चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ नोव्हेंबर २०२१

Date : 12 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा लांबणीवर :
  • टर्की येथे होणारी महिला जागतिक अजिक्यपद बॉक्सिंग स्पर्धा पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत लांबणीवर पडली असून भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी  महिला बॉंक्सगपटूंना आता निवड चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

  • महिला जागतिक अजिक्य पद बॉक्सिंग स्पर्धा टर्कीतील इस्तंबूल शहरात यावर्षी ४ ते १८ डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार होती. मात्र, या शहरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय बॉंक्सग संघटनेने (एआयबीए) जाहीर केले. या स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेतील सर्व वजनी गटांतील विजेत्या खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार होत्या.

  • केवळ ७० किलो वजनी गट याला अपवाद होता. या वजनी गटात टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेनला भारतीय संघात थेट प्रवेश देण्यात आला. मात्र, त्यामुळे वादाला तोंड फुटले.

  • राष्ट्रीय स्पर्धेत ७० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या अरुंधती चौधरीने लवलिनाच्या थेट निवडीवर आक्षेप घेताना दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने भारतीय बॉक्सिंग महासंघाला नोटीस बजावली. याचे उत्तर देताना महासंघाने, बोरगोहेनची निवड ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी आणि जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या स्थानाच्या आधारे करण्यात आल्याचे सांगितले.

  • आता जागतिक स्पर्धा लांबणीवर पडल्याने निवड चाचणी होणे अपेक्षित असून यात अरुंधतीसह सहा वेळची जगज्जेती मेरी कोम आणि सिमरनजीत कौर यांना संधी मिळू शकेल. मेरी राष्ट्रीय स्पर्धेत खेळली नाही, तर सिमरनजीतला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.

रद्द झालेल्या दहावी-बारावी परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार :
  • गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. करोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या.

  • दरम्यान, राज्य मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे लागणार आहे.

  • यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील दहावी-बारावीसाठी mahahsscboard.in, दहावीसाठी https://feerefund.mh-ssc.ac.in आणि बारावीसाठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून / लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

“मी शाळा शिकले नाही, पण…”; पद्मश्री पुरस्कार विजेत्या ‘बीजमाता’ राहीबाईंचा प्रेरणादायी प्रवास :
  • राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारा पद्म पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील १७ जणांचा पद्मश्री आणि दोघांचा पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आला.

  • परंतु गुलाबी लुगडं आणि नथ घालून पद्मश्री स्विकारणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्याकडे महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा खिळून राहिल्या.

  • कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०१९-२० वर्षातील पद्मश्री पुरस्कार देऊन राहीबाई पोपेरे यांना गौरविण्यात आले.

भारतात कधी येणार ५जी सेवा? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; म्हणाले :
  • अवघ्या १० वर्षांत भारतात टूजीपासून आता थेट ५जीपर्यंतचा प्रवास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्या फोर-जी सेवा भारतात उपलब्ध असून लवकर भारतात ५जी सेवा देखील उपलब्ध होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्ण यांनी यांदर्भात मोठी घोषणा केली असून त्यानुसार ५जी सेवेसाठीच्या कंत्राटांची लिलाव प्रक्रिया देखील लवकरच पार पाडली जाणार असल्याचं वैष्णव यांनी जाहीर केलं आङे. टाईम्स नाऊशी बोलताना वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

  • अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ६ महिन्यांमध्ये म्हणजेच, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत देशभरात ५जी सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. “या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच ५जी साठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया तटस्थ होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत”, असं वैष्णव यांनी सांगितलं.

  • यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पुढील २-३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वात मोठे बदल होण्याचे संकेत दिले. “येत्या २ ते ३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वातील नियमांमध्ये पूर्णपणे बदल होणार असून ते जागतिक स्तरावरील मानकांनुसार असतील”, असं ते म्हणाले. तसेच, टेलिकॉम क्षेत्राविषयी केंद्र सरकारचा दृष्टीकोन अमूलाग्ररीत्या बदलल्याचं देखील वैष्णव यांनी नमूद केलं. “जागतिक दर्जाची टेलिकॉम व्यवस्था भारातात असावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण केलं जाईल”, असं देखील ते म्हणाले.

‘स्पेसएक्स’चे आणखी चार अंतराळवीर अवकाशात ; ६० वर्षांत ६०० अंतराळवीराचा प्रवास :
  • अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि स्पेसएक्स यांनी चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पाठवले आहे. खराब हवामानासह अनेक कारणांमुळे दीर्घ विलंबानंतर, स्पेसएक्स रॉकेट अखेर बुधवारी या अंतराळवीरांना घेऊन रवाना झाले. ज्यात ६० वर्षांत अंतराळात पोहोचणाऱ्या ६००व्या अंतराळवीराचा समावेश आहे.

  • यूएस स्पेस एजन्सी नासाने सांगितले की जर्मनीचे मॅथियास मौरर यांचा बुधवारी अंतराळात गेलेल्या चार व्यक्तींमध्ये समावेश होता, जे अंतराळात जाणारे ६००वे व्यक्ती ठरले.  मॅथियास मौरर व्यतिरिक्त, इतर तीन अंतराळवीर २२ तासांच्या उड्डाणानंतर गुरुवारी संध्याकाळी अंतराळ स्थानकावर पोहोचतील. त्याला œc ३ असे नाव देण्यात आले आहे. रॉकेटमध्ये ४४ वर्षीय भारतीय अमेरिकन राजा चारी देखील होते, जे यूएस एअर फोर्स फायटर जेटचा प्रशिक्षित पायलट होते. त्यांना मिशन कमांडर बनवण्यात आले आहे.

  • खराब हवामानामुळे रॉकेटच्या उड्डाणाला विलंब झाला. बुधवारी रात्री रिमझिम पावसात चार अंतराळवीरांनी आपल्या कुटुंबाचा निरोप घेतला. हवामान तज्ज्ञांनी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवला होता आणि त्यात सुधारणाही झाली.

  • दोन दिवसांपूर्वी, स्पेसएक्स स्पेसक्राफ्ट यानातून नासाचे अंतराळवीर शेन किमब्रो आणि मेगन मॅकआर्थर, जपानचे अकिहितो होशिडे आणि फ्रान्सचे थॉमस पेस्केट हे पृथ्वीवर परतले. अंतराळ केंद्रात त्यांनी २०० दिवस व्यतीत केले आहेत.

१२ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.