चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ मे २०२१

Date : 11 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतातील करोनाचा नवा विषाणू चिंतेचा विषय; WHOने दिला इशारा :
  • करोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताची पुन्हा एकदा झोप उडवली आहे. अनेक देशांनी करोनाचा नवे प्रकार आढळून आले आहे. करोनाचा विषाणू स्वरूप बदलत असून, करोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण भारतात मोठ्या संख्येनं आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात आढळून आलेल्या करोनाच्या B.1.617 प्रकारचा विषाणू जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.

  • भारतात आढळून आलेल्या B.1.617 या विषाणूवर सुरूवातीला लक्ष ठेवण्यात आले होते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड -१९ टेक्निकल लीडच्या डॉ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सोमवारी सांगितले.

  • या विषाणूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध भागांमध्ये चर्चा सुरू असून भारतात आणि इतर देशांमध्ये या विषाणूचा कसा प्रसार झाला याचा अभ्यास सुरू असल्याचे व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले.

  • या विषाणूमुळे भारतातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय असल्याचे म्हंटले आहे.

लसीकरणाची नोंदणी करताना बनावट लघुसंदेशाबाबत सावधगिरी आवश्यक :
  • कोविड-१९ लसीकरणाच्या नोंदणीसाठीचा एक लघुसंदेश (एसएमएस) वापरकर्त्यांच्या अँड्रॉइड फोनमध्ये प्रवेश मिळवतो आणि त्यामुळे वापरकर्त्यांची संपर्क यादी धोक्यात येते, असा इशारा सांघिक सायबर सुरक्षा यंत्रणेने दिला आहे. हा हानीकारक एसएमएस किमान पाच प्रकारांनी ओळखला जातो.

  • ‘वापरकर्त्यांना भारतातील कोविड-१९ लशीसाठी नोंदणी करण्यासाठी अ‍ॅपचा पर्याय देणारा एक बनावट एसएमएस सध्या फिरत आहे. त्याच्यासोबत दिलेल्या लिंकमुळे अँड्रॉइड उपकरणांमध्ये हानीकारक अ‍ॅप इन्स्टॉल केले जाते व ते एसएमएसच्या माध्यमातून संबंधित वापरकर्त्यांच्या संपर्कापर्यंत (काँटॅक्ट्स) पसरते’, असे ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सीईआरटी) ने शनिवारी जारी केलेल्या सार्वजनिक सूचनांमध्ये म्हटले आहे.

  • ही यंत्रणा म्हणजे सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठीची, तसेच फिशिंग व हॅकिंगसारख्या ऑनलाइन हल्ल्यांविरुद्ध भारतीय सायबर विश्वाचे संरक्षण करण्यासाठीची सांघिक तंत्रज्ञान शाखा आहे.

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन :
  • करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून १५ मे पर्यंत निर्बंध कायम आहेत. ठाकरे सरकारकडून आधी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता, मात्र नंतर हा लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • दरम्यान परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याची शक्यता असून बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • राज्यात सध्या ११ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्हे सध्या संपूर्ण लॉकडाउनची तयारी करत आहे.

ग्रामीण भागात ऑफलाइन पद्धतीने लसीकरण करा’ :
  •  १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ऑनलाइन पद्धतीने करोना लसीकरण वाडा, विक्रमगड या  तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाले आहे. मात्र या दोन्ही तालुक्यात  आदिवासी व ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. अनेकांकडे मोबाइलचा   तसेच नेटवर्कचा अभाव आहे. त्यामुळे येथे ऑफलाइन लसीकरणास सुरुवात करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  • वाडा, विक्रमगड या दोन्ही तालुक्यातील आदिवासी समाज हा बहुतांश ग्रामीण, डोंगराळ भागात राहत आहे. आधीच हलाखाची परिस्थिती असलेल्या या समाजातील ५० टक्के कुटुंबीयांकडे  मोबाइल नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना इंटरनेट व नेटवर्कच्या समस्या आहेत. तसेच अनेक गाव-पाडय़ावर शिक्षणाचा अभाव आहे. 

  • त्यामुळे या नागरिकांसाठी थेट लसीकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे. जर तसे झाले नाही तर ५० टक्के नागरिक लसीकरणापासून वचित राहतील याकडे परळी येथील जिल्हा परिषद सदस्य रोहिणी शेलार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

१५० दिवसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नुकसान :
  • वर्षभरात १५०  दिवसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नुकसान झाले. यात अनेक मालिका किंवा स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक देशांना याचा मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.

  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट पूर्ण करता आले नाही, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) २५०० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे संकेत अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बीसीसीआय’प्रमाणेच अन्य अनेक मंडळांपुढे या आर्थिक फटक्यातून सावरण्याचे आव्हान असेल.

  • ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाने आर्थिक अडचणीला सामोरे जाताना कर्मचारी कपात केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला करोनामुळे २० कोटी डॉलर नुकसान सहन करावे लागले आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश क्रिकेट मंडळांनाही आर्थिक फटका बसला आहे. कारण अनेक मंडळांना आपल्या क्रिकेट  कार्यक्रमपत्रिकेला न्याय देता आलेला नाही. त्यामुळे प्रसारण हक्क आणि पुरस्कर्त्यांकडून मिळणाऱ्या महसुलावर परिणाम झाला आहे.

ICCच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर बाबर आझमने कोरले नाव :
  • पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेच्या सर्व स्वरूपात बाबरने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ९४ धावांची खेळी केली.

  • या खेळीमुळे त्याला १३ रेंटिग गुण मिळाले. या गुणांसह त्याने भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २७४ धावांचा पाठलाग करताना २६ वर्षीय बाबरने १०३ धावा फटकावत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिले.

  • एप्रिल महिन्यात बाबरने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ७६च्या प्रभावी सरासरीने २२८ धावा केल्या. तर, ७ टी-२० सामन्यांत बाबरने ३०५ धावा केल्या. टी-२० मालिकेत पाकिस्तानने झिम्बाब्वेला २-१ असे पराभूत केले, या संघाआधी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेला हरवून आला होता.

११ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.