चालू घडामोडी आणि दिनविशेष - 12 जून 2023

Date : 12 June, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्रातर्फे मणिपूरसाठी शांतता समितीची स्थापना
  • मणिपूरमधील विविध वांशिक गटांमध्ये शांतता प्रक्रियेचे सुलभीकरण करणे आणि परस्परविरोधी पक्षांमध्ये संवादाची सुरुवात करणे, यासाठी केंद्र सरकारने राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी सांगितले. या शांतता समितीत मुख्यमंत्री, काही मंत्री, खासदार, निरनिराळय़ा राजकीय पक्षांचे नेते आणि नागरी समाज गट यांचा समावेश असल्याचे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
  • राज्यातील विविध वांशिक गटांमध्ये शांतता निर्मितीची प्रक्रिया सुलभ करणे, तसेच संघर्ष करत असलेले पक्ष आणि गट यांच्यात शांततापूर्ण संवाद आणि वाटाघाटी सुरू करणे हे या समितीचे काम असेल. ही समिती सामाजिक सुसंगतता व परस्परांबाबतची समजूत बळकट करेल आणि विविध वांशिक गटांमध्ये सौहार्दपूर्ण संवाद सुलभ करेल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
  • या समितीत माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध वांशिक गटांचे प्रतिनिधी यांचाही समावेश राहील, असे मंत्रालयाने सांगितले आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २९ मे ते १ जून या काळात मणिपूरला भेट दिली होती आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शांतता समिती गठीत करण्याची घोषणा केली होती. अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याबाबत मैतेई समुदायाच्या मागणीच्या विरोधात ३ मे रोजी पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ आयोजित करण्यात आल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसक चकमकी उसळल्या होत्या.

सरमा- एन. बिरेन सिंह चर्चा

  • इम्फाळ : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांची भेट घेतली. पहाटेच गुवाहाटीवरून सरमा इम्फाळला रवाना झाले होते. मणिपूरमधील ताज्या स्थितीवर दोघांनी चर्चा केल्याचे समजते. मणिपूरमध्ये अद्याप तुरळक हिंसाचार सुरूच आहे. महिन्याभरापूर्वी या राज्यात जातीय हिंसाचार भडकला होता, ज्यात सुमारे शंभरावर नागरिक मृत्युमुखी पडले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिमंता बिस्वा सरमा यांनी दिल्लीचा निरोप मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना कळवल्याचे समजते. हा हिंसाचार थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा केंद्राचा संदेश असल्याचे समजते.

शस्त्रे जमा करण्याचे आवाहन   

  • इम्फाळ : सुरक्षा दलांची लुटलेली शस्त्रास्त्रे परत करण्यासाठी भाजपचे आमदार सुसिंद्रो मैतेई यांनी आपल्या निवासस्थानी एक पेटी (‘ड्रॉप बॉक्स’) ठेवण्यात आला आहे. येथे शस्त्रे परत करणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पूर्व इंफाळचे आमदार सुसिंद्रो यांनी घराबाहेर लावलेल्या फलकावर इंग्रजी व मैतेई भाषेत ‘कृपया येथे आपली शस्त्रे ठेवावीत’ असे आवाहन केले आहे.
 ‘जुनटीन्थ’ म्हणजे काय? अमेरिकेतील वर्णभेदाच्या दृष्टीने याचे महत्त्व काय?

जुनटीन्थ हा राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे का?

  • जुनटीन्थ हा अमेरिकेत राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे १६ जून २०२१ या दिवशी अमेरिकेच्या कायदेमंडळाने म्हणजेच काँग्रेसने, दरवर्षी १९ जून या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यासंबंधी विधेयक मंजूर केले. त्यापाठोपाठ अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यावर सही केली. त्यापूर्वी टेक्सास या राज्यामध्ये १९८० पासून १९ जूनला जुनटीन्थ सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ टेक्सास, न्यूयॉर्क, व्हर्जिनिया आणि वॉशिंग्टन अशा इतरही काही राज्यांमध्ये या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली. १९८३ मध्ये मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या जन्मदिनी म्हणजे १५ जूनला राष्ट्रीय सुटी घोषित करण्यात आली. त्यानंतर थेट ३८ वर्षांनी जुनटीन्थच्या दिवशी राष्ट्रीय सुटी घोषित करण्यात आली.

जुनटीन्थनिमित्त राष्ट्रीय सुटी का जाहीर करण्यात आली?

  • अमेरिकेत २५ मे २०२० रोजी पोलिसांनी जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या केल्यानंतर संपूर्ण देशात मोठा आक्रोश झाला. अमेरिकेतील वर्णवर्चस्ववाद अजूनही कायम असल्याची टीका झाली. लोकशाही मूल्ये आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हक्क यासाठी जागरूक असणाऱ्या अमेरिकी नागरिकांचा सरकारवरील दबाव वाढला. त्यानंतर वर्षभरानंतर जुनटीन्थनिमित्त राष्ट्रीय सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक तोपर्यंत अनेक अमेरिकी नागरिकांना हा दिवस आणि त्यामागील इतिहास याबद्दल काहीही माहीत नव्हते.

जुनटीन्थची सुरुवात कुठे झाली?

  • टेक्सास राज्यामध्येच १९ जून १८६६ या दिवशी जुनटीन्थ साजरा करण्यात आला. अमेरिकेतील शेवटच्या कृष्णवर्णीय व्यक्तीची गुलामगिरीतून सुटका होण्याच्या अभूतपूर्व घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त या दिवसापासून जुनटीन्थ साजरा करण्याची सुरुवात झाली. खरे तर अमेरिकेतील गुलामगिरी कायद्याने १८६३ मध्येच संपुष्टात आली होती. पण टेक्सासमधील कृष्णवर्णीय गुलामांना त्याबद्दल माहिती मिळून त्यांची सुटका होण्यासाठी १९ जून १८६५ हा दिवस उजाडावा लागला.

अमेरिकेतील गुलामगिरी कधी संपुष्टात आली?

  • अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांना गुलामगिरीतून मुक्त करणारा अतिशय महत्त्वाचा कायदा अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या काळात मंजूर झाला. लिंकन यांच्या इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशनने ६ डिसेंबर १८६३ पासून अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची गुलामगिरी अधिकृतपणे संपुष्टात आली. यासंबंधी सर्व संबंधितांना, म्हणजे कृष्णवर्णियांना गुलाम म्हणून फुकटात राबवून घेणाऱ्या श्वेतवर्णीयांपासून प्रत्यक्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या कृष्णवर्णीयांपर्यंत याबाबत माहिती देण्यास सांगण्यात आले. पण स्वतःचा फायदा सहजासहजी गमावण्यास तयार नसलेल्या टेक्सासमधील जमीनदार, व्यापाऱ्यांनी यासंबंधीची माहिती कोणाला कळूच दिली नाही. अखेर, युनियन मेजर जनरल गॉर्डन ग्रेंजर १९ जून १८६५ रोजी साधारण दोन हजार सैनिकांसह गल्फ कोस्ट सिटीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर गुलामांची सुटका झाली.
१६ एसटी कर्मचाऱ्यांची बढती रद्द होणार! पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ
  • एकीकडे एसटी महामंडळात बढती होत नसल्याची ओरड कर्मचारी करतात तर दुसरीकडे बढती मिळालेले १६ जण अद्यापही निश्चित ठिकाणी रूजू झाले नाहीत. हे कर्मचारी १२ जूनपूर्वी निश्चित ठिकाणी रूजू न झाल्यास त्यांची बढती रद्द होणार आहे.
  • एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलिनिकरणाच्या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी संप केला होता. त्यावेळी बढती प्रक्रियेबाबतही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता वरिष्ठ लिपिकांची लेखाकार पदावर, तर सहाय्यक भांडारपालांची भांडारपालपदी बढती करण्यात आली. बहुतांश कर्मचाऱ्यांना विभागाबाहेर पदस्थापना दिली गेली. परंतु, या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १६ कर्मचारी अद्यापही बढतीच्या ठिकाणी रूजू झालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांकडून बढती नाकारण्याबाबतही काही कळवण्यात आलेले नाही. दरम्यान, महामंडळाने १२ जून २०२३ पर्यंत बढतीच्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास त्यांचा बढतीस नकार समजून त्यांची बढती रद्द करण्याचे आदेश राज्यातील सगळ्या विभाग नियंत्रक, कार्यशाळा व्यवस्थापक आणि संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. या विषयावर एसटीचे महाव्यवस्थापक (क. व. औ. सं.) अजित गायकवाड म्हणाले, संबंधित कर्मचारी बढतीच्या ठिकाणी रूजू न झाल्यास त्यांची नियमानुसार बढती रद्द होणार आहे.

सर्वाधिक सात कर्मचारी विदर्भातील

  • लेखाकार आणि भांडारपाल पदावर बढतीनंतरही रूजू न होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये नागपुरातील ३, भंडारा १, यवतमाळ २, चंद्रपूर १, बीड २, सिंधुदुर्ग १, सोलापूर १, मुंबई २, पुणे १, लातूर १ तर परभणीतील एकाचा समावेश आहे.
वर्धा जिल्हा ई-ऑफिस प्रणालीत ठरला राज्यात अव्वल, वाचा सविस्तर…
  • सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या प्रणालीचा जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. सुरुवातीस आर्वी उपविभागातील तहसीलमध्ये सुरू करण्यात आलेली ही प्रणाली आता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात कार्यान्वित झाली आहे.
  • सुरुवातीच्या काळात केवळ मंत्रालय व राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये या प्रणालीचा अवलंब केला जात होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालये ई-ऑफिसने जोडली गेली. सर्वस्तरावरील शासकीय कामकाज या प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी येथे रुजू झाल्यानंतर तीनही उपविभागीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली. तालुकास्तरावर सुरुवातीस आर्वी विभागातील तीन तालुक्यांमध्ये राबविल्यानंतर आता सर्व तहसीलमध्ये ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे.
  • तालुकास्तरावर ही गतीमान प्रणाली राबविण्यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तांत्रिक सहाय्य महाआयटीच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांची कामे गतीने व्हावी, त्यांचा त्रास आणि पैसा वाचावा यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयोगी ठरली आहे. शासकीय विभागांच्या फाईल्स प्रत्यक्ष या टेबलवरून त्या टेबलवर फिरतात. ई-ऑफिसच्या पेपरलेस कामकाजामुळे फाईली ऑनलाइन सादर होतात आणि ऑनलाइनच पुढे जात असल्याने फाईलींचा निपटारा वेळेत होतो, शिवाय कामात पारदर्शकता, गतिमानतादेखील येते. नागरिकांचे कार्यालयात येणारे अर्ज, विनंत्या, तक्रारी देखील ई-ऑफिसद्वारे सादर होत असल्याने त्यावरदेखील कालमर्यादेत कारवाई होते.
  • मार्च महिन्यात आर्वी उपविभागातून ई-ऑफिस प्रणाली राबविण्यास सुरुवात झाली. आर्वी तहसीलने या प्रणालीद्वारे सर्वप्रथम फाईल तयार करून राज्यात पहिला तालुका होण्याचा मान मिळविला. त्यानंतर कारंजा व आष्टीने ही प्रणाली राबविली. आता जिल्ह्यातील सर्वच तहसीलमध्ये ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे. तालुकास्तरावर सर्व तहसीलमध्ये प्रणाली राबविणारा वर्धा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्ह्याच्या या कामाचे कौतुक केले आहे.
विक्रमवीर जोकोव्हिचचे २३वे ग्रँडस्लॅम जेतेपद; फ्रेंच खुल्या स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेता
  • टेनिस इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू असा लौकिक मिळवण्याच्या दृष्टीने नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी महत्त्वाचे पाऊल टाकले. जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडवर विजय मिळवताना कारकीर्दीतील विक्रमी २३व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली. या कामगिरीसह त्याने पुरुषांमध्ये राफेल नदालचा (२२) सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला.
  • तिसऱ्या मानांकित सर्बियाच्या जोकोव्हिचने अंतिम सामन्यात रुडवर ७-६ (७-१), ६-३, ७-५ अशी मात करताना तिसऱ्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ‘लाल मातीचा बादशाह’ अशी ओळख असणारा १४ वेळचा फ्रेंच स्पर्धेचा विजेता नदाल यंदा दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत जेतेपदाची सुवर्णसंधी जोकोव्हिचने साधली. त्याने उपांत्य फेरीत अग्रमानांकित कार्लोस अल्कराझला पराभूत केले. मग रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात रुडचा सलग तीन सेटमध्ये पराभव केला.
  • अंतिम सामन्याची रुडने चांगली सुरुवात केली. तो ४-१ असा आघाडीवर होता. मात्र, यानंतर लढवय्या वृत्तीच्या जोकोव्हिचने खेळ उंचावला. त्याने आधी ४-४ अशी बरोबरी साधली. मग दोन्ही खेळाडूंमध्ये ६-६ अशी बरोबरी असल्याने ‘टायब्रेकर’ खेळवण्यात आला. यात अचूक खेळ करताना जोकोव्हिचने ७-१ अशी बाजी मारत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने दमदार खेळ सुरू ठेवताना रुडला पुनरागमनाची संधी दिली नाही. तिसऱ्या सेटमध्ये रुडने झुंज दिली. सुरुवातीला रुडला आपली सव्‍‌र्हिस राखण्यात यश आले. त्यामुळे सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. मात्र, त्याच वेळी जोकोव्हिचने रुडची सव्‍‌र्हिस तोडली, मग आपली सव्‍‌र्हिस राखत स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

नदालकडून अभिनंदन

  • जोकोव्हिचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडल्यानंतर नदालने त्याचे अभिनंदन केले. ‘‘या यशाबद्दल तुझे अभिनंदन. एखादा खेळाडू २३ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा टप्पा गाठेल असा काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणी विचारही केला नव्हता. मात्र, तू ते करुन दाखवलेस,’’ असे नदालने ‘ट्वीट’ केले.

जोकोव्हिचची जेतेपदे

  • ऑस्ट्रेलियन स्पर्धा : १०
  • विम्बल्डन : ७
  • फ्रेंच स्पर्धा : ३
  • अमेरिकन स्पर्धा : ३

12 जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.