चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जानेवारी २०२२

Updated On : Jan 12, 2022 | Category : Current Affairs


टाटा समूह दोन वर्षांसाठी ‘आयपीएल’चे शीर्षक प्रायोजक :
 • देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या टाटा समूहाने येत्या हंगामापासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचे शीर्षक प्रायोजकत्व येत्या हंगामापासून दोन वर्षांसाठी मिळवले आहेत. चायनीज मोबाइल निर्मिती कंपनी व्हिवो यांच्या जागी टाटा समूहाकडे हे अधिकार देण्यात आल्याचे मंगळवारी ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूह दोन वर्षांसाठी सुमारे ६७० कोटी रुपये (वर्षांसाठी प्रत्येकी ३३५ रुपये) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) देणार आहे. या करारातील ३०१ कोटी रुपये शीर्षक प्रायोजकत्वाचे आहेत, तर अतिरिक्त ३४ कोटी रुपये संघविस्तारामुळे सामन्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल नमूद करण्यात आले आहेत.

 • तथापि, व्हिवोला दोन वर्षे आधी करार स्थगित करण्यासाठी एकूण ४५४ कोटी रुपयांचा (२०२२साठी १८३ कोटी रुपये आणि २०२३साठी २११ कोटी रुपये) भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ला २०२२ आणि २०२३ या दोन हंगामांमध्ये एकूण ११२४ कोटी रुपये महसूल मिळणार आहे. व्हिवो २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांच्या शीर्षक प्रायोजकत्वासाठी ९९६ कोटी रुपयांना बांधिल होते. २०२२मध्ये ४८४ कोटी आणि पुढील वर्षी ५१२ कोटी रुपये यात नमूद करण्यात आले होते.

 • २०१८ ते २०२२ या कालावधीत व्हिवोकडे शीर्षक प्रायोजकत्व असताना हा करार २२०० कोटी रुपयांचा होता. परंतु २०२०मध्ये भारत-चीन सैन्यात गढवाल खोऱ्यात झालेल्या चकमकीमुळे व्हिवोचा करार एक वर्षांसाठी स्थगित करण्यात आला होता. त्या वेळी ड्रीम११ने २२२ कोटी रुपये मोजून त्यांची जागा घेतली होती.

 • २०२१मध्ये व्हिवो कंपनी आपले शीर्षक प्रायोजकत्व अधिकार अन्य कंपनीकडे सुपूर्द करील आणि ‘बीसीसीआय’ची त्याला मान्यता असेल, अशी चर्चा ऐरणीवर होती. परंतु प्रत्यक्षात व्हिवोचे पुनरागमन झाले. ‘बीसीसीआय’ शीर्षक प्रायोजक रकमेतील ५० टक्के रक्कम स्वत:कडे ठेवते, तर उर्वरित रक्कम १० संघांमध्ये समान वाटप करते.

हिरकणीचा वारसा! १८ महिन्यांच्या उर्वीने आईसोबत फक्त साडे तीन तासात सर केला ‘कळसूबाई शिखर’ :
 • महाराष्ट्र वीरांची भूमी म्हणून का ओळखली जाते याचा प्रत्यय आजची पिढीही वारंवार आपल्या कृतींमधून दाखवून देत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे अनेक मावळे आणि हिरकणी आजही या मातीत आहेत.

 • संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा आपला इतिहास आपल्या कृतींमधून जिवंत करत पुन्हा एकदा आपली नोंद घेण्यास ते भाग पाडत आहेत. सोलापूरच्या श्रुती गांधीने आपल्या १८ महिन्यांच्या लेकीसोबत राज्यातील सर्वोच्च शिखर सर करत हे दाखवून दिलं आहे.

 • फक्त १८ महिन्याच्या उर्वी प्रितेश गांधी या सोलापूरच्या चिमुरडीने आपल्या आईसोबत अवघ्या साडेतीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केलं आहे. अवघ्या साडेतीन तासात उर्वी आणि तिची आई श्रुती यांनी कळसूबाईचा अवघड शिखर सर करत जबरदस्त कामगिरी केली.

 • सोलापुरातील गांधी कुटुंबीय हे शिवविचारांवार श्रद्धा ठेऊन गडकिल्यांच्या भ्रमंतीची मोहीम मागच्या वर्षभरापासून राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज पहाटे शिखर सर करत तिरंगा फडकवला. पहाटे साडे चार वाजता त्यांनी चढाईला सुरुवात केली होती. ८ वाजण्याच्या सुमारास या मायलेकींनी शिखर सर केला होता.

ओमायक्रॉनची लागण प्रत्येकालाच होणार, बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही; आरोग्य तज्ज्ञांची माहिती :
 • गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत १५-१८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला.

 • शिवाय आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. मात्र, हा बूस्टर डोस देखील लोकांना ओमायक्रॉनची लागण होण्यापासून रोखू शकणार नाही, असं एका आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलंय.

 • आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलायल एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, “करोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही.

 • नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमायक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमायक्रॉनची लागण झाली,” असं त्यांनी सांगितलं.

दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद ; कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा आदेश ; रेस्ताराँ-बारही बंद, घरपोच सेवांना मुभा "
 •  दिल्लीतील करोनाचा संसर्गदर २५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे राजधानीत निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व अपवाद केलेल्या खासगी सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारने दिले असून कर्मचाऱ्यांनी घरातून कार्यालयीन कामे करण्याची सूचना करण्यात आली आहे.

 • खासगी बँका, रिझव्‍‌र्ह बँकेशी संबंधित कार्यालये, बिगर बँक वित्तीय संस्था, सूक्ष्मवित्तीय पुरवठादार संस्था, वकिलांची कार्यालये, कुरिअर सेवा तसेच, अत्यावश्यक सेवांमध्ये औषधपुरवठासंदर्भातील कार्यालये-दुकाने, दूरध्वनी सेवा, मालवाहतूक व विमान सेवा यांची कार्यालये मात्र खुली राहतील. या सेवांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये जाण्याची मुभा देण्यात आली आहे.

 • राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरातील रेस्ताराँ व बार बंद राहतील. रेस्ताराँची घरपोच सेवा मात्र सुरू राहणार आहे. मॉल व बाजार सम-विषय तारखांनुसार खुली राहतील. रात्रीची संचारबंदी तसेच, शनिवार-रविवारची ४८ तासांची संचारबंदीही कायम राहणार आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती असून उर्वरित कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

अश्मिताचा धक्कादायक विजय :
 • युवा बॅडिमटनटू अश्मिता छलिहाने इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत मंगळवारी पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद करताना पाचव्या मानांकित एव्हगेनिया कोसेत्सकायाला पराभूत केले. अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत विश्वविजेत्या लो कीन येवला पहिल्या विजयासाठी तीन गेमपर्यंत झगडावे लागले, तर किदम्बी श्रीकांतने दिमाखदार विजय नोंदवला.

 • लो याने कॅनडाच्या शिओडाँग शेंगला १६-२१, २१-४, २१-१३ असे नमवले. श्रीकांतने सिरी वर्मावर २१-१७, २१-१० असा विजय मिळवला. चिराग सेनचे आव्हान मात्र सलामीलाच संपुष्टात आले. त्याने ८-२१, ७-२१ असा मलेशियाच्या सूंग जू व्हेनकडून पराभव पत्करला. बिगरमानांकित छलिहाने फक्त ३१ मिनिटांत जागतिक क्रमवारीत २८व्या क्रमांकावरील रशियाच्या कोसेत्सकायाला २४-२२, २१-१६ असे नामोहरम केले. याचप्रमाणे दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने श्रीकृष्णा प्रिया कुदारावल्लीवर २१-५, २१-१६ असा विजय मिळवला.

 • मिश्र दुहेरीत के. साईप्रतीक आणि गायत्री गोपीचंद जोडीने इशान भटनागर आणि तनिशा कॅस्ट्रो जोडीचा २१-१६, १६-२१, २१-१७ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत अग्रमानांकित मोहम्मद एहसान आणि हेंड्रा सेटियावान या इंडोनेशियाच्या जोडीने भारताच्या प्रेम सिंह चौहान आणि राजेश वर्मा जोडीला २१-१८, २१-१० असे हरवले.

आयपीएलनं VIVOला म्हटलं ‘टाटा’..! लीगला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर :
 • आयपीएल २०२२ मध्ये मोठे बदल होणार आहेत. टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवोने (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 • लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक आहेत, परंतु या काळात टाटा मुख्य प्रायोजक राहील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोने २०१८ मध्ये वार्षिक ४४० कोटी रुपये खर्चून टायटल हक्क विकत घेतले होते. चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२० मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला. तेव्हा हे अधिकार Dream11 ला हस्तांतरित केले गेले.

 • बोर्ड आणि विवो यांच्यातील पाच वर्षांचा करार २०२० हंगामापर्यंत होता आणि एका वर्षाच्या ब्रेकमुळे २०२३ पर्यंत वाढवण्यात आला होता. मंगळवारच्या बैठकीनंतर, टाटा समूह २०२२ आणि २०२३ हंगामासाठी शीर्षक प्रायोजक म्हणून कायम राहील, असा निर्णय घेण्यात आला.

 • विवोने आता आयपीएलचे अधिकार टाटाकडे हस्तांतरित केले आहेत. २०२२च्या हंगामासाठी Dream11 ही कंपनी आयपीएलची टायटल स्पॉन्सर होती. त्याला २२२ कोटी रुपयांचे प्रायोजकत्व अधिकार मिळाले. आयपीएल २०२० करोनामुळे यूएईमध्ये खेळवण्यात आले.

१२ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)