सलग तिसऱ्या वर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती
ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा आपल्या प्रतिस्पर्धकांना मागे टाकून सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा बनला. जुलैमध्ये सौदी अरेबियाला गेल्यानंतर २०१७ नंतर प्रथमच फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणारा ऍथलीट म्हणून स्थान मिळवलेला रोनाल्डो, आता २०२३ इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये अव्वल आहे, जो ऑनलाइन प्रभावाचा जागतिक मार्कर आहे.
इन्स्टाग्राम शेड्युलिंग टूल, हॉपर एचक्यू द्वारे संकलित केलेल्या २०२३ इन्स्टाग्राम रिच लिस्टनुसार, रोनाल्डो प्रति इन्स्टाग्राम पोस्टमधून ३.२३ अमेरिकन डॉलर कमावतो. ही मोठी रक्कम मिळण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर या दिग्गजाचे जवळपास ६०० दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत.यादीतील त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी सुमारे २.६ दशलक्ष कमावतो. यामुळे फुटबॉल दिग्गज रोनाल्डो आणि मेस्सी केवळ इतर सर्व क्रीडा व्यक्तिमत्त्वांपेक्षा पुढे आहेत. तसेच गायिका सेलेना गोमेझ, रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि उद्योजक काइली जेनर आणि अभिनेता ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सन यांसारख्या ख्यातनाम सेलिब्रेंटींच्या देखील पुढे आहेत.
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार हे फक्त दोनच खेळाडू टॉप-२० मध्ये स्थान मिळवू शकले आहेत. नेमार त्याच्या पॅरिस सेंट-जर्मेन संघातील सहकारी किलियन एमबाप्पेच्या प्रत्येक पोस्टपेक्षा जवळजवळ दुप्पट रक्कम कमावतो. हॉपर मुख्यालयाचे सह-संस्थापक, माईक बंदर यांनी प्लॅटफॉर्मवरून दरवर्षी वाढणाऱ्या वार्षिक कमाईबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तथापि, त्यांनी रोनाल्डो आणि मेस्सी सारख्या खेळाडूंच्या वर्चस्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की या खेळाडूंचा प्रभाव खेळपट्टीच्या पलीकडे डिजिटल क्षेत्रापर्यंत वाढत असून वैयक्तिक ब्रँडिंगची क्षमता प्रकट करते.
विराट कोहलीची 10 वी ची मार्कशिट व्हायरल, IAS अधिकाऱ्याने फोटो शेअर करत लोकांना दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला
संपूर्ण क्रिकेटविश्वात धावांचा पाऊस पाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७५ शतके ठोकणारा विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आता तर विराटच्या शिक्षणाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. विराटची सेकंडरी बोर्ड परीक्षेची दहावीची मार्कशिट इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. आएएस ऑफिसर जितिन यादव यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर विराटची इयत्ता १० वीच्या मार्कशिटचा फोटो शेअर केला आहे. मार्कशिटचा फोटो शेअर करत यादव यांनी लोकांना जबरदस्त मेसेज दिला आहे. सुंदर कॅप्शन देऊन पोस्ट शेअर केल्याने यूजर्सने खूप चांगल्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
आएएस अधिकारी जितिन यादव यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर कॅप्शनमध्ये म्हटलंय की, जर नंबरच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतील, तर संपूर्ण जग या व्यक्तीला पाठींबा देत नसता. यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि जिद्दीची गरज असते. विराट कोहलीला दहावीच्या बोर्ड परीक्षेत सामान्य गूण मिळाले होते. इंग्लिश आणि सोशल सायन्समध्ये ८० पेक्षा जास्त गुण आहेत.परंतु, गणित आणि विज्ञानात विराटला ५१ आणि ५५ गुण मिळाले आहेत. परंतु, सध्याच्या घडीला विराटला मिळालेलं यश मोजण्यासाठी प्रत्येक गोष्ट छोटी वाटेल.
तो त्याच्या करीअरच्या अव्वल स्थानावर आहे आणि क्रिकेट खेळणारा प्रत्येक मुलगा विराट कोहलीसारखा क्रिकेट बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ९ ऑगस्टला शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, गुण फक्त कागदावर लिहिलेले नंबर असतात. पॅशन आणि डेडीकेशन याच महत्वाच्या गोष्टी आहेत, याच्याशी मी सहमत आहे. तर अन्य एका यूजरने म्हटलं, खऱ्या आयु्ष्यात नंबर नाही तर मेहनत कामी येते.
डॉ. आंबेडकरांच्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्यास मान्यता
दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील आंतरराष्ट्रीय स्मारकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी त्यांच्या गाझियाबाद येथील शिल्पशाळेत डॉ. आंबेडकर यांच्या २५ फूट उंचीच्या पुतळय़ाची प्रतिकृती तयार केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व्यक्ती यांना सोबत घेऊन गझियाबाद येथील शिल्पशाळेतील आंबेडकरांच्या पुतळय़ाची प्रतिकृती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे ठरले होते. त्यानुसार ६ एप्रिल रोजी प्रतिकृतीची पाहणी करून, त्यास संमती देण्यात आली.
राज्य शासनाने आता गझियाबाद शिल्पशाळेतील २५ फुटी प्रतिकृतीच्या धर्तीवर इंदू मिलच्या जागेवरील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा बसविण्यास मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी त्यासंबंधीचा शासन आदेश काढला आहे.
अकरावी प्रवेश: तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर; एकूण १३ हजार ४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले
अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीत १३ हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले असून अद्याप ५ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर येत्या काळात एटिकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाईल.मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील एकूण जवळपास १ लाख ४७ हजार जागा रिक्त होत्या आणि अर्ज केलेल्या जवळपास ४५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे बाकी होते.
तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या १ लाख ७ हजार २९८ जागांसाठी एकूण १८ हजार ७०३ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी १३ हजार ४ विद्यार्थ्यांना या फेरीत महाविद्यालय मिळाले. ८ हजार २२५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, १ हजार ७४८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ९८२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.
मुंबई महानगरक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीच्या तुलनेत तिसऱ्या विशेष फेरीत २ ते ४ टक्क्यांनी घट झाली आहे. काही महाविद्यालयांच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये जवळपास ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुंबई महानगरक्षेत्रातील काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे संबंधित महाविद्यालयांची तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर करण्यात आली नाही.पहिल्या नियमित प्रवेश फेरीपासून ते तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीपर्यंत अकरावीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पहायला मिळाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाची चुरस ही प्रत्येक प्रवेश फेरीमध्ये वाढून विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महाविद्यालय कधी सुरु होणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
देशाच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ
देशाच्या सरासरी तापमानात १९०१ ते २०१८ या काळात सरासरी ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. तापमान वाढीमुळे हिंदी महासागराच्या पाणी पातळीत दरवर्षी सुमारे ३.३ मिली मीटरने वाढ होत आहे. मोसमी पावसात अनियमितात वाढून एकीकडे मुसळधार पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पाऊस न पडणारे दुष्काळी पट्टेही वाढले आहेत.
राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तरात ही माहिती दिली. देशाच्या सरासरी तापमानात १९०१ ते २०१८ या काळात ०.७ अंश सेल्सिअने वाढ झाली आहे. १९५० ते २०१५ या काळात मोसमी पावसात अनियमितता वाढली आहे. एका दिवसांत १५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एकीकडे पावसाचे दिवस वाढले आहेत. अतिवृष्टी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. दुसरीकडे १९५१ ते २०१५ दरम्यान, भारतातील दुष्काळाची वारंवारता वाढली आहे. पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी पट्टे वाढले आहेत. एकूण पर्यावरण बदल, जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून हिंद महासागरात पाणी पातळीत गेल्या अडीच दशकांत, १९९३ ते २०१७ या काळात दर वर्षी ३.३ मिलीमीटरने वाढ झाली.
युद्धासाठी सज्ज व्हा! सर्वोच्च जनरलला बडतर्फ केल्यानंतर किम जोंग उन आक्रमक
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. किम जोंग उन यांनी त्यांच्या सर्वोच्च जनरलला बडतर्फ केलं आहे. त्यानंतर लष्कराला आदेश दिले आहेत की युद्धासाठी तयार राहा. तसंच किम जोंग उन यांनी शस्त्रसाठा वाढवण्याचे आणि सैन्याने सतर्क राहण्याचेही आदेश दिले आहेत.
उत्तर कोरियाचं सरकारी चॅनल KRT ने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी केंद्रीय लष्कर आयोगाची बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी उत्तर कोरियाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी काय उपाय योजना करता येतील त्यावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी कुठल्याही शत्रू राष्ट्राचं नाव घेतलं नाही. मात्र लष्कराला सज्ज राहा असा इशारा दिला आहे.
KRT या वृत्तवाहिनीने एक फोटोही जारी केला आहे. या फोटोत किम जोंग उन हे दक्षिण कोरियाची राजधानी सियोल आणि त्या शेजारच्या ठिकाणांवर पॉईंट करताना दिसत आहेत. तिथल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाक सु इल यांना जनरल पदावरुन हटवून री योंग गिल यांची नवे जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाक सु इल यांना का हटवण्यात आलं याचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र आता री योंग गिल यांना जनरल करण्यात आल्याने ते संरक्षण मंत्री या पदावर राहणार नाहीत.
एका अहवालानुसार किम जोंग उन यांनी शस्त्रांची निर्मिती वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. मागच्याच आठवड्यात किम जोंग उन यांनी शस्त्रांच्या कारखान्याचाही दौरा केला. मिसाइल इंजिन, तोफखाने आणि इतर हत्यारं यांचं उत्पादन वाढवा असे आदेश त्यांनी दिले आहेत.युद्धाशी संबंधित सर्व गोष्टींसाठी तयार राहा. तसंच अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज राहा असंही किम जोंग उन यांनी सांगितल्याचं कळतं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
नेताजींनी ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारलेले मैदान सिंगापूरचे राष्ट्रीय स्मारक :
सिंगापूरमधील दोनशे वर्षे जुन्या पदांग या खुल्या हिरवळीच्या मैदानाला येथील सरकारने मंगळवारी पंचहत्तरावे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले आहे. विशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच मैदानावरून १९४३ मध्ये ब्रिटिशांविरोधात दिल्ली चलो ची हाक दिली होती.
सिंगापूर सरकारने ५७ व्या राष्ट्रीय दिनी पदांग हे स्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे मैदान अनेक संस्मरणीय घटनांचे साक्षीदार आहे. सिंगापूरच्या मध्यवर्ती भागातील हे स्थळ ४.३ हेक्टरवर आहे. सिंगापूरच्या राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतील हे पहिलेच खुले हिरवळीचे ठिकाण आहे. एखादी इमारत किंवा स्थळाचा या यादीत समावेश होणे हा त्या स्थळाचा सर्वोच्च बहुमान समजला जातो. हे मैदान क्रिकेट, फूटबॉल, हॉकी, टेनिस आणि लॉन बॉिलग आदींच्या सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. सन १८०० पासून वापरत असलेले हे मैदान देशातील सर्वात जुन्या मैदानांपैकी एक आहे.
सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास विभागाचे प्रमुख राजेश राय यांनी सांगितले की, सिंगापूरमधील भारतीय समुदायाच्या दृष्टीने पदांग या स्थळाला आगळे महत्त्व आहे. या बेटावर ब्रिटिशांनी जेव्हा त्यांचे आऊट पोस्ट उभारले, तेव्हा तेथे भारतीय शिपायांनीच प्रथम आपला तळ उभारला होता. याच ठिकाणावरून नेताजींनी आझाद हिंद सेनेचे जवान आणि येथील भारतीयांपुढे भाषणे दिली होती. येथेच त्यांनी चलो दिल्लीची घोषणा दिली आणि झाशी राणी पलटणीची स्थापना केली. युद्ध संपण्याच्या काही दिवस आधी याच मैदानाच्या दक्षिण टोकाला त्यांनी आझाद हिंद सैनिकांचे स्मारक उभारले होते. ते अजूनही तेथे आहे.
न्या. यू. यू. लळित यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती :
न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची बुधवारी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते देशाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळित यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली. २७ ऑगस्ट रोजी न्या. लळित यांचा शपथविधी होणार आहे.
सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी समाप्त होत असल्याने दुसऱ्या दिवशी न्या. लळित कार्यभार स्वीकारतील. केवळ तीन महिने न्या. लळित या पदावर असतील. ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. न्या. लळित हे दुसरे सरन्यायाधीश असतील, ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान देण्यात आले. १९७१मध्ये एस. एम. सिक्री यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली, जे मार्च १९६४मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्त झालेले पहिले वकील होते.
लळित यांच्याविषयी : ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. यू. यू. लळित यांचा जन्म झाला. त्यांचे पिता यू. आर. लळित हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायाधीश होते. न्या. लळित यांनी मुंबई उच्च न्यायालयात जून १९८३ मध्ये वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९८६पासून दिल्ली न्यायालयात वकिली केली. एप्रिल २००४ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले. १३ ऑगस्ट २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील अनेक ऐतिहासिक निकालांचा ते भाग होते. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऑगस्ट २०१७ मध्ये ३-२ अशा बहुमताने ‘तिहेरी तलाक’ घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला होता. या तीन न्यायाधीशांमध्ये न्या. लळित यांचाही समावेश होता.
पंतप्रधान योजनेंतर्गत राज्यात १७ लाख घरांना मंजुरी ; २० हजार कोटींची आवश्यकता :
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी तसेच मध्यमवर्गीयांसाठी सुमारे १७ लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. शासकीय, खासगी अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मोठय़ा संख्येने घरांची निर्मिती करावयाची असल्याने, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून २० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकासाठी व मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी २०१५ पासून देशपातळीवर पंतप्रधान आवास योजना सुरू केली. राज्य सरकारने जून २०१५ पासून ३९१ शहरांमध्ये या योजनेची अंमलबजाणी सुरू केली.
जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडय़ांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे, कर्जसंलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान देणे आणि खासगी भागीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, अशा चार घटकांच्या माध्यमातून या योजनेंतर्गत घरांची निर्मिती करण्यात येते. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रतिलाभार्थी दीड लाख रुपये व राज्य सरकारकडून एक लाख रुपये असे एकूण २ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. राज्यात गृहनिर्माण विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३१ मार्च २०२२ अखेपर्यंत राज्यात १९ लाख ४० हजार परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या योजनेला आता ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे या योजनेचा दीड महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यानंतर नवीन घरकुलांना किंवा घरकुल प्रकल्पांना मान्यता मिळणार नाही. आतापर्यंत या चार घटकांच्या माध्यमातून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी २ लाख ६९ हजार ९१ घरांची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातून देण्यात आली. या योजनेसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १६८९.३८ कोटी व राज्य सरकारने २१८०.४७ कोटी इतका निधी वितरित केल्याची माहिती देण्यात आली. या योजनेच्या अंतिम टप्प्यात राज्यात १७ लाख ३ हजार १७ घरकुलांना केंद्र सरकारच्या सनियंत्रण समितीने मंजुरी दिली आहे. त्यात आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या १० लाख ६१ हजार ५२४ घरांचा समावेश आहे. त्यासाठी केंद्र सरकारचा हिस्सा म्हणून १२ हजार १६६ कोटी ५२ लाख रुपये, तर राज्याच्या हिश्शापोटी ८ हजार १२९ कोटी ४४ लाख रुपये इतक्या निधीची आवश्यकता आहे. ३० सप्टेंबपर्यंत मंजूर केल्या जाणाऱ्या घरकुलांसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत निधी मिळणार आहे, असे सांगण्यात आले.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला एक दिवस आधी प्रारंभ :
कतारमध्ये ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला एक दिवस आधी प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यजमान कतार विरुद्ध इक्वेडर यांच्यातील सलामीचा सामना २० नोव्हेंबरला होऊ शकेल.
विश्वचषक स्पर्धेला आधीच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार २१ नोव्हेंबरला, सोमवारी सुरुवात होणार होती. दोहा येथे नेदरलँड्स आणि सेनेगल यांच्यात पहिला सामना, तर इंग्लंड-इराण यांच्यात दुसरा सामना होणार होता. अ-गटातील कतार-इक्वेडर यांच्यातील सामना त्याच दिवशी सहा तासांनी होणार होता. त्यामुळे स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा तिसऱ्या सामन्यापर्यंत लांबतो आहे. हा सामना होत असलेल्या अल बेट स्टेडियमची प्रेक्षकसंख्या ६० हजारांइतकी आहे. दोहा येथे १ एप्रिलला निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकात २८ दिवसांचे नियोजन करण्यात आले. परंतु ताज्या योजनेत २९ दिवसांचा समावेश करण्यात आला आहे.
युरोपमधील लीग स्पर्धा १३ नोव्हेंबर पर्यंत चालत असल्यामुळे ‘फिफा’ने २८ दिवसांच्या कार्यक्रमाला मान्यता दिली होती. कतार आणि इक्वेडोरमधील खूप कमी खेळाडू युरोपमध्ये खेळत असल्यामुळे यजमान कतारला उद्घाटनाचा सामना खेळण्याची संधी मिळेल.
विश्वचषकाची तिकिट विक्री यापूर्वीच झाली आहे. आता या बदलामुळे फुटबॉल रसिकांनाही प्रवासाचा कार्यक्रम बदलावा लागू शकेल. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद कतारला देण्याचा निर्णय २०१०मध्ये घेण्यात आल्यानंतर चार वर्षांनी ‘फिफा’ने स्पर्धेच्या तारखेत प्रथमच बदल केला होता. आता सात वर्षांनी पुन्हा एकदा स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल करण्याची स्थिती उद्भवली आहे.
शिवसेनेतील फूटप्रकरणी निर्णय २२ ऑगस्टला :
शिवसेनेतील फूटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुन्हा लांबणीवर गेला आह़े आता या प्रकरणाचा निर्णय १२ ऑगस्टऐवजी २२ ऑगस्टला होणार आह़े
शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ या प्रकरणावर सखोल कायदेशीर युक्तिवाद होण्याची गरज असेल तर हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत गेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांनी मांडले होते. त्यामुळे या प्रकरणी घटनापीठ स्थापन करण्यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देते, याकडे दोन्ही गटांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आह़े सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची आशा शिवसेनेला आह़े.
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नोटिशींना शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राज्यपालांनी शिंदे गट- भाजप युतीला सरकार स्थापन
करण्यासाठी दिलेले निमंत्रण, नव्या विधानसभाध्यक्षांची निवड आदी मुद्दय़ांवरून उद्धव ठाकरे यांच्या गटाने न्यायालयात धाव घेतली होती. तसेच शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणीलाही स्थगिती देण्याची विनंती उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. अशा विविध मुद्दय़ांवर सरन्यायाधीशांसमोर सुनावणी होत आहे. मात्र, दोनदा सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे सत्तासंघर्षांवरील निकाल लांबणीवर पडला आहे.