चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० मे २०२१

Date : 10 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथ ग्रहण सोहळा, ४३ मंत्र्यांचा समावेश :
  • पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपाला धुळ चारत मोठा विजय मिळवला. ममता यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

  • दरम्यान, आज (सोमवार) ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथ ग्रहण सोहळा आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात ४३ मंत्री सामील होणार आहेत. ममता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी आपला तिसरा कार्यकाळ सुरू करतील. या मंत्रीमंडळात २५ जुने चेहरे आणि १८ नवीन सदस्य असतील. यातील, ४३ पैकी नऊ राज्यमंत्री असतील. शपथविधी सकाळी १०:४५ वाजता राजभवनात होईल. राज्यपाल जगदीप धनकर सर्व मंत्र्यांना शपथ देतील.

  • या सोहळ्यात अमित मित्रासह दोन मंत्री आभासी शपथ घेतील. मित्रा अस्वस्थ आहेत आणि ब्रात्या बोस कोविड -१९ संसर्गापासून बरे होत आहेत. सुब्रत मुखर्जी, पार्थ चटर्जी, फरहाद हकीम, अरुप विश्वास, सुजित बोस, चंद्रिमा भट्टाचार्य आणि शशी पंजा पुन्हा मंत्री होणार आहेत.

  • तसेच मानस भुयान हे राज्यसभेचे खासदार होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुका लढवल्या. तेही आता मंत्रिमंडळात असतील. पूर्व मिदनापूरचा अखिल गिरी आणि हावडाचे अरुप रॉय यांनाही संधी मिळणार आहे. पहिल्यांदा संथाली सिनेमाचा स्टार बीरबहा हंसदा हे राज्यमंत्री होणार आहेत. माजी आयपीएस अधिकारी हुमायूं कबीर यांचे नावही मंत्र्यांच्या यादीत आहे.

सौदी अरेबियाचे भारत-पाकिस्तानला काश्मीर प्रश्नी संवादाचे आवाहन :
  • भारत व पाकिस्तान यांनी काश्मीर प्रश्न व इतर प्रलंबित प्रश्नांवर एकमेकांशी संवाद साधावा, असे आवाहन सौदी अरेबियाने केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले असून ते पाकिस्तान व सौदी अरेबिया यांच्या दरम्यानच्या मतैक्याबाबत आहे.

  • सौदी अरेबियाचे राजे महंमद बिन सलमान यांच्याशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उच्चस्तरीय चर्चा केली असून खान हे ७ ते ९ मे दरम्यान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरसह इतर मुद्दय़ांवर संवाद साधावा असे आवाहन केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये स्थिरता नांदावी अशी अपेक्षा दोन्ही देशांनी व्यक्त केली.

  • राजे सलमान यांनी भारत व पाकिस्तान यांच्यात अलीकडेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार न करण्याबाबत केलेल्या शस्त्रसंधीचे स्वागत केले आहे. २००३ मध्ये ही शस्त्रसंधी पहिल्यांदा करण्यात आली आणि नंतर त्याचे वारंवार उल्लंघन झाले होते.

  • भारत व पाकिस्तान यांच्या लष्करांमध्ये २५ फेब्रुवारी रोजी शस्त्रसंधीचे पालन करण्यावर मतैक्य झाले होते. खान यांनी सौदी अरेबियातील भेटीत द्विपक्षीय प्रश्न, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली. अमली पदार्थांच्या चोरटय़ा व्यापाराला निर्बंध घालण्याचा करार या वेळी करण्यात आला. पाकिस्तानातील ऊर्जा प्रकल्पांना निधी देण्याचे सौदी अरेबियाने मान्य केले आहे. कैद्यांच्या हस्तांतराचाही करार या वेळी करण्यात आला.

रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर नेमणूक :
  • हॉलीवूडमधील अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस यांच्यासह २०२० सालचे ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे.

  • महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्य़ातील परिटेवाडी या खेडय़ात प्राथमिक शिक्षक असलेले डिसले यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस १ अब्ज अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार जिंकला होता. याच पुरस्काराशी साधम्र्य साधणाऱ्या ५० हजार अमेरिकी डॉलरच्या पुरस्काराच्या निवड समितीवर आता त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबतीने वार्के फाऊंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आहे.

  • अध्ययनावर, तसेच एकूण समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ सुरू करण्यात आले आहे.

अखेर पाकिस्ताननं मान्य केलंच! “कलम ३७० भारताचा अंतर्गत मुद्दा”, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलं स्पष्ट :
  • ऑगस्ट २०१९मध्ये भारताच्या संसदेनं काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यासंदर्भातलं विधेयक देखील पारित करण्यात आलं. मात्र, तेव्हापासूनच पाकिस्तानकडून या निर्णयावरून आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेश यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर कायमच आगपाखड केलेली दिसून आली आहे.

  • मात्र, आता पहिल्यांदाच कलम ३७० ही भारताची अंतर्गत बाब असल्याचं पाकिस्ताननं मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही भूमिका मांडली आहे. मात्र, असं सांगताना त्यांनी कलम ३५अ आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं देखील नमूद केलं आहे.

  • भारतीय संसदेनं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात तीव्र शब्दांत टीका देखील केली होती. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं हे कलम रद्द केल्यानंतर भारत सरकारने जम्मू-काश्मीरची विभागणी लडाख आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील केली. त्यावरून पाकिस्तानने भारत सरकारवर टीका करत तीव्र नापसंती दर्शवली होती.

  • काश्मीरच्या मुद्द्यांवर भारत सरकार योग्य भूमिका घेत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणतेही व्यापारी संबंध ठेवले जाणार नाहीत, अशी भूमिका नुकतीच शाह महमूद कुरेशी यांनी घेतली होती. मात्र, आता आपल्या या भूमिकेवरून पाकिस्ताननं घुमजाव केलं आहे.

केंद्राची २५ राज्यांना मोठी मदत; उत्तर प्रदेशला सर्वाधिक १४४१ कोटी, तर महाराष्ट्राला ८६१ कोटी :
  • देशात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्राकडून देखील पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारने रविवारी २५ राज्यांसाठी मोठा निधी जाहीर केला. केंद्राने २५ राज्यांमधील पंचायतींना ८९२३.८ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. यामध्ये महाराष्ट्राला ८६१.४ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहेत.

  • वित्त मंत्रालयाने शनिवारी ही अनुदान रक्कम राज्य पंचायतींसाठी जाहीर केली. हे अनुदान पंचायत, राज्यातील तीन स्तरांसाठी – गाव, गट आणि जिल्हा याकरिता देण्यात आली आहे. रविवारी वित्त मंत्रालयाने ही अनुदानाची रक्कम जाहीर केल्याची माहिती दिली.

  • ही रक्कम २०२१-२२ या वर्षातील संयुक्त अनुदानाचा पहिला हप्ता आहे. इतर विकासकामांबरोबरच ग्रामीण स्थानिक संस्था करोनाचा सामना करण्यासाठी या रकमेचा वापर करतील. या अनुदानाच्या रकमेमुळे पंचायतींंच्या तीन स्तरांवर करोनाला पराभूत करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि संसाधनांमध्ये वाढ होईल. मंत्रालयाने वेगवेगळ्या राज्यांसाठी देण्यात आलेल्या अनुदान निधीची यादीही प्रसिद्ध केली आहे.

माद्रिद खुली टेनिस स्पर्धा - सबालेंका अजिंक्य :
  • बेलारुसच्या पाचव्या मानांकित आर्यना सबालेंकाने शनिवारी मध्यरात्री झालेल्या माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टीला नमवून महिला एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

  • दोन आठवडय़ांपूर्वी स्नायूंच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार करणाऱ्या सबालेंकाने दमदार खेळ करताना मातीच्या कोर्टवरील पहिले जेतेपद मिळवले. तिने बार्टीला ६-०, ३-६, ६-४ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. सबालेकांचे हे कारकीर्दीतील एकूण १०वे जेतेपद ठरले.

  • २५ एप्रिलला झालेल्या स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत बार्टीनेच सबालेंकाला धूळ चारली होती. मात्र या विजयासह तिने त्या पराभवाचा वचपा काढला. आता २३ वर्षीय सबालेंका जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेणार आहे. पुरुष एकेरीच्या सोमवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि इटलीचा मॅटिओ बॅरेट्टिनी आमनेसामने येणार आहेत.

१० मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.