चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ मार्च २०२१

Date : 12 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
MPSC पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा :
  • गुरुवारी दिवसभर ज्या मुद्द्यावरून MPSC चे परीक्षार्थी आंदोलन करत होते, त्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असून येत्या आठ दिवसांच्या आत MPSC ची पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्या तारखेची घोषणा १२ मार्च म्हणजे शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

  • पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सकाळपासून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात का असेना, पण दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या आठ दिवसांत परीक्षा होतील हे वचन देतो, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

  • “वयोमर्यादा आडवी येणार नाही!” - दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विद्यार्थ्यांना अजून एक दिलासा दिला आहे. MPSC ची पूर्वपरीक्षा अनेकदा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भिती वाटू लागली आहे. त्यानंतर परीक्षा देताच येणार नाही, याची देखील चिंता विद्यार्थ्यांना आहे. मात्र, फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

  • लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच काम देणार - परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच परीक्षेच्या कामांची जबाबदारी दिली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. “उगीच कुणी भडकवतंय म्हणून भडकून जाऊ नका. आपला अभ्यास करत राहा. या परीक्षेला शासकीय यंत्रणा लावावी लागते. त्यामध्ये अनेक कर्मचारी गुंतलेले असतात. या कर्मचारी वर्गाची तयारी करून घ्यावी लागणार आहे. करोना वाढताना विद्यार्थ्यांसोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही टेस्ट करावी लागणार आहे. ज्यांना लसीकरण केलं असेल, अशाच कर्मचाऱ्यांना परीक्षेसंदर्भातल्या ड्युटीवर लावलं जाणार आहे”, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कडक लॉकडाउनचा इशारा; म्हणाले :
  • राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी जेजे रुग्णालयात जाऊन करोनाची लस घेतली. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. लस घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी लोकांना लसीबद्दल कोणतीही भीती किंवा संभ्रम न बाळगण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउनचा इशारा दिला आहे. येत्या एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

  • “लसीकरणाबाबत कोणतीही भीती किंवा संभ्रम ठेवण्याची गरज नाही. लस घेताना अजिबात कळतही नाही, इतक्या सहज पद्धतीने ती दिली जात आहे. करोनाचा वाढत असल्याने लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या सर्वांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यावी,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

  • पुढे बोलताना ते म्हणाले की, “कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, बाहेर अनावश्यक गर्दी टाळा, विनाकारण बाहेर येणं-जाणं टाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा”.

चीनला मोठा दणका देण्याची भारताची तयारी, Huawei वर लवकरच बंदी घालण्याची शक्यता :
  • भारत चीनला अजून एक मोठा दणका देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. अमेरिकेनंतर आता भारतही चीनची दिग्गज टेक कंपनी Huawei वर बंदी घालण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत याबाबत सरकारकडून घोषणा केली जाईल असंही समजतंय.

  • १५ जूननंतर नाही खरेदी करता येणार Huawei  ची उपकरणं? :- वृत्तसंस्था Reutersने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या Huawei या कंपनीच्या दूरसंचार उपकरणांचा वापर करण्यापासून भारतातील मोबाईल कंपन्यांना रोखलं जाईल, असं सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. ‘१५ जूननंतर टेलिकॉम कंपन्यांना केवळ सरकारद्वारे परवानगी देण्यात आलेल्या काही ठराविक कंपन्यांकडूनच उपकरणं खरेदी कारावी लागतील. तसेच ज्या कंपन्यांकडून उपकरणं खरेदी करता येणार नाहीत त्यांची ब्लॅकलिस्टही जारी केली जाईल. या ब्लॅकलिस्टमध्ये Huawei कंपनीचं नाव असू शकतं’, असंही या दोन अधिकाऱ्यांनी सांगितलं.

  • ZTE कॉर्पवरही बंदीची शक्यता :- भारतात एखादी कंपनी गुंतवणूक करत असताना भारतीयांच्या सुरक्षेला धक्का लागत असेल तर अशा परिस्थितीत आर्थिक फायदा-तोटा न पाहता जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल, असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, ZTE कॉर्प या चिनी कंपनीलाही भारतात बंदी घातली जाऊ शकते, असं अन्य एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं. दोन्ही कंपन्या आपल्या उपकरणांद्वारे चिनी सरकारसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • दरम्यान, गेल्या वर्षी भारत-चीन सैन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनच्या बहुतांश लोकप्रिय आणि मोठ्या कंपन्यांचे अॅप्स बॅन करत आहे. सरकार आता Huawei या चीनच्या मोठ्या टेक कंपनीवरही बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

डेन्मार्कमध्ये AstraZeneca लसीच्या वापरावर तात्पुरती स्थगिती; रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याच्या तक्रारी :
  • डॅनिश आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, AstraZeneca ही कोविड -१९ प्रतिबंधक लस घेतल्यापासून काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होत आहेत त्यामुळे त्यांनी या लसीच्या वापराला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

  • डॅनिश हेल्थ ऑथॉरिटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, AstraZeneca ही लस घेतलेल्या लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या गंभीर बातमीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु त्यांनी असेही म्हटले आहे की, “लस आणि रक्ताच्या गुठळ्या यांच्यात काही संबंध असल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही.”

  • कोविड प्रतिबंधक लस  घेतल्यानंतर ४९ वर्षीय परिचारिकेचा “रक्त गोठण्याच्या गंभीर समस्येमुळे” मृत्यू झाल्यानंतर ऑस्ट्रियाने सोमवारी जाहीर केले की त्यांनी AstraZeneca लसींची एक बॅच वापरण्यास स्थगिती दिली आहे.

  • इस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया आणि लक्झमबर्ग या इतर चार युरोपीय देशांनीही या बॅचमधील लसींचा वापर स्थगित केला आहे. या बॅचमधून दहा लाख लसी १७ युरोपीय देशांमध्ये पाठविण्यात आल्या होत्या.

  • बुधवारी, युरोपच्या औषध निरीक्षक संस्था ईएमएने सांगितले की प्राथमिक तपासणीवरून असे दिसून आले आहे की ऑस्ट्रियामध्ये वापरल्या जाणार्‍या AstraZeneca लस ही परिचारिकेच्या मृत्यूसाठी जबाबदार नाही.

१२ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.