चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ मे २०२०

Date : 12 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दिल्लीत अडकलेल्या UPSC च्या १४०० विद्यार्थांसाठी स्पेशल ट्रेन :
  • राजधानी दिल्लीमध्ये UPSC ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांचा राज्यात येण्याचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील १६०० विद्यार्थी स्पर्धा परिक्षाची तयारी करण्यासाठी दिल्लीत होते.

  • करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घेण्यात आल्यामुळे सर्वजण दिल्लीमध्ये अडकून पडले होते. दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी १६ मे रोजी दिल्ली-पुणे अशी स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे.

  • UPSC च्या विद्यार्थांना दिल्लीहून पुण्याला घेऊन येणाऱ्या ट्रेनसाठी चार थांब्याची परवानगी देण्यात आली आहे. या ट्रेनला सुरूवातीला दिल्ली ते भूसावळ अशी परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता ही ट्रेन दिल्ली ते पुणे व्हाया भुसावळमार्गे धावणार आहे. या ट्रेनला भुसावळ, नाशिक, कल्याण आणि पुणे असे चार थांबे देण्यात आले आहेत. केंद्राकडून १४०० विद्यार्थांना या स्पेशल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सानिया मिर्झा ठरली Fed Cup Heart पुरस्काराची मानकरी, बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दान :
  • भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रतिष्ठेचा Fed Cup Heart पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार जिंकणारी सानिया पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. Asia/Oceania गटात सानिया मिर्झाने १० हजारापेक्षा जास्त मत घेत या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.

  • चाहत्यांनी केलेल्या ऑनलाईन व्होटिंगद्वारे सानिया मिर्झाला हा पुरस्कार मिळाला आहे. एकूण मतांपैकी ६० टक्के मत सानिया मिर्झाला पडली आहेत.

  • Fed Cup Heart पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय ठरल्याचा मला अभिमान आहे. मी हा पुरस्कार माझ्या देशवासियांना समर्पित करते, आणि माझ्या चाहत्यांचीही मी आभारी आहे. देशासाठी अशीच चांगली कामगिरी करत राहण्याचा माझा मानस असल्याचं सानिया मिर्झाने म्हटलंय.

रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; ८० कोटी लोकांना होणार फायदा :
  • जर तुम्ही रेशन कार्डधारक आहात तर तुमच्यासाठी एक दिलासादायक वृत्त आहे. केंद्र सरकारनं रेशन कार्डसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. रेशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार क्रमांकाला जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

  • सोमवारी सरकारनं यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. तसंच आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचंही सरकारनं सांगितलं. रेशन कार्डाला आधार क्रमांक न जोडल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना सरकारनं ही माहिती दिली.

  • सरकारनं आता आधार क्रमांक रेशन कार्डाला जोडण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. रेशन कार्डाशी आधार क्रमांक न जोडल्यास ते रद्द करण्यात येईल अशा चर्चा सुरू होत्या. अशा परिस्थितीत सरकारकडून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्यापही कोट्यवधी लोकांनी आपला आधार कार्ड क्रमांक रेशन कार्डाला जोडलेला नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या अधिसूचनेच्या आधारे सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना रेशनकार्ड आधार क्रमांकाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

२४ तासांत ३६०४ रूग्णांची वाढ; देशातील करोनाग्रस्तांची संख्या ७० हजारांच्या पुढे :
  • देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ झाली आहे. लॉकडाउन असतानाही दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. आतापर्यंत करोनानं २२९३ जणांचा बळी घेतला आहे. या सर्वांमध्ये दिलासादाक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही.

  • देशात आतापर्यंत २२ हजार ४५४ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४६ हजार ८ आहे.

  • भारतातील करोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ३१.१५ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी दिली. करोनाचे रुग्ण वाढत असले तरी समूह संसर्ग झालेला नाही.

  • करोनाचे अनेक रुग्ण आढळलेली ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या विभागांमध्ये घराघरांत जाऊन चाचणी घेणे व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजने गरजेचे असल्याचेही लव अगरवाल यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पर्यटन ६०-८० टक्क्यांनी घटणार : 
  • आंतरराष्ट्रीय पर्यटन हे करोनाच्या साथीमुळे ६० ते ८० टक्क्यांनी घटणार असून त्यामुळे ९१० अब्ज ते १.२ लाख कोटी डॉलर्सचा फटका महसुलात बसणार असल्याची माहिती जागतिक पर्यटन संघटनेने दिली आहे. याचा परिणाम म्हणून जगात १० ते १२ कोटी लोक रोजगार गमावणार आहेत.

  • करोनाचा प्रसार जगात बहुतांश देशात झाला असून आतापर्यंत ४१ लाख लोकांना संसर्ग झाला आहे, तर २,८२,७१९ लोक बळी पडले आहेत. अमेरिकेत १३ लाख लोकांना संसर्ग झाला असून ८० हजार बळी गेले आहेत.

  • जागतिकपर्यटन संघटनेने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत २०२० मधील पहिल्या तिमाहीत २२ टक्केघट झाली आहे. जागतिक करोना साथीमुळे आता वर्षांला पर्यटनात २०१९ च्या तुलनेत  ६० ते ८० टक्के घट होणार आहे.

  • जागतिक पर्यटन संघटनेचे महासचिव झुराब पोलिकासविली यांनी सांगितले की, मार्चमध्ये अनेक देशात टाळेबंदीमुळे पर्यटकांची संख्या ५७ टक्केकमी झाली आहे. विमानतळे व राष्ट्रीय सीमा बंद असल्याने ६७ दशलक्षआंतरराष्ट्रीय प्रवासी कमी झाले असून ८० अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. आशिया व पॅसिफिकमधील आकडेवारीनुसार  पर्यटक संख्या ३३ दशलक्षांनी घटली असून युरोपात २२ दशलक्षांनी कमी झाली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारकपात होणार का? मोदी सरकारने केला ‘हा’ मोठा खुलासा :
  • केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही पगारकपात करण्यात येणार नसल्याचं सांगत अर्थ मंत्रालयाने चुकीचं वृत्त पसरत असल्याची माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाने कोणत्याही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाणार नसल्याचं सांगितलं आहे. अर्थ मंत्रालयाने ट्विट करत हे वृत्त निराधार असल्याचं सांगितलं आहे.

  • “केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही. काही प्रसारमाध्यमांनी दिलेलं वृत्त चुकीचं असून पूर्णपणे निराधार आहे,” असं अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

  • एप्रिल महिन्यातही मंत्रालयाने अशाच पद्धतीचं एक ट्विट करत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २० टक्के कपात केली जाणार असल्याचं वृत्त चुकीचं आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं होतं. “केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये २० टक्के कपात केली जाण्याचा विचार केला जात असल्याचं वृत्त दिलं जात आहे. अशी कोणतीही कपात केली जाणार नाही. कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये कोणतीही कपात करण्याचा विचार नाही,” असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं.

१२ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.