चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जानेवारी २०२२

Updated On : Jan 13, 2022 | Category : Current Affairs


रत्नागिरीत आढळला सुमारे ४०० वर्षांचा आफ्रिकन ‘बाओबाब’ वृक्ष, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये :
 • रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४०० वर्षांहून अधिक जुना महाकाय आफ्रिकन बाओबाब वृक्ष आढळला आहे. या वृक्षाला भारतामध्ये गोरख चिंचेचे झाड म्हणून ओळखले जाते. हे वृक्ष आढळल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी त्याचे महत्त्व ओळखून तात्काळ त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • पर्यटनदृष्ट्या ‘हेरिटेज ट्री’चा वापर करून तेथे उत्तम पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच खासगी कंपनीच्या सीआरपीएस फंडातून हेरिटेज ट्री म्हणून पर्यटन सेल्फी पॉइंट विकसित करण्यात येईल. या झाडाचे महत्व काय, झाड किती वर्षांपूर्वीचे आहे ही माहिती देखील तिथे लावली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

 • बाओबाब म्हणजेच गोरख चिंच मूलतः आफ्रिका खंडातला, मादागास्कर, अरबी द्वीपकल्प तसेच ऑस्ट्रेलिया येथे आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा वृक्ष आहे. याच्या ९ प्रजातींपैकी ६ प्रजाती केवळ मादागास्करमध्ये आढळतात. त्याची उंची ५० फुटांपर्यंत होते. हा पानगळी वृक्षात मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो. खोडाचा जाड पापुद्रा राखाडी रंगाचा असतो. फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात. याची फुले रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो.

कोवॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा आणि Omicron विषाणूला उदासिन करतो; भारत बायोटेकचा दावा :
 • देशातला करोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र दिसत असतानाच अचानक ओमायक्रॉन नावाच्या नव्या करोनाप्रकाराने डोकं वर काढलं. त्याच्या दहशतीखाली सगळं जग असतानाच आत्ता उपलब्ध असलेल्या लसी ओमायक्रॉनविरुद्ध प्रभावी आहेत की नाही, याबाबत चर्चा सुरू आहेत.

 • अशातच आता भारत बायोटेकने एक चांगली बातमी दिली आहे. कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस हा डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही विषाणूप्रकारांशी लढण्यास समर्थ असल्याचं भारत बायोटेकचं म्हणणं आहे.

 • भारत बायोटेकने सांगितलं की कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस हा या दोन्ही प्रकारच्या व्हेरिएंटला उदासिन करतो. यासंदर्भात केलेल्या चाचण्यांचे परिणाम सांगतात की प्रयोगासाठी घेतलेल्या नमुन्यांपैकी डेल्टा विषाणू असलेल्या १०० टक्के नमुन्यांमध्ये हा विषाणू उदासिन झालेला दिसला. तर ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या ९० टक्के नमुन्यांमध्ये हा विषाणूप्रकार उदासिन झाल्याचं दिसून आलं.

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - सायना, प्रणॉय, लक्ष्य दुसऱ्या फेरीत :
 • माजी विजेती सायना नेहवाल, जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुनरागमन करणारा एचएस प्रणॉय यांनी दिमाखदार विजयांसह इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेची बुधवारी दुसरी फेरी गाठली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेही पुरुष दुहेरीत विजयी अभियान सुरू केले आहे.

 • महिला एकेरीत दुखापतींमुळे गतवर्षी अनेक स्पर्धामध्ये सहभागी होऊ न शकलेली माजी जागतिक अग्रस्थानावरील बॅडिमटनपटू सायनाने चेक प्रजासत्ताकच्या तेरेझा स्व्हाबिकोव्हाविरुद्ध सरशी साधली. या सामन्यात २०-२२, ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या तेरेझाने पाठीच्या दुखापतीमुळे हा सामना अर्धवट सोडला.

 • चौथ्या मानांकित सायनाची दुसऱ्या फेरीत मालविका बनसोडशी गाठ पडणार आहे. मालविकाने समिया इमान फारूखीचा २१-१८, २१-९ असा पाडाव केला. आकर्षी कश्यपने अनुरा प्रभुदेसाईविरुद्ध २१-१४, २१-१४ असा विजय मिळवला.

सर्व दुकानांना मराठीत नामफलक बंधनकारक ; अन्य भाषांनाही मुभा, पण अक्षरांचा आकार मराठीपेक्षा मोठा नको :
 • राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 • कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल.

 • परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा दुकानास, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

“TRP रेटिंग्ज पुन्हा सुरू करा”, केंद्र सरकारचे BARC ला आदेश; वृत्तवाहिन्यांना दिलासा :
 • जवळपास १५ महिन्यांपासून बंद असलेले TRP रेटिंग्ज पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बार्कला त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. तसेच, गेल्या ३ महिन्यांचे रेटिंग्ज तातडीने जाहीर करण्याचे देखील निर्देश केंद्र सरकारने BARC ला दिले आहेत.

 • त्यामुळे लवकरच वृत्तवाहिन्यांसाठीचे टीआरपी रेटिंग्ज जाहीर केले जाणार आहेत. यासंदर्भात ऑक्टोबर २०२०मध्ये उघड झालेल्या टीआरपी घोटाळ्यामुळे या आकडेवारीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वृत्तवाहिन्यांसाठी पुन्हा एकदा टीआरपी रेटिंग्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 • ऑक्टोबर २०२०मध्ये उघड झालेल्या टीआरपी घोटाळ्यानंतर वृत्तवाहिन्यांसाठीचे टीआरपी रेटिंग्ज थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. BARC अर्थात Broadcast Audience Research Council ला केंद्र सरकारने तसे आदेश दिले होते.

 • मुंबई पोलिसांनी दावा केला होता की बार्क आणि हस्ना या ग्राहक संशोधन कंपनीकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर टीआरपीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं. यानुसार टीआरपी मापन करण्यासाठी निवडण्यात आलेल्या विशिष्ट घरांमध्ये विशिष्ट वृत्तवाहिनी सुरू ठेवण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं वादात सापडली होती.

१३ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)