चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ नोव्हेंबर २०२२

Date : 12 November, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आशियाई बॉक्सिंग स्पर्धा - भारतीय महिलांचा सुवर्ण चौकार :
  • आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिलांनी सुवर्ण चौकार लगावला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेन (७५ किलो), परवीन हुडा (६३ किलो), स्विटी (८१ किलो) आणि अल्फिया पठाण (८१ किलोपेक्षा अधिक) या चौघींनी चमकदार कामगिरीसह विजेतेपद मिळविले. मीनाक्षी (५२ किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली.

  • भारताची अंतिम फेरीची सुरुवात अपयशी झाली होती. पहिल्या अंतिम लढतीत मीनाक्षीला जपानच्या किनोशिता रिंकाकडून पराभव पत्करावा लागला होता. मीनाक्षीने किनोशिताला झुंज दिली, पण पंचांनी कौल १-४ असा तिच्या विरोधात दिला. त्यानंतर मात्र भारताच्या चारही खेळाडूंनी वर्चस्व राखले. परवीनने जपानच्या किटो माई, तर लवलिनाने उझबेकिस्तानच्या रुझमेटोवा सोखिबा, स्विटीने कझाकस्तानच्या गुलसाया येरझानचा  एकतर्फी लढतीत पराभव केला.

  • आक्रमकता आणि सुरेख पदलालित्याच्या जोरावर बचाव भक्कम ठेवत परवीन आणि लवलिनाने बाजी मारली. पंचांनी तिघींच्या बाजूने ५-० असा कौल दिला. अल्फियाने जॉर्डनची प्रतिस्पर्धी इस्लाम हुसेलीला निष्प्रभ केले. अल्फियाने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. अल्फियाच्या आक्रमणांपुढे हुसेली निष्प्रभ ठरली. अल्फियाच्या हल्ल्यासमोर ती उभीच राहू शकत नव्हती. अखेरीस पंचांनी पहिल्या फेरीतच लढत थांबवून अल्फियाला विजयी घोषित केले.

दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू :
  • येथील क्रांतिवीर सांगोली रेल्वेस्थानकात शुक्रवारी दक्षिण भारतातील पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची सेवा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही एक्स्प्रेस चेन्नई-म्हैसूरदरम्यान बंगळुरुमार्गे धावणार आहे. रेल्वेच्या भारत गौरव रेल्वे धोरणांतर्गत ‘भारत गौरव काशीदर्शन’ या रेल्वेगाडीसही पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

  • या रेल्वेमुळे काशीदर्शनाची इच्छा असणाऱ्या हजारो यात्रेकरूंचे स्वप्न पूर्ण होईल, असे र्नैऋत्य रेल्वे विभागाने सांगितले. ही रेल्वे वाराणसीसह अयोद्धा, प्रयागराज आदी तीर्थस्थळांनाही जाणार आहे.

  • केम्पेगौडा यांच्या पुतळ्याचे अनावरण  बंगळुरुचे संस्थापक नादप्रभू केम्पेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळय़ाचे अनावरण तसेच  केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. हा पुतळा एखाद्या शहर संस्थापकाचा पहिला व सर्वात उंच कांस्य पुतळा म्हणून ‘वल्र्ड बुक ऑफ रेकॉर्ड’नुसार ओळखला जाईल. ‘समृद्धीचा पुतळा’ असे त्याला ओळखले जाईल.

विश्लेषण: एक राष्ट्र, एक निवडणूक प्रत्यक्षात येणार का :
  • वारंवार होणाऱ्या निवडणुका टाळण्यासाठीच एक राष्ट्र, एक निवडणूक म्हणजेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. या दृष्टीने नीती आयोगाने अहवाल तयार केला आहे. दोनच दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यात बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एकत्रित निवडणुकांकरिता निवडणूक आयोगाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. पण निर्णय संसदेने घ्यायचा असल्याचे मत त्यांनी मांडले.

  • आर्थिक भार टाळण्याकरिता निवडणुका एकत्रित घेण्याची भूमिका मांडली जाते. काँग्रेससह काही प्रादेशिक पक्षांचा मात्र एकत्रित निवडणुकांना विरोध आहे. राजकीय सहमतीशिवाय एकत्रित निवडणुका शक्य नाही. २०१९मध्ये एकत्रित निवडणुकांची मोदी यांची योजना प्रत्यक्षात आली नव्हती. आता २०२४ मध्ये तरी प्रत्यक्षात येते का, हा प्रश्न आहे.

ट्विटरची आठ डॉलर्सची सबस्क्रिप्शन सेवा रद्द, बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने निर्णय :
  • ट्विटरनं या आठवड्यात लॉन्च केलेलं ट्विटर ‘ब्लू टीक’ सेवेचं आठ डॉलर्सचं सबस्क्रिप्शन रद्द केलं आहे. बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा तुर्तास मागे घेतली आहे, अशी माहिती कंपनीच्या सुत्राने दिली आहे. युजर्संकडून मोठ्या ब्रँडच्या नावांचा गैरवापर होत असल्याचंही पुढे आले आहे. ज्या ग्राहकांनी याआधी हे सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांच्या खात्यांवर ही सेवा सुरू राहणार आहे.

  • या प्रकारानंतर कंपनीने हाय प्रोफाईल खात्यांसाठी नव्याने अधिकृत बॅजेस तयार केले आहेत. कंपनीच्या अंतर्गत मंजूर यादीनुसार व्यवसाय आणि माध्यमांशी संबंधित खात्यांवर ‘ग्रे बॅज’ दिसून येत आहे. ट्विटर ब्लू सेवा स्थगित करण्याआधी कंपनीने महत्त्वाच्या खात्यांसाठी हे बॅज तयार केले होते.

  • व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’चा युजर्सकडून गैरवापर - व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’साठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाली आहे. एका युजरने त्याच्या खात्यावर सुपर मारिओचा फोटो वापरून आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने फार्मा कंपनी ‘इली लीली’ या नावाचा वापर करत इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. या ट्वीटमुळे कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली आहे. ट्विटरच्या एका युजरने ‘टेस्ला’ कंपनीच्या सुरक्षा रेकॉर्डची खिल्ली उडवली आहे.

  • ‘ट्विटर ब्लू’ काय आहे : या सेवेअंतर्गत ट्विटर युजर्संना कुठल्याही पडताळणी प्रक्रियेशिवाय ‘व्हेरिफाईड बॅज’ मिळणार आहे. या सेवेचे सबस्क्रिप्शन असणाऱ्या युजर्संना ट्विटरच्या इतर सेवांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. या सेवेमुळे काही युजर्संमध्ये मतभेद आहेत. ट्विटर पैसे आकारून सर्वांना हा बॅज देत असल्यामुळे या सेवेचा गैरवापर होऊ शकतो, अशी शंका काही युजर्संना आहे. ‘रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये ‘ट्विटर ब्लू’ युजर्संना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय युजर्संना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही या सेवेचे सबस्क्रिप्शन घेतल्यास युजर्सची सुटका होणार आहे.

१२ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.