चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ जानेवारी २०२१

Date : 11 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नियमांचे उल्लंघन करुन बढती मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांना योगी सरकारचा दणका; थेट चौकीदार, कारकून पदावर केली नियुक्ती :
  • उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने भ्रष्टाचार आणि नियमांचे उल्लंघन करुन बढती (प्रमोशन) मिळवणाऱ्यांविरोधात मोहिम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून अप्पर जिल्हा सूचना अधिकारी पदावर तैनात असणाऱ्या चार अधिकाऱ्यांना मिळालेली बढती रद्द करण्यात आली आहे.

  • सरकारने अधिकारी पदावरील या कर्मचाऱ्यांचे डिमोशन करुन त्यांना थेट चौकीदार, कारकून, ऑप्रेटर आणि सहाय्यक पदावर नियुक्त केला आहे. यापूर्वीही गैर मार्गाने बढती मिळवल्याचे उघड झाल्यानंतर एका उपविभागीय दंडाधिकाऱ्यावर कारवाई करत त्याला तहसीलदार पदावर नियुक्त करण्यात आलं होतं.

  • उत्तर प्रदेश सरकारच्या सूचना आणि जनसंपर्क कार्यालयाने जारी केलेल्या आदेशामध्ये तीन नोव्हेंबर २०१४ साली या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली बढती ही नियमांचे उल्लंघन करुन देण्यात आल्याचे सिद्ध झाल्याचे नमूद केलं आहे. त्यामुळेच आता या नियुक्त्या रद्द करुन २०१४ साली हे अधिकारी ज्या पदावर होते तेथेच पुन्हा त्यांची नियुक्त करण्यात येत असल्याचेही सरकारने स्पष्ट केलं आहे.

  • सरकारने ज्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली आहे त्यामध्ये बरेलीचे अप्पर जिल्हा सूचना अधिकारी नरसिंह, फिरोजाबादचे दयाशंकर, मथुराचे विनोद कुमार शर्मा आणि भदोहीमधील अनिक कुमार यांचा समावेश आहे. या चारही जणांना २०१४ पासून मिळालेल्या बढत्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच नरसिंह यांना कारकून, दयाशंकर यांना चौकीदार, विनोद कुमार शर्मा आणि अनिल कुमार यांची ऑप्रेटरपदावर फेरनियुक्ती करण्यात आलीय.

पंतप्रधान मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक :

 

  • देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार असून, जगातील या सर्वात मोठय़ा कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसह करोनाविरोधी आघाडीवरील सुमारे तीन कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

  • या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ऑनलाईन बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यांमधील करोनाची परिस्थिती व लसीकरण अभियानाची कितपत तयारी झालेली आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे.

  • ‘विस्तृत आढावा घेतल्यानंतर, लोहरी, मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू इत्यादी सणांच्या पाश्र्वभूमीवर लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे केंद्र सरकारतर्फे शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर लसीकरणाचा हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

२० लाख अपात्र लाभार्थ्यांना १३४४ कोटी :
  • पंतप्रधान किसान मदत निधी योजनेत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना १३६४ कोटी रुपये देण्यात आले, असे माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्राने २०१९ मध्ये लागू केली होती, या योजनेत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. लघु व मध्यम शेतकऱ्यांना किंवा ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे अशांना ही योजना लागू करण्यात आली होती. कॉमनवेल्थ ह्य़ूमन राइट्स इनिशिएटिव्ह या संस्थेचे माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती अधिकारातील अर्जावर म्हटले आहे की, या योजनेत दोन प्रकारामध्ये अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. त्यांची वर्गवारी अपात्र शेतकरी व प्राप्तिकर भरणारे शेतकरी अशी करण्यात आली आहे.

  • अपात्र लाभार्थ्यांपैकी ५५.५८ टक्के लोक हे प्राप्तिकर भरणारे शेतकरी आहेत. उर्वरित ४४.४१ टक्के शेतकरी हे अपात्र शेतकरी गटात मोडणारे आहेत. सरकारच्या आकडेवारीत पैसा चुकीच्या लोकांना मिळाल्याचे म्हटले आहे. या अपात्र शेतकऱ्यात पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

भारतातील लसीकरणाकडे जगाचे लक्ष -मोदी :
  • भारत दोन लशींसह नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी सज्ज असून आमच्या या सर्वात मोठय़ा लसीकरण कार्यक्रमाकडे जगाचे लक्ष आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. १६ व्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. जर कुठे खरी लोकशाही जिवंत असेल, तर ती भारतात, असेही मोदी या वेळी म्हणाले.

  • जगाची ‘फार्मसी’ म्हणून भारताने नावलौकिक मिळवला आहे. जगाला आवश्यक असलेली अनेक औषधे भारताने पुरवली आहेत. अजूनही पुरवत आहे. आता जग भारतात लसीकरणाचा सर्वात मोठा कार्यक्रम कसा, राबवला जातो याची प्रतीक्षा करीत आहे, असे मोदी म्हणाले.

  • करोनासाथीच्या काळात भारतीय लोकांनी त्यांच्या क्षमता दाखवतानाच एकजुटीने या संकटाचा सामना केला. भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी थेट निधी हस्तांतराचा वापर केला जात असून थेट लाभार्थीच्या नावावर पैसे जमा होत आहेत. आज जग इंटरनेटने जोडले गेलेले असून आमची मने मात्र भारतमातेशी जोडली गेली आहेत. अनेक राष्ट्रप्रमुखांशी माझी चर्चा झाली. त्यांनी भारताने कोविड काळात जगाला मदतीचा हात दिल्याचे कौतुक केले. भारताने या काळात वेगळ्या पद्धतीने धुरीणत्व पार पाडले. हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात आज ३,५५८ नव्या करोनाबाधितांची नोंद :
  • राज्यात आज ३,५५८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २,३०२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

  • आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज आढळून आलेल्या नव्या ३,५५८ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १९,६९,११४ झाली आहे. तर आज २,३०२ रुग्ण बरे झाल्याने एकूण १८,६३,७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आजच्या ३४ मृतांच्या संख्येमुळे करोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या ५०,०६१वर पोहोचली आहे. तसेच सध्या राज्यात ५४,१७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

११ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.