करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगातील साऱ्या यंत्रणा झगडत असल्या तरीही झपाटय़ाने होत असलेली नव्या रुग्णांची वाढ ही चिंताजनक ठरत आहे. देशभरात २४ तासांमध्ये ८९६ नव्या रुग्णांची भर पडली असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युसंख्या ११० झाली असून जगातील बळींची संख्या १ लाखांवर गेली आहे.
देशभरात शुक्रवारी सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत २१८ नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील बाधितांची संख्या ९९३ झाली असून, दादरमधील शुश्रूषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना विषाणूची बाधा झाली. धारावीतील रुग्णांची संख्या वाढून २८ झाली. इंग्रजी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या एका पत्रकाराला देखील करोनाची लागण झाली.
राज्यात शुक्रवारी करोनाच्या २१० नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील करोनाबाधितांची संख्या १५७४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण १८८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात ११७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पंजाब सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये आता एक मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज सकाळीच लॉकडाउन वाढवण्याचे संकेत दिले होते. पंजाबमध्ये Covid-19 चाी लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पंजाबमध्ये १०० पेक्षा जास्त नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनिश्चित काळासाठी लॉकडाउन ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या रणनितीवर एक उच्चस्तरीय समिती काम करत आहे. करोना व्हायरस विरोधी लढयात संपूर्ण देशासाठी १५ हजार कोटी इतका निधी पुरेसा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर उद्या होणाऱ्या बैठकीत निधीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंजाबमध्ये आज १३२ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आम्ही २८७७ नमुन्यांची तपासणी केली आहे. पंजाबची लोकसंख्या अडीचकोटी पेक्षा जास्त आहे. त्यातुलनेत चाचणीचे प्रमाण कमी आहे असे अमरिंदर सिंग म्हणाले.
करोना विषाणूमुळे बऱ्याच देशांनी प्रवासबंदीचे नियम अधिक कठोर के ल्यामुळे भारतीय युवा बुद्धिबळपटू लेऑन मेंडोसा सध्या महिनाभरापासून हंगेरीत अडकला आहे. सध्या बुडापेस्टमध्ये असलेल्या १४ वर्षीय मेंडोसाला वडील आणि पुस्तकांचा आधार मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय मास्टर (२४५२ एलो रेटिंग गुण) मेंडोसा मॉस्को येथील एरोफ्लॉट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुडापेस्टला रवाना झाला होता. ही स्पर्धा १७ मार्चला संपणार होती. पण त्यानंतर युरोपमधून विमानांचे उड्डाण होण्यासाठी निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे तो सध्या बुडापेस्टमध्येच अडकू न आहे.
‘‘आम्ही सुरक्षित असून बुडापेस्टमधील एका इमारतीत राहत आहोत. आता भारतातील टाळेबंदी कधी उठते, याची प्रतीक्षा करत आहोत. टाळेबंदी उठल्यानंतरच आम्हाला भारतात परतता येणार आहे,’’ असे गोव्याच्या मेंडोसाने सांगितले.
‘‘सध्याच्या खडतर काळात हंगेरीमध्ये राहणे जिकिरीचे बनले आहे. मात्र करोनाची भीती असतानाही आम्ही सकारात्मक आहोत. आम्हाला पैसे हस्तांतरित करण्याची जबाबदारी मित्रमंडळींनी दाखवली आहे,’’ असे त्याचे वडील लिंडन यांनी सांगितले.
आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलरची (१६५०० कोटी रुपये ) मदत करोनाचा सामना करण्यासाठी देण्याचे ठरवले आहे. या बँकेचे अध्यक्ष मासत्सुगु असाकावा यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करोना विरोधात लढण्यासाठी २.२ अब्ज डॉलर म्हणजे १६५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
असाकावा यांनी सीतारामन यांना दूरध्वनी करून भारताने करोनाविरोधात केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर
कर कपात व इतर सवलतींसह १.७ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेचेही स्वागत केले आहे. २६ मार्च रोजी सीतारामन यांनी ही १.७ लाख कोटींची मदत योजना जाहीर केली होती.
आसाकावा यांनी म्हटले की, आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे ठरवले असून त्यातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करता येईल. लघु व मध्यम उद्योगांना सावरण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. गरज वाटल्यास आशियाई विकास बँक भारताला आणखी आर्थिक मदत देईल. बँकेने याआधी भारतासह काही देशांना ६.५ अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आशियाई विकास बँकेची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. आशिया व पॅसिफिकमधील एकूण ६८ देश या बँकेचे सदस्य आहेत.
मेक्सिको वगळता इतर प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावर मतैक्य झाले आहे. ओपेक या तेल उत्पादक व निर्यातदार देशांची बैठक होऊन त्यात जुलैपर्यंत तेलाचे उत्पादन दर दिवशी १ कोटी पिंपे व वर्षअखेरीपर्यंतच्या काळात ८० लाख पिंपांनी कमी करण्यावर मतैक्य झाले. पण त्याला मेक्सिकोने मान्यता दिलेली नाही.
ओपेक व रशियासह काही मित्र देश यांची आभासी बैठक गुरुवारी झाली. तेलाचे दर दोन दशकातील नीचांकी होत आले असून घसरण रोखण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करणे गरजेचे आहे, पण मेक्सिकोने त्यासाठी मान्यता देणे गरजेचे आहे. मेक्सिकोने त्यांच्या वाटय़ाचे तेल उत्पादन दिवसाला चार लाख पिंपानी कमी करणे गरजेचे आहे.
मेक्सिकोच्या ऊर्जा मंत्री रोसिओ नहले गार्सिया यांनी सांगितले, आम्ही दिवसाला १ लाख पिंपे उत्पादन कमी करण्यास तयार आहोत. मार्चपर्यंत मेक्सिकोने १७ लाख पिंपे उत्पादन केले आहे. दिवसाला १ कोटी पिंपे तेल उत्पादन घटवण्याचा सौदी अरेबिया आणि रशियाचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे असे व्हेनेझुएलाने म्हटले आहे.
जगातील टाळेबंदीमुळे तेलाचे दर घटले असून जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. इतर देशांनी उत्पादन कमी केले तरच आम्हीही कमी करू अशी भूमिका सौदी अरेबिया व रशिया यांनी घेतली आहे.
करोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे घातक परिणाम होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असतानाही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
लॉकडाउनचे निर्बंध हटवण्यात घाई केली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील असं टेड्रोस एडहानोम याचं म्हणणं आहे. जिनिवामधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काही ठिकाणी करोनाचा फैलाव वाढत असल्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, जर योग्य काळजी घेतली नाही तर खूप मोठा धोका आहे.
“लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीदेखील इच्छा आहे. पण घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. योग्य पद्धतीने करोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील,” असं टेड्रोस एडहानोम यांनी म्हटलं आहे.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.