चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ ऑगस्ट २०२१

Date : 13 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘ईओएस-०३’ उपग्रह अंतराळात पाठवण्यात अपयश :
  • प्रक्षेपण यानाचे क्रायोजेनिक टप्प्यावर प्रज्ज्वलन करण्यात अपयश आल्यामुळे देशाचा सर्वात अलीकडचा ‘ईओएस-०३’ हा भूनिरीक्षण उपग्रह अंतराळात पाठवण्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) जीएसएलव्ही प्रक्षेपक गुरुवारी अयशस्वी ठरला. यामुळे ही मोहीम ठरल्यानुसार पूर्ण होऊ शकली नाही, असे इस्रोला जाहीर करावे लागले. तथापि, प्रक्षेपण यानाचा पहिला व दुसरा टप्पा सामान्य रीतीने पार पडला, असे इस्रोने सांगितले.

  • ‘नियोजित वेळापत्रकानुसार जीएसएलव्ही-एफ १० चे प्रक्षेपण आज पहाटे ५ वाजून ४३ मिनिटांनी पार पडले. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामगिरी नियोजनानुसार झाली. मात्र क्रायोजेनिक ऊर्ध्व टप्प्यातील प्रज्वलन तांत्रिक बिघाडामुळे होऊ शकले नाही. ही मोहीम ठरल्यानुसार पूर्ण होऊ शकली नाही’, असे इस्रोने एका निवेदनात सांगितले.

  • इस्रोच्या सांगण्यानुसार, ‘क्रायोजनिक अप्पर स्टेज इग्निशन’ प्रक्षेपणानंतर ४.५६ मिनिटांनी होणार होते. ‘क्रायोजेनिक टप्प्यावर तांत्रिक बिघाड आढळला. मोहीम पूर्ण होऊ शकली नाही’, अशी औपचारिक घोषणा रेंज ऑपरेशन्स संचालकांनी मोहिमेच्या नियंत्रण केंद्रात केली. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.

आग्नेय आशियातील करोना रुग्णसंख्या स्थिर - डब्ल्यूएचओ :
  • भारतातील सध्या स्थिर झालेली करोना रुग्णसंख्या आणि इंडोनेशिया व म्यानमारमध्ये सातत्याने घटलेल्या रुग्णांमुळे आग्नेय आशियात मे महिन्याच्या तुलनेत गेल्या महिन्यातील रुग्णसंख्या स्थिर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) करोनाविषयक साप्ताहिक माहिती १० ऑगस्टला जाहीर केली. गेल्या आठवड्यात या भागात ७ लाख ९९ हजार नव्या रुग्णांची भर पडली असून मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात ५ टक्क्यांनी घट झाली आहे. असे असले तरी या भागातील श्रीलंका (२६ टक्के) आणि थायलंड (२० टक्के) या देशांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

  • सर्वाधिक रुग्णसंख्या २ लाख ७८ हजार ६३१ ही भारतात नोंदली गेली. ती एक लाख रुग्णांमागे २०.२ रुग्ण अशी असून त्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत २ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच इंडोनेशियाची रुग्णसंख्या २ लाख २५ हजार ६३५ इतकी असून त्यात १८ टक्के घट झाली आहे. तर थायलंडमधील रुग्णसंख्या एका लाख ४१ हजार १९१ इतकी झाली असून त्यात २० टक्के वाढ झाली आहे.

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा : कोमलिका बारी अंतिम फेरीत :
  • भारताची कौशल्यवान तिरंदाज कोमलिका बारीने गुरुवारी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेतील (२१ वर्षांखालील) रीकव्‍‌र्ह प्रकाराची अंतिम फेरी गाठली. कोमलिकाने भारतासाठी पदकनिश्चिती केली असून रविवारी तिला सलग दुसरे जागतिक जेतेपद मिळवण्याची संधी आहे.

  • जमशेदपूरच्या १९ वर्षीय कोमलिकाने यापूर्वी १८ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक कमावले होते. गुरुवारी तिने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या कॅसी कौफहोल्डला ६-४ (२८-२७, २५-२८, २८-२६, २५-३०, २९-२५) असे पराभूत केले. आता रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत तिच्यासमोर स्पेनच्या एलिआ कॅनल्सचे कडवे आव्हान असेल.

  • कोमलिकाने ही लढत जिंकल्यास दीपिका कुमारीनंतर अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी तिरंदाज ठरेल. दीपिकाने २००९ आणि २०११मध्ये अनुक्रमे कॅडेट आणि कनिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावले होते.

चंद्रावर पाण्याचे आढळले अंश, इस्त्रोच्या माजी अध्यक्षांचा दावा :
  • इस्त्रोच्या चांद्रयान -२ मोहिमेबाबत एक उत्कंठावर्तक माहिती समोर आली आहे. चांद्रयान -२ चे ऑरबिटर हे यान चंद्राभोवती सुमारे १०० किलोमीटर उंचीवर फिरत आहे. या ऑरबिटरवरील इमॅजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागाची असंख्य छायाचित्रे काढली. या छायाचित्रांच्या अभ्यासाद्वारे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा दावा इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस एस. किरणकुमार यांनी केला आहे. अर्थात हे पाणी पृथ्वीवर आढळणाऱ्या प्रवाही, गोठलेल्या किंवा वाफेच्या स्वरुपात नाहीये. तर छायाचित्रांच्या अभ्यासाद्वारे plagioclase ( प्लेगियोक्लेज ) प्रकारच्या खडकांत हायड्रोक्सिल ( OH ) आणि पाणी ( H2O ) यांचे रेणू आढळले आहेत. ऑरबिटरवरने काढलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करत एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या शोधनिबंधाचे एस एस. किरणकुमार हे सहलेखक आहेत.

  • चंद्रावर पाण्याचा शोध आधी कोणी लावला होता  - २००८ च्या चांद्रयान – १ मोहिमेत भारताचे अस्तित्व चंद्रावर उमटावे या हेतूने तिरंग्याचे चित्र असलेला एक मून इम्पॅक्ट प्रोब हा चंद्राच्या पृष्टभागावर धडकवण्यात आला होता. यामुळे उडालेल्या चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेण्यात आली होती. त्याद्वारे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचं सिद्ध झालं होतं. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व हे भारताच्या चांद्रयान -१ मोहिमेमुळे सिद्ध झाले होते. आता चांद्रयान -२ च्या मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे दाखवून दिले आहे.

  • चांद्रयान -२ मोहिम काय होती - २२ जुलै २०१९ ला चांद्रयान – २ हे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आले होतं. ७ सप्टेंबर ला चांद्रयान -२ चे ‘विक्रम लॅंडर’ हे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरणार होते आणि त्यानंतर या लॅंडरमधील रोव्हर हा चांद्रभुमिवर संचार करणार होता. पण विक्रम लॅंडर हा चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद न उतरता वेगाने कोसळला आणि ती मोहिम अपयशी झाली होती. असं असलं तरी चांद्रयान -२ चा ऑरबिटर हे यान तेव्हापासून चंद्राभोवती १०० किलोमीटर उंचीवरुन यशस्वीपणे अजुनही फिरत आहे. याच ऑरबिटरने घेतलेल्या छायाचित्रांमुळे चंद्रावर पुन्हा एकदा पाण्याचे अस्तित्व असल्याचे अभ्यासाद्वारे सांगितलं आहे.

दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश :
  • विद्यापीठासह महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत ऑफलाईन महाविद्यालये सुरू होतील; परंतु लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडील उपलब्ध लशींमधून ३० टक्के कुप्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी येथे सांगितले.

  • स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठास भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. या वेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा  हंबर्डे आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती.

  • सामंत म्हणाले,की राज्यात एकूण ४२ लाख विद्यार्थी उच्च व तंत्रशिक्षण घेत आहेत. करोनामुळे ऑनलाईन सुरू असलेले वर्ग आता ऑफलाईन सुरू होऊ शकतील.  त्यामुळे यासाठी तयारी सुरू आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.

  • जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध लशींमधून ३० टक्के  लशी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमधून हा प्रयोग सुरू केला जाणार असून यंत्रणेने आदर्श पद्धतीने हा प्रयोग राबवावा. त्यानंतर या प्रयोगाची अंमलबजावणी केली जाईल.

पालकांना मोठा दिलासा, शालेय शिक्षण शुल्कामध्ये १५ टक्के कपात; सरकारी आदेश जारी : 
  • राज्यात करोनाचं संकट निर्माण झाल्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे सर्व मुले घरीच असताना दुसरीकडे करोनामुळे आर्थिक परिस्थिती देखील बारगळली होती. त्यामुळे अनेक घरांमधली आर्थिक गणितं बिघडली होती. या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून देखील आणि ऑनलाईन शिक्षण सुरू असून देखील पूर्ण शुल्क आकारण्यावर अनेक पालकांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार राज्य सरकारने आता शालेय शिक्षण शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा शासकीय आदेश काढला आहे. यासंदर्भातला निर्णय गेल्याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. मात्र, त्यासंदर्भातला अध्यादेश कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता असल्यामुळे अखेर सरकारने सरकारी आदेश काढला आहे.

  • करोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी १५ टक्के शुल्क माफीचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला होता. मात्र, खासगी शाळांमधील शुल्क नियमनामध्ये हस्तक्षेप झाल्यास सरकारचा निर्णय कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता होती. त्यावर अखेर सरकारी आदेश काढून तोडगा काढण्यात आला आहे.

  • करोनामुळे उत्पन्नावर परिणाम झालेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी खासगी शाळांचे शुल्क १५ टक्क्यांनी कमी करता यावे, यासाठी ‘महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमा’त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा किंवा साथरोग प्रतिबंधक अधिनियम लागू असल्यास आणि शाळा तीन महिन्यांहून अधिक काळ बंद ठेवाव्या लागल्यास खासगी शाळांच्या शुल्करचनेचे नियमन करण्याचे अधिकार काममस्वरूपी राज्य सरकारला मिळाले असते. या दृष्टीने विभागाने अध्यादेश काढण्याची तयारी सुरू केली.

१३ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.