चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ ऑक्टोबर २०२१

Updated On : Oct 11, 2021 | Category : Current Affairs


कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा - भारताचा पदकधडाका :
 • नेमबाजांनी अखेरच्या दिवशीही अचूक वेध साधल्याने भारताने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेची सर्वाधिक पदकांसह सांगता केली. ‘आयएसएसएफ’ने जाहीर केलेल्या पदकतालिकेनुसार, स्पर्धेअंती भारताच्या खात्यात एकूण ४० पदके होती, ज्यात १६ सुवर्ण, १५ रौप्य आणि नऊ कांस्यपदकांचा समावेश होता.

 • अखेरच्या दिवशी २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल आणि ५० मीटर पिस्तूल या ऑलिम्पिकमध्ये न खेळल्या जाणाऱ्या नेमबाजी प्रकारांत भारतीयांनी उत्कृष्ट कामगिरी करताना सर्व १२ पदके आपल्या नावे केली. २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात पुरुषांमध्ये विजयवीर सिद्धूने सुवर्ण, तर उधयवीर सिद्धूने रौप्यपदकाची कमाई केली. या जुळ्या भावंडांमध्ये अंतिम फेरीअखेरीस ५७०-५७० अशी गुणांची बरोबरी होती.

 • मात्र, विजयवीरने १० गुणांवर सर्वाधिक (१७ वेळा) वेध साधल्याने त्याने अव्वल क्रमांक पटकावला. या गटात हर्ष गुप्ताने (५६६ गुण) कांस्यपदक मिळवले. महिला गटात रिदम सांगवानने (५७३ गुण) सुवर्णपदकाची कमाई करताना निवेदिथा (५६५ गुण) आणि नाम्या कपूर (५६३ गुण) यांना मागे सोडले.

 • तसेच ५० मीटर पिस्तूल नेमबाजी प्रकारात पुरुषांमध्ये अर्जुन सिंह चिमाने ५४९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. शौर्य सरिन आणि अजिंक्य चव्हाण यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकण्यात यश आले. महिलांमध्ये शिखा नरवालने ५३० गुणांसह अव्वल स्थान मिळवताना ‘सुवर्ण’ कामगिरी केली. ऐशा सिंहने (५२९ गुण) रौप्य, तर नवदीप कौरने (५२६ गुण) कांस्यपदक आपल्या नावे केले. दुसऱ्या स्थानावरील अमेरिकेने एकूण २१ पदके मिळवली.

“राज्यातला बंद १०० टक्के यशस्वी”; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास :
 • राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.

 • लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला.

 • त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले आहे.

शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड देण्यासाठीच्या विशेष मोहिमेचा कालावधी वाढविला :
 • राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शासकिय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड ही कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा कालावधी ३१ ऑक्टोंबर, २०२१ रोजीपर्यंत वाढविण्यात आला आहे. ही मोहीम सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतच ही मोहीम राबवण्यात येणार होती.

 • हा कालावधी अपुरा असून त्यात वाढ करण्याची मागणी आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडे केली होती. याची दखल घेऊन अखेर आदिवासी विकास विभागाने या विशेष मोहिमेचा कालावधी ३१ ऑक्टोबर पर्यंत वाढविला असून याबाबत आदिवासी विकास विभागाने पत्र काढले आहे.

 • अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शासकिय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड ही कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प स्तरावर विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

 • सदर मोहिमेचा कालावधी अपुरा असल्यामुळे हा मोहिमेचा कालावधी वाढविण्याची मागणी श्रमजीवी संघटनेसह, आदिवासी बांधवांकडून होत होती. त्यामुळें विशेष मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त आदिवासी बांधवांना मिळावा यासाठी “समर्थन” संस्थेच्या वतीने आदिवासी विकास विभागाला पत्र देऊन विशेष मोहिमेचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती.

भारनियमनाचे सावट! राज्यात कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; तूट भरून काढण्याचे आव्हान :
 • देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक हे प्रत्येकी २१० मेगावॉटचे तसेच पारस- २५० मेगावॉट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॉटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे.

 • यासोबतच कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॉटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॉटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

 • विजेची मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॉटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरू आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून ७०० मेगावॉट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे.

 • रविवारी सकाळी ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.

स्पुटनिक लाइट लशीच्या निर्यातीस भारताची मान्यता :
 • भारत सरकारने एका मात्रेच्या स्पुटनिक लाइट या कोविड १९ प्रतिबंधक लशीच्या निर्यातीस मान्यता दिली आहे. ही लस रशियाच्या सहकार्याने भारतात तयार करण्यात आली असून आपल्या देशात या लशीला अजून मान्यता देण्यात आलेली नाही असे सूत्रांनी रविवारी सांगितले.

 • भारताच्या हेटरो बायोफार्मा लि. या कंपनीने या लशीचे उत्पादन केले असून स्पुटनिक लाइट लशीच्या ४० लाख मात्रांची निर्यात रशियाला करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

 • स्पुटनिक लाइट ही रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीसारखीच असून भारतातील लसीकरण कार्यक्रमात वापर करण्यासाठी अजून या लशीला मंजुरी देण्यात आलेली नाही. भारताच्या औषध महानियंत्रकांनी स्पुटनिक व्ही लशीला एप्रिलमध्ये मंजुरी दिली होती पण स्पुटनिक लाइट लशीला अजून मंजुरी मिळालेली नाही.

 •  रशियाच्या राजदूतांनी भारत सरकारला अशी विनंती केली होती की, हेटरो बायोफार्माने तयार केलेल्या स्पुटनिक लाइट या लशीच्या निर्यातीला परवानगी देण्यात यावी. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड या आस्थापनेशी या कंपनीचा करार असून त्यांनी लशीचे उत्पादन केले आहे. भारतात अजून स्पुटनिक लाइट या लशीला मान्यता मिळालेली नाही तोपर्यंत ही लस निर्यात करण्यास परवानगी द्यावी असे राजदूतांनी म्हटले होते. 

११ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)