चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ जानेवारी २०२१

Date : 12 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च केंद्रातर्फे :
  • तीन कोटी करोना योद्धय़ांच्या लसीकरणाचा पहिल्या टप्प्यातील खर्च केंद्र सरकारतर्फे उचलण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींचा समावेश नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या दूरचित्र माध्यमाद्वारे घेतलेल्या बैठकीत मोदी यांनी पुन्हा एकदा भारतातील लसीकरण कार्यक्रम ही जगातील सर्वात मोठी मोहीम असल्याचा पुनरुच्चार केला. येत्या शनिवारपासून लसीकरणास प्रारंभ होणार आहे. ‘‘येत्या काही महिन्यांत भारतातील ३० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, या तुलनेत जगातील ५० देशांमध्ये केवळ अडीच कोटीच नागरिकांना लस देण्यात येईल’’, असे मोदी म्हणाले. 

  • लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या दोन्ही करोना लशी जगातील अन्य कोणत्याही उपलब्ध लशींपेक्षा प्रभावी असून त्या देशाची गरज म्हणून विकसित करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. या बैठकीत पंतप्रधानांनी करोना साथीची सद्य:स्थिती आणि लसीकरणाच्या सज्जतेचा आढावा घेतला.

  • लसीकरण मोहिमेबरोबरच भारताचा करोना महासाथीविरोधातील लढा निर्णायक टप्प्यात पोहोचेल. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होताच आणखी काही लशी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी सांगितले.

एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

  • त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, ११ एप्रिल २०२१) रोजी होणार आहे.

  • या अगोदर निश्चित करण्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (११ ऑक्टोबर २०२०), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० – (१ नोव्हेंबर २०२०) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (२२ नोव्हेंबर २०२०) होणार होती.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२० मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे दिनांक संदर्भिय दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्राकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. तथापि, ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शासानाकडून ऐनवेळी निर्णय घेण्यात आला व तसे आयोगास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले.

  • शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय लक्षात घेऊन रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्राकद्वारे तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या दोन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाकडून घोषित करण्यात आले.

भारतीय महिला वैमानिकांचा विक्रम :
  • सर्व महिला वैमानिकांनी सारथ्य केलेले एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्को- बंगळूरु हे विमान सोमवारी बंगळूरुला येऊन पोहचले आणि भारतीय विमानाने विना थांबा सर्वाधिक अंतर पार करण्याच्या या विक्रमाची देशाच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासात नोंद झाली.

  • स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजता सॅन फ्रान्सिस्कोहून निघालेले एआय-१७६ हे विमान सोमवारी पहाटे ३.४५ वाजता बंगळूरुच्या केंपेगौडा विमानतळावर उतरल्यानंतर त्यातील कर्मचारी विमानतळाच्या लाऊंजकडे आले, तेव्हा मोठय़ा संख्येत जमलेल्या लोकांनी आनंदाने घोषणा देत त्यांचे स्वागत केले. सर्व महिला वैमानिकांचा समावेश असलेल्या या चमूने उत्तर ध्रुवावरून सर्वाधिक अंतराचे उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.

  • एअर इंडिया किंवा इतर कुठल्या भारतीय विमान कंपनीतर्फे संचालित हे सर्वात लांब अंतराचे व्यावसायिक विमान उड्डाण असेल, असे एअर इंडियाने यापूर्वी सांगितले होते. जगाच्या दोन विरुद्ध टोकांवर असलेल्या या दोन शहरांतील थेट अंतर १३,९९३ किलोमीटर असून, त्यात सुमारे १३.५ तासांचा ‘टाइम झोन’ बदल होतो.

  • लोकांने हर्षोल्लास व्यक्त करत टाळ्या वाजवत असताना कॅप्टन झोया अगरवाल, कॅ. पापागरी तन्मयी, कॅ. आकांक्षा सोनावणे व कॅ. शिवानी मन्हास यांनी हाताचे अंगठे उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.  ‘भारतीय हवाई वाहतुकीतील महिला वैमानिकांनी इतिहास निर्माण केला असून हा मनात जतन करण्याचा आणि साजरा करण्याचा क्षण आहे. या चारही वैमानिकांचे हार्दिक अभिनंदन!’, असे ट्वीट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.

भारतानं चीनी सैनिकाला परत पाठवलं; चुकून केला होता भारतीय हद्दीत प्रवेश :
  • पूर्व लडाखमध्ये शुक्रवारी भारतीय सैन्यानं पकडलेल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) सैनिकाला आज भारताने पुन्हा चीनकडे सोपवलं. हा चीनी सैनिक ८ जानेवारी रोजी चुकून वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) पार करुन भारतीय हद्दीत आला होता.

  • चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा एक सैनिक शुक्रवारी सकाळी पूर्व लडाखच्या ‘पँगोंग सो’ या दक्षिणी किनारा क्षेत्रात पकडला गेला होता. तो एलएसीच्या भारतीय हद्दीत आला होता. या सैनिकाला आज (सोमवार) सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पूर्व लडाखमध्ये चुशूल-मोल्दो सीमेवर चीनकडे सोपवण्यात आलं.

  • गेल्या आठ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे, अशा परिस्थितीत भारतीय लष्करानं या चीनी सैनिकाला अशा वेळी परत पाठवलं आहे. भारतीय लष्करानं सांगितलं होतं की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा एक सैनिक एलएसीवर भारतीय हद्दीत आला होता. यानंतर तिथे तैनात भारतीय सैनिकांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्यानं सांगितलं की, तो रस्ता भटकल्याने चुकून भारतीय हद्दीत पोहोचला.

आयपीएल’च्या १४व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव ११ फेब्रुवारीला :
  • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव ११ फेब्रुवारीला होण्याची दाट शक्यता आहे. याचप्रमाणे आठ संघांना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे, असे ‘आयपीएल’चे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी सांगितले.

  • सोमवारी ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीच्या झालेल्या ऑनलाइन बैठकीत २०२१च्या हंगामाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. त्यानुसार खेळाडूंच्या स्थलांतरासाठी ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील विश्रांतीच्या दिवसांत लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.

  • चेन्नई केदारला वगळणार - चेन्नई सुपर किंग्जच्या खात्यावर फक्त १५ लाख रुपये बाकी आहेत. त्यामुळे अधिक रक्कम खात्यावर शिलकीत राहावी, याकरिता केदार जाधव आणि पीयूष चावला यांना चेन्नईकडून वगळणे जाण्याची दाट शक्यता आहे.

  • मुंबई इंडियन्सचा संघ कायम - मुंबई इंडियन्सच्या खात्यावर एक कोटी, ९५ लाख रुपये शिल्लक असून, ते आपल्या संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे.

  • पंजाबकडे सर्वाधिक १६.५ कोटी - किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक १६ कोटी, ५० लाख रुपये शिलकीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून लिलावात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. याचप्रमाणे राजस्थान रॉयल्स (१४.७५ कोटी), सनरायजर्स हैदराबाद (१०.१ कोटी), दिल्ली कॅपिटल्स (९ कोटी), कोलकाता नाइट रायडर्स (८.५ कोटी) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (६.४ कोटी) यांच्याकडूनही लिलावात मोठी गुंतवणूक होईल.

१२ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.