चालू घडामोडी आणि दिनविशेष - १२ ऑगस्ट २०२०

Updated On : Aug 12, 2020 | Category : Current Affairsवडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना समानाधिकार :
 • हिंदू वारसा ‘सुधारणा’ कायदा २००५ अमलात येण्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल तरी अविभक्त  हिंदू कुटुंबातील वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींना मुलांइतकाच समानाधिकार (समदायित्व) राहील, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे.

 • सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने मंगळवारी सांगितले की, ९ सप्टेंबर २००५ पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीवर समान हक्क आहे. कारण वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार हा जन्मापासून मिळत असतो. सुधारित कायद्यातील कलम ६ अन्वये मुलींना वडिलोपार्जित संपत्तीतील समान हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने हे हक्क लागू आहेत. त्यामुळे याबाबतची प्रलंबित प्रकरणे सहा महिन्यात निकाली काढावीत.

 • हिंदू वारसा हक्क कायदा पहिल्यांदा १९५६ मध्ये अमलात आला होता. त्यात वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान अधिकार देणारी सुधारणा २००५ मध्ये करण्यात आली होती. ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होते असे स्पष्ट करण्यात आले.

 • प्रकाश विरुद्ध फुलवती (२०१५) व दानम्मा अ‍ॅट सुमन सुरपूर विरुद्ध अमर (२०१८) या प्रकरणात न्यायालयांनी विरोधाभासी निकाल दिले होते. प्रकाश विरुद्ध फुलवती (२०१५) प्रकरणात न्या. अनिल दवे व न्या. ए.के.गोयल यांचा समावेश असलेल्या न्यायापीठाने सांगितले की, सुधारित कायद्यातील वारसा हक्क हे जिवंत वारसा हक्क कर्त्यांच्या जिवंत असलेल्या मुलींना त्या केव्हा जन्मल्या याचा विचार न करता ९ सप्टेंबर २००५ पासून लागू होतात.

 • पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाहीत. दानम्मा अ‍ॅट सुमन सुरपूर विरुद्ध अमर (२०१८) या खटल्यात न्या. ए.के.सिक्री व न्या. अशोक भूषण यांनी म्हटले होते की, २००१ मध्ये वडील वारलेल्या दोन मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत सारखाच हक्क आहे. तो हक्क पूर्वलक्ष्यी लागू होतो. हे परस्पर विरोधी निकाल होते.

करोनावर पहिली लस तयार केल्याचा रशियाचा दावा :
 • गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या करोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला. मात्र, या दाव्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.

 • ‘करोनावरील जगातील पहिल्या लशीची नोंद रशियात करण्यात आली आहे. या लशीच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. ही लस प्रभावी असून, त्यातून करोना विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होते’, असे पुतिन यांनी जाहीर केले. आपल्या मुलीला ही लच टोचण्यात आली असून, तिला बरे वाटत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 • ‘स्पुटनिक व्ही’ असे या लशीचे नाव आहे. ही लस आता प्रथम वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दिली जाईल. लसीकरणाची सक्ती केली जाणार नाही. लसीकरण ऐच्छिक असेल. सप्टेंबरमध्ये या लशीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात सुरू  केले जाईल. नंतर ऑक्टोबरमध्ये लसीकरणास सुरुवात होईल, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले.

 • १८ जूनला रशियन लशीच्या चाचण्यांना सुरुवात झाली. सुरुवातीला ती ३८ जणांना टोचण्यात आली. या सर्वामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली. ही लस १ जानेवारी २०२१ पासून जनतेसाठी उपलब्ध होईल, असे रशियाने म्हटले आहे.

 • वैज्ञानिकांनी या लशीबाबत धोक्याचा इशारा दिला असून परिपूर्ण चाचण्यांशिवाय ही लस वापरणे घातक असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या टप्प्यात प्रयोग न करताच या लशीची नोंदणी करणे चुकीचे असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

चीनमध्ये पसरतोय ब्यूबॉनिक प्लेग; रुग्ण दगावल्याने संपूर्ण गावच लॉकडाउन करण्याचा बीजिंगमधून आदेश :
 • चीनमधील मंगोलिया प्रांताच्या पश्चिमेकडील बायानूर शहरामध्ये एका व्यक्तीचा ब्यूबॉनिक प्लेगमुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला आधीपासूनच प्रकृतीसंदर्भातील व्याधी होत्या त्याला ब्यूबॉनिक प्लेगचा संसर्ग झाला. मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीला ब्यूबॉनिक प्लेग कसा झाला असावा याचा माग काढत काढत सरकारी यंत्रणांनी थेट त्याचं गाव गाठलं आणि सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण गाव सील करण्यात आलं आहे.

 • मागील काही आठवड्यांमध्ये ब्यूबॉनिक प्लेगमुळे अशाप्रकारे क्वारंटाइन करण्यात आलेलं हे दुसरं गाव आहे. बिजिंगमधून हे गावही पूर्णपणे सील करण्याचे आदेश देण्यात आल्याचे युनायडेट किंग्डममधील एक्सप्रेस डॉट को डॉट युके या वेबसाईटने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

 • या संबंधित बोलताना बायानूरमधील अधिकाऱ्यांनी, “मृत व्यक्तीचे घर सील करण्यात आलं आहे. या साथीचा प्रसार होण्याची किती शक्यता आहे यासंदर्भातील तपास आम्ही करत आहोत,” अशी माहिती दिली आहे. सध्या शहरामध्ये माणसामधून माणसाला प्लेगचा संसर्ग होण्याची भिती असल्याचेही अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या व्यक्तव्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. याआधी मागील आठवड्यामध्येही एका व्यक्तीचा ब्यूबॉनिक प्लेगमुळे मृत्यू झाला होता. ही घटना बायानूरच्या शेजराच्या शहरात म्हणजेच बाओटूमध्ये घडली होती.

‘या’ दहा राज्यांनी करोना नियंत्रणात आणला तर देश ही लढाई जिंकेल - पंतप्रधान मोदी :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्वाधिक करोनाबाधित आढळलेल्या १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शनही केली. “जर या दहा राज्यांनी करोनावर नियंत्रण मिळवलं तर देश ही लढाई जिंकेल.

 • करोनाच्या केसेसचे ७२ तासांमध्ये अहवाल, जास्तीजास्त चाचण्या यामुळे आपण या महामारीवर मात करू शकतो,” असंही ते म्हणाले. या बैठकीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगण आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता.

 • “देशात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी सर्वाधिक या दहा राज्यांमध्ये आहेत. यासाठी आम्ही आज समिक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या या चर्चेतील एकमेकांच्या अनुभवातून खुप काही शिकण्यास मिळालं. तसंच एक बाबही लक्षात आली. जर या दहा राज्यांना करोनावर मात करण्यास यश मिळालं तर आपला देशही ही लढाई जिंकू शकेल,” असं मोदी यावेळी म्हणाले.

१२ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)