चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ मे २०२०

Date : 11 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्याच्या सीमेवर अडकलेले ३००० मजूर ‘लालपरी’च्या मदतीमुळे पोहोचले घरी :
  • लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये आणि राज्यातील इतर भागांमध्ये अडकलेल्या नागरिकव मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पायी जाणाऱ्या मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान, राज्य सरकारनं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि मजुरांना घरी पोहोचवण्याचं काम सुरू केलं असून, लालपरी अर्थात एसटीमुळे ३००० जण सुखरुप घरी पोहोचले आहेत.

  • लॉकडाउन लागू झाल्यानंतर परराज्यातील कामगारांनी घराचे रस्ते धरले. त्याचप्रमाणे इतर राज्यात असलेल्या महाराष्ट्रातील कामगारांनीही राज्याची वाट धरली. प्रवासी वाहतुकीची कोणतीही सोय नसल्यानं अनेक जण पायी निघाल्याचं दिसत आहेत. तर काहीजण मिळेल त्या वाहनानं घर जवळ करण्यासाठी धडपडताना दिसत आहे. दरम्यान, औरंगाबाद-जालना दरम्यान झालेल्या मजुरांच्या अपघातानंतर राज्य सरकारनं परराज्यात अडकलेल्या मजुरांना घरी आणण्यासाठी पाऊलं उचलली आहेत.

  • राज्याच्या सीमेवर अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील ३००० मजूरांनी एसटीमुळे सुखरुपणे घरी पोहोचता आले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याविषयी माहिती दिली. “आज (१० मे) राज्याच्या सीमेवर अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३००० मजुरांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुखरुप पोहोचवण्यात आलं आहे. या सर्व प्रवासात सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्यात आले होते. 

टाळेबंदीबाबत पंतप्रधानांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद :
  • नवी दिल्ली : टाळेबंदीचा तिसरा टप्पा या आठवडय़ाअखेर संपत असताना करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच पुढील उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी दुपारी तीन वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. टाळेबंदीमुळे मरगळलेली अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

  • टाळेबंदीचा कालावधी १७ मे रोजी संपत आहे. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासंदर्भात बैठक चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. टाळेबंदी लागू केल्यापासून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची ही पाचवी बैठक आहे.

  • या बठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बठक घेऊन राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. या बठकीत स्थलांतरित मजुरांच्या प्रवासासंदर्भातही माहिती देण्यात आली. गौबा यांच्या चच्रेत उपस्थित झालेल्या मुद्दय़ांच्या आधारेही मुख्यमंत्र्यांच्या बठकीत सविस्तर विचार केला जाण्याची शक्यता आहे.

जर्मनीच्या मॅगझीनचा ‘तो’ दावा असत्य आणि निराधार; WHO चं स्पष्टीकरण :
  • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जर्मनीतील मॅगझीनने केलेला दावा फेटाळून लावला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम गेब्रेयसिस यांच्यात करोनाची माहिती उशिरा देण्याबद्दल झालेल्या चर्चेचं वृत्त असत्य आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

  • दोघांमध्ये झालेल्या चर्चेच्या वृत्तात कोणतीही सत्यता नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस आणि राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात २१ जानेवारी रोजी कोणताही संवाद झाला नाही.

  • करोना व्हायरसचा संसर्ग माणसांपासूनच माणसांना होत असल्याची पुष्टी २० जानेवरी रोजी करण्यात आली होती आणि २२ जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं त्याची घोषणाही केली होती, असं स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलं आहे.

घरी परतणाऱ्या मजुरांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, मुख्यमंत्री सहायता निधीतून भरणार रेल्वे तिकीटाचे पैसे :
  • परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना महाराष्ट्रात येण्यासाठी रेल्वे प्रवासाचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.

  • “परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे”. अशी माहिती ट्विटरद्वारे देण्यात आली आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि परराज्यात जाणाऱ्या मजुरांचे रेल्वेभाडे मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या मजुरांकडे रेल्वे प्रवासाला लागणारे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल.

  • यावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. ” महाविकासआघाडी सरकारने स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे यात्रेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सीमेवर भारत-चीनचे सैनिक समोरासमोर : झटापटीत दोन्ही देशांचे जवान जखमी :
  • सिक्कीममधील भारत चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आल्याची घटना घडली. उत्तर सिक्कीममधील नाकू ला सेक्टरमध्ये असेलेल्या भारत चीन सीमेजवळ हा प्रकार घडला. यानंतर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

  • चीनी सैनिकांचा असा उद्दामपणा यापूर्वीही दाखवला होता. आज घडलेल्या घटनेत भारताचे आणि चीनचे काही सैनिक किरकोळ जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये काही बाचबाचीही झाली. परंतु स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद निवळला. काही वेळ दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बाचाबाची सुरू होती.

  • परंतु त्यानंतर ते आपापल्या पोस्टवर परत गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच बऱ्याच कालावधीनंतर अशाप्रकारची घटना घडल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. एएनआयनं लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

‘पिके’मधील कलाकाराचे अमेरिकेत निधन :
  • अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे प्रदीर्घ आजाराने १० मे रोजी निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून त्याला ‘ग्लायोब्लास्टोमा’शी (ब्रेन कॅन्सर) ग्रासले होते. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी ब्रेन कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी तो अमेरिकेतील लॉस अँजेलिसला गेला होता. तेव्हापासून तो उपचार घेत होता. रविवारी सकाळी ७:३० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) त्याची प्राणज्योत मालवली.

  • साईप्रसाद गुंडेवारने आजवर अनेक मालिका, बॉलिवूड चित्रपटांसह हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला पर्व ४’ (Splitsvilla Season 4), स्टार प्लस वाहिनीवरील ‘सर्वाइवर’ (Survivor), तसेच अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T., Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies,’द कार्ड’ (The Card) या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘रॉक ऑन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट व लघुपटांमध्ये विविध भूमिका केल्या.

  • डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे.

११ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.