चालू घडामोडी आणि दिनविशेष - 11 जानेवारी 2024

Date : 11 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नॅन्सीला सुवर्ण, तर एलाव्हेनिलला रौप्य! १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताला पहिले दोन क्रमांक
  • कनिष्ठ गटातील जागतिक विजेत्या नॅन्सीने आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत बुधवारी वरिष्ठ गटात १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. त्याच वेळी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा अनुभव असलेली एलाव्हेनिल व्हलारिवन रौप्यपदकाची मानकरी ठरली.
  • कनिष्ठ गटात जागतिक सांघिक विजेती असलेल्या युवा नॅन्सीने सर्वोत्तम २५२.८ गुणांची कमाई करताना सुवर्णयश मिळवले. एलाव्हेलिनचे सुवर्णपदक अवघ्या दशांश गुणाने हुकले. तिने २५२.७ गुणांसह रौप्यपदक मिळवले. या स्पर्धा प्रकारातील भारताचे निर्विवाद वर्चस्वही थोडक्यात हुकले. तिसरी स्पर्धक मेहुली घोषला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीनची शेन युफान कांस्यपदकाची मानकरी ठरली.
  • एलाव्हेनिल ६३३.८ अशा सर्वाधिक गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. नॅन्सीने ६३२.४, तर मेहुलीने ६३१.० गुणांची कमाई करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत मात्र नॅन्सीची अचूकता अधिक होती. अखेरच्या संधीपर्यंत बरोबरीत असलेल्या एलाव्हेनिलला त्या संधीला ९.७ गुणांचाच वेध घेता आला. तुलनेत नॅन्सीने अचूक लक्ष्यभेद करताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
  • ऑलिम्पिकसाठी यापूर्वीच पात्र ठरलेल्या ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रुद्रांक्षने २२८.७ गुणांसह हे पदक मिळवले. चीनच्या मा सिहानने (२५१.४) सुवर्ण, तर कोरियाच्या दाएहन चोएने रौप्यपदक पटकावले. भारताच्या अर्जुन बबुतानेही अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत रुद्रांक्ष तिसऱ्या, तर बबुता चौथ्या क्रमांकावर होता. त्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठता आली.
राज्यभरात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलींचे वारे
  • आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे आचारसंहिता लागण्याची धाकधूक सुरु झाली आहे. त्यामुळे गृह विभागाने सतर्कता दाखवत राज्यभरातील बदलीच्या कक्षेत असलेले आणि आचार संहिताच्या नियमात बसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याची जोरात तयार सुरु केली आहे. काही पोलीस अधिकारी पसंतीच्या शहरात बदलीची ‘सेटिंग’ लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
  • लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य पोलीस दलातील प्रत्येक जिल्ह्यात, आयुक्तालयात एकाच शहरात पाच पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी किंवा एकाच विभागात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना असतात. निवडणुकींवर प्रभाव पडू नये म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. भारतीय निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक कार्यालयाला काही सूचना दिल्या होत्या. त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भातही विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ८ जानेवारीला पोलीस महासंचालक कार्यालयातून आस्थापना विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या सहिने एक पत्र प्रत्येक पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला (लोहमार्ग आणि मुंबई वगळून) पाठविण्यात आले.
  • त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक यांना १२ जानेवारीपर्यंत अधीनस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली-पदस्थापनेबाबत कार्यवाही करावी लागणार आहे. परीक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक यांनी १२ ते १६ जानेवारीपर्यंत बदल्या किंवा पदस्थापना करावी. तसेच पोलीस आयुक्तांनाही 16 जानेवारीपर्यंत बदल्या संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आता १६ जानेवारीपर्यंत राज्यभरातील पात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे जे पोलीस अधिकारी बदलीच्या कक्षेत किंवा बदली पात्र आहेत, त्यांनी गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात ‘सेटींग’ लावण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
‘इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार’
  • राज्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी, कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतला. उंटावरून शेळय़ा हाकणारा मी मुख्यमंत्री नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. राज्यात इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, हा आपला शब्द असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय मंडळींपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
  • आखाडा बाळापूर येथे शिवसंकल्प अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर आदी उपस्थित होते.
  • आपण एकदा शब्द दिल्यानंतर तो पाळत असतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. राज्यात शिवसेना वाचविण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी वेगळे पाऊल उचलले. आमच्यासोबत आमदार, खासदार हेदेखील आले. स्वार्थासाठी वेगळी भूमिका घेतली असती तर तुम्ही सर्व या ठिकाणी जमला असता काय, असा सवाल त्यांनी केला. खरी शिवसेना तुमची, आमची असल्याचे स्पष्ट करून त्यांनी राज्याचा सर्वागीण विकास हीच आमची भूमिका असल्याचे सांगितले.
  • माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून घरात बसणारा, उंटावरून शेळय़ा हाकणारा मी मुख्यमंत्री नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यावर तुमचा पोटशुळ का उठतो आहे, असा हल्लाही त्यांनी केला. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा हेलिकॉप्टरमधून शेतात जाणे केव्हाही चांगले, असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. मी जमिनीवरील कार्यकर्ता असून सदैव कार्यकर्ता म्हणूनच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अयोध्येत २२ जानेवारीला दर्शनाला जाणाऱ्या पाहुण्यांसाठी ‘टोकन गिफ्ट’, आमंत्रितांमध्ये मजुरांच्या कुटुंबीयांचाही समावेश!
  • अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता आयोजकांनी देशभरातील रामभक्तांना २२ जानेवारी रोजी आपापल्या परिसरातील राम मंदिरात जाऊन पूजा करण्याचं आवाहन केलं आहे. एकीकडे अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी प्रशासन चोख बंदोबस्त करत असताना दुसरीकडे राम मंदिर सोहळा आयोजकांकडून इतर बाबी पार पाडल्या जात आहेत. या सोहळ्याला बोलावण्यात आलेल्या आमंत्रितांना दर्शनानंतर ‘टोकन गिफ्ट’ दिलं जाणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे.
  • इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, २२ जानेवारीच्या सोहळ्यासाठी आमंत्रित पाहुण्यांना राम मंदिरातील दर्शनानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून टोकन गिफ्ट दिलं जाणार आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, २२ जानेवारी रोजी अयोध्येत ११ हजाराहून अधिक आमंत्रित उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अयोध्येत येणाऱ्या या पाहुण्यांना सनातन सेवा न्यासाच्या वतीने हे गिफ्ट देण्यात येणार आहे. त्यासाठी सनातन सेवा न्यासाचे पदाधिकारी शिवम मिश्रा यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

काय आहे हे टोकन गिफ्ट?

  • या वृत्तानुसार, टोकन गिफ्टमध्ये प्रसाद आणि प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित काही वस्तूंचा समावेश असेल. यात दोन बॉक्स असतील. एका बॉक्समध्ये प्रसाद असेल. यात बेसनाचा लाडू आणि तुळशीचं पान असेल. दुसऱ्या बॉक्समध्ये प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित वस्तू असतील. त्यात राम मंदिर भूमीपूजनावेळी खोदण्यात आलेली माती, अयोध्येतील माती आणि शरयू नदीचं पाणी यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त या बॉक्समध्ये एक ब्रासची प्लेट आणि चांदीचं नाणं असेल.

आमंत्रितांमध्ये मजुरांच्या नातेवाईकांचाही समावेश

  • दरम्यान, या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या ११ हजार आमंत्रितांमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी झटलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. मजुरांच्या नातेवाईकांनाही सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
मोदी भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान! उद्योगपती मुकेश अंबानी यांची स्तुतिसुमने
  • मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की नरेंद्रभाई मोदी हे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान, आमचे प्रिय नेते आणि सध्याच्या काळात महान जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. ते भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत.ह्णह्णपरदेशातील माझे मित्र मला विचारतात की लाखो भारतीय ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा घोषणा देत आहेत त्याचा अर्थ काय आहे? मी त्यांना सांगतोयाचा अर्थ असा, की भारताचे पंतप्रधान त्यांच्या दूरदृष्टीने, दृढनिश्चयाने अशक्य ते सर्व शक्य बनवतात.
  • ‘व्हायब्रंट गुजरात’ सर्वात महत्त्वाची गुंतवणूक परिषद’२०४७ पर्यंत भारताला ३५,००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. यावेळी अंबांनींनी ‘व्हायब्रंट गुजरात’चे वर्णन सर्वात महत्त्वाची-प्रतिष्ठित गुंतवणूकदार परिषद असे केले. मोदी राज्याचे मुख्यमंत्री असताना सुमारे दोन दशकांपूर्वी ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट’ सुरू करण्यात आले होते.
  • मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील.

 

टीम इंडियाने रचला नवा विश्वविक्रम; ऑस्ट्रेलियाला मागे टाकत बनला जगातील पहिलाच संघ : 
  • भारत आणि श्रीलंका संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. हा सामना गुवाहाटीत खेळला जातोय. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला ३७४ धावांचे लक्ष्य दिले. या बरोबरच भारताने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विश्वविक्रम रचला आहे.
  • भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध एक मोठा कारनामा केला आहे. टीम इंडियाने विक्रमी ९व्यांदा श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५० हून अधिक धावा केल्या. भारताने या विक्रमाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाला हा कारनामा भारताविरुद्ध केला आहे.
  • श्रीलंकेविरुद्ध ९व्यांदा ३५०हून अधिक धावा केल्या - गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकात ७ गडी गमावून ३७३ धावा केल्या. भारताच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध ९व्यांदा ३५०हून अधिक धावा केल्या आहेत. आता हा नवा विश्वविक्रम झाला आहे.
  • ऑस्ट्रेलियाला टाकले मागे - यापूर्वी हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या नावावर नोंदवला गेला होता, ज्याने भारताविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळा ३५० हून अधिक धावा केल्या होत्या. परंतु आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून श्रीलंकेविरुद्ध नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने ११३, रोहित शर्माने ८३, शुबमन गिलने ७० आणि केएल राहुलने ३९ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाइन द्वितीय यांचे निधन
  • ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाइन द्वितीय यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते हृदयाशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. यादरम्यान, त्यांना अनेकवेळा रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रॉटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
  • कॉन्स्टंटाइन द्वितीय हे ग्रीसचे माजी राजा किंग पॉल आणि राणी फ्रेडरिका यांचे पुत्र होते. १९६४ मध्ये राजा किंग पॉल यांच्या मृत्यूनंतर कॉन्स्टंटाइन द्वितीय यांना राजा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, २१ एप्रिल १९६७ रोजी लष्करी उठावानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं. काही महिन्यांनंतर त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले. त्यांची कारकीर्द ग्रीसच्या इतिसाहातील सर्वात अशांत कालखंडांपैकी एक मानली जातो.
  • दरम्यान, १९७४ मध्ये कोन्स्टँटिनोस कॅरामॅनलिस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकता सरकारने घेतलेल्या जनमत चाचणीत ग्रीक नागरिकांनी दुसऱ्यांना राजेशाही नाकारली आणि कॉन्स्टंटाइन द्वितीय हे ग्रीसचे शेवटचे राजा ठरले. त्यानंतर अथेन्सने त्यांचे नागरिकत्वदेखील काढून घेतले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३४ वरून ३८ टक्के झाला आहे.  
  • वित्त विभागाने याबाबतचा आदेश प्रसृत केला आहे. त्यानुसार १ जुलै २०२२ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेच्या मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे. 
  • महागाई भत्त्यातील वाढ १ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील थकबाकीसह यंदाच्या जानेवारी महिन्यातील वेतनाबरोबर रोखीने देण्याचे आदेश वित्त विभागाने जारी केले आहेत.
नोकरभरतीतील अडथळे दूर करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा 
  • राज्यात सुरू केलेल्या नोकर भरतीतील त्रुटी तपासून त्या दूर करण्याकरिता मुख्य सचिवांची समिती नेमण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला केल्याचे समजते.
  • सरकारने काही दिवसांपुर्वी ७५ हजार नोकर भरतीची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व विभागाला नोकर भरतीसाठी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच नोकर भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारने दोन कंपन्यांची निवड केली होती. ग्रामविकास विभागातील ‘क’ व ‘ड’ वर्गातील जागासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून काही लाख इच्छुकांनी अर्ज केले आहेत.
  • मात्र या कंपंन्यांची राज्यातील सर्व जिल्ह्यात केंद्र नसल्यामुळे ग्रामविकास विभागापुढे पेच निर्माण झाला आहे. यातच १५ लाखांच्या आसपास अर्ज आल्याने या कंपन्यांची एकाच वेळी परीक्षा घेण्याची क्षमता नसल्याचे पुढे आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची समिती नेमण्याची सूचना सरकारने  केल्याचे समजते.
आरोग्य वार्ता - जागतिक स्तरावर करोना लसीकरणात वाढ :
  • जागतिक स्तरावर करोना लसीकरणात मोठी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ७५.२ टक्के लसीकरण झाले होते, तर २०२२ मध्ये ७९.१ टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. विशेष म्हणजे २३ देशांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले.
  • स्पेनमधील बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी या संस्थेने हा अभ्यास केला आहे. हा अभ्यास देशांमधील व्यापक परिवर्तनशीलता आणि लससंकोच सोडवण्यासाठी अनुकूल संवाद धोरणांची आवश्यकता अधोरेखित करतो.
  • २३ देशांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले असले तरी आठ देशांमध्ये मात्र लस स्वीकारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या देशांमध्ये विशेषत: तरुणच वर्धक मात्र घेण्यास टाळाटाळ करत आहेत, असे अभ्यासात म्हटले आहे. ‘नेच मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात हे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. हा डाटा मिळविण्यासाठी या संस्थांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याने २०२० पासून २३ उच्च लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये सर्वेक्षणांची मालिका सुरू केली, ज्यांना साथीच्या रोगाचा जोरदार फटका बसला. 
  • ब्राझील, कॅनडा, चीन, इक्वेडोर, फ्रान्स, जर्मनी, घाना, भारत, इटली, केनिया, मेक्सिको, नायजेरिया, पेरू, पोलंड, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, तुर्कस्तान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हा डाटा मिळविण्यात आला आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ जानेवारी २०२२
 
भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार; जाणून घ्या कसा असणार नवा गणवेश :

भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार आहे. १५ जानेवारी रोजी, आर्मी डे परेड दरम्यान, सैनिकांसाठी नवीन लढाऊ गणवेशाचा पहिला देखावा प्रदर्शित केला जाईल. मेक इन इंडियाच्या अनुषंगाने सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) यांनी संयुक्तपणे केली आहे.

डिजिटल नमुन्यांवर आधारित डिझाइन हे सैनिक तैनात असलेल्या विविध भूप्रदेशांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. सैनिकांना या गणवेशात आरामदायी वाटेल, याची काळजी घेण्यात आली आहे.

याचं उत्तर आहे नाही. सैनिकांच्या गणवेशासाठी नवीन डिझाइन केलेले कापड खुल्या बाजारात उपलब्ध होणार नाही आणि ते अधिकारी आणि सैनिकांना त्यांच्या युनिटमधील तुकड्यांमध्ये दिले जातील. दरम्यान, तब्बल १३ लाख भारतीय सैन्याची कापड पुरवण्याची गरज पूर्ण करण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही कंपन्यांना खुली निविदा जारी करण्याची सरकराची योजना आहे. या कंपन्या या नवीन बॅटल ड्रेस युनिफॉर्म्स (BDU) पुरवठा करतील.

संपूर्ण ‘आयपीएल’ महाराष्ट्रात :

एकीकडे राज्यासह देशभरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम पूर्णपणे महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात संपूर्ण ‘आयपीएल’ खेळवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘बीसीसीआय’चे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमिन, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष विजय पाटील आणि शरद पवार यांची यासंबंधी चर्चा झाली. लवकरच ही मंडळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी परवानगी घेतील, असे समजते.

मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अशा एकूण चार स्टेडियममध्ये ‘आयपीएल’चे सामने खेळवता येऊ शकतात. प्रेक्षकांना या स्पर्धेसाठी परवानगी नसेल. मुंबईसह पुण्यात जैव-सुरक्षा परीघ तयार करण्याची उत्तम सुविधा उपलब्ध असून खेळाडूंना विमान प्रवासही टाळता येईल. त्यामुळे फेब्रुवारीत खेळाडूंची लिलावप्रक्रिया झाल्यावर ‘बीसीसीआय’ ठिकाणांसंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अपेक्षित आहे.

नेदरलँड, चिलीसारख्या देशांपेक्षाही मराठवाडय़ातील प्राणवायू क्षमता अधिक :

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्राणवायूचा तुटवडय़ाचे चित्र होते पण आता मराठवाडय़ात प्राणवायू निर्मितीचे समान लोकसंख्या असणाऱ्या नेदरलँड, बेल्जियम, चिली, कझाकीस्थान या देशापेक्षाही अधिक आहे. पहिल्या लाटेत ८० मे. टन प्राणवायू लागला. तेव्हा साठवण क्षमता खूप कमी होती. दुसऱ्या लाटेत २२० मे. टन प्राणवायू लागला. तेव्हाही २५० मेट्रीक टनाची क्षमता होती. आता तिसऱ्या लाटेपूर्वी प्राणवायू साठवणूक व निर्मितीची क्षमता  ८४५ मे टन एवढी असून ती १ हजार २९६ पर्यंत वाढेल असे सांगण्यात येत आहे.

ही सारी यंत्रणा उभी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर खास पुढाकार घेत आठ जिल्हाधिकाऱ्यांना कामाला लावले. साखर कारखान्यासह, स्टील उद्योगात तसेच वीज निर्मिती प्रकल्पातही प्राणवायू प्रकल्प उभे करण्यात आले. किनवटसारख्या आदिवासी व दुर्गम भागात आता प्राणवायू साठवणुकीची क्षमता उभी करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

करोनाची पहिली लाट आली होती तेव्हा पीपीई किटपासून ते औषधांचीही कमतरता होती. दुसऱ्या लाटेत प्राणवायूसाठी होणारी धावपळ तर महाराष्ट्रात सर्वानी पाहिली. त्यानंतर प्राणवायू प्रकल्प कुठे आणि कसे सुरू करता येतील याचे दौरे सुरू करण्यात आले. स्वत: विभागीय आयुक्तांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. काही वेळा युद्धजन्यस्थितीसारखी कामे करुन घेण्यात आली. मराठवाडय़ाची लोकसंख्या साधारणत: दोन कोटी आहे. एवढीच लोकसंख्या असणाऱ्या अन्य देशात किती प्राणवायू साठवणूक याचा अंदाजही मराठवाडय़ातील अधिकारी घेत होते.  

मराठवाडय़ातील शेवटच्या टोकांच्या गावात प्राणवायू पोहचविण्यासाठी नांदेड व परभणी जिल्हाधिकाऱ्यांना बऱ्याच खटपटी कराव्या लागल्या होत्या. हैदराबाद व कर्नाटकातूनही प्राणवायूचे टँकर मागवावे लागले होते. तेव्हापासून प्राणवायू साठवणूक क्षमता व निर्मिती वाढविण्यावर जोर दिला जात होता. मराठवाडय़ातील शहराच्या आकारानुसार गरज ओळखून प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आले आहेत. आता त्यात पुरेसा प्राणवायूही साठवणूक करण्यात आला आहे. तिसरी लाट आली तर प्राणवायूची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी पुन्हा धावपळ करावी लागण्याची शक्यता कमी असल्याचा दावा केला जात आहे.

देशभरात २४ तासांत १,६८,०६३ नवीन करोनाबाधित ; २७७ रूग्णांचा मृत्यू :

देशात करोना महामारीची तिसरी लाट आली आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. करोनासोबतच ओमायक्रॉनबाधितही रूग्णांची नोंद होत आहे. मागील २४ तासात देशभरात १,६८ हजार ०६३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २७७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

याशिवाय ६९ हजार ९५९ रूग्ण करोनामधून बरे दखील झालाची माहिती समोर आली आहे. तर, देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ८ लाख २१ हजार ४४६ वर पोहचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १०.६४ टक्के आहे. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या ४ हजार ४६१ वर पोहचली आहे.

काल देशभरात १ लाख ६९ हजार ७२३ नवीन करोनाधित आढळून आले होते. या तुलनेत आज आढळून आलेल्या करोनाबाधितांची संख्या ही ११ हजार ६६० रूग्णांनी कमी आहे.

तर, देशात करोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि या महिन्याच्या अखेरीस ते करोनाची तिसरी लाट पीकवर असण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे की, या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्ण संख्या आढळू शकते. इतकेच नाही तर कडक निर्बंधांमुळे ही लाट काही काळानंतर नक्कीच येईल, पण नंतर ती दीर्घकाळ राहील, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

११ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.