चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ डिसेंबर २०२१

Date : 11 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आचारसंहिता संपताच लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना वाढीव संधीचा निर्णय :
  • वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी एक वाढीव संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असला तरी विधान परिषद निवडणुकीमुळे शासन आदेश निघू शकलेला नाही.

  • आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना वाढीव संधी देण्याचा शासन निर्णय काढला जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी माध्यमांना दिली. करोना परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला एकही उमेदवार परीक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही, सरकार त्यांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

  • आचारसंहितेमुळे शासन निर्णय लांबणीवर - करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेली होती. करोनाच्या संकटामुळे हे घडल्याने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने ११ नोव्हेंबरला सर्व उमेदवारांना एमपीएससी परीक्षेकरिता एक वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला होता.

  • मात्र, त्यानंतर काही दिवसांतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता लागल्याने राज्य शासनाला या संदर्भातील शासन निर्णय काढता आला नाही, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत : कार्लसनने जगज्जेतेपद राखले :
  • नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन जगज्जेतेपद कायम राखण्यात पुन्हा यशस्वी ठरला. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील शुक्रवारी झालेल्या ११व्या फेरीत कार्लसनने रशियाचा आव्हानवीर इयान नेपोम्निशीवर सहज वर्चस्व गाजवून सलग पाचव्यांदा जेतेपदाचा किताब मिळवला.

  • भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला नमवून २०१३मध्ये प्रथमच जेतेपद काबीज करणाऱ्या कार्लसनने यंदाच्या लढतीत एकूण ७.५-३.५ गुणांच्या फरकाने तीन फेऱ्या बाकी असतानाच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने ११वी फेरी ३ तास, २१ मिनिटांच्या संघर्षानंतर ४९ चालींत जिंकली. सर्वोत्तम १४ डावांच्या खेळवण्यात आलेल्या या लढतीतील एकूण ११ फेऱ्यांपैकी चारमध्ये कार्लसनने विजय मिळवला, तर अन्य सात डावांत त्याने बरोबरी पत्करली.

  • शुक्रवारी पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या ३१ वर्षीय नेपोम्निशीला आव्हान टिकवून ठेवण्यासाठी ११व्या फेरीत कार्लसनला किमान बरोबरीत रोखणे गरजेचे होते. परंतु २३व्या चालीत अतिआक्रमकपणा दाखवणे नेपोम्निशीला महागात पडले. कार्लसनने मात्र चलाखीने घोड्याचा बळी दिला आणि तेथून पुढे नेपोम्निशीला सातत्याने चुका करण्यास भाग पाडले. अखेर ४९व्या चालीनंतर नेपोम्निशीला हार मानावी लागली.

‘समाज माध्यमे, कूटचलनासाठी जागतिक नियमावलीची गरज’ :
  • समाज माध्यमे आणि कूटचलन (क्रिप्टोकरन्सी) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर लोकशाहीला कमकुवत नव्हे तर तिच्या सशक्तीकरण्यासाठी व्हावा, यासाठी त्याचे जागतिक नियम ठरवणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.

  • अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आयोजित केलेल्या लोकशाही शिखर परिषदेत मोदी दूरचित्रप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मोदी म्हणाले की, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, तसेच सर्व प्रशासकीय क्षेत्रांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी भारतला आपले कौशल्य प्रदान करण्यात आनंद होईल.

  • बहुपक्षीय निवडणुका, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि मुक्त माध्यमे लोकशाहीची महत्त्वाची साधने आहेत. तथापि, लोकशाहीचे बलस्थान आपल्या नागरिकांमध्ये आणि समाजात असलेला आत्मा आणि नैतिकता हे आहे, असे मोदी म्हणाले.  लोकशाही केवळ लोकांची, लोकांनी चालवलेली, लोकांसाठी नसते, तर ती लोकांबरोबर आणि लोकांमध्ये असते, असे मोदी यांनी नमूद केले.

जनरल रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार :
  • भारताचे पहिले सैन्यदलांचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली कंटोनमेंट क्षेत्रातील ब्रार चौक स्मशानभूमीत जनरल रावत यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

  • या वेळी जनरल रावत यांच्या पार्थिवास १७ तोफांची सलामी देण्यात आली. सैन्यदलांचे ८०० जवान अंत्यसंस्कारास तैनात होते. तमिळनाडूतील कन्नूरनजीक बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह सैन्यदलाच्या ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढवला होता.

  • स्मशानभूमीत जनरल रावत यांच्या कन्या क्रितिका आणि तारिणी यांनी आपले पिता आणि आईच्या पार्थिवावर अंत्यविधी केले. या वेळी गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, द्रमुकचे नेते ए. राजा आणि कनिमोळी आदी नेते उपस्थित होते.

ओमायक्रॉन संसर्गानंतर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी भारतात कोणते नियम बदलले :
  • नागरी उड्डान संचलनालयाने ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान प्रवास ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत भारताने मार्च २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लादले होते. याशिवाय सध्या भारताने अति जोखमीच्या देशांच्या यादीतही बदल केले आहेत. या यादीतील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची अधिक कठोर तपासणी केली जाते.

याचा अर्थ सर्व आंतरराष्ट्रीय विमानं रद्द आहेत असा आहे का?

भारताने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लावले आहेत याचा अर्थ सर्व आंतरराष्ट्रीय विमानं रद्द झालेली नाहीत. भारताने जगातील ३२ देशांबाबत वेगळे नियम केले आहेत. याला बबल अरेंजमेंट असं म्हटलं जातं. या अंतर्गत अमेरिका, सिंगापूर, कतार, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी अशा ३२ देशांमधील विमान सेवे निश्चित वेळापत्रकाप्रमाणेच सुरू आहे. असं असलं तरी या प्रवाशांना केंद्र सरकारच्या करोना नियमावलीचे पालन करणं बंधनकारक ठेवण्यात आले आहे.

नियमित विमान प्रवास केव्हा सुरू होईल?

भारताने काही दिवसांपूर्वीच १५ डिसेंबरपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय पुढे ढकलण्यात आलाय. आता भारतातील विमानसेवा ३१ जानेवारीपर्यंत निलंबित असेल. सध्या तरी ही सेवा पुन्हा कधी सुरू होणार याबाबत केंद्र सरकारकडून निश्चित सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर लावलेले निर्बंध हटवण्यात येतात की वाढवले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ठाण्यातील रुद्रांक्ष पाटीलचा डंका; तिन्ही प्रकारांत जिंकली रौप्यपदकं :
  • मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये वरिष्ठ, कनिष्ठ आणि युवा या तिन्ही गटात ठाण्यातील रुद्रांक्ष पाटील याने रौप्यपदके पटकावली आहेत. रुद्रांक्षच्या कामगिरीचे ठाणेकरांकडून कौतुक केले जात आहे.

  • भोपाळ येथे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत वरिष्ठ, कनिष्ठ आणि युवा या तिन्ही गटातील प्रकारामध्ये रौप्य पदकाची कामगिरी केली. यापूर्वी रुद्रांक्षने पेरू येथील कनिष्ठ गटातील जागतिक स्पर्धा जिंकली होती.

  • करोनाच्या कालावधीतही सरावामध्ये त्याने खंड पडू दिला नाही. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या कालावधीत त्याची परिक्षाही सुरू होती. अशा परिस्थितीतही त्याने पदके पटकावले, असे रुद्रांक्ष याचे वडिल बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

११ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.