चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ मे २०२०

Date : 13 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातील करोना मृत्युदर जगात सर्वात कमी :
  • इतर देशांपेक्षा भारतात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे सुमारे ३.२ टक्के इतके आहे. काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. या तुलनेत जागतिक करोना मृत्युदर ७.५ टक्के राहिलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी दिली.

  • जगभरात ४१ लाख लोक करोनाग्रस्त झाले असून त्यापैकी आत्तापर्यंत २ लाख ८५ हजार रुग्ण दगावले. भारतात २२९३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • केंद्रीय आरोग्यमंत्री राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मंगळवारी हर्षवर्धन यांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशात केवळ मृत्यूचा दर कमी आहे असे नव्हे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. हे प्रमाण आता ३१.७० टक्क्यांवर पोहोचलेले आहे.

  • देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२,४५५ इतकी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १५३८ रुग्ण बरे झाले. मात्र देशभरातील करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७० हजाराच्या घरात गेली असून मंगळवारी ती ७०,७५६ इतकी झाली. सोमवारी एका दिवसात चार हजारहून अधिक रुग्णांची भर पडली होती. गेल्या चोवीस तासांमध्ये ३६०४ नवे रुग्ण आढळले व ८७ रुग्णांचा मृत्यू झाला.

२० लाख कोटींची मदत :
  • देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल, असे पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले.

  • करोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू झाले असले, तरी रोजगारनिर्मिती करणाऱ्या विविध उद्योगांसाठी केंद्राने आर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. यासंदर्भात गेल्या आठवडय़ात निरनिराळ्या क्षेत्रांतील प्रतिनिधींशी चर्चाही केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची बुधवारपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देतील, असे मोदींनी स्पष्ट केले.

  • करोनाच्या आपत्तीनंतर केंद्राने, तसेच रिझव्‍‌र्ह बँकेने वेळोवेळी जाहीर केलेल्या मदतीचाही ‘आत्मनिर्भर भारत मदत योजने’त समावेश असेल. हा मदतनिधी देताना जमीन, रोजगार, रोखता आणि नियम या चारही आर्थिक बाबींचा विचार करण्यात आला आहे. त्याद्वारे वस्त्रोद्योग, सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग, मजूर, मध्यम वर्ग, उद्योग यांना साह्य़ केले जाईल, असेही मोदी म्हणाले. टाळेबंदीत हालअपेष्टा सहन करणाऱ्या लाखो स्थलांतरित मजुरांचाही मोदींनी उल्लेख केला. या मजुरांच्या कल्याणावरही आर्थिक मदतीतून लक्ष केंद्रित केले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोठा निधी :
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारासाठी एप्रिलमध्ये ६१.७  दशलक्ष डॉलरचा  निधी जमवण्यात आला आहे.त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या प्रचारासाठी ६०.५ दशलक्ष डॉलरचा निधी जमवला आहे.

  • अध्यक्षीय निवडणूक ३ नोव्हेंबरला होणार असून दोन्ही उमेदवारांनी निधी जमवणे सुरू ठेवले आहे. संसर्गाच्या भीतीमुळे सध्या दोन्ही उमेदवारांच्या कुठल्याही जाहीर सभा आयोजित करण्यात आलेल्या नाहीत.

  • अमेरिकेत आत्तापर्यंत करोनाने ८० हजार बळी गेले असून १३ लाख ४७ हजार जणांना संसर्ग झाला आहे.  रिपब्लिकन राष्ट्रीय समितीने म्हटले आहे, ट्रम्प फॉर प्रेसिडेंट इन्कार्पोरेशन व  रिपब्लिकन राष्ट्रीय समिती यांनी एप्रिल अखेर ६१.७ दशलक्ष डॉलर जमवले आहेत. डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीने एप्रिलमध्ये जो बिडेन यांच्यासाठी ६०.५ दशलक्ष डॉलर्स जमवले आहे. एप्रिलमध्ये ३२.६३ डॉलर ऑनलाइन मदत मिळाली असून एप्रिलअखेर ६०.५ दशलक्ष डॉलर निधी जमवण्यात आला आहे.

भारताला फायदा होईलच असे नाही- बॅनर्जी :
  • चीनमधून करोना साथीमुळे बाहेर पडलेले उद्योग आपल्याकडे वळवल्याने  भारताला फायदाच होईल याची कुठलीही खात्री नाही,असे मत नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.

  • बंगाली वृत्तवाहिनीला त्यांनी सांगितले,की सर्व जण चीनला करोना विषाणूचा उगम तेथून झाल्याबाबत दोष देत आहेत. चीनमधील उद्योग आता बाहेर पडतील व त्यांना भारताकडे वळवले पाहिजे असा आग्रह केला जात आहे. पण  त्यातून फायदा होईलच याची कुठली खात्री नाही.

  • पश्चिम बंगाल सरकारने नेमलेल्या जागतिक सल्लागार मंडळाचे बॅनर्जी हे सदस्य असून त्यांनी करोना १९ चा मुकाबला करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात राज्य सरकारला मदत केली आहे.

१९ मे पासून एअर इंडिया देशांतर्गत सोडणार विशेष विमाने :
  • लॉकडाउनमुळे देशाच्या वेगवेगळया भागात अडकलेल्या नागरिकांसाठी एअर इंडिया १९ मे ते दोन जून दरम्यान देशांतर्गत विशेष विमाने सोडणार आहे. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतता यावे, यासाठी देशाच्या वेगवेगळया शहरांदरम्यान ही विशेष विमाने उड्डाण करतील.

  • १८ मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होईल. चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम पूर्णपणे नवीन असतील असे मोदींनी काल जाहीर केले. या हवाई प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटाचे पैसे भरावे लागणार असून अजून बुकिंग सुरु झालेली नाही.

  • दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या चार प्रमुख महानगरांदरम्यान सर्वाधिक विमाने सोडण्यात येतील.

  • दिल्लीहून १७३, मुंबईहून ४०, हैदराबादहून २५ आणि कोचीहून १२ विमाने उड्डाण करतील. दिल्लीहून जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ या शहरांमध्ये विमाने सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद आणि विजयवाडा या शहरांमध्ये विशेष विमाने सोडण्यात येतील.

१३ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.