चालू घडामोडी आणि दिनविशेष - 12 मे 2023

Date : 12 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
माहीची ग्रेट-भेट! धोनीने ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्री ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ टीमला CSKची जर्सी दिली गिफ्ट
  • भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंटरी ‘द एलिफंट व्हिस्पर्स’चे दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस, बोमन आणि बेली यांची ग्रेट-भेट घेतली. धोनीने ‘द एलिफंट व्हिस्पर्स’च्या संघाला स्वतःची ७ नंबर असणारी चेन्नई सुपर किंग्जची जर्सी गिफ्ट दिली, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
  • ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने ९५व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ऑस्कर जिंकला आहे. अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जच्या एका खास कार्यक्रमादरम्यान वास्तविक जीवनातील हत्तीची काळजी घेणारे बोमन आणि बेली यांनी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. महेंद्रसिंग धोनीचे फॅन पडल्याचे किस्से वेळोवेळी पाहायला मिळतात. त्याचे प्रियजन त्याला देव मानतात.
  • टीम चेन्नई सुपर किंग्सने आपल्या इंस्टाग्रामवर काही छायाचित्रांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धोनी आणि सीएसकेचे व्यवस्थापन चेपॉक स्टेडियमवर ‘द एलिफंट व्हिस्पर्स’च्या टीमचे स्वागत करताना दिसत आहेत. प्रथम धोनीने त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांना त्याच्या नावाची छापलेली जर्सी भेट दिली. यादरम्यान धोनीची मुलगी झिवाही टीम ‘द एलिफंट व्हिस्पर्स’चे सदस्य कार्तिकी गोन्साल्विस, बोमन आणि बेली यांना भेटली आणि फोटो काढले.
  • मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ससाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हत्तींचे केअरटेकर, बोमन आणि बेली देखील उपस्थित होते. यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला. एम.एस. धोनीने त्याची जर्सी भेट देऊन त्याचा गौरव केला. यासोबतच त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून मोमेंटोही देण्यात आला. हत्तींची काळजी घेण्यासाठी त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून धनादेश देण्यात आला होता. टीमने इव्हेंटमधील फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “आमची मनं जिंकणाऱ्या टीमला टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करा! बोमन, बेली आणि फिल्ममेकर कार्तिकी गोन्साल्विस यांचे अभिवादन करून खूप छान वाटले आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले हे आमचे भाग्य आहे.”
मिनिटभर गाडी चालवा, पक्के वाहन परवाने घ्या!
  • राज्यात वाहन चालवण्याच्या पक्क्या परवान्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीत सर्व निकष पाळले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. वाहन परवाना चाचणी सरासरी एका मिनिटात उरकली जात असून, किमान निकषांचे पालन न करता परवाना दिला जात आहे. दरम्यान, योग्य पद्धतीने चाचणी न घेता परवाना दिला जात असल्याने अपघातांमध्ये वाढ होत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
  • राज्यात ५० प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आहेत. परिवहन विभागानेच दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१७ ते २०२२ या कालावधीत राज्यात वाहन परवाना चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २.४ टक्के आहे. १४ आरटीओंमध्ये वाहन परवाना चाचणीत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. फक्त सहा आरटीओंमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक आहे. वाहन परवाना चाचणीसाठी मोटार वाहन कायद्यानुसार २४ निकष आहेत. हे सर्व निकष आरटीओकडून पाळले जात नाहीत. पक्क्या परवान्यासाठी ही चाचणी अगदी चुटकीसरशी घेतली जात आहे. वाहन परवाना चाचणीचा सरासरी वेळ दुचाकीसाठी १६ ते २० सेकंद, मोटार व रिक्षासाठी १ मिनिट आणि जड वाहनांसाठी ३ मिनिटे आहे.
  • वाहन चालवण्यासाठी सुरुवातीला सहा महिन्यांसाठी शिकाऊ परवाना दिला जातो. नंतर पक्क्या परवान्यासाठी प्रत्यक्ष वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाते. पुण्यात मोटारीचा वाहन परवाना प्रथमच घेत असल्यास वाहन चालन व प्रशिक्षण संस्थेतील (आयडीटीआर) ट्रॅकवर ही चाचणी होते. तसेच आळंदी रस्त्यावरील फुलेनगर येथे दुचाकी, तीन चाकी आणि इतर जड वाहनांच्या परवान्यासाठी चाचणी घेतली जाते. मोटारीच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा परवाना मिळवण्यासाठी आळंदीतील ट्रॅकवर पुन्हा चाचणी द्यावी लागते.
एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा; नवीन सीईओ म्हणून महिलेची नियुक्ती, सहा आठवड्यात स्वीकारणार पदभार
  • एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली असून त्यांनी या पदासाठी एका महिलेची निवड केली आहे. मस्क यांनी अद्याप नव्या सीईओचं नाव घोषित केलं नसलं तरी नवीन सीईओ येत्या सहा आठवड्यांत पदभार स्वीकारतील, अशी माहिती मस्क यांनी ट्वीटद्वारे दिली.
  • ते म्हणाले, ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड केल्याचं जाहीर करताना मला आनंद होत आहे. ट्वीटरचे नवीन सीईओ येत्या सहा आठवड्यांत पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर मी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी तसेच सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचं काम पाहीन”
  • एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतलं, तेव्हापासून ते त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ट्विटरला कायमस्वरूपी सीईओ नाही. नवे सीईओ आल्यानंतर माझी भूमिका बदलेल. मला कोणत्याही कंपनीचे सीईओ व्हायचं नाही, असं त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं.
  • दरम्यान, मस्क यांनी यासंदर्भात १९ डिसेंबर रोजी ट्विटरवर पोल सुरू केला होता. “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हायला हवं का? या पोलचा येणारा निकाल मला मान्य असेल, मी तो पाळेन”, असं एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यावेळी तब्बल ५७.५ टक्के युजर्सनं पदावरून पायउतार होण्याच्या बाजूने मत दिलं होतं.
नऊ मुद्द्यांच्या आधारे जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!
  • महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला असून हा निकाल एकूण ९ मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाने नमूद केला आहे. यात प्रतोदची नियुक्ती, राज्यपालांचे निर्णय, बहुमत चाचणीचे आदेश यासंदर्भात शिंदे गटाला धक्का बसला आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिल्यामुळे पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवता येणार नाही, असंही न्यायालयाने यावेळी नमूद केलं.
  • काय आहे न्यायालयाचा ९ कलमी निकाल?
  • १. नबम रेबिया प्रकरणातील तरतुदी इथे लागू होतात की नाही याचा निर्णय सात सदस्यीय मोठ्या खंडपीठासमोर होईल.
  • २. आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयात हे न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर आमदार अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा.
  • ३. अपात्रतेसंदर्भातली नोटीस बजावलेली असतानाही कोणताही आमदार सभागृहाच्या कामकाजाच सहभागी होऊ शकतो. त्यामुळे सभागृहात झालेल्या कामकाजाची वैधता आमदारांच्या अपात्रतेबाबत होणाऱ्या निर्णयावर अवलंबून असू शकत नाही.
  • ४. विधिमंडळ पक्ष नसून राजकीय पक्षच प्रतोदाची नियुक्ती करत असतो. विशिष्ट पद्धतीने मतदान करणं किंवा अनुपस्थित राहाणं याचे आदेश राजकीय पक्ष देत असतो, विधिमंडळ पक्ष नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाकडून नियुक्त केलेल्या प्रतोदांना मान्यता देणं बेकायदेशीर होतं.
  • ५. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाला त्यांच्यासमोर आलेल्या प्रकरणांवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
  • ६. यासंदर्भात निर्णय घेताना निवडणूक आयोगाने त्यासाठी सर्वाधिक लागू होणाऱ्या पद्धतीनुसार निर्णय घ्यायला हवा.
  • ७. पक्षफुटीनंतर आमदारांना अपात्रतेसं संरक्षण मिळण्याची सूट या प्रकरणात राहात नाही. विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवून त्यावर आधारीत अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यावा. दहाव्या परिशिष्टातील दुसऱ्या परिच्छेदाचा संदर्भ घ्यावा, जिथे दोन किंवा अधिक गट संबंधित राजकीय पक्ष असल्याचा दावा करत असतील.
  • “अब हमारी भूमिका खतम”, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दिली सूचक प्रतिक्रिया!
  • ८. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश उद्धव ठाकरेंना देणं बेकायदेशीर होतं. त्यांच्यासमोर सबळ पुरावे नव्हते. पण उद्धव ठाकरेंना आता पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही कारण उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांचा राजीनामा सादर केला होता.
  • ९. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळेच भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा राज्यपालांना निर्णय योग्य ठरतो.
व्हॉट्सॲपवर तुम्हालाही येताहेत का आंतरराष्ट्रीय क्रमाकांवरून मिसकॉल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
  • जगभरातील कोट्यवधी युजर्सना एका क्लिकवरून संपर्कात ठेवणाऱ्या व्हॉट्सॲपवरून सध्या भलताच स्कॅम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हॉइस मिस कॉल येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक व्हॉट्सॲप युजर्सने याबाबती तक्रारी केल्या आहेत. संपूर्ण देशात ही समस्या वाढली असून याप्रकरणी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. यावरून आता व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने याप्रकरणी खुलासा केला आहे.
  • व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, “आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेफ्टी टूल देत आहोत. व्हॉट्सॲपवर ब्लॉक-रिपोर्टचाही पर्याय उपलब्ध आहे. या ॲपवरून होणाऱ्या अनैतिक कामांवर प्रतिबंध घालण्याचा आमचा कायम प्रयत्न असेल.परंतु, आता नवा स्कॅम आला आहे. यामध्ये एका क्रमाकांवर मिस कॉल दिला जातो. त्या नंबरवर लोकांना परत कॉल केला की त्यांच्यासोबत स्कॅम केला जातो. परंतु, या स्कॅमवर व्हॉट्सॲपने ५० टक्क्यांपर्यंत प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केला आहे.”
  •  
  • काही दिवसांपूर्वी याप्रकरणी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही मोठं विधान केलं होतं. फोनमध्य इनबिल्ड असलेल्या अॅप्सना काय काय अॅक्सेस करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबादारी संबंधित कंपन्यांनी घ्यायला हवी.
आम्हाला नाही तर तुम्हालाही नाही!  विश्वचषक २०२३ खेळण्यासाठी पाकिस्तानचा भारतात येण्यास नकार
  • आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस भारतात होणार आहे. या मेगा इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेटचा संघ यात सहभागी होणार आहे की नाही याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. आम्ही या स्पर्धेत सहभागी होणार असे मान्यता अद्याप दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याशिवाय विश्वचषक होणार का? असे प्रश्न क्रिकेट वर्तुळात निर्माण होत आहेत.
  • इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामाच्या समाप्तीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या मेगा इव्हेंटचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करू शकते. आयसीसी बोर्ड सदस्याने पीटीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताचे पाकिस्तानात जाणे आणि पाकिस्तानचे भारतात येणे या दोन्ही देशांच्या बोर्डावर अवलंबून नाही. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही पीसीबी सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच निर्णय घेऊ शकते.
  • आशिया चषकाच्या आयोजनावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये हे दंद्वयुद्ध पाहायला मिळत आहे. पीसीबीचे हायब्रीड मॉडेल उर्वरित देशांनी नाकारल्यानंतर आता आशियाई क्रिकेट परिषद (ACC) सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेत आयोजित करण्याची तयारी करत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानही आशिया चषकातून बाहेर पडू शकतो. आशिया चषकाबाबत पाकिस्तानने केलेल्या हायब्रीड प्लॅनप्रमाणे भारताने आपले सामने यूएईमध्ये खेळवले असते आणि उर्वरित संघ केवळ पाकिस्तानमध्येच खेळले असते. यालाही बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही.
  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे काही अधिकारी जिओ टीव्हीवर बोलताना म्हणाले, “जर भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानात खेळायला येऊ शकत नाही तर आम्हीही विश्वचषक २०२३मध्ये सहभागी होणार नाही. आमच्याशिवाय विश्वचषक खेळा.” वास्तविक, पाकिस्तान आशिया चषक २०२३चे आयोजन करत आहे, परंतु बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानला जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये या मुद्द्यावरून दररोज वाद होत आहेत. अशा परिस्थितीत भारत पाकिस्तानात जाणार का? आणि पाकिस्तानचा संघ भारतात येणार का? या प्रश्नांची उत्तरे दोन्ही देशांच्या सरकारवर अवलंबून आहेत.

 

सायप्रस अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा - ज्योतीला राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक :
  • सायप्रस आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील १०० मीटर अडथळा शर्यतीमधील सुवर्णपदकासह ज्योती याराजीला अखेरीस तिसऱ्या प्रयत्नात १३.२३ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करण्यात यश आले. याआधी दोनदा ज्योतीचा राष्ट्रीय विक्रम नोंदवण्यात आला नव्हता.

  • आंध्र प्रदेशच्या २२ वर्षीय ज्योतीने मंगळवारी १३.३८ सेकंदांचा जुना विक्रम मोडीत काढला. तो २००२ मध्ये अनुराधा बिस्वालने नोंदवला होता. जागतिक अ‍ॅथलेटिक्स खंडीय स्पर्धेतील ही ‘ड’ विभागाची स्पर्धा आहे.

  • भुवनेश्वरमधील ओडिशा अ‍ॅथलेटिक्स उच्च कामगिरी केंद्रात ज्योती जोसेफ हिलियर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. गेल्या महिन्यात कोळीकोडे येथे झालेल्या फेडरेशन चषक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने १३.०९ सेकंद अशी वेळ नोंदवली होती.

  • परंतु वाऱ्याचा वेग अपेक्षित प्रमाणापेक्षा अधिक असल्याने तो विक्रम नोंदवण्यात आला नाही. त्याआधी, ज्योतीने २०२०मध्ये झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत १३.०३ सेकंदांची राष्ट्रीय विक्रमाची वेळ नोंदवली होती. मात्र, स्पर्धेला राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने (नाडा) तिची उत्तेजक चाचणी न घेतल्याने आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे तांत्रिक शिष्टमंडळ उपस्थित न राहिल्याने ज्योतीचा राष्ट्रीय विक्रम ग्राह्य धरण्यात आला नव्हता.

  • पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत अमलन बोरगोहेनने २१.३२ सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले. त्यानेसुद्धा फेडरेशन चषक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.

एनआयएचे लवकरच मध्य प्रदेशात कार्यालय :
  • दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) लवकरच तिचे कार्यालय मध्य प्रदेशात सुरू करेल, असे राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी बुधवारी सांगितले. आतापर्यंत मध्यप्रदेशात या दहशतवादविरोधी यंत्रणेचे कार्यालय नव्हते. राज्याच्या पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी एका अतिरेकी संघटनेच्या काही सदस्यांना अटक केली होती, हे उल्लेखनीय.

  •  ‘एनआयए लवकरच मध्य प्रदेशात त्यांची शाखा उघडणार आहे. अल- सूफा व जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) यासारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांबाबत ही यंत्रणा तपास करत आहे’, असे राज्य सरकारचे प्रवक्तेही असलेले मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले.

  • या वर्षी मार्च महिन्यात मध्यप्रदेश पोलिसांनी प्रतिबंधित जेएमबी संघटनेच्या चार सदस्यांना भोपाळमधून अटक केली होती आणि त्यांच्याजवळून जिहादी साहित्य व इलेक्ट्रॉनिक उपकरणे हस्तगत केली होती. याशिवाय, राजस्थान पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अल-सूफा या अतिरेकी संघटनेशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना मार्च महिन्यात रतलाम येथून अटक केली होती.

पाकिस्तान श्रीलंकेच्या वाटेवर ? पाकिस्तानचा रुपया घसरला, एका डॉलरची किंमत पोहचली १८८.३५ रुपयांवर :
  • पाकिस्तान रुपयाचे मूल्य डॉलर्सच्या तुलनेत आत्तापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर येऊन पोहचले आहे. एका डॉलर्सच्या समोर पाकिस्तानला १८८.३५ रुपये मोजावे लागत आहेत. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानच्या चलनाचे मुल्य डॉलर्सच्या समोर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. आज सकाळी ८२ पैशांनी पाकिस्तान रुपया डॉलर्सच्या तुलनेत घसरला.

  • पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, इंधनाच्या वाढत्या किंमती यामुळे पाकिस्तानचे पेकाट मोडले आहे. असं असतांना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागितली.

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही ६ अब्ज डॉलर्स देण्याची तयरी दर्शवली होती. यासाठी काही प्रमाणात आर्थिक शिस्त पाळण्याच्या सूचना या पाकिस्तानला केल्या होत्या. विशेषतः इंधन आणि वीजेवर असलेली सवलत मोठ्या प्रमाणात कमी कराव्यात असं नाणेनिधीने स्पष्टपणे पाकिस्तानला सांगितले होते. दरम्यान पाकिस्तामध्ये सत्तांतर झाल्यावरही हे बदल होऊ शकले नाहीत. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पाकिस्तानला अपेक्षित असलेला अर्थपुरवठा थांबवला. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत भर पडली आहे.

  • विदेशी चलन साठाही पाकिस्तानमधील कमी झाला असून पुढील काही दिवस काढता येतील अशी परिस्थिती आहे. त्यात आता अन्नधान्याचे संकटही पाकिस्तानसमोर येऊन ठेपले आहे. गहूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यावर्षी कमी झाल्याने आणखी एक अडचणीचा डोंगर पाकिस्तानसमोर उभा राहीला आहे.

आजच्या दिवशी भारताने जगाला दाखवून दिली होती आपली ताकद; जाणून घ्या National Technology Day चा इतिहास :
  • भारतात ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताने तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात किती प्रगती केली आहे आणि आतापर्यंत कोणकोणती मोठी कामगिरी केली आहे हे लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. तसेच, या दिवसाशी संबंधित एक मोठी घटना देखील आहे ज्यामुळे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे या दिवशीच साजरा केला जातो.

  • ११ मे १९९८ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली होती. भारताने १९७४ ला पहिली अणू चाचणी केली होती. त्यानंतर अण्वस्त्र संबंधितचे तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठी काही चाचण्यांची आवशक्यता होती.

  • विविध आंतरराष्ट्रीय आणि राजकीय कारणांनी १९७४ नंतर चाचण्या शक्य झाल्या नाहीत. पण १९९८ ला पाच यशस्वी अणू चाचण्या करत भारताने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवून दिली. पोखरणमधील या अणुचाचणीचे नेतृत्व माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. यानंतर, पुढच्या वर्षी याच दिवशी म्हणजेच ११ मे १९९९ रोजी भारतात पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

राजपक्षे नौदल तळात सुरक्षित; सुरक्षा दलांची श्रीलंकेच्या रस्त्यांवर गस्त :
  • श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांना त्यांच्या सरकारी निवासस्थानातून हलवण्यात आल्यानंतर त्रिंकोमाली येथील नौदल तळात संरक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे देशाचे संरक्षण सचिव कमल गुणरत्ने यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, सरकार आर्थिक संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याच्या मुद्दय़ावर देशात निदर्शने सुरू असताना, ‘दिसताच गोळय़ा घाला ’ असा आदेश मिळालेल्या सशस्त्र वाहनांतील सुरक्षा दलांनी देशभरातील रस्त्यांवर गस्त घातली.

  • महिंदू राजपक्षे समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर हिंसाचार उसळल्यामुळे; २००५ ते २०१५ दरम्यान अध्यपदाच्या कारकीर्दीत लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई) विरुद्ध अमानुष लष्करी मोहिमेसाठी ओळखले जाणारे श्रीलंका पीपल्स पार्टीचे (एसएलपीपी) नेते महिंदू यांनी सोमवारी राजीनामा दिला. या हल्ल्यानंतर राजपक्ष समर्थक राजकीय नेत्यांविरुद्ध उफाळलेल्या व्यापक हिंसाचारात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह नऊ जण ठार झाले.

  • तीनवेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले महिंदू राजपक्षे यांचे निवासस्थान सोमवारी पेटवून देण्यात आले. आपल्या समर्थकांवर भीषण हल्ले करण्यात आल्यानंतर महिंदू हे त्यांची पत्नी व कुटुंबीयांसह टेंपल ट्रीज या त्यांच्या सरकारी निवासस्थानातून पळून गेले आणि त्यांनी त्रिंकोमालीतील नौदल तळावर आश्रय घेतला. त्रिंकोमाली हे देशाच्या ईशान्य किनाऱ्यावरील बंदराचे शहर आहे.

  • ‘महिंदू राजपक्षे यांना त्रिंकोमालीतील नौदल तळावर हलवण्यात आले आहे’, असे कमल गुणरत्ने यांनी पत्रकारांना सांगितले. ‘ते कायमचे तेथे राहणार नाहीत. परिस्थिती सामान्य झाली की त्यांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी हलवण्यात येईल’, असे ते म्हणाले.  

  • महिंदू हे त्रिंकोमालीच्या नौदल तळावर असल्याचे वृत्त पसरल्यानंतर लोकांनी या महत्त्वाच्या लष्करी ठिकाणी निदर्शने सुरू केली. महिंदू तसेच त्यांचे मोठे भाऊ व अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततेने निदर्शने करणाऱ्या सरकारविरोधी निदर्शकांविरुद्ध हिंसाचार केल्याबद्दल महिंदू यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी विरोधी राजकीय पक्ष करत आहेत.

१२ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.