चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ ऑगस्ट २०२२

Date : 13 August, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून :
  • यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित तारखेपेक्षा एक दिवस आधी, म्हणजेच २१ ऐवजी २० नोव्हेंबरला प्रारंभ होणार आहे. ‘फिफा’ने शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

  • २० नोव्हेंबरला कतार आणि इक्वाडोर या संघांमध्ये दोहा येथील ६० हजार प्रेक्षकसंख्या असलेल्या अल बयात स्टेडियममध्ये आता विश्वचषकाच्या सलामीचा सामना रंगेल. विश्वचषकाला एक दिवस आधी प्रारंभ करण्याच्या ‘फिफा’च्या निर्णयाला आयोजक, दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघ, तसेच कतार आणि इक्वाडोरच्या राष्ट्रीय फुटबॉल संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

  • कतार येथे होणाऱ्या विश्वचषकाची कार्यक्रम पत्रिका - १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली होती. त्या कार्यक्रम पत्रिकेनुसार, २१ नोव्हेंबरला होणाऱ्या तीन सामन्यांपैकी सेनेगल आणि नेदरलँड्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार होता. मग इंग्लंड आणि इराण आमनेसामने येणार होते. अखेरचा सामना कतार आणि इक्वाडोर यांच्यात होणार होता. मात्र, या दोन सामन्यांमध्ये केवळ एका तासाचे अंतर होते आणि या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडणार होता. परंतु कोणत्याही स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा होणे धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिकदृष्टय़ा महत्त्वाचे असल्याचे ‘फिफा’ने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे कतार आणि इक्वाडोर यांच्यात आता स्पर्धेचा सलामीचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन केले जाईल.

६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान; थेट सरपंचपदाचाही समावेश :
  • पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

  • राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश : सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्‌भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

  • निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय : घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १९ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

महिलांना मोफत बसप्रवास म्हणजे क्रांती- स्टॅलिन :
  • तमिळनाडूत महिलांना मोफत बसप्रवासाची सवलत देण्याचा निर्णय द्रमुक सरकारने घेतला आहे. त्याकडे एक ‘मोफत रेवडी संस्कृती’ या संकुचित नजरेने पाहिले जाऊ नये. हे एक आर्थिकदृष्टय़ा क्रांतिकारक पाऊल असल्याचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी सांगितले.

  •  स्टॅलिन यांनी सांगितले, की या योजनेच्या लाभार्थीच्या कुटुंबीयांची या निर्णयामुळे आठ ते बारा टक्के बचत नक्कीच होणार आहे.  या निर्णयाचा लाभ ८० टक्के द्रविड समाजातील मागासवर्गीयांना होणार आहे. द्रविड प्रारूप सरकाराचे हे चांगले संकेत आहेत.  गरीब परिवारांची आठ ते १२ टक्के आर्थिक बचत होणार असल्याने मी याला ‘आर्थिक क्रांती’च म्हणतो.

औरंगाबादेतील बॅडमिंटनपटूचे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी महिलांच्या यादीत; खंडपीठाची स्वातंत्र्यदिनी सुनावणी :
  • आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरलेला शहरातील राष्ट्रीय बॅंडमिंटन पटू प्रथमेश प्रकाश कुलकर्णी याला बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या कारभाराचा फटका बसला असून, ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट नाही होऊ शकले. प्रथम महिला गटात नाव समाविष्ट केले आणि नंतर चुकीची दुरूस्ती करण्यात आली नाही.

  • या प्रकरणात प्रथमेशचे पालक तथा माजी सैनिक प्रकाश कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असून, न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अरूण पेडणेकर यांनी शहरातील या होतकरू आणि गुणी खेळाडूसाठी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सुनावणी ठेवली. केंद्राचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांना सर्व माहितीसह हजर राहण्याचे आदेश दिले. 

  • मागील काही तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असलेला शहरातील खेळाडू प्रमेश कुलकर्णी याला कार्यालयातील बाबुंच्या लहरीपणाचा फटका बसला. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय मानांकनात ५५ वरून २३ व्या क्रमांकावर मजल मारणाऱ्या मेहनती खेळाडूला आता बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या चुकीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित राहावे लागत आहे. इंडिया ज्युनीअर इंटरनॅशनल ग्रॅंड ट्रीक्स या पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. संबंधित निवड गोवा येथे २५ जुलैला पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत समाविष्ट होण्यासाठी बॅडमिंटर फेडरेशन ऑफ इंडियाकडे रितसर अर्ज सादर केला.

  • आंतरराष्ट्रीय स्पर्देसाठी नाव नाेंदविताना चुकून त्याचा समावेश महिलांच्या यादीत केला. यासंबंधी अर्ज फाटे विनंत्या केल्यानंतर त्याचे नाव महिला यादीतून हटविले परंतु पुरूषांच्या यादीत समाविष्ट केले नाही. याविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. अॅड. अमोल जोशी यांनी राष्ट्रीय मानांकन २३ असताना खेळाडूला फेडरेशनच्या चुकीचा फटका सहन करावा लागत आहे, असा मुद्दा मांडून अत्यंत मेहनतीतून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. बॅडमिंटन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या अखत्यारित असल्याने यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांना मत मांडायचे निर्देश दिले. ज्या स्थितीत गणेवशात असले तरी खंडपीठात वादी प्रतिवादींनी हजर राहावे असे आदेश दिले. 

१३ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.