच्च न्यायालयाने २७ एप्रिलला दिला होता. हे ९ जण विभागीय अधिकारी म्हणून काम करतील आणि राज्यातील करोनाविषयक परिस्थितीची दर आठवड्याच्या अखेरीस आपल्याला माहिती देतील, असे न्यायालयाने म्हटले होते.

 • आता प्रत्येक जिल्ह्यात तीन सदस्यांची ‘महामारी सार्वजनिक तक्रार निवारण समिती’ स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या समितीत मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा जिल्हा न्यायाधीशांनी नामनिर्देशित केले समकक्ष न्यायिक अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या समकक्ष प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश राहील. आदेश जारी केल्यापासून ४८ तासांच्या आत या समित्या अस्तित्वात यायला हव्यात, असे न्यायालयाने सांगितले.

बी.१.६१७ विषाणूचा ४४ देशात फैलाव :
 • भारतात फैलाव झालेला बी.१.६१७ हा करोना विषाणूचा प्रकार ४४ देशात पसरला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. दरम्यान ही जागतिक पातळीवर चिंतेची बाब असल्याचे संघटनेने मंगळवारीच जाहीर करताना या विषाणूला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ या गटात टाकले आहे.

 • संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की दोन उत्परिवर्तनांमुळे या विषाणूची संसर्गजन्यता जास्त आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचा समावेश या गटात करण्यात आला आहे. ११ मे पर्यंत जनुकीय क्रमवारीचे ४५०० नमुने ‘गिसएड’ या जागतिक माहिती संचात टाकण्यात आले असून त्यात ४४ देशांमध्ये व सहा विभागात हा विषाणू पसरल्याचे दिसून आले आहे.

 • ‘गिसएड’ हा जागतिक वैज्ञानिक उपक्रम असून त्यात विषाणूच्या जनुकीय क्रमवारीची माहिती जमा करण्यात येत असते. जागतिक आरोग्य संघटनेने बी.१.६१७ हा जागतिक चिंता निर्माण करणारा विषाणू असल्याचे जाहीर केल्यानंतर तो धोकादायक असल्याचे स्पष्ट  झाले आहे.

 • चीनमध्येमध्ये सापडलेल्या मूळ विषाणूपेक्षा हा विषाणू पूर्णपणे वेगळा असून त्यात दोन उत्परिवर्तने झाली असून त्याची संसर्गजन्यता, घातकता, लशींचा प्रतिरोध जास्त आहे. सुरुवातीला या विषाणूत दोन उत्परिवर्तने दिसली असली तरी आता ती तीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विषाणू ऑक्टोबर २०२० मध्ये प्रथम भारतात सापडला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यात पुन्हा बदल झाले.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, राज्य सरकारचा निर्णय :
 • कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत  १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

 • आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  राज्यातलं १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

 • सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकऱण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये असंही त्यांनी सांगितलं. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 • ते पुढे म्हणाले की २० तारखेनंतर सिरमक़डून लसींचे अधिक डोस उपलब्ध होणार आहेत त्यामुळे त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेत.

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल - मँचेस्टर सिटीचे चार वर्षांत तिसऱ्यांदा जेतेपद :
 • दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर युनायटेडला मंगळवारी लिस्टर सिटीकडून १-२ अशा पराभवाला सामोरे जावे लागल्याने मँचेस्टर सिटीच्या इंग्लिश प्रीमियर लीगच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. मँचेस्टर सिटीचे हे गेल्या चार वर्षांतील तिसरे जेतपद ठरले.

 • मँचेस्टर सिटीने आता तीन सामने शिल्लक राखून १० गुणांची निर्णायक आघाडी घेतली आहे. मँचेस्टर युनायटेडचे वर्चस्व मोडीत काढत सिटीने आता गेल्या १० मोसमात पाच जेतेपदांची कमाई केली आहे. मँचेस्टर युनायटेडचा पराभव झाल्यानंतर सिटीच्या चाहत्यांनी विजयाचा जल्लोष केला.

 • आता २३ मे रोजी एव्हर्टनविरुद्ध होणाऱ्या मोसमातील अखेरच्या सामन्यानंतर मँचेस्टर सिटीला जेतेपदाचा चषक उंचावताना पाहण्याची संधी १० हजार चाहत्यांना मिळेल. सिटीने या मोसमात चौथ्यांदा लीग चषकाचे जेतेपद मिळवले. त्याचबरोबर चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदाची संधीही त्यांना मिळणार आहे.

“…किमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा,” ICMR च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य :
 • करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केलं आहे. काही राज्यांमध्ये जिल्हास्तरावर लॉकडाउनचा निर्णय घेतला जात असून नागरिकांवर निर्बंध आणले जात आहे. दुसरीकडे देशातही लॉकडाउन लावला जावा अशी मागणी काही राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

 • करोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन ठेवला पाहिजे असं मत बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणीमध्ये संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे आहे तिथे लॉकडाउन लावण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

 • सध्या भारतातील ७१८ जिल्ह्यांपैकी भारताच्या तीन चतुर्थांश भागात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई तसंच बंगळुरुचा समावेश आहे. बलराम भार्गव यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने करोनाला रोखण्यासाठी आधीच अनेक ठिकाणी लागू करण्यात आलेला लॉकडाउन किती काळ असला पाहिजे यावर भाष्य केलं आहे.

१३ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)