चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जानेवारी २०२१

Date : 13 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अखेर एलन मस्कच्या बहुचर्चित Tesla ची भारतात एंट्री, ‘या’ शहराची केली निवड; रजिस्ट्रेशनही झालं :
  • इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची अखेर भारतात एंट्री झालीये. एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ (Tesla Motors India and Energy Pvt Ltd with RoC Bangalore) नावाने भारतात रजिस्ट्रेशन केलं आहे. कंपनी भारतात लग्जरी इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन घेईल.

  • बेंगळुरूमधून सुरूवात :- भारतातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमधून टेस्ला आपल्या व्यवसायाला सुरूवात करणार असून इथेच कंपनीने रजिस्ट्रेशन केलंय. यासोबतच कंपनीने तीन डायरेक्टर्सचीही नियुक्ती केली आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेंस्टीन यांची डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. 8 जानेवारी रोजी कंपनीने नोंदणी केली असून नोंदणी नंबर 142975 आहे.

  • कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत :- कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी टेस्लाचं कर्नाटकात स्वागत केलं. “मी एलन मस्क आणि टेस्लाचं भारतात व कर्नाटकात स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कर्नाटक ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासाचं नेतृत्त्व करेल”, असं येडियुरप्पा म्हणाले.

शेतकरी आंदोलन - सर्वोच्च न्यायालयाकडून चार सदस्यीय समितीची स्थापना :
  • सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली व समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटना व केंद्र सरकार यांच्यातील कोंडी सोडवण्यासाठी ही समिती बनवण्यात आली आहे.

  • या समितीमध्ये भारतीय किसान यूनियनचे भूपिंदर सिंह मान, शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी आणि आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेचे प्रमोद जोशी या चार जणांचा समावेश आहे. ही समिती आपला अहवाल थेट सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवणार आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत कृषी कायद्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती असणार आहे.

  • या समितीमधील चौघांपैकी एक असलेले भारतीय किसान यूनियनचे भूपिंदर सिंह मान हे कृषी कायद्याच्या विरोधातील आहेत. तर, शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे असलेल्या अनिल घटनवट यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, सरकार शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून कायदा लागू व त्यामध्ये संशोदन करू शकते. हे कायदे मागे घेण्याची आवश्यकता नाही, जे शेतकऱ्यांसाठी अनेक संधी निर्माण करत आहेत.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारीपासून :
  • सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी निर्माण करण्यात आलेल्या सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर पुढील महिन्यापासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गांभीर्याने विचार करीत आहे.

  • ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेची ऑनलाइन सभा १७ जानेवारीला होणार असून, या बैठकीच्या विषयपत्रिकेवर सात मुद्दे आहेत. यापैकी देशांतर्गत क्रिकेट हंगामातील रणजी स्पर्धा तसेच कनिष्ठ आणि महिलांच्या गटांच्या स्पर्धा हे विषय ऐरणीवर असतील.

  • ‘‘मुश्ताक अली स्पर्धेसाठीच्या सहा केंद्रांवरच फेब्रुवारीपासून रणजी करंडक स्पर्धेचे आयोजन करण्याची ९० टक्के शक्यता आहे. मुश्ताक अली स्पर्धेचीच गटवारी रणजी स्पर्धेसाठी कायम ठेवण्यात येईल,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आधी रणजीचे साखळी सामने खेळवण्यात येतील. तसेच बाद फेरीचे म्हणजेच उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामने ‘आयपीएल’नंतर होतील. त्यामुळे सर्वोत्तम खेळाडूंना रणजी स्पर्धेत खेळता येईल. यावेळी रणजी स्पर्धेच्या वेळापत्रकात कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

खासगी कंपनीकडून नोकरभरती घेण्यामागे कारण काय :
  • अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (एमपीएससी) भरवशाच्या संस्थेला डावलून खासगी कंपन्यांकडून परीक्षा घेण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा नेमका मनसुबा काय, असा सवाल परीक्षार्थीकडून उपस्थित केला जात आहे. नोकरभरतीमध्ये पारदर्शकता आणायची असल्यास ‘एमपीएससी’नेच परीक्षा घ्यावी, अशी मागणीही केली जात आहे.

  • फडणवीस सरकारच्या काळात अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी तयार केलेल्या महापरीक्षा संकेतस्थळाच्या प्रक्रियेत गोंधळ आणि गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींवरून महाविकास आघाडी सरकारने हे संकेतस्थळ बंद केले. आता सरकार पुन्हा खासगी कंपनीलाच परीक्षेचे काम देण्याचा घाट घालत आहे.

  • राज्य शासनाच्या ग्रामविकास, गृहविभाग, एमआयडीसी, आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागांमधील भरती प्रक्रिया येत्या काळात घेण्याची घोषणा या खात्याच्या मंत्र्यांकडून होत आहे. मात्र या सर्व अराजपत्रित पदांच्या परीक्षा खासगी कंपनीकडून होणार असल्याचे समोर येत आहे. अनेक वर्षांपासून भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या व परीक्षेची कसून तयारी करणाऱ्या उमेदवारांवर यामुळे अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच परीक्षेमध्ये पारदर्शकता आणायची असेल तर ती एमपीएससीकडून घ्या, अशी मागणी जोर धरत आहे.

  • ‘एमपीएससी स्टुडंट राईट्स’च्या वतीने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देत तशी मागणी करण्यात आली आहे. मेगाभरतीच्या पहिल्या टप्प्यात २७,६०५ जागांसाठी ३४ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत.

ट्रम्प यांच्याविरुद्धच्या महाभियोगासाठी बुधवारी प्रतिनिधिगृहात मतदान :
  • अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांच्या मदतीने कॅपिटॉल हिल इमारतीत हिंसाचार घडवून आणल्याच्या आरोपावरून त्यांना पदच्युत करण्यासाठी महाभियोग कारवाईसाठी बुधवारी प्रतिनिधीगृहात मतदान होत आहे.

  • प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असल्याने महाभियोगाच्या कारवाईचा प्रस्ताव मंजूर होण्याचीच शक्यता अधिक आहे. काँग्रेसचे सदस्य जेमी रसकीन व डेव्हिड सिसीलाइन तसेच टेड लिउ यांनी महाभियोग ठरावाची रचना केली असून त्याला २११ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे.

  • प्रतिनिधीगृहातील बहुमताचे नेते स्टेनी हॉयर यांनी सांगितले की, बुधवारी महाभियोग कारवाईच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात येईल. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर ६ जानेवारी रोजी हिंसाचारास उत्तेजन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल येथे हिंसाचार केला होता. त्यानंतर प्रतिनिधी वृंदाच्या मतांची मोजणी काही काळ थांबवण्यात आली होती. या हिंसाचारात पाच जण ठार झाले होते.

  • डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधीगृहात बहुमत असून सेनेटमध्ये रिपब्लिकन व डेमोक्रॅट यांच्यात ५१-५० एवढीच तफावत असून दोन तृतीयांश सदस्यांचे मत हे महाभियोग कारवाईसाठी गरजेचे असते. बहुमताचे नेते मिच मॅकोनेल यांनी सांगितले की, वरिष्ठ सभागृहात २० जानेवारी म्हणजे बायडेन यांच्या शपथविधी आधी मतदान होऊ शकणार नाही.

१३ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.