चालू घडामोडी आणि दिनविशेष - 13 जून 2023

Date : 13 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘कोविन’वरील भारतीयांची वैयक्तिक माहिती सुरक्षित, वृत्त खोडसाळ असल्याचे केंद्राचे स्पष्टीकरण
  • आरोग्य मंत्रालयाच्या कोविन पोर्टलवर असलेली माहिती (डेटा) फुटल्याच्या वृत्ताचे केंद्र सरकारने सोमवारी खंडन केले. कोविन पोर्टलवरील माहिती पूर्णपणे सुरक्षित असून तिच्या गोपनीयतेसाठी पुरेशी सुरक्षाव्यवस्था असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.कोविन पोर्टलवरील नोंदणीकृत लाभार्थ्यांची माहिती फुटल्याचा दावा करणारे वृत्त खोडसाळ आणि निराधार आहे. देशाची सायबर सुरक्षा संस्था ‘भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथका’ने (सीईआरटी-इन) या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला असून भारतीयांची माहिती फुटल्याचे आढळलेले नाही, असे केंद्राने म्हटले आहे.
  • केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने (सीईआरटी-इन) माहिती फुटल्याच्या कथित वृत्ताची त्वरित दखल घेऊन तपासणी केली असता सर्व भारतीयांची माहिती सुरक्षित असल्याचे आढळले.
  • टेलिग्राम ‘बीओटी’चा वापर करून लसीकरण झालेल्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती मिळवली जात आहे. लाभार्थीचा मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे त्यांची वैयक्तिक माहिती मिळवण्यात आली आहे, असा दावा ट्विटर या समाजमाध्यमांवरील काही संदेशांमध्ये करण्यात आला होता. परंतु तपासणीत हा दावा खोडसाळ असल्याचे निष्पन्न झाले, असे केंद्राने स्पष्ट केले.

चौकशीची विरोधकांची मागणी

  • कोविन पोर्टलवरील नागरिकांची माहिती फुटल्याच्या कथित घटनेच्या चौकशीची मागणी विरोधी पक्षांनी केली. हे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचा आरोप काँग्रेसने केला. सरकारचा डेटा संरक्षण कायद्या कशासाठी आहे? या प्रश्नाचे उत्तर संबंधित मंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली. तर हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.

घडले काय?

  • करोना लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांची संवेदनशील वैयक्तिक माहिती त्यांच्या आधार आणि पारपत्र क्रमांकांसह टेलिग्राम या समाजमाध्यमावरील एक स्वयंचलित खाते प्रसारित करीत आहे, असे वृत्त सकाळी पसरले होते. समाज-माध्यमांवरही तसे संदेश प्रसारित झाले होते.
यूपीएससी पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर; ‘या’ लिंकवरून लगेच चेक करा…
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा २८ मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. upsc.gov.in आणि upsconline.nic.in या संकेतस्थळवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.
  • यूपीएससी २०२२ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार दरवर्षीप्रमाणे रविवार २८ मे ला पूर्व परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रांत ही परीक्षा झाली. पहिल्या सत्रात सामान्य अध्ययनावर आधारित परीक्षा झाली, तर दुसऱ्या सत्रामध्ये सी-सॅटचा पेपर घेण्यात आला. या दोन्ही सत्रांतील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये

  • यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ आता १५ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित केली जाईल. पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार या परीक्षेला बसतील.
किरकोळ महागाईदराचा दोन वर्षांतील नीचांक, मे महिन्यात ४.२५ टक्क्यांवर
  • भाजीपाला, तृणधान्य किमती घसरल्यामुळे सरलेल्या मे महिन्यात किरकोळ महागाई दर २५ महिन्यांच्या नीचांकी ४.२५ टक्क्यांवर नोंदवला गेला. महागाई दरात घसरणीचा हा क्रम सलग चौथ्या महिन्यात कायम असून, रिझर्व्ह बँकेसाठी सहनशील मर्यादा पातळी अर्थात सहा टक्क्यांखाली तो नोंदवला जाण्याचा हा सलग तिसरा महिना आहे.
  • ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर आधीच्या एप्रिल महिन्यात ४.७ टक्के पातळीवर होता, तर गेल्या वर्षी म्हणजे मे २०२२ मध्ये तो ७.०४ टक्के अशा चिंताजनक पातळीवर होता. एप्रिल २०२१ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ४.२३ टक्क्यांच्या महागाई दरानंतर नोंदवला गेलेला सर्वात कमी दर आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये महागाई दर ४ टक्क्यांच्या पातळीखाली नोंदवला गेला होता.
  • अन्नधान्य घटकाच्या किमती घट झाल्याचा परिणाम मे महिन्याच्या एकंदर महागाई दरातील घसरणीत दिसून आला. एप्रिलमध्ये ३.८४ टक्के नोंदवलेली अन्नधान्यांच्या किमतीतील वाढ ही मे महिन्यात २.९१ टक्क्यांवर घसरली. ग्राहक किंमत निर्देशांकांत जवळपास निम्मा वाटा हा अन्नधान्य घटकाचा आहे. बरोबरीने इंधन आणि विजेच्या महागाईचा दरही एप्रिलमधील ५.५२ टक्क्यांवरून मागील महिन्यात ४.६४ टक्क्यांवर आला.

व्याजदर कपात शक्य?

  • गेल्या आठवडय़ात रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना रेपो दर ६.५ टक्क्यांच्या पातळीवर कायम ठेवून चलनवाढीतील ताज्या उताराच्या शाश्वततेबद्दल साशंकता व्यक्त केली. ’महागाईवर ‘अर्जुनासारखा नेम’ रोखून धरणे गरजेचे असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले होते.
  • ’चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ चलनवाढीचा दर सरासरी ५.१ टक्के आणि एप्रिल ते जून तिमाहीत तो ४.६ टक्क्यांवर राहण्याचे मध्यवर्ती बँकेचे अनुमान आहे. प्रत्यक्षात मे महिन्याची आकडेवारी ही या अंदाजाहून अधिक घसरण दर्शविणारी आहे.’एल-निनोच्या परिणामाच्या शक्यता असतानाही यंदा पाऊसपाणी सामान्य राहिल्यास, महागाई दराच्या घसरणीचा क्रम टिकून राहील आणि नजीकच्या काळात व्याजदर कपातही दिसून येईल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जोकोव्हिच ‘एटीपी’ क्रमवारीत पुन्हा अग्रस्थानी, श्वीऑनटेकचे ‘डब्ल्यूटीए’ क्रमवारीतील अव्वल स्थान कायम
  • फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या विजेतेपदासह विक्रमी २३वा ग्रँडस्लॅम जिंकणारा नोव्हाक जोकोव्हिच ‘एटीपी’ क्रमवारीत स्पेनच्या कार्लोस अल्कराझला मागे टाकत पुन्हा एकदा अग्रस्थानी पोहोचला आहे. ५० वर्षांहून अधिक काळापूर्वी सुरू झालेल्या संगणकीकृत क्रमवारीत सर्वाधिक काळ शीर्षस्थानी राहणारा पुरुष किंवा महिला खेळाडूचा विक्रम आपल्या नावे करणारा जोकोव्हिच आपल्या विक्रमात आणखी सुधार करेल.जोकोव्हिच फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून सहभागी झाला होता.
  • मात्र, अंतिम सामन्यात कॅस्पर रूडला ७-६ (७-१), ६-३, ७-५ असे पराभूत करण्यात जोकोव्हिचला यश मिळाले. सध्या ‘एटीपी’ क्रमवारीत अल्कराझ दुसऱ्या आणि डॅनिल मेदवेदेव तिसऱ्या स्थानी आहे. तर रूडने आपले चौथे स्थान कायम ठेवले आहे.
  • दुखापतींचा सामना करत असलेला स्पेनचा राफेल नदाल शीर्ष १०० खेळाडूंच्याही बाहेर फेकला गेला आहे. तो सध्या १३६व्या स्थानावर आहे.महिला एकेरीचे जेतेपद पटकावणारी पोलंडची इगा श्वीऑनटेक ‘डब्ल्यूटीए’ क्रमवारीत अग्रस्थानी कायम आहे.

 

विश्वचषक पॅरानेमबाजी स्पर्धा - अवनीला दुसरे सुवर्ण :
  • भारताची युवा पॅरानेमबाज अवनी लेखराने फ्रान्स येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा क्रीडा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. अवनीने महिलांच्या आर८ गटातील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन एसएच१ गटात सुवर्ण कामगिरी केली.

  • अवनीने ४५८.३ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. तर व्हेरॉनिका व्हादोव्हिकोव्हा (४५६.६ गुण) आणि स्वीडनची अ‍ॅना नॉर्मन (४४१.९ गुण) या अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवण्यात यशस्वी ठरल्या.

  • राजस्थानच्या अवनीला अंतिम फेरीच्या सुरुवातीला अपेक्षित खेळ करता आला नाही. मात्र, अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये सलग १० गुणांवर लक्ष्य साधत त्याने विजय साकारला. लेखराने यापूर्वी महिलांच्या आर२ गटातील १० मीटर एअर रायफल एसएच१ प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.

  • दुसरीकडे, भारताची युवा पॅरानेमबाज रुबीना फ्रान्सिसने  महिलांच्या पी२ गटातील १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ प्रकारात  कांस्यपदक पटकावले.

युवा जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा - भारताला दोन रौप्यपदके :
  • आकांक्षा व्यवहारे (४० किलो) आणि विजय प्रजापती (४९ किलो) या भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी चमकदार कामगिरी करताना रविवारी युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात रौप्यपदकाची कमाई केली.

  • मेक्सिको येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षाने एकूण १२७ किलो (५९ किलो व ६८ किलो), तर विजयने १७५ किलो (७८ किलो व ९७ किलो) वजन उचलत दुसरे स्थान पटकावले. आकांक्षा आणि विजय हे अनुक्रमे औरंगाबाद आणि पतियाळा येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलंसमध्ये सराव करतात.

  • युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वेटलिफ्टिंगपटूंनी केलेल्या कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन. राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षकांनी कमी वेळेमध्ये वेटलििफ्टगपटूंची तयारी करून घेतली. त्यामुळे त्यांनाही या दर्जेदार कामगिरीचे श्रेय जाते, असे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्यात :
  • मंगळवारी मुंबई भेटीत पंतप्रधान दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान हे मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  • हे दोन्ही कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान हे नवी दिल्लीला रवाना होतील. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान  मंगळवारी  श्रीक्षेत्र देहू येथे येत आहेत. २० जूनला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

  • पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होईल. दोन वाजून दहा मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत.

जैतापूर प्रकल्पासंदर्भात फ्रान्सच्या प्रस्तावावर विचार ; रशियाच्या कराराबद्दल प्रश्नचिन्ह :
  • युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाबरोबरच्या नागरी आण्विक भागीदारीबद्दल अनिश्चितता असताना फ्रान्सच्या सरकारी अणुऊर्जा कंपनी (इडीएफ)च्या लांबलेल्या कराराबद्दल आता आशादायी चित्र निर्माण झाले आहे. जैतापूर येथील नियोजित अणुऊर्जा प्रकल्पात सहा इपीआर अणुभट्टय़ा पुरवण्याच्या प्रस्तावास भारताने तत्त्वत: मान्यता दिली होती.

  • महाराष्ट्रातील जैतापूर येथे सहा इपीआर अणुभट्टय़ा उभारण्यास मदत करण्याबाबत फ्रान्सच्या सरकारी अणुऊर्जा कंपनीने दिलेल्या प्रस्तावाचे परीक्षण भारताचा अणुऊर्जा विभाग करीत आहे. गेल्याच महिन्यात इडीएफचे एक उच्चस्तरीय पथक भारतात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमान्यूएल मॅक्रॉन यांच्यात मेमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेची ही  फलश्रुती असल्याचे सूत्रांनी सांगितले

  • फ्रान्सशी २००८मध्ये झालेल्या व्यापक आण्विक करारानुसार जैतापूर येथे १६५० मेगावॅट इलेक्ट्रिक (एमडब्ल्यूइ) क्षमतेच्या सहा अणुभट्टय़ा उभारण्यास भारताने तत्वत: मान्यता दिली होती. तथापि, तो प्रस्ताव अनेक कारणांनी लटकला होता. त्यांत  जपानमधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर जागतिक पातळीवर नियोजित अणुऊर्जानिर्मिती प्रकल्पांच्या कामांत आलेली संथगती, अशा प्रकल्पांबाबत उपस्थित झालेली शंका आणि  फ्रान्सच्या कंपनीत निर्माण झालेला अंतर्गत पुनर्चनेचा प्रश्न आदी कारणांचा समावेश होता.

पहिल्या दिवशी ४३ हजार कोटींहून अधिकची बोली ; ‘आयपीएल’ प्रसारण हक्कांसाठी प्रति सामन्यामागे १०० कोटींचा टप्पा पार :
  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पुढील पाच हंगामांसाठी (२०२३ ते २०२७) प्रसारण हक्कांच्या ई-लिलाव प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी रविवारी विविध समूहांनी टीव्ही आणि डिजिटल माध्यमांचे हक्क प्राप्त करण्यासाठी प्रति सामन्यासाठीचा आकडा १०० कोटींपलीकडे गेला. म्हणजेच प्रसारण हक्काच्या बोलीने एकत्रित एकूण आकडा ४३,०५० कोटी रुपयांपर्यंत उंचावला आहे.

  • २०१७मध्ये झालेल्या गेल्या प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने १६,३४७.५ कोटी रुपयांसह पाच हंगामांसाठीचे (२०१८-२२) प्रसारण हक्क मिळवले होते. यंदा मात्र या रकमेत जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. यंदा दोन दिवस चालणाऱ्या ई-लिलाव प्रक्रियेत चार विभागांमध्ये प्रसारण हक्क दिले जाणार असून, हा आकडा ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • अ-विभागात भारतीय उपखंडातील टीव्ही (प्रसारण) हक्कांचा समावेश आहे. हे हक्क मिळवण्यासाठी पहिल्या दिवशी ५७ कोटी रुपयांची (प्रति सामना) बोली लावण्यात आली. तसेच ब-विभागात समाविष्ट असलेले भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क प्राप्त करण्याकरिता ४८ कोटी रुपयांची (प्रति सामना) बोली लागली. त्यामुळे प्रति सामन्यामागील एकूण रक्कम ही १०५ कोटी इतकी झाली आहे.

  • पहिल्या दिवशी जवळपास सात तास चाललेल्या लिलाव प्रक्रियेत व्हायकॉम १८, डिझ्नी-स्टार, सोनी आणि झी या चार समूहांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

१३ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.