चालू घडामोडी आणि दिनविशेष - 10 मार्च 2023

Date : 10 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

Reliance Jio ने लॉन्च केली आणखी २७ शहरांमध्ये ५ जी सेवा; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा आहे समावेश

  • भारत सध्या Rilance Jio , Airtel आणि VI म्हणजेच वोडाफोन-आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी आपली ५ जी सेवा भारतामध्ये सुरु केलेली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ कंपनी सर्वात आघाडीवर आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जिओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. रिलायन्स जिओने देशभरातील २७ शहरांमध्ये आपली ५जी सेवा सुरु केली आहे.
  • या ५ जी सेवेमध्ये महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे. आज सुरु झालेल्या सेवेमध्ये राज्यातील सातारा शहराचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील १७ शहरांमध्ये जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील अकोला, परभणी, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, पुणे, सांगली आणि सोलापूर व सातारा अशा एकूण १७ शहरांमध्ये रिलायन्स जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे.
  • तर देशातील आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर , छत्तीसगड, कर्नाटक , केरळ , मध्य प्रदेश, महाराष्ट्र , पंजाब, तेलंगणा , तामिळनाडू , उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड व पश्चिम बंगाल या राज्यांमधील २७ शहरांमध्ये ५ जी सेवा जिओने सुरु केली आहे. बुधवारपासून या २७ शहरांमधील रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Jio वेलकम ओफर अंतर्गत १ Gbps या स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. कामपणीच्या प्रत्येक वापरकर्त्याने Jio True ५ जी सेवेचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा असल्याचे रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याने सांगितले. या वर्षाच्या अखेरीस प्रत्येक शहरांत आणि गावात ५ जी सेवा सुरु करण्याचे जीओचे लक्ष्य आहे.

नेपाळच्या राष्ट्रपतीपदी रामचंद्र पौडेल यांची निवड

  • नेपाळमध्ये पंतप्रधान पुष्ककमल दहल ‘प्रचंड’ यांच्या नेतृत्वाखालील कमजोर आघाडी सत्तेवर असल्याने अस्थैर्य वाढत असतानाच, नेपाळी काँग्रेसचे रामचंद्र पौडेल यांची गुरुवारी देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.
  • नेपाळी काँग्रेस व पंतप्रधान प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन (माओइस्ट सेंटर) यांचा समावेश असलेल्या आठ पक्षांच्या आघाडीचे उमेदवार असलेले पौडेल यांना संसदेतील लोकप्रतिनिधींची २१४ मते आणि प्रांतिक विधानसभा सदस्यांची ३५२ मते मिळाली.
  • आठ पक्षांच्या पाठिंब्यामुळे ७८ वर्षांचे पौडेल यांचा विजय निश्चित होता. त्यांचे प्रतिस्पर्धी सुभाषचंद्र नेबमांग यांना माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएल पक्षाचा पाठिंबा होता.

आतिशी दिल्लीच्या नव्या शिक्षणमंत्री,‘आप’ सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद रिक्त

  • दिल्लीतील ‘आप’ सरकारचे शिक्षण प्रारूप तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आतिशी नव्या शिक्षणमंत्री झाल्या आहेत. तर, पक्षाचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी स्वीकारली आहे. नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी दोघांना गुरुवारी मंत्रीपदाची शपथ दिली.
  • अटकेत असलेले मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर केजरीवाल सरकारची फेररचना अनिवार्य झाली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळाची फेररचना करताना उपमुख्यमंत्रीपद मात्र रिक्त ठेवले आहे. यावेळी देखील केजरीवाल यांनी मंत्रीपदाचा भार आपल्या खांद्यावर घेणे टाळले असले, तरी सिसोदियांच्या अनुपस्थितीत दिल्ली सरकारच्या कारभारात आता केजरीवाल यांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
  • केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या सिसोदिया यांच्याकडे १८ खात्यांची जबाबदारी होती. त्यातील अर्थ, महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम ही खाती कैलाश गेहलोत यांच्याकडे दिली आहेत. एकाचवेळी महत्त्वाची खाती सांभाळणारे गेहलोत हे केजरीवाल सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री बनले आहेत. गेहलोत यांच्याकडे दिल्लीच्या वाहतूक खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.
  • दिल्ली विधानसभेत ७० सदस्य आहेत. मंत्रिपदांची संख्या ही सदस्य संख्येच्या १० टक्क्यांपर्यंत मर्यादित असावी लागते. त्यामुळे केजरीवाल सरकारमध्ये ७ मंत्री असून आतिशी आणि भारद्वाज यांचा नव्याने समावेश करावा लागला आहे. भारद्वाज यांच्याकडे पाणीपुरवठा व उद्योग ही खातीही देण्यात आली आहेत. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतलेल्या आतिशी यांनी २०१५ ते २०१७ या काळात शिक्षण प्रारूपाचा आराखडा बनवण्यासाठी सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून काम केले होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

शेतकऱ्यांना मदतीचा हात; सहा हजार रुपये अनुदान आणि एक रूपयात पीक विमा

  • बदलत्या हवामानामुळे सतत संकटात सापडणाऱ्या बळीराजाला शाश्वत शेतीच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून तब्बल २९ हजार कोटींची भरीव तरतूद करतानाच शेतकऱ्यांना एक रूपयात पीकविमा आणि वर्षांला ६ हजार रूपये सन्माननिधी धेण्याची घोषणा करीत शिवसेना- भाजप सरकारने गुरूवारी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकरीवर्गाला खूश करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.
  • केंद्र सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना वर्षांला ६ हजार रूपये देण्याची सन्मान योजना सुरू आहे. राज्यात सत्तेवर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या धर्तीवर सन्मान योजना जाहीर करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली असून सध्याच्या कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकार ६ हजार रूपयांची भर टाकणार असल्याने राज्यातील एक कोटी १५ लाख शेतकऱ्यांना आता वर्षांला १२ हजार रुपये मिळणार आहेत.
  • अशाचप्रकारे पीक विमा योजनेतही शेतकऱ्यांना दिलासा देताना केवळ एक रूपयात पीक विमा दिला जाणार आहे. सध्या या योजनेत विमाहप्तय़ाच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती. मात्र आता ही रक्कमही सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीकविमा मिळणार असून ३३१२ कोटींचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
  • गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत अपघात विमा मिळविताना विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक दूर करण्यासाठी ही योजना आता सरकारच राबविणार आहे. त्यानुसार अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आता दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार असून डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढविताना या मिशनवर तीन वर्षांत एक हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षांनिमित्त राज्यात ‘श्रीअन्न अभियान’ राबविण्याची आणि त्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्याची त्याचप्रमाणे नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र, नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन

  • चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.
  • ते म्हणाले, ”मला माहित आहे की, मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. पण हे मी माझा मित्र सतीश कौशिक बद्दल लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीचा असा अचानक अंत झाला.
  • सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुरालसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

भारताला पाकिस्तान व चीनकडून धोका; अमेरिकी गुप्तचर खात्याचा इशारा

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आणि चीन या दोन शेजारी देशांबरोबर भारताचे असणारे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांकडून सातत्याने सीमाभागात भारताला मनस्ताप देणाऱ्या कारवाया केल्या जात असताना भारताकडूनही याबाबत ठाम आणि निषेधाची भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आशियामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी पाकिस्तान आणि चीनकडून सीमाभागात होणाऱ्या कारवाया थांबवण्याची आवश्यकता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केली जात आहे. यावर आता थेट अमेरिकेच्या गुप्तचर खात्याकडून इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी अमेरिकेतील गुप्तचर खात्याकडून पाकिस्तान आणि चीनबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. यानुसार आगामी काळात पाकिस्तान आणि चीनकडून भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर भारताकडून त्याचा आक्रमकपणे प्रतिकार केला जाऊ शकतो.

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 10 मार्च 2022

 

पाच राज्यांचा कौल आज :
  • उत्तर प्रदेशबरोबरच उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांचा कौल आज, गुरुवारी स्पष्ट होईल़  मतमोजणी सकाळी सुरू होऊन दुपापर्यंत कल स्पष्ट होईल़ 

  • बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उत्तर प्रदेशात भाजप सत्ता कायम राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  मात्र, आपल्याला बहुमत मिळेल, असा विश्वास प्रतिस्पर्धी सप आघाडीला आह़े  पंजाबमध्ये सत्तांतर, तर उत्तराखंड आणि गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच होण्याचा अंदाज चाचण्यांनी वर्तवला आह़े.

  • निकालोत्तर राजकीय जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते या राज्यांत तळ ठोकून आहेत़  त्यामुळे आता प्रत्यक्षात कौल कोणाला मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आह़े.

कोव्होवॅक्स लशीला मंजुरी :
  • सीरम इन्स्टिटय़ूटच्या १२ ते १७ वर्षे वयोगटासाठीच्या कोव्होवॅक्स लशीचा आपत्कालीन वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. करोनाविषयक तज्ज्ञ समितीने गेल्या आठवडय़ात या वयोगटासाठी कोव्होवॅक्स लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरीची शिफारस केली होती़  त्यानुसार केंद्रीय औषध महानियंत्रकांकडून ही मंजुरी मिळाली आहे. १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी सशर्त दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.

  • १२ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे दोन हजार ७०७ मुलांवरील दोन अभ्यासांमधील आकडेवारीनुसार कोव्होवॅक्स अत्यंत प्रभावी, रोगप्रतिबंधक, सुरक्षित असल्याचे औषध महानियंत्रकांकडे करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होत़े  १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेली कोव्होवॅक्स ही चौथी लस आह़े

  • १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सरसकट लसीकरणाबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. लसीकरणाची अतिरिक्त गरज आणि लसीकरणासाठी लोकसंख्येच्या समावेशाची व्याप्ती किती वाढवायची, याबाबत सतत तपासणी केली जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

७०० भारतीय विद्यार्थी सुमी शहरातून रवाना :
  • युक्रेनच्या आग्नेयेकडील सुमी शहरातून स्थलांतरित करण्यात आलेल्या सुमारे ७०० भारतीय विद्यार्थ्यांचा अखेरचा मोठा गट पोल्तावा येथून एका विशेष रेल्वेगाडीत बसला असून, हे विद्यार्थी गुरुवारी पोलंड येथून विमानाने भारतासाठी रवाना होण्याची शक्यता आहे.

  • ही रेल्वेगाडी या विद्यार्थ्यांना पश्चिम युक्रेनमधील ल्यिव येथे नेणार असून, तेथून त्यांना बसगाडय़ांतून पोलंडला नेण्यात येईल, असे अर्शद अली या विद्यार्थी समन्वयकाने सांगितले. पोल्तावा आणि ल्यिव यांच्यातील अंतर सुमारे ८८८ किलोमीटर आहे.

  • वेढल्या गेलेल्या सुमी शहरातील दोन आठवडय़ांच्या कष्टप्रद वास्तव्यानंतर, युक्रेनमध्ये शेकडो मैल अंतर कापून आणि वाहतुकीच्या निरनिराळय़ा साधनांचा उपयोग करून या विद्यार्थ्यांना युद्धग्रस्त युक्रेनमधून स्थलांतरित करण्यात येत आहे.

  • अडकून पडलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याकरता भारत सरकार ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत अतिशय नाजुक व आव्हानात्मक अशी मोहीम राबवत आहे.

अष्टपैलू जडेजाची अग्रस्थानी झेप :
  • भारताचा रवींद्र जडेजा बुधवारी ‘आयसीसी’च्या जागतिक कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी विराजमान झाला. श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे झालेल्या कसोटीत नाबाद १७५ धावांची खेळी साकारण्यासह नऊ बळी मिळवल्याने डावखुऱ्या जडेजाने ४०६ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला.

  • वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर (३८२) आणि भारताचा रविचंद्रन अश्विन (३४७) यांची अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी घसरण झाली. ३२ वर्षीय जडेजाने कारकीर्दीत दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला. यापूर्वी, ऑगस्ट २०१७मध्ये जडेजा एका आठवडय़ासाठी अग्रस्थानी होता.

  • याव्यतिरिक्त, फलंदाजांच्या यादीत जडेजाने ५४व्या स्थानावरून ३७वा क्रमांक पटकावला, तर गोलंदाजांमध्ये तो २२वरून १७व्या स्थानी पोहोचला.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लेवांडोवस्कीची हॅट्ट्रिक; बायर्न उपांत्यपूर्व फेरीत :
  • तारांकित आक्रमणपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीने ११ मिनिटांच्या अंतरात साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीत त्यांनी साल्सबर्गचा ७-१ असा धुव्वा उडवला.

  • उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात बायर्नने साल्सबर्गला १-१ असे बरोबरीत रोखले होते. मंगळवारी मात्र बायर्नने घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना वर्चस्व गाजवले. लेवांडोवस्कीने अनुक्रमे १७, २१ आणि २३व्या मिनिटाला गोल नोंदवले. थॉमस म्युलर (५४ आणि ८३वे मिनिट), सर्ज गनाब्री (३१वे मि.) आणि लेरॉय साने (८५वे मि.) यांनी लेवांडोवस्कीला उत्तम साथ दिली.

  • लिव्हरपूल : लिव्हरपूलच्या मंगळवारी मध्यरात्री झालेल्या उपउपांत्यपूर्व लढतीत इंटर मिलानने १-० असे पराभूत केले; परंतु २-१ अशा एकूण गोलफरकाच्या बळावर लिव्हरपूलने उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या टप्प्यातील लढतीत लिव्हरपूलने मोहम्मद सलाह आणि रॉबटरे फर्मिनोच्या गोलमुळे २-० असा विजय मिळवला होता. लिव्हरपूलने गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा अंतिम आठ संघांत स्थान मिळवले.

१० मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.