चालू घडामोडी आणि दिनविशेष - ११ डिसेंबर २०२०

Date : 11 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विराट-धोनीवरुन भिडले गावसकर-हेडन; सांगितला दशकातील सर्वोत्तम खेळाडू :
  • सामना जिंकून देणारा दशकातील सर्वात प्रभावशाली खेळाडू कोणता, विराट कोहली की धोनी? यावरुन गावसकर आणि हेडन यांच्या दुमत पाहायला मिळालं. गावसकरांच्या मते दशकातील सर्वोत्त खेळाडू विराट कोहली आहे. तर हेडनच्या मते धोनी हा भारतासाठी या दशकातील सर्वात प्रभावशाली खेळाडू आहे. स्टार स्पोर्ट्सवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात या दिग्गजांनी आपली मतं मांडली.

  • भारताचा माजी खेळाडू सुनिल गावसकर म्हणाला की, सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीला मानलं जातं. एकदिवसीय सामन्याच्या इतिहासातील दिग्गज खेळाडूंमध्ये कोहलीची गणना होते. नुकतेच कोहलीनं वेगवान १२ हजार धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करताना कोहलीनं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीची ही कामगिरी पाहाता त्यानं किती सामने जिंकून दिले, याची प्रचिती येईल. म्हणूनच विराट कोहलीला गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठा मॅचविनर म्हणावं लागेल, असे सुनील गावसकर म्हणाले.

  • धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याच्या आसपास एकही खेळाडू दिसत नाही. विराट कोहलीनं भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. एखाद्या खेळाडूनं केलेल्या धावा किंवा बळी न पाहाता सामन्यात तो खेळाडू किती प्रभावशाली ठरला हे महत्वाचं आहे. त्यामुळेच विराट कोहली या दशकातील सर्वोत्तम खेळाडू आहे, असं गावसकर म्हणाले.

“आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणार नवं संसद भवन” :
  • नवीन संसद भवनाची निर्मिती ही नव्या व जुन्याच्या सहअस्तित्वाचे उदाहरण आहे. आज १३० कोटींपेक्षा जास्त भारतीयांसाठी अत्यंत सौभाग्याचा व गर्वाचा दिवस आहे. आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरत आहोत. काळ आणि गरजेच्या अनुषंगाने स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आहे. नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यानंतर बोलताना म्हटलं.

  • ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी आज(गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.

  • याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन व नंतर स्वतंत्र भारताला घडण्यासाठी आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारची निर्मिती देखील इथेच झाली व पहिली संसद देखील इथंच बसली. याच संसद भवनात आपल्या राज्यघटनेची रचना झाली. आपल्या लोकशाहीची पुर्नस्थापना झाली.

  • संसदेची सध्याची इमारत स्वतंत्र भारताचे प्रत्येक चढ-उतार, आपली प्रत्येक आव्हानं, आपल्या आशा-आकांक्षा, समाधान, आपल्या यशाचे प्रतीक राहिलेली आहे. या इमारतीत बनलेला प्रत्येक कायदा, या कायद्याच्या निर्मिती दरम्यान झालेल्या अनेक गंभीर चर्चा, हे सर्व आपल्या लोकशाहीचा ठेवा आहे. मात्र संसदेच्या शक्तीशाली इतिहासाबरोबरच यथार्थ स्वीकारणे तेवढंच आवश्यक आहे. ही इमारत आता जवळजवळ १०० वर्षांची होत आहे. मागील दशकात तत्कालीन गरजांना लक्षात घेता सातत्याने यामध्ये बदल केले गेले. या प्रक्रियेत अनेकदा भिंती तोडण्यात आल्या आहेत, अन्य सुविधांमध्ये बदल केले गेले. सदस्यांना बसण्यास पुरेसी जागा मिळावी यासाठी भिंती देखील हटवल्या गेल्या आहेत. एवढं सर्व झाल्यानंतर हे संसद भवन आता विश्रांती मागत आहे.

गूगलवर ‘करोना’चा नव्हे; ‘आयपीएल’चा सर्वाधिक शोध :
  • करोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असताना, गूगल या सर्च इंजिनवर जास्तीतजास्त लोकांनी याच शब्दाचा शोध घेतला असावा असे कुणालाही वाटणे साहजिक आहे. मात्र, शोधविषयाच्या बाबतीत इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) करोना विषाणूवरही मात केल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या गूगल इंडियाच्या ‘सर्च इन २०२०’मुळे उघड झाले आहे. यामुळे भारताचे क्रिकेटप्रेम पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

  • गेल्या वर्षी ‘आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप’ ही गूगल सर्चवरील ‘टॉप ट्रेंडिंग क्वेरी’ होती.

  • क्रीडा आणि वृत्त कार्यक्रमांपैकी आयपीएलचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. यानंतर करोना विषाणू, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, बिहार निवडणूक निकाल आणि दिल्ली निवडणूक निकाल याचा गूगलवर सर्वात जास्त शोध घेण्यात आलेल्या विषयांमध्ये समावेश आहे.

  • कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आयपीएलची तेरावी आवृत्ती संयुक्त अरब अमिरातींमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा तिच्या प्रेक्षकसंख्येत या वर्षी २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.

  • गूगलच्या ‘सर्च इन २०२०’ यादीनुसार, निर्भया प्रकरण, भारत-चीन संघर्ष आणि राममंदिर हे भारतीयांनी सर्वाधिक शोध घेतलेल्या पहिल्या १० क्रमांकांमध्ये होते.

राजनाथ सिंह यांची चीनला कोपरखळी :
  • आपल्या कार्यकलापांमध्ये संयम राखणे आणि ज्यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची होईल अशा कृती टाळणे यामुळे कायमस्वरूपी प्रादेशिक शांतता राखण्यात दीर्घकालीन मदत होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी अप्रत्यक्षरीत्या चीनच्या आक्रमक लष्करी वर्तणुकीच्या संदर्भात सांगितले.

  • दहशतवाद हे या क्षेत्रासाठी आणि जगासाठीही असलेले मोठे संकट असल्याचे सिंह यांनी आसियान संरक्षणमंत्र्यांच्या ‘मीटिंग प्लस’मध्ये (एडीएमएम- प्लस) केलेल्या भाषणात सांगितले. यात दहा देशांचा समावेश आहे. दहशतवादाला मदत करणाऱ्या व तो कायम राखणाऱ्या शक्ती अद्यापही अस्तित्वात आहेत आणि त्या भारताच्या शेजारीही आहेत, असे त्यांनी पाकिस्तानी भूमीवरून कार्यरत असलेल्या दहशतवादाच्या संदर्भाने सांगितले.

  • दहशतवादाशी सामूहिकरीत्या व जोमाने लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय यंत्रणा बळकट करण्याबाबत मजबूत बांधिलकी असल्याच्या आवश्यकतेवर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला.

इटलीच्या पावलो रोस्सी यांचे निधन :
  • १९८२मध्ये इटलीच्या फिफा विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलणारे तसेच त्यानंतर समालोचक म्हणून नावलौकिक मिळवणारे पावलो रोस्सी यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.

  • गुरुवारी पावलो यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला, असे त्यांच्या पत्नी फेडेरिका यांनी सांगितले. १९८०मध्ये सट्टेबाजी प्रकरणात बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पावलो यांनी धडाकेबाज पुनरागमन करत इटलीला १९८२मध्ये फिफा विश्वचषकाचे जेतेपद मिळवून दिले. स्पेनमध्ये झालेल्या या स्पर्धेत पावलो यांनी तब्बल सहा गोल झळकावले. अंतिम फेरीतही त्यांनी पश्चिम जर्मनीविरुद्ध सलामीचा गोल नोंदवला होता. त्याच वर्षी त्यांना फिफाच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

  • इटली फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष गॅब्रिएल ग्रॅविना आदरांजली वाहताना  म्हणाले की, ‘‘इटली फुटबॉलमधील महान खेळाडू तसेच आम्ही चांगला मित्र गमावला आहे.’’

११ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.