चालू घडामोडी आणि दिनविशेष - 11 मे 2023

Date : 11 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘बीसीसीआय’ला मिळणार अब्जावधीचा हिस्सा
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) तिजोरी २०२३ ते २०२७ या कालावधीत आणखी भरभरून वाहणार आहे. ‘बीसीसीआय’ला २०२३ ते २०२७ या पाच वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) महसुलातील वाटा म्हणून तब्बल ९ अब्ज रुपये अपेक्षित आहेत.
  • अर्थात, ही आकडेवारी अजून निश्चित नाही. मात्र, ‘आयसीसी’च्या एका अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘बीसीसीआय’ला ‘आयसीसी’च्या वार्षिक महसूलातील ३८.५० टक्के इतका वाटा मिळतो. ‘आयसीसी’ला या कालावधीत ६ कोटी डॉलर महसूल अपेक्षित असून, या टक्केवारीनुसार जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असणाऱ्या ‘बीसीसीआय’ला २ कोटी ३१ लाख डॉलर इतके उत्पन्न अपेक्षित आहे.
  • हा एक प्रस्तावित आराखडा आहे. ते क्रिकेट मानांकन,‘आयसीसी’ स्पर्धामधील कामगिरी आणि व्यावसायिक खेळातील योगदानावर अवलंबून असते. यामध्ये व्यावसायिक विभागात ‘आयसीसी’ला मोठा महसूल मिळवून देण्यात ‘बीसीसीआय’चा महत्त्वाचा वाटा आहे, असे ‘बीसीसीआय’च्या सूत्राने सांगितले. एका संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ‘आयसीसी’च्या महसूल वाटपातील इंग्लंडचा वाटा ६.८९ टक्के, ऑस्ट्रेलियाचा ६.२५ टक्के, तर, पाकिस्तानचा ५.७५ टक्के इतका आहे. या वेळी सहयोगी सदस्यांसाठी आयसीसी ११ टक्के वाटप करणार आहे. नव्या प्रस्तावापूर्वी हे वाटप १४ टक्के होते.
कर्नाटकमध्ये ७२ टक्के मतदान
  • कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ७२ टक्के मतदान झाले. विधानसभेच्या २२४ जागांसाठी पार पडलेल्या मतदानात रामनगर येथे सर्वाधिक ७८.२२ टक्के मतदान झाले होते. बंगळूरु शहरमध्ये ४८.६३ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील  विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात एकूण ७२.३६ टक्के मतदान झाले होते.
  • या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलात तिरंगी लढत झाली. निवडणुकीसाठी पाच कोटी ३१ लाख मतदारहोते. दोन हजार ६१५ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी दि.१३ मे रोजी होणार आहे.

सीमाभागात चुरस

  • कोल्हापूर :  सीमाभागात मतदानात उत्साह दिसून आला. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली तरीही काही केंद्रांमध्ये रांगा लागलेल्या होत्या. बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात सरासरी ७३ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी वाढली असल्याने एकीकरण समितीच्या ५ उमेदवारांच्या निकालाकडे लक्ष वेधले आहे.
‘The Kerala Story’ची टीम घेणार यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट; ‘या’ गोष्टींवर होणार चर्चा
  • सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा धर्मांतरण केलेल्या चार महिलांची आहे ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.
  • एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटासाठी गर्दी केल्याचे ठीकठिकाणी बघायला मिळत आहे. राजकीय संघटनांनीही यात सहभाग घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घातली गेली आहे, तर देशातील काही प्रदेशांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार ‘द केरला स्टोरी’ची टीम लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. चित्रपट टॅक्स फ्री करण्याबरोबरच याच्या कथेबद्दलही या भेटीत चर्चा केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संपूर्ण कॅबिनेटबरोबर हा चित्रपट बघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले, “उत्तर प्रदेशची जनता हा चित्रपट बघू इच्छिते की कशा रीतीने त्यांच्या लोकांना यातना सहन कराव्या लागल्या. आम्ही चित्रपट बघू आणि मग त्यावर निर्णय घेऊ.”
आज होणार Google I/O इव्हेंट; जाणून घ्या भारतात कसा पाहता येणार लाईव्ह? ‘हे’ प्रॉडक्ट्स होणार लॉन्च
  • आज Google चा वर्षातील सर्वात मोठा i/o इव्हेंट होणार आहे. यंदाचा गुगलचा हा इव्हेंट एकदम खास असणार आहे. कारण कंपनी यामध्ये पहिल्या पिक्सल फोल्ड हा पहिला फोल्डिंग स्मार्टफोन लॅान्च करणार आहे. तसेच तुम्हाला यामध्ये Pixel 7a चे अधिकृत लॉन्चिंग पाहायला मिळणार आहे. जो लवकरच भारतात देखील येणार आहे.
  • तसेच या इव्हेंटमध्ये गुगल त्याच्या AI चॅटबॉट Bard बद्दल माहिती देणार आहे. तसेच या इव्हेंटची सुरुवात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या भाषणाने होणार आहे. सेच याशिवाय Android 14 चे ऑफिशियल इंट्रोडक्शन, पिक्सल टॅबलेटसह Pixel 8 सिरीज देखील लॉन्च करू शकते. तर हा इव्हेंट तुम्ही Live कुठे, कसा आणि केव्हा पाहू शकता त्याबद्दल जाणून घेऊयात.

Google I/O इव्हेंट २०२३ कधी आणि कुठे पाहता येणार ?

  • Google I/O 2023 हा इव्हेंट माउंटन व्ह्यू (कॅलिफोर्निया) मधील शोरलाइन अ‍ॅम्फीथिएटरमध्ये होणार आहे. म्हणजेच हा इव्हेंट यंदा भौतिकरित्या होणार आहे. मात्र फॅन्स मुख्य भाषण मोफत लाईव्ह पाहू शकणार आहेत. याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे कंपनीच्या अधिकृत YouTube हँडलवर होणार आहे. Google I/O कीनोट रात्री १०.३० वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्यानंतर डेव्हलपर केंद्रित कीनोट होणार आहे. गुगल या वर्षी अनेक डिव्हाइसेस लॉन्च करण्याची शक्यता आहे त्यामुळे हा इव्हेंट एका तासापेक्षा अधिक काळ चालू शकतो.

Android 14 

  • गुगल या कार्यक्रमामध्ये अँन्ड्रॉईड १४ ला बीटा टेस्टर्ससाठी लॉन्च करू शकते. काही महिन्यांनी हे सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी रोलआऊट करण्यात येणार आहे. अँड्रॉइड १४ मध्ये मिळणाऱ्या अनेक नवीन फीचर्सची माहिती या इव्हेंटमध्ये दिली जाणार आहे. ज्यामध्ये सर्वात खास ‘Back Gesture’ हे फिचर असणार आहे.

AI Bard

  • गुगलच्या या इव्हेंटमध्ये AI bard देखील सादर केले जाणार आहे. कंपनी याबद्दल या इव्हेंटमध्ये अधिकची माहिती वापरकर्त्यांना आणि ग्राहकांना देऊ शकते.

Pixel 7a

  • Pixel 7a हा मिड-बजेट असणारा स्मार्टफोन कंपनीसाठी गेमचेंजर ठरू शकतो. सध्या या सेगमेंटमध्ये सॅमसंग, ओप्पो आणि वनप्लसचे वर्चस्व पाहायला मिळते. गुगलच्या या फोनची किंमत साधरणतः ४५,००० रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये संकीर्ण, बॅटरी आणि कॅमेरा देखील अपग्रेड होऊ शकतो.

Pixel Fold

  • Pixel Fold या फोल्डेबल फोनमध्ये तुम्हाला ७.६७ इंचाचा स्क्रीन मिळू शकतो. तसेच हा फोन फोल्ड केला असता त्याच्या डिस्प्लेची साईझ ५.७९ इंच होतो. गुगलचा फोल्डेबल फोनचा डिस्प्ले सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत लहान होतो.
तीन राज्यांचा समलिंगी विवाहाला विरोध; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
  • राजस्थान, आंध्र प्रदेश आणि आसाम या तीन राज्यांचा समलिंगी विवाहाला विरोध असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. समलिंगी विवाहाच्या मुद्दय़ावर आपल्याकडे सात राज्यांचा प्रतिसाद आला असून त्यापैकी या तीन राज्यांनी त्याला विरोध केल्याची माहिती केंद्राने दिली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस आर भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी एस नरसिंह यांच्या घटनापीठासमोर यावरील सुनावणी सुरू आहे.
  • महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडताना सांगितले की, मणिपूर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि सिक्कीम या राज्यांनी या मुद्दय़ावर गहन आणि सविस्तर चर्चा आवश्यक असून तातडीने उत्तर सादर करता येणार नाही असे कळवले आहे. सुनावणीदरम्यान  भारतीय कायद्यांनुसार एकटय़ा व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. आदर्श कुटुंबामध्ये स्वत:ची जैविक मुले असतात, पण यापेक्षा वेगळी परिस्थिती असू शकते हे कायद्याला मान्य आहे असे न्यायालयाने नमूद केले. लिंग ही संकल्पना अस्पष्ट असू शकते पण आई व मातृत्व ही संकल्पना अस्पष्ट नाही असा युक्तिवाद राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) केला. त्यावर न्यायालयाने आपले मत मांडले. आपले सर्व कायदे भिन्निलगी दाम्पत्याच्या मुलांचे हितसंबंध आणि कल्याण यांचे संरक्षण करतात. भिन्निलगी जोडप्यांची मुले आणि समलिंगी जोडप्यांची मुले यांच्यामध्ये भेद करण्याची सरकारची भूमिका रास्त आहे असा दावा अतिरिक्त महान्यायअभिकर्ता ऐश्वर्या भाटी यांनी केला.

संघाशी संबंधित संस्थेचा विरोध

  • समलिंगी विवाहाला कायद्याचे संरक्षण मिळाल्यास भारताच्या सांस्कृतिक मुळांना हादरा बसेल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘संवर्धिनी न्यास’ या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून केला. समलिंगी विवाह कायदेशीर केल्यास हिंदू विवाह कायद्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे. इतर धर्म आणि पाश्चात्त्य देशांमधील उदारमतवादी विचारांचा भारतावर प्रभाव वाढत असून त्यामुळे हिंदू धर्माच्या स्वरूपावर परिणाम होत आहे अशी चिंता संवर्धिनी न्यासाने पत्रात व्यक्त केली आहे. न्यासाच्या कायदेशीर सल्लागार श्वेता शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे.
ब्रिटनमधील दैनिकाकडून राजपुत्र हॅरींची माफी; बेकायदेशीरपणे माहिती संकलित केल्याची कबुली
  • आपल्या ‘फोन हॅकिंग’च्या पहिल्या खटल्याच्या सुरुवातीलाच राजपुत्र हॅरी (डय़ूक ऑफ ससेक्स) यांनी विजय मिळवला असून, त्यांच्याबाबतचे वार्ताकन करताना बेकायदा माहिती मिळवल्याबद्दल ‘डेली मिरर’च्या प्रकाशकांनी माफी मागितली आहे. या गु्न्ह्यासाठी भरपाईची तरतूद आहे.
  • मिरर समूहाने बचावासाठी केलेल्या युक्तिवादात वरील बाब मान्य केली असली, तरी व्हॉइसमेलमध्ये ‘ऐतिहासिक’ व्यत्यय आणल्याबाबतच्या दाव्याबाबत आपण लढा देणार असून, हॅरी यांच्यासह इतर तीन फारशा प्रसिद्ध नसलेल्या सेलिब्रिटीजनी त्यांचे दावे मुदतीनंतर दाखल केल्याबाबत आपण सुनावणीत युक्तिवाद करू असे म्हटले आहे.
  • मात्र याचवेळी, काही तिसऱ्या पक्षांनी दावाकर्त्यांपैकी प्रत्येकाच्या यूआयजीच्या (अनलॉफुल इन्फर्मेशन गॅदिरग) साठी सूचना दिल्या याचा पुरावा आहे, असेही या समूहाने मान्य केले. यासाठी ‘भरपाई दिली जाऊ शकते’ असे समूहाने म्हटले असले तरी ती कुठल्या स्वरूपात असेल हे सांगितलेले नाही.
  • ‘मिरर वृत्तसमूह यूआयजीच्या अशा सर्व प्रकारांसाठी माफी मागत असून, या कृत्याची पुनरावृत्ती होणार नाही याची सर्व दावाकर्त्यांना हमी देते’, असे समूहाने म्हटले आहे. राजपुत्र हॅरी  यांच्यासह इतर तिघांनी फोन हॅकिंगबाबतचे तीन दावे दाखल केले असून, गोपनीयतेवरील कथित आक्रमणासाठी ‘दि डेली मिरर’च्या माजी प्रकाशकांना न्यायालयात खेचले आहे. पहिल्या खटल्याची सुनावणी बुधवारी सुरू झाली. हे प्रकरण सुमारे दोन दशकांपूर्वीचे आहे, ज्या वेळी पत्रकार आणि गुप्तहेर राजघराण्याचे सदस्य, राजकीय नेते, खेळाडू, सेलिब्रिटीज आणि गुन्हेगार यांच्या खासगी गोष्टींमध्ये डोकावण्यासाठी व्हॉईसमेल अडवत असत. हे ‘हॅकिंग’ नंतर उघड झाल्यामुळे कंडय़ा पिकल्या होत्या. या प्रकरणात हॅरी हे जूनमध्ये स्वत: साक्ष देणे अपेक्षित असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे.
  • राजपुत्र हॅरी यांनी कायदेशीर दाव्यांच्या माध्यमातून ब्रिटिश वृत्तपत्रांविरुद्ध शाब्दिक युद्ध छेडले आहे. माध्यमांना सुधारणे हे आपल्या जीवनाचे ध्येय असेल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. हीच माध्यमे आपली आई युवराज्ञी  डायना हिच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

आता देशात होणार डिजिटल जनगणना; जन्म-मृत्यूची नोंदही होणार लिंक, अमित शाह यांची घोषणा :
  • करोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची. पण आता जनगणना प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. एवढंच नव्हे तर, जन्म आणि मृत्यू बाबतचं रजिस्टरही याला जोडण्यात (लिंक) येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

  • यामुळे देशात प्रत्येक जन्म आणि मृत्यूनंतर जनगणना आपोआप अपडेट होणार आहे. गृह मंत्रालयाने जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आसाममधील डिरेक्टोरेट सेन्सस ऑपरेशन्स इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. देशाचा विकास साधायचा असेल तर अद्ययावत जनगणना किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी अधिक भर दिला.

  • “पुढील जनगणना ही ई-जनगणना असेल. जी १०० टक्के परिपूर्ण जनगणना असेल. या जनगणनेच्या आधारावर, पुढील २५ वर्षांसाठी देशाच्या विकास कामांचं नियोजन केलं जाईल,” असंही ते म्हणाले. जनगणना ही विविध बाबींसाठी अत्यंत महत्त्वाची असते. आसामसारख्या राज्यात तर याचं महत्त्व अधिक वाढतं. आसाम हे राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आहे,” असंही ते पुढे म्हणाले.

  • संबंधित जनगणना प्रक्रियेला जन्म-मृत्यू रजिस्टरही लिंक केलं जाणार आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याचा तपशील जनगणना नोंदणीमध्ये आपोआप जोडला जाईल. संबंधित पाल्य १८ वर्षांचा झाल्यानंतर, त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट केलं जाईल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचं नाव यादीतून हटवलं जाईल. तसेच संबंधित व्यक्तीचं नाव आणि पत्ता बदलणं देखील अधिक सोपं होईल. याचा अर्थ आपली जनगणना आपोआप अपडेट होईल,” असंही अमित शाह यावेळी म्हणाले.

भारतीय रेल्वेने सादर केली ‘बेबी बर्थ’ सीट, जाणून घ्या कोणत्या ट्रेनमध्ये मिळणार ही सुविधा :
  • तुम्ही लहान मुलांसोबत ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे (NR) झोनने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आणखी एक पाऊल उचलले आहे. उत्तर रेल्वे झोनच्या लखनौ विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये खालच्या बर्थमध्ये लहान मुलांसाठी बेबी बर्थ जोडण्यात आला आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये बेबी बर्थ बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • रेल्वेच्या या निर्णयामुळे लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. बेबी बर्थमधील प्रवासी त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मुलाला अतिरिक्त बर्थमध्ये बसवून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा बेबी बर्थ सोयीचा असेल. प्रवासादरम्यान बाळाला बेबी बर्थमध्ये ठेवून प्रवासी याचा फायदा घेऊ शकतात. यासोबतच लहान मूल झोपताना खाली पडू नये यासाठी या बर्थमध्ये स्टॉपरही बसवण्यात आला आहे.

  • ही सीट फोल्ड करण्यायोग्य आहे, जो गरजेनुसार वापरता येतो आणि गरज नसताना दुमडता येतो. मात्र, ही सुविधा फक्त खालच्या बर्थमध्ये उपलब्ध असेल.

उबर चषक बॅडिमटन स्पर्धा - भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत :
  • भारतीय महिला बॅडिमटन संघाने मंगळवारी ड-गटात अमेरिकेवर ४-१ असा शानदार विजय मिळवून उबर चषक बॅडिमटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

  • पी. व्ही. सिंधूने पुन्हा भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावताना जीनी गे हिला २१-१०, २१-११ असे नामोहरम केले. दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि त्रिसा जॉली जोडीने फ्रॅन्सिस्का कॉर्बेट आणि ऑलिसन ली जोडीचे आव्हान २१-१९, २१-१० असे मोडीत काढले.

  • मग एकेरीत आकर्षी कश्यपने ईस्थर शायला २१-१८, २१-११ असे पराभूत केले. त्यामुळे भारताला ३-१ अशी विजयी आघाडी मिळाली. त्यानंतर दुहेरीत युवा जोडी सिमरन सिंघी आणि रितिका ठाकरने लॉरेन लॅम आणि कोडी टँग ली जोडीकडून १२-२१, २१-१७, १३-२१ असा संघर्षपूर्ण पराभव पत्करला. अश्मिता छलिहाने नताली शी हिच्यावर २१-१८, २१-१३ अशी मात केली.

उबर चषक

* सकाळी ७.३० वा.

* भारत वि. कोरिया

थॉमस चषक

* दुपारी १२.३० वा.

* भारत वि. चायनीज तैपेई

* थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१

मुंबईत सुरू होणार उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय, मुंबई महानगर निवडणुकांपुर्वी योगी सरकारचा निर्णय :
  • मुंबईसध्ये आता उत्तर प्रदेश सरकाराचं कार्यलय सुरू होणार आहे. मुंबईमध्ये राहणा-या उत्तर भारतातील लोकांना मदत करण्यासाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

  • मुंबईंमध्ये सुमारे ५० ते ६० लाख उत्तर भारतीय राहतात. या लोकांना येणा-या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत व्हावी यासाठी उत्तर प्रदेशसरकारने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्यामुळे मुंबईत राहणा-या लाखो उत्तर भारतीय मजुरांची प्रचंड अडचण झाली होती.

  • आता अश्या प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास मुंबईतील कार्यालयाच्या माध्यामातून उत्तर प्रदेश सरकार त्या लोकांना मदत करेल. ज्या प्रमाणे प्रत्तेक देशात इतर देशांच्या दुतावासांचं कार्यालय असतं आणि ते ज्या पद्धतीनं काम करतं त्याच पद्तीनं हे कार्यालय स्थानिक पातळीवर काम करणार असल्याचं सांगितलं जातंय.

  • मुंबईमध्ये असंघटीत क्षेत्रात काम करणा-या उत्तर भारतीयांची संख्या खुप मोठी आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये याच असंघटीत कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्णाण झाला होता. या प्रस्तावित कार्यालयातून मुंबईत राहणा-या उत्तर भारतीयांना उत्तर प्रदेशातील विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत माहीती देण्यात येईल.

  • यामध्ये पर्यटन, लघू उद्योग, मध्यम उद्योग या आणि अनेक गुतवणुकींचा समावेश असेल. या लोकांनी तयार केलेल्या मालाला उत्तर प्रदेशात आणि देशातील इतर भागांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. उत्तर प्रदेशच्या या कार्यलयाच्या माध्यामातून इथे राहणा-या उत्तर प्रेदेशातील लोकांचा उत्तर प्रदेश सरकारसोबत समन्वय वाढण्यास मदत होईल. मुंबईत राहणा-या उत्तर भारतींना काही सरकारी अडचणी आल्यास हेच कार्यालय महाराष्ट्र सरकारशी समन्वय साधेल.

आठवडाभरात कायदे मंडळाचे अधिवेशन घेण्याची तयारी :
  • श्रीलंकेतील आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाच्या विरोधात अभूतपूर्व हिंसाचार आणि व्यापक निदर्शने सुरू असताना, सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी या आठवडय़ात कायदे मंडळाचे अधिवेशन बोलवावे, अशी विनंती कायदे मंडळाच्या अध्यक्षांनी मंगळवारी  राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांना केली.

  • या विनंतीसाठी आपण अध्यक्ष गोताबया यांना दूरध्वनी केला असल्याचे कायदे मंडळाचे अध्यक्ष महिंदू यापा अबेयावर्दने यांनी सांगितले. हे अधिवेशन १७ मेपासून होण्याचे नियोजित आहे, मात्र सध्या पंतप्रधान किंवा सरकार नसल्यामुळे अध्यक्षांना त्यापूर्वीच अधिवेशन बोलावावे लागेल, असे कायदे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • दरम्यान, शांततेने सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्यांविरुद्ध आपल्या समर्थकांना हिंसाचाराला प्रवृत्त केल्याबद्दल महिंदूा राजपक्षे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. या हिंसाचारात किमान आठ जण ठार व दोनशेहून अधिक लोक जखमी झाले होते, तसेच अनेक राजकीय नेत्यांची घरे जाळण्यात आली होती.

  • सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने, कायदे मंडळात प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना गोताबया राजपक्षे भेटणार असल्याचे अध्यक्षीय कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. सभागृहाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी आपण स्वत: पक्षनेत्यांची बैठक बोलावली असल्याचे अध्यक्ष अबेयवर्दने म्हणाले.  राजपक्षे समर्थक टोळीने शांत निदर्शकांवर सोमवारी केलेल्या हल्ल्याचा तपास करण्याचा आदेश आपण गुन्हे विभागाला दिला असल्याचे पोलीस प्रमुख चंदन विक्रमरत्ने यांनी सांगितले.

देशातील पहिले “मधाचे गाव’, …या गावाची करण्यात आली निवड :
  • राज्यात देशातील पहिलं ‘मधाचं गाव’ साकारलं जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. मधाचे गाव ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.

  • मधाचे गाव साकारण्यासाठी गावाची निवड करणं हा अत्यंत महत्वाचा भाग होता. या गावाची निवड करताना अनेक बाबींची काळजी घेणं आवश्यक होतं. गावाची भौगोलीक रचना, गावातील लोकांचे व्यवसाय, या संकल्पनेसाठी आवश्यक असणारी नैसर्गीक साधनसंपत्ती या आणि अश्या अनेक बाबींची पुर्तता होणं गरजेचं होतं.

  • राज्यातील अनेक गावांची तपासणी केल्यानंतर एका गावाची निवड करण्यात आली. मधाचे गाव साकारण्यासाठी महाबळेश्वर येथील मांघर या गावाची निवड करण्यात आली आहे. मांघर हे गाव महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर सुंदर फुलं फुललेली असतात. या प्रकल्पासाठी याच गावाची निवड करण्याचं मुख्य कारण म्हणजे या गावात सामूहिक पद्धतीने मधमाशांचे संगोपन केले जाते. मांघर या गावातील ८० टक्के लोकसंख्या ही मधमाशापालनाचा व्यवसाय करते मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

  • या निमित्ताने महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायम स्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहीले जाते. मधमाशांच्यामुळे पिक उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे.

११ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.