चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जून २०२०

Date : 12 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी :
  • राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्राला द्वितीय स्थान मिळाले आहे. क्रमवारीतील पहिल्या शंभर संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात राज्यातील १२ संस्था आणि विद्यापीठ गटात १३ संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षीही क्रमवारीत महाराष्ट्राला द्वितीय स्थानच मिळाले होते.

  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही यादी गुरुवारी जाहीर केली. शैक्षणिक संस्थांमधील अध्ययन-अध्यापन, सोयीसुविधा, संशोधन, विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या रोजगारसंधी, एकूण दृष्टिकोन आदी निकषांवरील संस्थांची कामगिरी विचारात घेऊन ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. सर्वसाधारण गटामध्ये आयआयटी मद्रास प्रथम स्थानी आहे, तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगळूरु दुसऱ्या स्थानी आहे.

  • सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातील आयआयटी बॉम्बे (४), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१९), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (२५), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई (३०), इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (३४), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (५७), सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे (७३), डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे (७५), नरसी मूनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (९२), मुंबई विद्यापीठ (९५), दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (९७), भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे (९८) या संस्थांचा समावेश आहे.

चार दिवसात करोना बरा करणाऱ्या औषधाच्या वापराला रशियात सुरुवात; १० देशांनी केली मागणी :
  • जगभरामध्ये करोनावरील लसीवर संशोधन सुरु असतानाच गुरुवारी रशियाने करोनावर उपचार करण्यासाठी एका औषधाची अधिकृत घोषणा केली. रशियामधील करोनाबाधितांचा आकडा पाच लाखांहून अधिक झाला असून याच पार्श्वभूमीवर तेथील करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रशियाने एका अ‍ॅण्टी व्हायरल औषधाला अधिकृत मान्यता दिली आहे. हे औषध बनवण्यासाठी गुंतवणूकदारांनीच ही माहिती दिली असल्याचे रॉयर्टसने म्हटलं आहे.

  • एविफेविर (Avifavir) असं या औषधाचे नाव आहे. हे औषध देशाच्या वेगवेगळ्या भागांमधील काही रुग्णालयांमध्ये आणि क्लिनीकमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

  • याबद्दलची माहिती रशियामधील रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) सार्वभौमत्व अधिकार असणाऱ्या मंडळाने प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलं आहे. हे औषध बनवण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांची मदत घेण्यात आली असून त्यामध्ये केमरार या कंपनीचा ५० टक्के वाटा आहे.

धाडसी निर्णय, आक्रमक गुंतवणुकीची हीच वेळ :
  • धाडसी निर्णय आणि गुंतवणुकीची हीच वेळ असून देशाला आत्मनिर्भर बनायचे असेल, आर्थिक प्रगती साधायची असेल तर पारंपरिक दृष्टिकोन उपयोगी पडणार नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. ‘इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स’च्या ९५व्या वार्षिक कार्यक्रमात मोदी बोलत होते.

  • आत्ता आपल्याला आयात करणे भाग पाडले जात आहे, पण इथून पुढे प्रत्येकाने देशी उत्पादने निर्यात कशी होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पूर्वीसारखी साचेबद्ध पद्धतीने आर्थिक विकासाची पावले न टाकता नव्या कल्पनांना संधी दिली पाहिजे आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक पुरवठा साखळी निर्माण केली पाहिजे.

  • भारताला आत्मनिर्भर बनवण्याची हीच वेळ असून ज्या वस्तू आयात केल्या जातात, त्यांचे उत्पादन देशांतर्गत व्हायला हवे, असे सांगत मोदींनी स्थानिक वस्तूंना जागतिक बाजारापेठ मिळवून देण्याचा पुनरुच्चार केला. देशातील छोटय़ा व्यापाऱ्यांकडून स्थानिक उत्पादने विकत घ्या, त्यातून त्यांच्या हातात पैसे देतो असे नव्हे तर त्यांच्या कष्टाची पावतीही त्यांना देत असतो, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योजक व व्यापारी वर्गाला दिला.

दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण ‘या’ दिवशी; कुठे, कसं पाहू शकाल :
  • पाच जून रोजी झालेल्या चंद्रग्रहणानंतर याच महिन्यात २१ तारखेला सूर्यग्रहण होणार आहे. हे दुर्मिळ असं कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. या वर्षी दोन चार चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण होणार आहेत. त्यापैकी १० जानेवारी आणि पाच जून रोजी दोन चंद्रग्रहण झाली आहेत.

  • आता २१ तारखेला पहिलं सूर्यग्रहण आणि वर्षातील तिसरे ग्रहण होणार आहे. भारतामध्ये काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे. संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळते

  • भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हे खंडग्रास सुर्यग्रहणाच्या स्वरूपात पाहता येणार आहे. उत्तराखंडच्या जोशी मठ, डेहराडून तसेच हरियाणाच्या कुरुक्षेत्र, पोहोवा, इटिया या भागातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दिसणार आहे. देशाच्या इतर भागांतून खंडग्रास स्थिती दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. महाराष्ट्रात सकाळी १० ते १.२८ या काळात हे ग्रहण दिसणार आहे.

१२ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.