चालू घडामोडी आणि दिनविशेष - 11 ऑक्टोबर 2023

Date : 11 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पॅलेस्टाईन नव्हे, ‘या’ देशात रचला इस्रायलवरील हल्ल्याचा कट, हमासला दोन देशांकडून मदत
  • इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधल्या युद्धाने जगाला हादरवलं आहे. या युद्धात गेल्या चार दिवसांमध्ये २,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी (७ ऑक्टोबर) सकाळी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रं डागली आणि युद्धाला सुरुवात केली. रॉकेट हल्ल्यापाठोपाठ हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून इस्रायली नागरिकांची कत्तल सुरू केली. शेकडो लोकांची गोळ्या घालून हत्या केली, तर १५० हून अधिक इस्रायली स्त्रियांचं अपहरण केलं. हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केला असला तरी गाझा पट्टीपासून ३०० किमी दूर असलेल्या बैरुत शहरात (लेबनानची राजधानी) या हल्ल्याचा कट शिजला होता, अशी माहिती नुकतीच समोर आली आहे.
  • इस्रायलने दावा केला आहे की, या हल्ल्याचा कट लेबनानच्या बैरूत शहरात रचला होता. तसेच इस्रायलवर हल्ला करण्यासाठी सगळी शस्त्रास्त्रं, दारूगोळा, आणि रॉकेटसह इतर यंत्रसामग्री ही लेबनानने पुरवली होती. शस्त्र मिळाल्यानंतर हमासचे दहशतवादी इस्रायलवर तुटून पडले. लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या मदतीमुळेच हमास हा हल्ला करू शकली. हिजबुल्लाह एका बाजूला हमासला मदत करत आहे, त्याचबरोबर हमासच्या हल्ल्यापाठोपाठ हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनीदेखील इस्रायलवर हल्ला केला. त्यामुळे इस्रायलचं सैन्य एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढत आहे.
  • हिजबुल्लाहने मंगळवारी इस्रायली रणगाड्यांवर क्षेपणास्त्रं डागली. या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने लगेच हा हल्ला आपणच केला असल्याचं जाहीर केलं. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हिजबुल्लाहने या हल्ल्याचं उघडपणे समर्थन केलं आहे. तसेच लेबनानमध्ये हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला इराणी सरकार ताकद देत आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेत ५०,००० हून अधिक तरुणांचा भरणा आहे.
  • हिजबुल्लाहने इस्रायलमधील तीन ठिकाणी क्षेपणास्त्रं, मोर्टार आणि बॉम्बहल्ला केला आहे. लेबनानमधून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रं माउंट दोव्ह प्रांतात कोसळली. तसेच हे हल्ले करून हिजबुल्लाहने एक निवेदन जारी केलं. यात हिजबुल्लाहने म्हटलं आहे की, आम्ही इस्रायलवर हल्ला केला आहे. इस्रायली लोकांनी पॅलेस्टाईनवर केलेल्या अत्याचारांचा बदला घेण्यासाठी आम्ही पॅलेस्टिनी लोक आणि हमासबरोबर उभे आहोत. दरम्यान, हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायलने लेबनानच्या सीमेवर गोळीबार करून प्रत्युत्तर दिलं.
जागतिक अर्थव्यवस्था मंदावणार, नाणेनिधीकडून चालू वर्षासाठी अंदाज

वाढते व्याजदर, रशिया-युक्रेन युद्धासह, वाढत चाललेली भू-राजकीय ताणाची स्थिती यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावत आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी दिला. जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ चालू वर्षात ३ टक्के राहील, तर पुढील वर्षात ती २.९ टक्क्यांवर घसरेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला आहे.

याआधी जुलैमध्ये नाणेनिधीने पुढील वर्षासाठी ३ टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता. करोना संकटामुळे २०२० मध्ये आलेल्या अल्पकालीन मंदीतून जग सावरलेले असताना आता त्यात पुन्हा घसरण होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा ३.५ टक्क्यांचा अंदाज वर्तविला होता, तो सुधारून घेत तिने ३ टक्क्यांपर्यंत खालावला आहे.

विकास दराबाबत ‘आयएमएफ’चा ६.३ टक्क्यांचा सुधारित अंदाज
  • भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६.३ टक्के राहील, असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. याआधी वर्तविलेल्या ६.१ टक्के विकास दराच्या अंदाजात आता वाढ करण्यात आली आहे. याचवेळी किरकोळ महागाईचा दर ५.५ टक्के राहण्याची शक्यताही तिने वर्तवली आहे.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक आर्थिक स्थितीचा अहवाल मंगळवारी जाहीर केला. या अहवालानुसार, भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षात ६.३ टक्के राहील. चालू आर्थिक वर्षासाठीच्या आधीच्या अंदाजात ०.२ टक्के वाढ करण्यात आली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत क्रयशक्ती वाढल्याने अंदाजात वाढ करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर ५.४ टक्के आणि विकास दर ६.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेकडून महागाई दर नियंत्रणात ठेवण्याचे उद्दिष्ट मध्यम कालावधीत गाठले जाईल. देशाची चालू खात्यावरील तूट चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १.८ टक्के राहील, असेही नाणेनिधीने नमूद केले आहे.

चीनचा विकास दर कमी राहणार

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चीनच्या विकासदराचा अंदाज घटवला आहे. याचबरोबर युरोपमधील देशांचा विकासदरही कमी राहील, असे म्हटले आहे. जागतिक पातळीवर आर्थिक वाढ कमी आणि असमान राहील. जागतिक जीडीपी यंदा ३ टक्क्यांवर कायम राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
  • जागतिक अर्थव्यवस्था करोना संकटातून सावरली आहे. याचबरोबर रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि मागील वर्षातील ऊर्जा संकट यातूनही जग बाहेर पडत आहे. मात्र, जागतिक पातळीवर असमान आर्थिक विकास दिसून येईल. मध्यम कालावधीत साधारण विकास दराचा अंदाज आहे.
युद्धाच्या चौथ्या दिवशी इस्रायलच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन, काय झाली चर्चा? मोदी म्हणाले…
  • इस्रायल या देशावर शेजारच्या पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (७ ऑक्टोबर) पहाटे रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. या हल्ल्याला इस्रायलनेही रॉकेट हल्ला करून जशास तसं प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सरू आहे. आज युद्धाचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत या युद्धात दोन्ही बाजूचे सुमारे १६०० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर ७,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्य पूर्वेतील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. तर अमेरिका आणि युरोपातील काही देश इस्रायलबरोबर उभे आहेत. भारतानेही इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली आहे. अशातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केल्याची बातमी समोर आली आहे.
  • अमेरिकेसह, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने आज सकळी संयुक्त निवेदन जारी करत इस्रायला पाठिंबा दर्शवला आहे. हमासच्या दहशतवादी कृत्यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही संयुक्तपणे हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध करतो, असं या राष्ट्रांनी निवेदनात म्हटलं आहे.
  • अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्रिटनने संयुक्त निवेदनात म्हटलं की, आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कॉल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आम्ही सर्वजण एकजुटीने इस्रायलला पाठिंबा देतो. आम्ही हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध करतो.” या युद्धजन्य परिस्थितीत भारतही इस्रायलच्या बाजूने उभा असून भारतानेही हमासचा निषेध नोंदवला आहे.
  • दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मला फोन करून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली, याबाबत मी त्यांचे आभार मानतो. या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो.
पुढील आशियाई स्पर्धेत कामगिरी अधिक उंचावेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास; आशियाई पदक विजेत्या खेळाडूंशी संवाद
  • भारतीय खेळाडू त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत पोचण्यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करेल, असे वचन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील आशियाई स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अधिक उंचावलेली असेल अशी खात्री व्यक्त केली.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी २८ सुवर्णपदकांसह १०७ पदके मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावली. या पदक विजेत्या खेळाडूंशी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी संवाद साधला. भारताच्या यशातील अर्धा वाटा महिला खेळाडूंचा राहिला याकडे लक्ष वेधत मोदी यांनी महिला खेळाडूंचे यावेळी विशेष आभार मानले. देशातील महिला खेळातही मागे नाहीत हे या खेळाडूंनी दाखवून दिले, असे मोदी म्हणाले. उद्दिष्टांपर्यंत पोचण्यासाठी सरकार खेळाडूंना प्रत्येक आघाडीवर मदत करेल. या वेळी आपण पदकांचे शतक गाठले. पुढील स्पर्धेत याहून अधिक पदके मिळवली जातील याची मला खात्री आहे, असे मोदी यांनी सांगितले.
  • अधिक युवकांनी खेळाकडे जोडले जावे यासाठी आशियाई स्पर्धा एक द्योतक होती. आता खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीने यशाचा नवा मार्ग उघडला गेला. नव्या पिढीला ही कामगिरी नक्कीच प्रेरणा देईल, असेही मोदी म्हणाले.
  • भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्याची दखलही मोदी यांनी या वेळी घेतली. ते म्हणाले,‘‘स्पर्धा कुठलीही असो आशियाई किंवा अन्य आंतरराष्ट्रीय. भारतीय खेळाडू पदक मिळवत आहेत. देशातील क्रीडा संस्कृती वाढण्यासाठी हे चांगले संकेत आहेत. हे यश पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील प्रेरक ठरेल यात शंका नाही. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी खेळाडूंना शाळांमध्ये जाऊन अमलीपदार्थ आणि झटपट यशाच्या मार्गापासून दूर राहण्याचे आवाहन करण्याची सूचना केली. तुम्ही आदर्श आहात. विद्यार्थी तुमचे लगेच ऐकतील असे मोदी यावेळी म्हणाले.

 

हरमनप्रीत कौरची मोठी झेप - आयसीसी पुरस्कार जिंकत रचला इतिहास :
  • भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या श्रेणीतील महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. महिला गटात हरमनप्रीत महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे, तर रिझवानला पुरुष गटात हा बहुमान मिळाला आहे.

  • विराट कोहली, रोहित शर्मासारख्या खेळाडूंना मोह्ममद रिझवानशी बरोबरी करता आली नव्हती. पण आता भारताच्या हरमनप्रीत कौरने रिझवानशी बरोबरी केली आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये इतिहास रचला होता, कारण भारताला १९९९ नंतर एकदाही इंग्लंडमध्ये विजय मिळवता आला नव्हता. पण आता हरमनप्रीतच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

  • हरमनप्रीतने इंग्लंडमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली - हा पुरस्कार मिळवण्यासाठी हरमनप्रीत कौरने सहकारी खेळाडू स्मृती मानधना आणि बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना यांना मागे टाकले. हरमनप्रीतने अलीकडेच इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी केली होती आणि ऐतिहासिक विजयात सामना जिंकणारी खेळी खेळली होती. तिने सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत १०३.२७ च्या स्ट्राइक रेटने २२१ धावा केल्या आणि ती या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.

समाजवादकेंद्री राजकारणातील नेता हरपला - मुलायमसिंह यादव यांचे निधन :
  • समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. यादव यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

  • गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायमसिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावरून, ‘‘माझे वडील आणि सर्वाचे ‘नेताजी’ आता हयात नाहीत,’’ अशा संदेशाद्वारे मुलायमसिंह यांच्या निधनाची दिली. मुलायमसिंह यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव सैफई येथे मंगळवारी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मुलायमसिंह यांना ऑगस्टमध्ये मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तदाब खालावल्याने आणि शरीरातील प्राणवायूचे प्रमाण घटल्याने त्यांना २ ऑक्टोबर रोजी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

  • मुलायमसिंह यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तर प्रदेशातील इटावाजवळील सैफई येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून हा पक्ष राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. मुलायम यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. विद्यार्थी आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता.

  • राज्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ अध्यापनही केले होते. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि अनेक विरोधी नेत्यांप्रमाणे मुलायम यांनीही तुरुंगवास भोगला. मुलायम यांनी १९९६ ते १९९८ पर्यंत संरक्षणमंत्रीपद भूषविले. १९८९-९१, १९९३-९५ आणि २००३-०७ असे तीन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मुलायम दहा वेळा आमदार म्हणून, तर सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मल्लखांबातील तीन सुवर्णपदकांमुळे महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी :
  • मल्लखांब प्रकारातील तीन सुवर्णपदकांसह मिळविलेल्या सहा पदकांच्या जोरावर सोमवारी महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. महाराष्ट्राने आता ३४ सुवर्ण, ३७ रौप्य आणि ५७ कांस्यपदकांसह एकूण १२८ पदके मिळवून हरयाणाला मागे टाकले.

  • सेनादल संघ ५३ सुवर्ण, ३३ रौप्य आणि २९ कांस्यपदकांसह एकूण ११५ पदकांसह आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. हरयाणाने एकूण पदकांचे शतक गाठले. मात्र, त्यांना ३२ सुवर्ण, ३०रौप्य आणि ३८ कांस्यपदकांसह तिसऱ्या स्थानावर घसरावे लागले.

  • मल्लखांब प्रकारात शुभंकर खवले, अक्षय तरळ व रूपाली गंगावणे यांची कामगिरी महाराष्ट्राच्या यशात निर्णायक ठरली. शुभंकर या पुण्याच्या खेळाडूने पुरलेल्या मल्लखांबावर लवचिकतेचे अप्रतिम प्रदर्शन केले.  दोरीच्या मल्लखांबावर अक्षय सरस ठरला. 

  • महिला विभागातील दोरीच्या मल्लखांब प्रकारात रूपाली गंगावणेने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक पटकाविले. पुरलेल्या मल्लखांबावर मात्र तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  दोरीच्या मल्लखांबावर नेहा क्षीरसागर कांस्यपदकाची मानकरी ठरली.  जान्हवी जाधवने रौप्यपदक जिंकले.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना दिली विराट कोहलीची ही खास भेट :
  • भारतीय क्रिकेट संघ सध्या टी२० विश्वचषक २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. टीम इंडिया व्यतिरिक्त भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर हे देखील सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. जयशंकर यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांची भेट घेतली. कॅनबेरा येथे दोन्ही राजनैतिक अधिकाऱ्यांची बैठक झाली. यादरम्यान भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना विशेष भेट दिली. ही भेट काही नसून भारतीय फलंदाज विराट कोहलीची बॅट आहे.

  • जयशंकर यांनी विराटची सही असलेली बॅट रिचर्ड यांना भेट दिली. दोन्ही नेत्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान मार्ल्स यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून जयशंकर यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, क्रिकेटवरील प्रेमासह अनेक गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात. मार्ल्स पुढे म्हणाले की, आज जयशंकर यांनी क्रिकेटचा दिग्गज कोहलीची स्वाक्षरी केलेली बॅट देऊन आश्चर्यचकित केले.

  • या वर्षाच्या सुरुवातीला जयशंकर यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे विराट कोहलीची स्वाक्षरी केलेली बॅट ऑस्ट्रेलियामधील त्याच स्टेडियमचे मुख्य अध्यक्ष मारिस पायने यांना भेट दिली होती.

  • देशाच्या सामरिक दृष्टीकोनातून विचार करता हिंदी महासागरात चीनच्या हालचाली आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात वाढत्या लष्करी प्रभावादरम्यान जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांना भेटून आनंद झाला. प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर विचार विनिमय केला. आमचे वाढते संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य शांततापूर्ण, समृद्ध आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिकची खात्री देते,” परराष्ट्र मंत्री काही भेटवस्तू देत असल्याचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

11 ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.