चालू घडामोडी आणि दिनविशेष - 11 जुलै 2023

Date : 11 July, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; एक ऑगस्टला मोदी-पवार पुण्यामध्ये एकाच मंचावर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्‍या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाईल. यंदा या पुरस्काराचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे.
  • तसेच या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
फॉक्सकॉन-वेदान्तचा काडीमोड, भारतातील महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प धोक्यात
  • इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीतील अग्रणी तैवानस्थित ‘फॉक्सकॉन’ कंपनीने अखेर उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या ‘वेदान्त लिमिटेड’बरोबर सेमिकंडक्टर चिपनिर्मितीच्या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचे सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर केले. यासाठी फॉक्सकॉनने कोणतेही विशिष्ट कारण दिले नसले तरी भागीदारी संपुष्टात आल्याने आधी महाराष्ट्रात नियोजित असलेला आणि ऐन वेळी गुजरातकडे वळविलेला हा प्रकल्प धोक्यात आला आहे.
  • जगातील सर्वात मोठी काँट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक उत्पादक असलेली फॉक्सकॉन आणि वेदान्त यांनी गेल्या वर्षी गुजरातमधील ढोलेरा येथे सेमिकंडक्टर चिपनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी १९.५ अब्ज डॉलर (सुमारे दीड लाख कोटी रुपये) गुंतवणुकीसाठी करार केला होता. उभय कंपन्यांनी धोरणात्मक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची निवड केली होती; पण आकस्मिकपणे प्रकल्प गुजरातमध्ये साकारत असल्याचे जाहीर करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे गुजरातला देशातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील मुख्य केंद्र बनविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र सोमवारी फॉक्सकॉनने एका निवेदनाद्वारे आपली वेदान्तबरोबर भागीदारी संपुष्टात आल्याचे जाहीर केले. ‘आता वेदान्तकडे पूर्ण मालकी असलेल्या कंपनीच्या या प्रकल्पातून अंग काढून घेण्यासह त्याच्याशी जुळलेले फॉक्सकॉनचे नावही काढून टाकण्यासाठी आम्ही पाऊल टाकत आहोत.
  • फॉक्सकॉनचा या प्रकल्पाशी कोणताही संबंध राहिलेला नाही, परिणामी त्याचे मूळ नाव तसेच ठेवले गेल्यास भविष्यातील भागधारकांसाठी ते संभ्रम निर्माण करणारे ठरेल,’ असे या निवेदनात म्हटले आहे. त्याच वेळी भारताच्या सेमिकंडक्टर क्षमतेच्या विकासाच्या दिशेने प्रयत्नांच्या सफलतेबाबत फॉक्सकॉनने विश्वास व्यक्त केला आहे. या घडामोडींवर वेदान्तकडून लगेच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नसल्याचे ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने स्पष्ट केले.
  • मूळ करारानुसार, वेदान्तच्या चिपनिर्मिती क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेत तांत्रिक भागीदार म्हणून फॉक्सकॉनचा या संयुक्त उपक्रमात सहभाग केला होता आणि प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या वेदान्तकडे ६० टक्के हिस्सेदारी तर उर्वरित ४० टक्के मालकी फॉक्सकॉनकडे राहणार होती. दरम्यान, फॉक्सकॉन आणि वेदान्त यांच्यात काही मुद्दय़ांवर आधीपासूनच मतभेद असल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या सेमिकंडक्टर मोहिमेंतर्गत प्रोत्साहनपर सवलतींसाठी पुन्हा अर्ज करण्यावरून दोन्ही कंपन्यांमध्ये मतभेद होते. संयुक्त कंपनीने यासाठी मागील वर्षी केलेला अर्ज केंद्राने अद्याप मंजूर केलेला नाही.
Amazon Prime Day Sale मध्ये ‘या’ आयफोनवर मिळणार वर्षातील सर्वात मोठा डिस्काउंट, इतर ऑफर्स पहाच
  • Amazon एक ई-कॉमर्स साईट आहे. जिथून ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. भारतीय बाजारासाठी Amazon प्राइम डे सेलची घोषणा करण्यात आली आहे. हा सेल केवळ ४८ तास म्हणजे दोन दिवसांसाठी असणार आहे. या सेलमध्ये असणाऱ्या ऑफर्स या केवळ प्राईम मेंबर्ससाठीच उपलब्ध असणार आहेत. विक्रीदरम्यान अनेक किंमतीमधील स्मार्टफोन उपलब्ध असणार असून त्यावर डिस्काउंट मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. हा डिस्काउंट केवळ भारतात मिळणार आहे.
  • इंडिया टुडे टेकशी बोलताना, Amazon इंडियाचे वायरलेस आणि होम एंटरटेनमेंट सेगमेंटचे डायरेक्टर रणजित बाबू म्हणाले, प्राईम डे सेलदरम्यान iPhone 14 वर मोठा डिस्काउंट मिळणार आहे.
  • प्राईम डे सेलमध्ये आयफोन १४ वर एक चांगली ऑफर असेल असा खुलासा त्यांनी केला. खरं तर, आयफोन १४ वरील ऑफर आयफोन १३ पेक्षा खूपच चांगली असेल. कंपनीने ऑफरची किंमत अद्याप उघड केलेली नाही. मात्र नमूद केल्याप्रमाणे आयफोन १४ वरील सेलमधील डिस्काउंट या वर्षातील सर्वात चांगली डिस्काउंट ऑफर असेल. यामध्ये काही चांगल्या एक्सचेंज ऑफर्स असतील त्यामुळे हे डील अधिक आकर्षक होईल.
  • आयफोन १३ तुलनेने जुना असल्याने आयफोन १४ वरच डिस्काउंट ऑफर देणे चांगले ठरेल. दरम्यान काही अफवांनुसार आयफोन १५ सिरीज या वर्षाच्या शेवटी लॉन्च होऊ शकते. यामध्ये कंपनी iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि शेवटी, iPhone 15 Plus यासह चार नवीन iPhone मॉडेल्सचे लॉन्चिंग करणे अपेक्षित आहे. मात्र याची सिरीजमधील मॉडेल्सची किंमत आयफोन १४ च्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे. आयफोन 14 हे सध्या भारतात खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम iPhone मॉडेल आहे. अधिकृतपणे, भारतात मॉडेलची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते.
पार्थ साळुंखेची ऐतिहासिक कामगिरी, युवा जागतिक तिरंदाजीच्या पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या पार्थ साळुंखेने ऐतिहासिक कामगिरी करताना युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदकाची कमाई केली. युवा जागतिक स्पर्धेतील रीकव्र्ह गटात सोनेरी यश संपादन करणारा पार्थ भारताचा पहिला पुरुष तिरंदाज ठरला आहे. तसेच भारताने युवा जागतिक तिरंदाजीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना एकूण ११ पदके पटकावली.
  • साताऱ्याच्या पार्थने २१ वर्षांखालील पुरुषांच्या रीकव्र्ह विभागातील अंतिम लढतीत सातव्या मानांकित कोरियाच्या सॉन्ग इन्जुनचा ७-३ असा पराभव केला. १९ वर्षीय पार्थ सुरुवातीला पिछाडीवर होता. पहिला सेट २६-२६ असा बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सॉन्गने २५-२८ अशी बाजी मारताना एकूण लढतीत आघाडी मिळवली. मात्र, पार्थने दडपणाखाली संयम बाळगताना पुढील तीन सेट अनुक्रमे २८-२६, २९-२६, २८-२६ असे जिंकत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
  • त्याचप्रमाणे २१ वर्षांखालील महिलांच्या रिकर्व्ह विभागात भारताच्या भजन कौरने कांस्यपदक मिळवले. तिने चायनीज तैपेइच्या सु हसीन-यु हिला ७-१ (२८-२५, २७-२७, २९-२५, ३०-२६) असे सहज पराभूत केले.भारताने या स्पर्धेत सहा सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली. युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील ही भारताची सर्वाधिक पदके ठरली. मात्र, भारताला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोरियाने अग्रस्थान मिळवले.
  • पार्थची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने कोरियन तिरंदाजाचे वर्चस्व मोडून काढताना सुवर्णयश मिळवले. त्याने यापूर्वी जूनमध्ये सिंगापूर येथे झालेल्या आशिया चषकाच्या तिसऱ्या टप्प्यात रौप्यपदक मिळवले होते. तसेच गेल्या वर्षी या स्पर्धेच्या सुलेमानिया आणि शारजा येथील टप्प्यांत त्याने कांस्यपदके जिंकली होती. २०२१च्या युवा जागतिक स्पर्धेतील पुरुष सांघिक गटात सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. यंदाच्या स्पर्धेत मिश्र सांघिक गटात पार्थने रिद्धीसह कांस्यपदक मिळवले.
  • युवा जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पार्थ साळुंखे हा भारताचा एकूण सहावा तिरंदाज आहे. यापूर्वी दीपिका कुमारी, कोमालिका बारी, पाल्टन हन्सदा, अदिती स्वामी आणि प्रियांश यांनी युवा जगज्जेतेपदाचा मान मिळवला होता.

 

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत ऋषी सुनक :
  • ब्रिटनचे भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीची औपचारिक प्रचारमोहीम सुरू केली आहे, काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्वपद आणि ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत शनिवारी त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसले. ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई असलेल्या ४२ वर्षीय सुनक यांना ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे नेते मार्क स्पेन्सर, पक्षाचे माजी अध्यक्ष ऑलिव्हर डाउडेन आणि माजी मंत्री लियाम फॉक्स यांच्यासह संसदेच्या अनेक वरिष्ठ सदस्यांकडून जाहीर पाठिंबा मिळाला आहे.

  • सुनक यांनी त्यांच्या समाजमाध्यमांतील प्रचाराच्या प्रारंभीच्या चित्रफितीत म्हटले आहे, की जेव्हा आपण करोनाच्या दु:स्वप्नाचा सामना केला, तेव्हा मी सरकारमधील सर्वात आव्हानात्मक विभागाची जबाबदारी सांभाळत होतो. ‘ब्रेक्झिट’चे समर्थक असलेले पंतप्रधान व पक्षनेतृत्वाचे उमेदवार सुनक विभाजित सत्ताधारी पक्षाचे विभाजन टाळू शकतीत. माजी कुलपती असलेले सुनक ब्रिटनसमोरील मोठय़ा आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ नेतृत्व ठरतील, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

  • मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निष्ठावंतांकडून त्यांच्यावर जॉन्सन यांच्याविरुद्ध कट रचल्याची टीका झाली होती. त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे, की या चित्रफितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास असे दिसते, की  सुनक यांची पंतप्रधानपदासाठीची मोहीम काही काळ आधीपासूनच सुरू झाली होती. तथापि, सुनक यांच्या समर्थकांनी असा दावा केला, की या चित्रफितीत त्यांनी आपल्या भारतीय वंशाच्या विनम्र कौटुंबिक वारशाच्या वैयक्तिक संदर्भाचा उल्लेख केला आहे. पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये त्यांची आजी सरक्षा यांच्या स्थलांतराचा त्यात उल्लेख आहे. जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याच्या काही तासांनंतर ही चित्रफीत बनवण्यात आली आहे. 

  • ‘ऑडस्चेकर’ या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, सट्टेबाजांच्या मतानुसार सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यानंतर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस आणि संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांची नावे आहेत.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे १३ जुलै रोजी राजीनामा देणार :
  • आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत भीषण परिस्थिती ओढावली आहे. जनतेने सरकारविरोधात तीव्र आंदोलन पुकारले असून आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घराला आग लावली आहे. तर अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या कोलंबो येथील अतिसुरक्षित भागातील शासकीय निवासस्थानात आंदोलक घुसले आहेत. या परिस्थितीला श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे जबाबदार असल्याचा आरोप नागरीकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. श्रीलंकेतील चिघळत चाललेली परिस्थिती पाहता गोटाबाया राजपक्षे १३ जुलै रोजी आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • श्रीलंकेत अराजकता - श्रीलंका गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटातून जात आहे. देशात इंधन आणि खाद्यपदार्थांसोबतच दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचीही तीव्र टंचाई निर्माण झाली होती. श्रीलंका देशात सध्याची अराजकता लक्षात घेता येथील पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी राजीनाम्याची घोषणा केली. सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे विक्रमसिंघे यांनी सांगितले आहे.

  • राष्ट्रपती भवनात आंदोलकांची तोडफोड - श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल शैवेंद्र सिल्वा यांनी श्रीलंकन ​​जनतेला शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची विनंती केली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया यांनी आपल्या शासकीय निवासस्थानातून पळ काढल्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवत भवनात जोरदार तोडफोड केली आहे.

नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे पंतप्रधानांचे आवाहन :
  • ‘‘येत्या काही वर्षांत नैसर्गिक शेती करण्याची लोकचळवळ खूप यशस्वी होईल. शेतकरी जितक्या लवकर या बदलात सामील होतील तितकेच त्यांना त्याचे फायदे मिळतील,’’ अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

  • गुजरातमधील सुरत येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे नैसर्गिक शेतीवरील एका परिषदेस संबोधित करताना पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचा उल्लेख केला. गावांमध्ये असा बदल-सुधारणा करणे अशक्य आहे, असा आक्षेप घेणाऱ्यांना या मोहिमेच्या यशाने योग्य उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले.  मातीची गुणवत्ता आणि उत्पादकता जपून नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे हे धरणीमातेची सेवा करण्यासारखेच आहे, असे सांगून सुरतमध्ये या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, की सुरतमधून उदयास आलेले नैसर्गिक शेतीचे प्रारूप संपूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकते.

  • देशातील जनतेने कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प केला, तर कोणताही अडथळा त्यांच्या मार्गात येऊ शकत नाही. लोकसहभागाने कोणतेही मोठे काम यशस्वी होऊ शकते. ते म्हणाले, ‘‘डिजिटल इंडिया मोहिमेच्या अभूतपूर्व यशाने आमच्या गावांनी हे दाखवून दिले, की ते केवळ बदल घडवून आणू शकत नाहीत, तर ते बदलाचे दूतही बनू  शकतात.

जागतिक क्रीडा स्पर्धा - तिरंदाजीत अभिषेक-ज्योती जोडीला कांस्यपदक :
  • अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या भारतीय जोडीने रविवारी जागतिक क्रीडा स्पर्धेतील मिश्र कंपाऊंड तिरंदाजीत कांस्यपदक पटकावले. त्यांनी प्रतिस्पर्धी मेक्सिकोवर एका गुणाने निसटता विजय मिळवला.

  • अभिषेक-ज्योती जोडीने पहिल्या फेरीत अचूक वेध साधताना दहा गुणांची कमाई करण्याची दमदार कामगिरी केली, मात्र आंद्रेया बेकेरा आणि मिग्वाइल बेकेरा या मेक्सिकन जोडीने दुसऱ्या फेरीत चमक दाखवत सामना बरोबरीत आणला. मग अभिषेक आणि ज्योतीने तिसऱ्या फेरीत पुन्हा अचूक वेध साधला. तसेच भारतीय जोडीने अखेरच्या फेरीतही दमदार खेळ सुरू ठेवताना १५७-१५६ अशा फरकाने विजय मिळवत कांस्यपदक आपल्या नावे केले.

  • भारतीय तिरंदाजी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक असून अभिषेकचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे ५०वे पदक आहे. कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सर्वच स्पर्धात पदक जिंकणारा अभिषेक हा एकमेव भारतीय तिरंदाज आहे.

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : एब्डेन-पर्सेल जोडीला पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद :
  • ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेन आणि मॅक्स पर्सेल या जोडीने धक्कादायक विजयाची नोंद करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटाचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात १४व्या मानांकित एब्डेन-पर्सेल जोडीने दुसऱ्या मानांकित क्रोएशियाच्या निकोला मेक्टिच आणि मेट पाव्हिच जोडीवर ७-६ (७-५), ६-७ (३-७), ४-६, ६-४, ७-६ (१०-२) अशी पाच सेटमध्ये मात केली. तब्बल चार तास आणि ११ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात दोन्ही जोडय़ांनी उत्कृष्ट खेळ केला.

  • एब्डेन-पर्सेल जोडीने पहिला सेट जिंकल्यानंतर मेक्टिच-पाव्हिच जोडीने दमदार पुनरागमन करताना पुढील दोन सेटमध्ये सरशी साधली. मात्र, चौथ्या सेटमध्ये पुन्हा एब्डेन-पर्सेल जोडीला विजय मिळवण्यात यश आले. त्यानंतर पाचव्या सेटमध्येही दोन्ही जोडय़ांमध्ये जेतेपद पटकावण्याची जिद्द दिसली. या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाल्याने विजेती जोडी ठरवण्यासाठी टायब्रेकर झाला. यात एब्डेन-पर्सेल जोडीने १०-२ अशी बाजी मारली.

  • एब्डेन आणि पर्सेल या दोघांच्याही कारकीर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. तसेच विम्बल्डनमधील पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवणारी ही २२ वर्षांतील पहिली ऑस्ट्रेलियन जोडी ठरली.

11 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.