चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० नोव्हेंबर २०२०

Date : 10 November, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी- जिनपिंग यांचा आज संवाद :
  • भारत व चीन यांच्यादरम्यान गेल्या मे महिन्यापासून पूर्व लडाखच्या सीमेवर तणाव उद्भवल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा मंगळवारी प्रथमच संवाद होणार आहे. शांघाय सहकार्य परिषदेच्या परिषदेनिमित्त एका आभासी संवादात हे दोघे सहभागी होणार आहेत.

  • याशिवाय, ब्रिक्स बैठकीनिमित्त १७ नोव्हेंबरला आणि जी-२० परिषदेसाठी २१-२२ नोव्हेंबरलाही मोदी हे जिनपिंग यांच्यासोबत एकाच आभासी व्यासपीठावर येतील. गेल्या ६ वर्षांत हे दोन नेते किमान १८ वेळा भेटले आहेत. सौदी अरेबियाने करोना महासाथीच्या प्रश्नावर गेल्या २६ मार्चला जी-२०ची आभासी बैठक आयोजित केली होती, त्यावेळी हे दोघे एका व्यासपीठावर आले होते.

  • भारत व चीन यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, एससीओ बैठकीत सीमेवरील तणावाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता अतिशय अंधुक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिवाळीत स्थानिक उत्पादनेच वापरा- पंतप्रधान :
  • दिवाळीत लोकांनी स्थानिक उत्पादनेच वापरून ‘व्होकल फॉर लोकल’ या तत्त्वाचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले आहे.

  • देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी स्थानिक उत्पादने वापरणे गरजेचे आहे,असे आवाहन करताना त्यांनी सांगितले,की ‘व्होकल फॉर  लोकल’ हा मूलमंत्र आचरणात आणण्यासाठी स्थानिक उत्पादनेच खरेदी करावीत. परदेशी उत्पादने खरेदी करू नयेत, वाराणसीतील लोकांनीही खरेदी करताना स्थानिक उत्पादनेच खरेदी करावी.

  • वाराणसी येथील  ७०० कोटींच्या १९ विकास  प्रकल्पांचे उद्घाटन त्यांनी केले. मोदी यांनी सांगितले की,  दिवाळीच्या निमित्ताने लोकांनी स्थानिक  उत्पादनांना संधी द्यावी, कारण या काळात मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत असते.

  • तुम्ही स्थानिक उत्पादने खरेदी करून त्याचा अभिमान बाळगा. त्यामुळे स्थानिक व देशी उत्पादनांचा दर्जा चांगला असल्याचा संदेश इतरांनाही जाईल. यात स्थानिक ओळख तर निर्माण होईलच, त्याशिवाय सगळ्यांची दिवाळीही प्रकाशमान होईल.

ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि दिवाळी बोनस जाहीर :
  • जळगावमध्ये एसटी कंडक्टरने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाकरे सरकारने लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एक महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे. त्यात या महिन्याचा पगार तासाभरात केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी पत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पत्रक जारी केले आहे.

  • आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याने पत्रात काय म्हटले होते - ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाचा विक्रम :
  • अमेरिकेत अजूनही मतमोजणी सुरू असून २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत गेल्या पन्नास वर्षांतील उच्चांकी मतदान झाले आहे. यापूर्वी २००८ मध्ये बराक ओबामा निवडून आले त्या वेळी मोठे मतदान झाले होते. या वेळी अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात गेलेला कौल मोठा आहे.

  • रविवारी जी आकडेवारी मिळाली ती पाहता मतदानास पात्र असलेल्यांपैकी ६२ टक्के लोकांनी मतदान केले.  २००८ पेक्षा यावेळचे मतदान ०.४ टक्क्य़ांनी अधिक झाले आहे. २००८ मध्ये ओबामा यांच्या रूपाने पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष देशाला मिळाला होता. मतदान जास्त झाले असले तरी त्याबरोबर देशाची लोकसंख्याही वाढलेली आहे, हा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. आतापर्यंत १४ कोटी ८० लाख मतांची मोजणी झाली असून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांना ७ कोटी ५० लाख मते मिळाली आहे.

  • ट्रम्प यांना सात कोटी मते मिळाली आहेत. पराभूत उमेदवाराला इतकी मते कधी मिळाली नव्हती हेही वास्तव सामोरे आले आहे. किमान १६ कोटी मतदान झाल्याचा अंदाज असून यानंतरही आकडे बदलण्याची शक्यता आहे. जेव्हा राज्ये मतदानाला वेळ वाढवून देतात तेव्हा मतदानावर त्याचा परिणाम होतो हे स्पष्ट झाले, कारण यावर्षी अनेक राज्यांनी मतदानाची वेळ वाढवली होती. ट्रम्प यांनी मतदानाच्या वाढीव वेळेला विरोध करून या वेळेतील मते बाद करण्यासाठी न्यायालयात दावे केले होते. असोसिएटेड प्रेस व युनायटेड स्टेटस इलेक्शन प्रोजेक्ट यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार १९६८ नंतर प्रथमच निवडणुकीचा उच्चांक झाला आहे.  तज्ज्ञांच्या मते विसाव्या शतकात एवढे मतदान कधी झाले नव्हते.

१० नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.