चालू घडामोडी आणि दिनविशेष - 10 मे 2023

Date : 10 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
युजर्ससाठी आनंदाची बातमी! Twitter लवकरच आणणार ‘हे’ जबरदस्त फिचर
  • Twitter ही एक सोशल मीडिया साईट आहे. याचे सीईओ ही एलॉन मस्क आहेत. मागच्या वर्षी मास्क यांनी ट्विटरची खरेदी केली होती. त्यांतर त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. यापुढेही अनेक बदल होण्याची शक्यता आहे. मग ते कर्मचाऱ्यांची कपातीचा निर्णय असो, किंवा blue tick हटवण्याचा निर्णय असो. असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. आतासुद्धा ट्विटर वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ट्विटर लवकरच वापरकर्त्यांसाठी Voice आणि Video चॅट चे फीचर आणणार आहे.
  • ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्वीट करत ही घोषणा केली की प्लॅटफॉर्म लवकरच वापरकर्त्यांसाठी व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटिंगचे फीचर आणणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल नंबर शेअर न करता सुद्धा ट्विटरवर कोणाशीही संवाद साधता येणार आहे.
  • तसेच एलॉन मस्क यांनी ट्विटरवर काही प्रमुख फीचर्स जोडण्याची घोषणा केली.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ही स्पष्ट केले, या नवीन फीचरचा वापर करून वापरकर्ते ट्विटरवरील इतर कोणत्याही वापरकर्त्याला व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहे.
  • मस्क यांनी सांगितले एनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेज (DMs) व्हर्जन १.० उद्या रिलीज होणार आहे. हे एन्क्रिप्शन इतके मजबूत आहे की त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली तरी तो वापरकर्त्याच्या डीएमचा कंटेंट पाहू शकणार नाही. ट्वीटरला सुपर App बनवण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. हे नवीन व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटचे फीचर त्यांना त्यांच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाईल अशी अपेक्षा आहे.
  • ट्वीटर लवकरच Inactive अकाउंट्स बंद करणार असल्याची माहिती काल मस्क यांनी दिली. ट्वीटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली. वर्षानुवर्षे निष्क्रिय असलेली अकाउंट्स बंद केली जाणार आहेत. दरम्यान ट्वीटरवर अशी हजारो अकाउंट्स आहेत , ज्यावर कोणतीही पोस्ट शेअर केली जात नाही.
पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
  • ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ८ मे रोजी सोमवारी या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले, तर त्याच्या दोन दिवसांपूर्वी तमिळनाडूमध्येही चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात आलं. त्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटावरील बंदी हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
  • ‘द केरळ स्टोरी’च्या निर्मात्यांनी पश्चिम बंगालमधील चित्रपटावरील बंदी हटवण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निर्मात्यांनी त्यांच्या याचिकेद्वारे तमिळनाडू सरकारला राज्यभरातील चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. तामिळनाडूतील मल्टीप्लेक्स संघटनांनी चित्रपटगृहात हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. पण काही ठिकाणी हा चित्रपट दाखवला जात आहे, त्यांना सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी निर्मात्यांची मागणी आहे.
  • ‘द केरला स्टोरी’ ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, “आधी ते काश्मीर फाईल्स घेऊन आले होते, आता ही केरळची कहाणी आहे आणि नंतर बंगाल फाईल्सची योजना आखत आहेत. भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहे? केरला स्टोरी हा चित्रपट चुकीच्या तथ्यांसह केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.”
  • दरम्यान, चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांनी बंदी हटवण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालय काय निर्णय देईल, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मंदीचे सावट आणखी गडद; आता Linkedin करणार तब्बल ‘इतकी’ नोकरकपात
  • सध्या जगभरामध्ये जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये Amazon , Google, Meta , Microsoft यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अनेक कंपन्यांनी तर दोनवेळा कर्मचारी कपात केली आहे. आता या कंपन्यांमध्ये LinkedIn कंपनीचा देखील समावेश झाला आहे. LinkedIn कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
  • LinkedIn कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३.५ टक्के म्हणजेच ७१६ कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. तसेच कंपनी चीन-केंद्रित जॉब अ‍ॅप्लिकेशन देखील बंद करणार आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन आणि मागणीत झालेली घट यामुळे कंपनीने ही पाऊल उचलले आहे. ही कंपनी मायक्रोसॉफ्टच्या मालकीची कंपनी आहे. लिंकडिनमध्ये सुमारे २०,००० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये कंपनीचा महसूल वाढला असला तरी लिंकडिन कंपनी कर्मचारी कपात केलेल्या कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे.
  • LinkedIn चे सीईओ रायन रोस्लान्स्की यांनी याबद्दल आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणाले, ”कंपनीचे कामकाज अधिक चांगले करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कंपनीला लवकर निर्णय घेण्यास मदत होईल.” कंपनीच्या सेल्स, ऑपरेशन अणि सपोर्ट टीममधील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.
  • फेसबुकची मूळ कंपनी असणाऱ्या Meta ने २१,००० तर गुगलने १२,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तसेच Amazon , Meesho , Sharechat , Microsoft यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खुली निवड चाचणी? कुस्तीसाठी ‘आयओए’ नियुक्त हंगामी समिती निर्णय घेणार
  • आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघाची निवड चाचणी खुल्या पद्धतीने होण्याची शक्यता आहे. सरकारच्या आदेशानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नियुक्त केलेली निवड चाचणी या संदर्भात निर्णय घेणार आहे. सध्या ही समिती खुली निवड चाचणी घेण्याचा विचार करत आहे. करोनामुळे गेल्या वर्षी लांबणीवर पडलेली आशियाई क्रीडा स्पर्धा या वर्षी २३ सप्टेंबरपासून होणार आहेत. त्यासाठी जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात कुस्ती निवड चाचणी स्पर्धा अपेक्षित आहेत. या आठवडय़ात या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
  • भारतीय कुस्ती महासंघाच्या नियमानुसार, गेल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा, राष्ट्रीय मानांकन, फेडरेशन चषक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंसह गुणवान कुमार कुस्तीगिरांना चाचणीसाठी बोलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता बदलत्या चित्रानुसार हंगामी समिती सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा यांनी खुल्या निवड चाचणीची तयारी ठेवली आहे. यामध्ये महासंघाशी संलग्न सर्व राज्य संघटना आपल्या पसंतीचे मल्ल चाचणीसाठी पाठवू शकतील. अर्थात, यावर अजून निर्णय झालेला नाही. प्रशिक्षक आणि तज्ज्ञ पंचांच्या मते चाचणीसाठी वेळ कमी आहे आणि या कमी वेळेत खुली चाचणी पूर्ण होऊ शकणार नाही.
  • खुली निवड चाचणी घेतल्यास महासंघाशी संलग्न २५ राज्य संघटना असून, त्यांनी तीन प्रकारांतील (पुरुष ग्रीको-रोमन, फ्री-स्टाइल व महिला) १० वजनी गटात आपल्या पसंतीचे मल्ल पाठवले, तर सहभागी स्पर्धकांची संख्या वाढणार आहे. अशा वेळी निवड चाचणी वेळेत पार पडणे कठीण आहे असे मत प्रशिक्षकांनी मांडले. या संदर्भात एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, १७ आणि २३ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी १७ ते १९ मे या कालावधीत निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १० ते १८ जूनदरम्यान बिश्केक येथे होईल. कुमार राष्ट्रीय शिबिराची घोषणाही लवकरच अपेक्षित आहे.

 

बांगलादेश सीमेवरील स्थितीचा गृहमंत्र्यांकडून आढावा :
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आसाममधील मानकाचर सेक्टरमधून आसाम- बांगलादेश सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. सोमवारी सकाळी हेलिकॉप्टरने कामाख्या टेकडीच्या शिखरावर उतरलेले शहा यांनी मानकाचरला जाण्यापूर्वी कामाख्या देवीच्या मंदिरात प्रार्थना केली.

  • सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.गृहमंत्र्यांनी बीएसएफच्या अधिकाऱ्यांसोबत या भेटीनिमित्त उभारलेल्या टेहळणी मनोऱ्यावरून सीमेचे निरीक्षण केले. या भागात जमलेल्या स्थानिक गावकऱ्यांशी ते संवाद साधत असल्याचेही दिसत होते.

  • भारत व बांगलादेश या दोन्ही देशांच्या सीमेवरील कर्मचाऱ्यांनी या वेळी ध्वजसंचलन केले.

  • घुसखोरी, पशूंची तस्करी, सीमेवरील कुंपण आणि नदीकाठावरील गस्त यांच्याशी संबंधित मुद्दय़ांवर सहा हे सदरटिला तळावर बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता असल्याचे बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले. आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री सोमवार व मंगळवारी अनेक कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत.

न्या. धुलिया, न्या. पारडीवाला यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ :
  • गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधांशु धुलिया व गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जमशेद पारडीवाला यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या विस्तारित इमारत परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी या दोन्ही न्यायमूर्तीना पदाची शपथ दिली.

  • न्या. धुलिया व न्या. पारडीवाला यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयाची ३४ न्यायाधीशांची संपूर्ण क्षमता पुन्हा बहाल झाली आहे. अर्थात, न्या. विनीत सरन हे १० मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने ही क्षमता पुन्हा ३३ वर येईल.

  • न्या. पारडीवाला हे पुढे दोन वर्षांहून अधिक कालावधीसाठी देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

  • उत्तराखंडमधून पदोन्नत होणारे दुसरे न्यायाधीश असलेले न्या. धुलिया यांचा कार्यकाळ तीन वर्षांहून थोडा अधिक राहणार आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने   उच्च न्यायालयाच्या या दोन न्यायमूर्तीच्या नावांची शिफारस केल्यानंतर केंद्रीय विधि मंत्रालयाने गेल्या शनिवारी त्यांच्या फायलींवर तात्काळ प्रक्रिया केली व त्यानुसार त्याच दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यालयातून  नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. आणखी दोन न्यायाधीशांच्या नियुक्तीसोबतच, सरन्यायाधीशांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या ११ न्यायमूर्तीना शपथ दिली असून, हा एक प्रकारचा विक्रम आहे.

पाश्चात्य धोरणांमुळेच युक्रेनमध्ये कारवाई-पुतिन :
  • ‘‘पाश्चात्य देशांच्या चुकीच्या धोरणांमुळेच रशियाला युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करावी लागली,’’ असा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. नाझींवर दुसऱ्या महायुद्धात मिळवलेल्या विजयानिमित्त आयोजित केलेल्या लष्करी संचलनानिमित्त ते बोलत होते. यावेळी त्यांनी दुसऱ्या महायुद्धात रशियाच्या लाल सैन्याने नाझी सैन्याशी केलेल्या संघर्षांची तुलना सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या लष्करी मोहिमेशी केली.

  • युक्रेनमध्ये रशियाने केलेली लष्करी कारवाई अगदी योग्य वेळी केली असून, ती अत्यंत गरजेची होती, असा दावा पुतिन यांनी केला. ते म्हणाले, की अगदी सीमेजवळ रशियाला धोका पोहोचेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हा धोका दिवसेंदिवस वाढतच होता.  

  • रशियाने ही आगळीक वेळीच रोखली. एखाद्या सार्वभौम, बलाढय़ आणि स्वतंत्र राष्ट्राकडून अपेक्षित असलेल्या कृतिनुसार आम्ही कारवाई केली. रशियानजीक होणारा नाटो संघटनेचा विस्तार रोखावा आणि सुरक्षेची हमी देण्याच्या रशियाच्या मागणीकडे पाश्चात्य देशांनी दुर्लक्ष केल्याने रशियाला युक्रेनविरुद्ध कारवाई करण्याव्यतिरिक्त अन्य पर्यायच उरला नाही. रशियाचे सैन्य आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी युक्रेनमध्ये लढत आहे.

  • रशियाच्या  हुतात्मा  सैनिकांना त्यांनी मौन राखून श्रद्धांजली वाहिली. संचलनात भाग घेतलेल्या काही सैन्यपथकांनी युक्रेनमधील कारवाईत भाग घेतल्याचीही पुतिन यांनी आवर्जून नमूद केले.

भारतीय पालकांचा सरकारी नाही तर खासगी शाळांवर विश्वास; देशात ५१ हजार सरकारी शाळांना टाळे :
  • शालेय शिक्षण विभागाच्या (UDISE) प्लसच्या अहवालावरून एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. २०१८-१९ वर्षात देशभरातील सरकारी शाळांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर खासगी शाळांची संख्या सुमारे ३.६ टक्क्यांनी वाढली आहे.

  • सरकारी शाळांची संख्या २०१८-१९ मध्ये १ लाख ८३ हजार ६७८ होती ती २०१९-२० मध्ये १ लाख ३२ हजार ५७० वर आली आहे. म्हणजेच देशभरात ५१ हजार १०८ सरकारी शाळा कमी झाल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही आकडेवारी करोनाच्या आधीची आहे.

  • देशात खासगी शाळांमध्ये वाढ - मात्र, या काळात खासगी शाळांची संख्या वाढली आहे. देशभरातील खाजगी शाळांची संख्या ३ लाख २५ हजार ७६० वरून ३ लाख ३७ हजार ४९९ पर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात UDISE Plus ने २०२०-२१ वर्षातील शाळांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध प्रसिद्ध केला होता. त्यात सरकारी शाळांच्या संख्येत आणखी घट झाल्याचे दिसून आले आहे.

  • सरकारी शाळांची संख्या १ लाख ३२ हजार ५७० वरून १ लाख ३२ हजार ४९ वर आली आहे. म्हणजे ५२१ सरकारी शाळा पुन्हा कमी झाल्या आहेत. कोरोनामुळे या शाळांमध्ये घट झाल्याचे सांगितले जात आहे.

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा, संपूर्ण देशात संचारबंदी लागू :
  • भारताच्या शेजारील श्रीलंका देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. १९४८ साली ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून श्रीलंका सध्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाला तोंड देत आहे. श्रीलंकेत सध्या सुरु असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी राजपक्षे यांनी जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

  • राजपक्षे यांनी ट्विट करत आवाहन केले आहे की, “श्रीलंकेत भावनांचा उद्रेक वाढत असल्याने मी सर्वसामान्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करतो. लक्षात ठेवा की हिंसाचाराने फक्त हिंसाचार पसरेल. आर्थिक संकट दूर करण्यासाठी ठोस समाधानाची गरज आहे. ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे.”

  • संकटग्रस्त सरकारचे नेतृत्व करणारे राष्ट्रापती गोटाबाया राजपक्षे यांना सध्याच्या राजकीय गोंधळाचे निराकरण आणि अंतरिम प्रशासन तयार करण्यासाठी महिंदाचा राजीनामा हवा होता. खासदार मैत्रीपाला सिरिसेना यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सांगितले होते की, “राष्ट्रपतींनी आपल्या मोठ्या भावाला पंतप्रधानपदापासून दूर करण्यास सहमती दर्शविली आहे. तसेच नवीन पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या नावासाठी राष्ट्रीय परिषद नियुक्त केली जाईल.

  • ” ७६ वर्षीय महिंद्रा राजपक्षे यांच्यावर त्यांच्या स्वत:च्या श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) पक्षाकडून पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव होता. मात्र, त्यांनी आपल्या समर्थकांना एकत्र करत दबाव आणला होता. अखेर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

10 मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.