महाराष्ट्राच्या महिला संघाने शुक्रवारी साखळी सामन्यांत तेलंगण आणि चंडीगड या संघांवरील दोन विजयांसह फ-गटातून बाद फेरीतील प्रवेश केला. पाटणा आणि जयपूर येथे झालेल्या गेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचा संघ साखळीतच गारद झाला होता.
महाराष्ट्राने सायंकाळच्या सत्रात चंडीगडला ४०-१८ असे सहज नमवले. या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावातच २३-१३ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आणखी जोरदार खेळ करीत १७ गुणांची भर टाकली. महाराष्ट्राच्या या विजयात स्नेहल शिंदेच्या धारदार चढायांचा मोलाचा वाटा आहे. तिने एकाच चढाईत ४ गडी टिपण्याचा पराक्रम केला. पूजा यादवची तिला चढाईत तर सायली केरीपाळे, पूजा शेलार यांची पकडींची साथ लाभली.
त्याआधी, सकाळच्या सत्रात महाराष्ट्राने तेलंगणावर ४८-१४ असा दिमाखदार विजय नोंदवला. मध्यंतराला महाराष्ट्राने २६-१० अशी आघाडी घेतली होती. शनिवारी महाराष्ट्राची शेवटची साखळी लढत छत्तीसगडशी होईल.
पुढील आर्थिक वर्षांत राज्यावरील कर्जाचा बोजा हा साडेसहा लाख कोटींवर जाणार आहे. यंदाच्या वर्षांत तूट ही २० हजार कोटींनी वाढली आहे. करोनाचा फटका लागोपाठ दुसऱ्या वर्षांही राज्याच्या तिजोरीला बसला असून, जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, वाहन कर, उत्पादन शुल्क या मुख्य आर्थिक स्त्रोतात घट झाली आहे.
गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना १० हजार २२६ कोटींची तूट अपेक्षित होती. नैसर्गिक आपत्ती आणि चक्रीवादळामुळे खर्चात वाढ झाली. परिणामी तूट २० हजार कोटींनी वाढली व ती ३० हजार कोटींवर जाणार आहे. २०२०-२१ मध्ये महसुली तूट ही ४१,१४२ कोटी होती. यंदाच्या वर्षांत ती ३० हजार कोटी असून, पुढील आर्थिक वर्षांत ती तूट २४ हजार ३५३ कोटी होईल, असा अंदाज आहे. प्रत्यक्ष तूट वाढू शकते. आकस्मिक खर्च २३ हजार कोटी झाला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या वर्षांत खर्च वाढला. यामुळे ९० हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले. २०२०-२१ या वर्षांत ६५ हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. पुढील वर्षांत ७७ हजार कोटींचे कर्ज काढण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य सकल उत्पन्नाच्या तीन टक्के कर्ज काढण्यास मान्यता असल्याने तेवढय़ा रक्कमेचे कर्ज काढण्यात आले. ही मर्यादा वाढविण्यात आली तरी राज्याने अतिरिक्त कर्ज काढण्याचे टाळले होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. रशियाने जर रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल असं बायडन म्हणाले आहे. अमेरिका युक्रेनमध्ये रशियाशी लढणार नाही. तसंच नाटो आणि क्रेमलिनच्या दरम्यान भिडल्यास तिसरं महायुद्ध होईल, असा इशाराही ज्यो बायडन यांनी दिला आहे. तसंच युक्रेनसोबतच्या लढाईत रशिया कधीच जिंकणार नाही, असंही बायडन म्हणाले आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी रशियाच्या सैन्याने युक्रेनवर हल्ला केला. २७ फेब्रुवारीला मॉस्कोने युक्रेनमधली दोन वेगळी क्षेत्रं डोनेट्स्क आणि लुहान्स्कला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ज्यो बायडन यांनी सांगितलं की आम्ही युरोपात आमच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देणं सुरूच ठेवणार आहोत.
आम्ही संपूर्ण ताकदीनिशी नाटो क्षेत्राच्या इंच न इंच भागाचं रक्षण करू आणि नाटोमधल्या अन्य देशांनाही यासाठी प्रेरित करू. त्यांनी सांगितलं की आम्ही युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. बायडन यांनी सांगितलं की नाटो आणि रशिया थेट भिडल्यास तिसर महायुद्ध होईल. आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न करू.
या आधी बायडन यांनी रशियाची दारू, सी-फूड आणि हिऱ्यासह अन्य व्यापारी संबंधांवर निर्बंध लावण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी बायडन म्हणाले की आता जग पुतीन यांचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहे.
ईशान्य चीनमधील चंगचन शहरात करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळत असल्याच्या पार्श्वभू्मीवर सरकारने शुक्रवारी तेथे टाळेबंदीचे आदेश जारी केले. या शहराच्या सुमारे ९० लाख लोकसंख्येला कठोर करोना निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी चीनमध्ये स्थानिक संक्रमणाचे नवे ३९७ रुग्ण नोंदले गेले. त्यातील ९८ रुग्ण हे जिलिन प्रांतातले आहेत. हा परिसर चंगचन शहराच्या सभोवताली आहे.
निर्बंधांनुसार, आता रहिवाशांना घरी थांबणे अनिवार्य केले आहे. याशिवाय त्यांना सामूहिक चाचण्यांच्या तीन फेऱ्यांत चाचणी करून घ्यावी लागेल. या शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा आणि वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारच्या दिवसभरातील रुग्णांपैकी केवळ दोन जण चंगचन शहरातील असले तरी संपूर्ण शहरात टाळेबंदी करण्याचा आग्रह सरकारी अधिकाऱ्यांनी धरला होता. करोनाबाबत चीनने शून्य तडजोड धोरण स्वीकारले असून एक किंवा त्याहून अधिक रुग्ण आढळला, तरी संपूर्ण वसाहत टाळेबंद केली जात आहे.
त्याशिवाय जिलिन नावाच्या नजीकच्या शहरातही ९३ रुग्ण नोंदले गेले आहेत. तेथेही अंशत: निर्बंध लागू करण्यात आले असून त्या शहराचा संपर्क तोडण्यात आला आहे.
भारतातून चुकून एक मिसाइल सुटलं आणि ते ९ मार्च रोजी पाकिस्तानात जाऊन पडलं. या प्रकारामुळे भारताने खेद व्यक्त केला आहे. पाकिस्तानी लष्कराने याप्रकरणी काल एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी भारतीय मिसाईल पाकिस्तानात पडल्याने काही भागात नुकसान झाल्याचं म्हटलं होतं.
पाकिस्तानने सांगितलं, एक भारतीय मिसाईल पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलं आणि ते मियाँ चन्नू भागात कोसळल्याने त्या भागात थोडं नुकसान झालं आहे. याबद्दल भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातामध्ये जिवीतहानी झालेली नसल्याने ही एक दिलासादायक गोष्ट असल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ९ मार्च २०२२ रोजी नेहमीच्या देखभाल प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे मिसाईल अपघाताने प्रक्षेपित झालं.
भारत सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या भागात हे मिसाईल पडलं आहे. ही दुर्घटना अत्यंत खेदजनक असून या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली ही दिलासादायक बाब आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता राज्यामध्ये सत्तास्थापनाच्या घडामोडींना वेग येताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवणारे योगी आदित्यनाथ होळीच्या आधीच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ (Yogi Adityanath Oath) घेण्याची दाट शक्यता आहे.
योगी आदित्यनाथ हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत होळीच्या आधी म्हणजेच १५ मार्च रोजी पदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहू शकतात असंही सांगितलं जात आहे. याशिवाय भाजपाने अन्य मोठे नेतेही योगींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे योगी हे उत्तर प्रदेशचे पाहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर योगींच्या शपथविधीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. योगी आदित्यनाथ हे होळीच्याआधीच शपथविधीचा कार्यक्रम उरकून लवकरात लवकर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ इच्छितात असं सांगण्यात येत आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.