चालू घडामोडी आणि दिनविशेष - 10 नोव्हेंबर 2023

Date : 10 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धा : परणीत कौरची सुवर्णकमाई
  • युवा परणीत कौरने अनुभवी ज्योती सुरेखा वेन्नमला पराभवाचा धक्का देत गुरुवारी आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच परणीत आणि ज्योती यांनी महाराष्ट्राच्या आदिती स्वामीसह मिळून महिला सांघिक गटात भारताला सुवर्णयश मिळवून दिले. आदितीने प्रियांशच्या साथीने खेळताना मिश्र सांघिक गटात भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकले.
  • कम्पाऊंड प्रकारातील तिरंदाजांनी भारताला तीन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदके मिळवून दिली. दोन भारतीय तिरंदाजांमध्ये झालेल्या कम्पाऊंड प्रकारातील महिला वैयक्तिक गटाच्या अंतिम लढतीत परणीत आणि ज्योती यांच्यात १४५-१४५ अशी बरोबरी झाल्याने टायब्रेकर खेळवण्यात आला. गेल्या महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेत तिहेरी सुवर्णयश मिळवणाऱ्या ज्योतीला टायब्रेकरमध्ये आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. शूट-ऑफमध्ये परणीतने ९-८ अशी बाजी मारताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले.
  • मिश्र सांघिक गटाच्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या आदिती स्वामीने प्रियांशच्या साथीने खेळताना थायलंडच्या जोडीला १५६-१५१ अशा फरकाने पराभूत करताना सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर आदिती, ज्योती आणि परणीत यांनी महिला सांघिक गटाच्या अंतिम लढतीत चायनीज तैईच्या त्रिकुटाला २३४-२३३ असे नमवले. भारतीय त्रिकुटाने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. रीकव्‍‌र्ह प्रकारातील तिरंदाजांनी निराशा केली. एकही पुरुष तिरंदाज उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा ओलांडू शकला नाही. धीरज बोम्मादेवराला टँग चिचचुनकडून ३-७ असा, तर तरुणदीप रायला किम जे देओककडून ०-६ असा पराभव पत्करावा लागला. महिला विभागात भजन कौर आणि तिषा पुनिया उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या.
मुंबई उच्च न्यायालयाचे ‘टेलिग्राम चॅनल’; कारवाईबाबतची माहिती प्रसारित केली जाणार
  • सोशल मीडियाची वाढती व्याप्ती लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयही स्वत: अपडेट करत आहे. या शृंखलेत उच्च न्यायालयाने टेलिग्रामवर स्वत:चा चॅनल सुरू केला आहे. ८ नोव्हेंबरला याबाबत न्यायालयीन प्रशासनाने परिपत्रक काढले. उच्च न्यायालयाच्या टेलिग्राम चॅनलवर रोजच्या कारवाईबाबत माहिती प्रसारित केली जाईल. याशिवाय ज्या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी होत आहे अशा प्रकरणांची लिंकदेखील यावर पुरविली जाईल.
  • मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य खंडपीठासह नागपूर, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही चॅनलवर दिली जाईल. टेलिग्राम चॅनलवर डेटा सेव्ह करण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • टेलिग्राम चॅनलवरच सर्व अपडेट्स मिळत असल्याने उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाला वारंवार भेट देण्याची गरज भासणार नाही, असे परिपत्रकात सांगितले गेले आहे. टेलिग्राम चॅनल सुरू केल्याबरोबर सुमारे दहा हजार लोकांनी चॅनलला फॉलो केले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनास ४ डिसेंबरपासून सुरुवात; गुन्हेविषयक नव्या कायद्यांच्या मसुद्यांवर चर्चेची शक्यता
  • संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरला सुरू होऊन ते २२ डिसेंबपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. अधिवेशन काळात १९ दिवसांत १५ सत्रे होतील, असे जोशी यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे सांगितले. ‘अमृतकाळात कायदेविषयक कामकाज आणि इतर मुद्दय़ांवर चर्चा होण्याची प्रतीक्षा आहे’, असे ते म्हणाले.
  • तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध ‘प्रश्न विचारण्यासाठी पैसा’ या आरोपांबाबत नैतिकता समितीचा अहवाल याच अधिवेशनात लोकसभेत मांडला जाणार आहे. समितीने केलेली बडतर्फीची शिफारस अमलात आणण्यापूर्वी सभागृहाला हा अहवाल मंजूर करावा लागणार आहे.
  • आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडन्स अ‍ॅक्ट यांच्याऐवजी नवे कायदे करण्याचा प्रस्ताव असलेली तीन विधेयके अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. गृहविषयक स्थायी समितीने हे तिन्ही अहवाल यापूर्वीच स्वीकारले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्त्यांशी संबंधित एक विधेयक प्रलंबित आहे. ते पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आले होते. विरोधी पक्षांच्या विरोधामुळे सरकारने विशेष अधिवेशनात पाठपुरावा केला नव्हता. सीईसी व ईसी यांना मंत्रिमंडळ सचिवाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. सध्या त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा दर्जा आहे.
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानच्या समुद्रात नव्या बेटाची निर्मिती
  • एक -एक इंच जमिनीसाठी अनेक देशांमध्ये युद्ध होत असताना तीन आठवडय़ांपूर्वी जपानच्या समुद्रात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर एका छोटय़ा नव्या बेटाची निर्मिती झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे बेट फार काळ टिकणार नाही. दक्षिणेकडील इवो जिमाच्या किनारपट्टीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या मालिकेला २१ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. त्यानंतर १० दिवसांत ज्वालामुखीची राख आणि खडक येथील उथळ समुद्रतळावर गोळा झाले. त्याचे टोक समुद्राच्या पृष्ठभागावर आहे.
  • जपानच्या हवामानशास्त्र संस्थेच्या ज्वालामुखी विभागातील विश्लेषक युजी उसुई यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीस सुमारे १०० मीटर व्यासाचे आणि समुद्रापासून २० मीटर उंचीचे नवीन बेट तयार झाले आहे.
  • इवो जिमाजवळ ज्वालामुखीची सक्रियता वाढली आहे. अलीकडच्या काही वर्षांत समुद्राखाली अनेक उद्रेक झाले आहेत. परंतु नवीन बेटाची निर्मिती ही एक महत्त्वाची घटना आहे, असे उसुई यांनी सांगितले. लाटांच्या माऱ्यामुळे नवीन बेट आता काहीसे आकुंचन पावत आहे. तज्ज्ञ येथील परिस्थितीचे विश्लेषण करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
इस्रायलकडून हमासच्या मिसाईल मॅनचा खात्मा
  • इस्रायल सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या अँटी टँक मिसाईल युनिटच्या प्रमुखाचा खात्मा केला. इब्राहिम अबू मघसिब असं हमासच्या सेंट्रल कॅम्प ब्रिगेडमधील प्रमुखाचं नाव आहे. त्याला हमासचा मिसाईल मॅन म्हणूनही ओळखलं जात होतं.
  • इब्राहिम अबू मघसिबने याआधी इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्र हल्ल्यांचं नेतृत्व केलं होतं. दरम्यान, इस्रायलच्या सैन्याने जमिनीवरून हमासवर हल्ले चढवलेच. याशिवाय इस्रायच्या नौदलाने हमासच्या अँटी टँक मिसाईल पोस्टही उद्ध्वस्त केल्या.

‘जी ७’ राष्ट्रांचा इस्रायलवर ‘मानवतावादी युद्धविरामा’साठी दबाव

  • इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये हवाई आणि जमिनीवरून हल्ल्यांची तीव्रता वाढवल्यानंतर तेथील पॅलेस्टिनींनी स्थलांतर करण्याचा वेग वाढला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदतीसाठी समन्वय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी जवळपास १५ हजार जणांनी उत्तर गाझामधून स्थलांतर केले. सोमवारी पाच हजार, तर रविवारी दोन हजार लोकांनी स्थलांतर केले होते.

‘जी ७’ देशांची एकत्रित भूमिका

  • ‘जी ७’ या श्रीमंत औद्योगिक देशांनी सोमवारी युद्धाबद्दल एकत्रित भूमिका जाहीर केली. युद्धग्रस्त गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांपर्यंत विनाअडथळा अन्न, पाणी, औषधे आणि इंधन पोहोचते केले जावे आणि ‘मानवतावादी युद्धविराम’ घेण्यात यावा असे आवाहन जी७ कडून करण्यात आले. यामुळे इस्रायलवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

रुग्णालयातील इंधन संपण्याची भीती

  • गाझामधील अल कुद्स या रुग्णालयातील इंधन पुरवठा बुधवारी संपेल, असा इशारा पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट या मदतसंस्थेने दिला. इस्रायलने गाझामध्ये मदत सामग्री पोहोचती करण्यास परवानगी दिली असली तरी इंधनाचा पुरवठा मात्र रोखून धरला आहे.

 

एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! टेस्ला कंपनीचे ३.९५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकले :
  • ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचा मालकीहक्क मिळवलेल्या अब्जाधीश एलॉन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे ट्विटर खरेदीसाठी त्यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स मोजलेले असताना दुसरीकडे त्यांनी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या टेस्ला या कंपनीचे तब्बल ३.९५ अब्ज डॉलर्स किमतीचे १९.५ दशलक्ष शेअर्स विकले आहेत.

  • एलॉन मस्क यांनी त्यांच्या टेस्ला या कारनिर्मिती करणाऱ्या कंपनीचे तब्बल १९.५ दशलक्ष शेअर्स विकले आहेत. या शेअर्सची किंमत ३.९५ अब्ज डॉलर्स आहे. मस्क यांच्याकडे टेस्ला कंपनीचे सर्वाधिक शेअर्स आहेत. मात्र काही शेअर्स विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटले. या निर्णयांतर मस्क यांची संपत्ती २०० अब्ज डॉलर्सच्या खाली घसरली आहे.

  • मालकीहक्क मिळवल्यापासून मस्क ट्विटरमध्ये जास्त व्यस्त आहेत, अशी धारणा भागधारकांची झाली आहे. याच कारणामुळे टेस्ला कंपनीचे शेअर्सही पडले आहेत. भागधारक टेस्लाचे शेअर्स विकत आहेत. टेस्लाचा शेअर मागील ५२ आठवड्यातील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. संपत्तीत घट झालेली असली तरी जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क सर्वोच्च स्थानावर आहेत.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ :
  • न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. धनंजय चंद्रचूड आगामी दोन वर्षे सरन्यायाधीश म्हणून न्यायदानाचे काम करतील. १० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या पदावरून निवृत्त होतील. धनंजय चंद्रचूड यांचे वडीलदेखील देशाचे सरन्यायाधीश होते. धनंजय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांचे पूत्र आहेत. वाय व्ही चंद्रचूड यांनी सात वर्षे देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायदान केलेले आहे.

  • देशाचे मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ संपल्यानंतर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. आज (९ ऑक्टोबर) राष्ट्रपतीभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. धनंजय चंद्रचूड यांना १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी याआधी अयोध्येतील बाबरी मशीद तसेच गोपनियतेचा अधिकार यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायदानाचे काम केलेले आहे. 

  • याआधी धनंजय चंद्रचूड यांनी बॉम्बे उच्च न्यायालय तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेली आहे. तसेच अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापन केलेले आहे.

ऐन विश्वचषकाच्या धामधुमीत ठरले आयपीएल २०२३च्या लिलावाचे स्थळ आणि तारीख, जाणून घ्या :
  • टी२० विश्वचषक २०२२ चे बाद फेरीचे सामने सुरु होत आहेत. बुधवारी पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यात तर गुरुवारी दुसरा उपांत्य सामना भारत-इंग्लंड यांच्यात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टी२० विश्वचषकाकडे आहेत, पण त्याच दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग २०२३ साठीची खलबतेही तीव्र होत आहेत.

  • स्पोर्ट्स स्टारच्या मते, आयपीएल २०२३ चा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. त्याच वेळी, ही ग्रँड लीग मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. जगातील अनेक देशांचे स्टार खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसत आहेत.

  • या आयपीएल लिलावासाठी सर्व फ्रँचायझींच्या मालकांनी रक्कम ही वाढवल्या जाऊ लागल्या आहेत. वास्तविक, सर्व संघांचे एकूण बजेट ९० कोटींवरून ९५ कोटींपर्यंत वाढू शकते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात आयपीएलसाठी मेगा लिलाव झाला होता, त्यावेळी सर्व संघांनी एकूण २०४ खेळाडूंना खरेदी केले होते.

  • आयपीएल २०२२ प्रमाणेच आयपीएल २०२३ मध्ये एकूण १० संघ खेळतील. आता १५ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक संघाला ते त्यांच्या संघातून कोणते खेळाडू सोडत आहेत याची माहिती द्यावी लागेल. जे खेळाडू सोडले जातील त्यांना लिलावात जाण्याची संधी मिळणार आहे.

झेलेन्स्की यांची रशियाशी सशर्त चर्चेची तयारी :
  • रशियासोबत आमच्या अटींवर शांतता चर्चा होऊ शकते, अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी मांडली. आतापर्यंत व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत बोलण्यास अजिबात तयार नसलेल्या झेलेन्स्कींनी एक पाऊल मागे घेतले आहे. अर्थात त्यांच्या अटी पुतिन मान्य करणार का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

  • जागतिक समुदायाने पुतिन यांना खऱ्याखुऱ्या शांतता चर्चेसाठी तयार करावे, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले. रशियाने हल्ला केल्यापासून ते ‘रशियाशी चर्चा केवळ अशक्य आहे,’ असेच सांगत होते. मात्र अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमुळे चित्र काहीसे बदलले आहे.

  • अमेरिकेचे सेनेट आणि हाऊसमध्ये रिपब्लिकन पार्टीचे प्राबल्य झाल्यास युक्रेनला आतासारखी आर्थिक आणि लष्करी मदत सुरू राहणे अवघड असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी आपली भाषा बदलली असली तरी त्यांनी घातलेल्या अटी या अत्यंत जाचक असल्यामुळे पुतिन तयार होण्याची शक्यता कमी आहे.

 झेलेन्स्कींच्या अटी

  • रशियाने बळकावलेला प्रांत परत करावा
  • युद्धात झालेल्या संहाराची नुकसान भरपाई द्यावी
  • रशियाने केलेल्या युद्धगुन्ह्यांचे खटले सुरू करावेत
भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या चिन्हाचे अनावरण :
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये जी-२० समूहाचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही अभिमानाची आणि प्रचंड संधी उपलब्ध करून देणारी बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या हस्ते भारताच्या अध्यक्षपदाचे चिन्ह, संकल्पना (थिम) आणि संकेतस्थळाचे अनावरण झाले.

  • ‘स्वातंत्र्यानंतर भारताच्या विकासात सर्व सरकारे आणि नागरिकांचे आपापल्या परीने योगदान राहिले आहे. जेव्हा लोकशाही ही संस्कृती होते, तेव्हा संघर्षांला विराम देता येऊ शकतो, हे भारत जगाला दाखवून देऊ शकतो,’ असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या अध्यक्षपदाचे चिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळ यातून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. जी-२० अध्यक्षपद भारताकडे येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

  • जगातील सर्वात मोठय़ा विकसित आणि विकसनशील देशांचा जी-२० हा समूह आहे. जगाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ८५ टक्के आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ७५ टक्के हिस्सा या २० देशांमध्ये विभागला गेला आहे. समूहाचे अध्यक्षपद हे फिरते असते. १५ आणि १६ नोव्हेंबरला बालीमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये इंडोनेशियाकडून भारताला अध्यक्षपद बहाल केले जाईल. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३पर्यंत भारताकडे अध्यक्षपद असेल. पुढली जी-२० परिषद दिल्लीमध्ये होईल.

  • प्रगती आणि प्रकृती (निसर्ग) हे एकत्र नांदू शकतात. त्यातून कायमस्वरूपी विकास साधता येईल.

१० नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.