चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ डिसेंबर २०२०

Date : 13 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डिजिटल मतदार ओळखपत्रांचा प्रस्ताव :
  • निवडणूक आयोग मतदारांना डिजिटल पद्धतीची ओळखपत्रे जारी करण्याबाबत विचार करीत असून ही मतदार ओळखपत्रे डिजिटल रूपात असल्यास ती चटकन वापरता येऊ शकतात. असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कुठलाही निर्णय मात्र घेतलेला नाही.

  • याबाबत निवडणूक आयोगातील  एका अधिकाऱ्याने सांगितले की,  आम्हाला प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांकडमून सूचना मिळत आहेत. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांचा एक कार्यकारी गट असून त्यांच्या मार्फत व थेट लोकांकडूनही सूचना मिळत असतात. त्यात अनेकांनी मतदार ओळखपत्र डिजिटल स्वरूपात द्यावे, अशी सूचना केली आहे.

  • डिजिटल मतदान ओळखपत्र मतदार मोबाइलमध्ये बाळगू शकतात काय या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की एकदा निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार ओळखपत्रांचा निर्णय घेतल्यानंतर ती पुढची पायरी असू शकते. हे ओळखपत्र मोबाइलवर , संकेतस्थळावर, ई-मेलरूपात ठेवता येणारे किंवा मुद्रित स्वरूपात मतदानावेळी स्वतजवळ बाळगता येणारे अशा कुठल्याही प्रकारात आणता येईल. 

  • डिजिटल स्वरूपात व्यक्तीचे छायाचित्रही स्पष्ट असेल. अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, की तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेताना सुरक्षेचा विचार करावा लागेल.

बारावीच्या परीक्षेसाठीचे अर्ज १५ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान :
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि  विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यात नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान, तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रम आदी विद्यार्थ्यांना ५ ते १८ जानेवारीदरम्यान अर्ज भरता येईल.

  • राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरल्यानंतर शुल्क चलनाद्वारे १५ डिसेंबर ते २५ जानेवारीदरम्यान बँकेत भरायचे आहे.

  • त्यानंतर विद्यार्थ्यांच्या यादी आणि प्री-लिस्ट चलनासोबत २८ जानेवारीला विभागीय मंडळात जमा करायची आहे. या वर्षी नव्याने १७ नंबरच्या अर्जाद्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्रे भरण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार असल्याने त्या कालावधीत त्यांचे अर्ज भरू नयेत, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट के ले आहे.

सहा-आठ महिन्यांत कोटय़वधी नागरिकांच्या लसीकरणाची भारताची तयारी :
  • करोना प्रतिबंधासाठी किमान तीन कंपन्यांच्या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध नियंत्रकांकडूनआढावा घेतला जात असतानाच, येत्या ६ ते ८ महिन्यांत कोटय़वधी लोकांचे लसीकरण करण्याच्या मोहिमेची तयारी भारताने सुरू केली आहे.

  • कोविड-१९ लशीच्या ६० कोटी मात्रा ३० कोटी भारतीयांना देण्यासाठी आमची निवडणूक यंत्रणा तैनात करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. यात आरोग्यसेवेतील कार्यकर्ते, ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे प्राधान्य गटातील लोक आणि बहुव्याधी असलेले ५० वर्षांखालील लोक यांचा यात समावेश आहे.

  • २ ते ८ अंश सेल्सिअस दरम्यानच्या तापमानावर साठवणुकीची (कोल्ड स्टोअरेज) व्यवस्था सरकारने सुरू केली आहे, असे निती आयोगाचे सदस्य आणि कोविड-१९ लसीकरणाच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले.

  • ‘सीरम, भारत बायोटेक, झायडस कॅडिला आणि स्पुटनिक ५ या ४ कंपन्यांना सामान्य शीत साखळीची आवश्यकता आहे. त्यामुळे या लशींच्या बाबतीत काहीच अडचण येणार नाही असे मला वाटते’, असे पॉल यांनी सांगितले.

सक्ती असूनही राज्यभाषा वाऱ्यावरच :
  • २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी केंद्रीय, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळा मराठी भाषा सक्तीच्या कायद्याबाबत अनभिज्ञ आहेत. मराठीसाठी अभ्यासक्रम कोणता, मूल्यमापन कसे, अशा प्रश्नांबाबत संभ्रम आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत सूचना आली नसल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता असल्याचे चित्र आहे.

  • बोरिवलीच्या ‘मुंबई हाय वल्र्ड स्कूल’ सीबीएसई शाळेत प्रथम भाषा इंग्रजी, द्वितीय भाषा हिंदी आहे. अतिरिक्त उपक्रम म्हणून फ्रेंच, स्पॅनिश, संस्कृतसोबत मराठीही शिकवली जाते. आठवडय़ातून हिंदीच्या चार तासिका तर, मराठीचा केवळ एक तास असतो. मराठीबाबत लेखन, वाचन, संभाषण यांचे प्राथमिक धडे देण्यासाठी वृत्तपत्र वाचन वगैरे घेतले जाते. लेखी परीक्षा होत नाही.

  • ‘मराठी सक्तीच्या कायद्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही. मराठी अनिवार्य झाल्यास तिची लेखी परीक्षा घेणार का, दहावीसाठी मराठीची प्रश्नपत्रिका सीबीएसई काढणार का, असे प्रश्न शाळेचे संचालक योगेश दराडे यांनी उपस्थित केले.

पेसचे सलग आठव्या ऑलिम्पिकचे लक्ष्य :
  • सलग आठव्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याचे माझे उद्दिष्ट असून, पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी मी खडतर मेहनत घेत आहे, असे भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने सांगितले.

  • २०१९च्या नाताळमध्ये पेसने ‘एकदा अखेरची गर्जना’ या शीर्षकासह २०२० हा व्यावसायिक टेनिस कारकीर्दीतील अखेरचा हंगाम असल्याचे जाहीर केले होते. पण त्यावेळी करोनाची इतकी मोठी आपत्ती येईल, अशी कुणालाही कल्पना नव्हती. या साथीने सर्वापुढे आव्हान निर्माण केले आहे, असे पेसने सांगितले.

  • ‘‘करोनाच्या साथीमुळे प्रदीर्घ काळाची विश्रांती मिळाली. या काळात शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा सज्ज होता आले. भारताचे नाव इतिहासात अधोरेखित व्हावे, हाच माझा नेहमी उद्देश असतो. त्यामुळेच मी गेली ३० वर्षे अथक मेहनत घेत आहे,’’ असे पेस म्हणाला.

  • टोक्यो ऑलिपिकला २३ जुलैपासून प्रारंभ होणार असून, या स्पर्धेदरम्यान पेस ४८ वर्षांचा होईल. परंतु वय हा फक्त आकडा असतो, असे त्याने सांगितले. ‘‘सातव्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा विक्रम माझ्या नावे आहेच. आठव्या ऑलिम्पिकमध्ये हा विक्रम आणखी उंचावेल,’’ असे प्रतिपादन पेसने केले. १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पेसने वैयक्तिक कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती.

१३ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.