चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० नोव्हेंबर २०२१

Date : 10 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धा - राहीला रौप्यपदक :
  • भारताची नेमबाज राही सरनोबतने बंदुकीमध्ये झालेल्या बिघाडानंतरही मंगळवारी प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धेमधील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले.

  • राहीने अंतिम फेरीत ३१ गुण मिळवले. परंतु बंदुकीमधील बिघाडामुळे अखेरच्या दोन मालिकांमधील काही महत्त्वाचे नेम चुकले. ही समस्या येण्याआधी राहीने उत्तम कामगिरी करीत सलग तीन वेळा लक्ष्यभेद केला.  जर्मनीच्या व्हेनेकॅम्पने ३३ गुणांसह सुवर्ण, तर मॅथिल्डे लॅमोलेने २७ गुणांसह कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरी गाठणारी भारताची अन्य स्पर्धक मनू भाकरला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

  • मनूला मिश्र गटात सुवर्ण - मनूने टर्कीच्या ओझगूर वर्लिकच्या साथीने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र गटात सुवर्णपदकाची नोंद केली. मनू-ओझगूर जोडीने शियाओ (चीन) आणि पीटर ओलीस्क (ईस्पोनिया) जोडीचा ९-७ असा पराभव केला.

महाराष्ट्राने गाठला १० कोटी लसीकरणाचा टप्पा - आरोग्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन :
  • राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. तर, दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण देखील जोरात सुरू असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्राने आज करोना लसीकरणात दहा कोटीचा टप्पा देखील गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

  • “महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो. ” असं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

  • राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

ऑटोमध्ये ड्रायव्हर सीटवर बसलेल्या प्रवाशाचा अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही: हायकोर्टाचा निर्णय :
  • तीन जण बसू शकणाऱ्या ऑटोत सात-आठ जण कोंबून बसवल्याचं चित्र तुम्ही पाहिलंच असेल. एकट्या ड्रायव्हर सीटवरच दोन जण जास्तीचे बसवले जातात. ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये हे चित्र मोठ्या प्रमाणात दिसतं. मात्र केरळमध्ये आता ड्रायव्हर सीटवर प्रवाशाला बसवता येणार नाही. याचं कारण म्हणजे बसवल्यानंतर जर ऑटोचा अपघात झाला तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.

  • तीन चाकी मालवाहू गाडीमध्ये किंवा प्रवासी वाहनात वाहनाचा मालक अथवा प्रवाशाने चालकासोबत सीट शेअर करू नये, ही कृती विमा पॉलिसीच्या अटींचे उल्लंघन आहे, असे मत केरळ हायकोर्टाने नोंदवले आहे.

  • “जर विम्याच्या दावेकर्‍याने वाहनाचा मालक म्हणून वाहनात प्रवास केला नसेल, तर त्याला विम्याच्या पॉलिसीमध्ये संरक्षण दिले जाणार नाही. याशिवाय तीन चाकी मालवाहू गाडीमध्ये, ड्रायव्हरसीटवर त्याच्यासोबत इतर कोणीही बसू शकत नाही.

  • प्रवासी किंवा वाहनाचा मालक या नात्याने इतर कोणत्याही व्यक्तीने ड्रायव्हरची सीट शेअर करू नये. असं करणारी कोणतीही कृती विमा धोरणाच्या अटींचे उल्लंघन आहे,” असं एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ए. बादरुदीन यांनी म्हटलं. तसेच त्यांनी मोटार वाहन न्यायाधिकरणाने विमा कंपनीवर अशा निरुपयोगी प्रवाशाची भरपाई करण्यासाठी केलेली मागणी पूर्ण केली जाणार नसल्याचं सांगितलं.   

ब्रिटनमधील मान्यताप्राप्त लशींच्या यादीत आता कोव्हॅक्सिनही :
  • भारताने कोविड १९ प्रतिबंधासाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लशीचा समावेश ब्रिटनमधील संमत लशींच्या यादीत येत्या २२ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. याचा अर्थ भारतातून जे लोक कोव्हॅक्सिनच्या मात्रा घेऊन आले असतील त्यांना ब्रिटनमध्ये आल्यानंतर विलगीकरणात रहावे लागणार नाही.

  • जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी दिल्यानंतर ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे. कोव्हॅक्सिन लस भारतात वापरलेल्या लशीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविशिल्ड ही लस भारतात सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केली होती त्यात ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी तंत्रज्ञान हस्तांतर केले होते. ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अलेक्स इलिस यांनी सांगितले की, भारतीयांसाठी एक चांगली बातमी म्हणजे ब्रिटन येत्या २२ नोव्हेंबरला कोव्हॅक्सिन या लशीचा संमत लशींच्या यादीत समावेश करीत आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेने या लशीला आधीच मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ही लसही कोविशिल्डच्या रांगेत जाऊन बसली आहे. कोव्हॅक्सिन लशीची मान्यता २२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजेपासून अमलात येईल. कोव्हॅक्सिन शिवाय चीनच्या सिनोव्हॅक व सिनोफार्म या लशींना मंजुरी देण्यात आली असून या दोन्ही लशींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली असून या लशी घेतलेल्या व्यक्तींना ब्रिटनमध्ये येणे शक्य होणार आहे.

  • कारण या लशींनाही मान्यता मिळणार आहे . संयुक्त अरब अमिरात व मलेशियातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या लशी घेतलेल्या व्यक्तींना कुठल्याही चाचणीला सामोरे जावे लागणार नाही व स्वविलगीकरणातूनही सूट देण्यात येणार आहे.

१० नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.