चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० जुलै २०२१

Updated On : Jul 10, 2021 | Category : Current Affairs


अमेरिकेत तिसऱ्या ‘बुस्टर’ मात्रेची तयारी :
 • करोना प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी बारा महिन्यांनी लशीची तिसरी मात्रा देणे शक्य व्हावे, या हेतूने अमेरिकेतील फायझर कंपनी पुढील महिन्यात परवानगीसाठी अर्ज करणार आहे.

 • अनेक देशातील संशोधनानुसार कोविड  १९ लशी डेल्टा विषाणू विरोधात संरक्षण देत आहेत. आता हा विषाणू जगात पसरला असून अमेरिकेत काही जणांना हा संसर्ग झाला आहे. फायझर लशीच्या दोन मात्रा आवश्यक असून त्यामुळे करोना विषाणूविरोधात प्रतिपिंड तयार होतात. डेल्टा विषाणू विरोधातही यात प्रतिपिंड तयार होतात. जगातील अनेक लोकांना अजून पहिली मात्राही मिळाली नसून फायझरने तिसऱ्या बुस्टर म्हणजे वर्धक लशीच्या परवान्यासाठी मागणी केली आहे.

 • कालांतराने प्रतिपिडांची संख्या कमी होत असते. त्यामुळे वर्धक लस मात्रेची गरज आहे असे फायझरचे म्हणणे आहे.

 • फायझरचे मिलाएल डोल्टसन यांनी सांगितले, की तिसऱ्या लशीच्या मात्रेनंतर व्यक्तींमध्ये प्रतिपिंडांचे प्रमाण हे पाच ते दहा टक्के वाढत असते. ऑगस्टमध्ये फायझर लशीच्या तिसऱ्या मात्रेच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. लशीच्या दोन मात्रा प्रतिपिंड वाढवण्यासाठी गरजेच्या असतात. सर्व प्रकारच्या करोना विषाणूंपासून त्यामुळे संरक्षण मिळते.  केवळ डेल्टाच नव्हे तर इतर विषाणूंनाही प्रतिकार केला जातो. ऑगस्टमध्ये फायझर कंपनी ही तिसऱ्या बुस्टर लशीच्या मात्रेसाठी परवानगीकरिता अर्ज करणार आहे.

कॅनडात लॅम्डा उत्परिवर्तन :
 • करोनाचा लॅम्डा विषाणू उपप्रकार कॅनडात आढळून आला आहे. पण या विषाणूचा प्रसार आतापर्यंत कि ती प्रमाणात झालेला आहे हे समजलेले नाही. कॅनडाच्या प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. थेरेसा टॅम यांनी सांगितले की लॅम्डा विषाणूचे आतापर्यंत ११ रुग्ण सापडले असून हा विषाणू पेरू देशात गेल्या वर्षी सापडला होता.

 • राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या मते मार्च व एप्रिलमध्ये क्युबेकमध्ये या विषाणू प्रकाराचे २७ रुग्ण सापडले होते. सार्वजनिक आरोग्य संस्थेने म्हटले आहे की, आम्ही लॅम्डा विषाणू्च्या  प्रसारावर लक्ष ठेवत असून तो लशीला किती व कसा प्रतिसाद देतो याचा अभ्यास करण्यात येत आहे. आम्ही या विषाणूबाबत माहिती गोळा करीत आहोत. सध्या तरी या रुग्णांची संख्या थोडी आहे.

 • न्यूयॉर्क विद्यापीठाने आतापर्यंत केलेल्या अभ्यासात २ जुलैला असे सांगण्यात आले होते की, एमआरएनए लशींनी तयार केलेल्या प्रतिपिंडांनाही हा विषाणू दाद देत नाही. फायझर बायोएनटेक व मॉडर्ना या लशी एमआरएनए स्वरूपाच्या असून प्रतिपिंडांना हा विषाणू अजिबातच प्रतिसाद देत नाही असे म्हणता येणार नाही. फक्त त्याचे प्रमाण कमी आहे.

‘स्पेलिंग बी’मध्ये आफ्रिकी वंशाची मुलगी प्रथम :
 • यंदाच्या २०२१ या वर्षातील स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत प्रथमच झैला अवांत गडदे या मुलीने पहिला क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत झालेल्या ९३ स्पर्धांमध्ये आफ्रिकी-अमेरिकी विद्यार्थिनीने ही स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 • या मुलीला बास्केटबॉलची आवड आहे. भारतीय अमेरिकी व्यक्तींनी आतापर्यंत या स्पर्धेवर नेहमीच वर्चस्व ठेवले होते. या वेळी भारतीय अमेरिकी मुलांना दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. चैत्रा थुमाला (वय १२) ही सॅनफ्रान्सिस्कोची मुलगी दुसरी आली असून भावना मदिनी ही १३ वर्षांची न्यूयॉर्कमधील मुलगी तिसरी आली आहे.

 • अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन या स्पर्धेच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. झैला अवांत गडदे हिने मुराया या आशियाई, ऑस्ट्रेलियाच्या वृक्षाचे स्पेलिंग अचूक सागितले. झैला  हिला गुरुवारी पन्नास हजार डॉलरचा स्पेलिंग बी पुरस्कार मिळाला. स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा गेल्यावर्षी करोनामुळे झाली नव्हती.

 • झैला अवांत गडदे हिने ११ उमेदवारांना मागे टाकून ही स्पर्धा जिंकली आहे. झैला ही लुईझियानाची रहिवासी असून पहिली आफ्रिकीअमेरिकी विजेती ठरली आहे. ९३ वर्षांच्या इतिहासात या समुदायाला हे विजेतेपद मिळण्याची ही पहिलीच वेळ होती..

उत्तर प्रदेशात लवकरच Population Policy होणार लागू!; लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी योजना :
 • राज्यातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार योजना आणणार आहे. यासाठी ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवसाचं औचित्य साधण्यात आलं आहे. २०२१ ते २०३० या कालावधीत लोकसंख्या नियंत्रणासाठी खास उपाययोजना आखण्यात आली आहे. “लोकांना चांगल्या सुविधा आणि राज्याचा विकास व्हावा यासाठी पावलं उचलली जात आहेत.

 • गरीबी आणि निरक्षरता लोकसंख्या वाढीचं कारण आहे. काही समाजात लोकसंख्येबाबत जागरुकता नाही. त्यासाठी त्यांना जागरूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर याबाबत एक प्रेझेंटेशन करण्यात आलं.

 • नव्या लोकसंख्या नियंत्रण पॉलिसीनुसार उत्तर प्रदेशात २०२६ पर्यंत जन्मदर २.१ टक्के करण्याचं लक्ष्य आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशात जन्मदर आता २.७ टक्के इतका आहे. हा आकडेवारी राष्ट्रीय जन्मदराच्या २.२ टक्क्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे.

 • तर २०३० पर्यंत जन्मदर १.९ टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी कुटुंब नियोजन आणि आरोग्य सुविधांवर भर दिला जाणार आहे. आरोग्य सुविधांमुळे बालमृत्यू आणि मातृ मृत्यू दर कमी करण्यास मदत होणार आहे. यामुळे नियोजनाला चालना मिळणार आहे.

हुर्काझला नमवून बेरेट्टिनी प्रथमच अंतिम फेरीत :
 • इटलीच्या सातव्या मानांकित माटिओ बेरेट्टिनीने शुक्रवारी कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो इटलीचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

 • दोन तास आणि ३६ मिनिटांपर्यंत रंगलेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत २५ वर्षीय बेरेट्टिनीने पोलंडच्या १४व्या मानांकित हुबर्ट हुर्काझला ६-३, ६-०, ६-७ (३-७), ६-४ असे चार सेटमध्ये पराभूत केले. आठ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररला उपांत्यपूर्व फेरीत हरवणाऱ्या हुर्काझला बेरेट्टिनीविरुद्ध मात्र कामगिरी उंचावता आली नाही. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात बेरेट्टिनीसमोर नोव्हाक जोकोव्हिच विरुद्ध डेनिस शापोवालोव्ह यांच्यातील विजेत्याचे आव्हान असणार आहे.

 • जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या बेरेट्टिनीने आपल्या सव्‍‌र्हिस आणि फोरहँडच्या फटक्यांच्या जोरावर हुर्काझला निष्प्रभ केले. फेडररविरुद्ध अप्रतिम खेळ साकारणाऱ्या हुर्काझला बेरेट्टिनीविरुद्ध सूर गवसलाच नाही. त्यामुळेच पहिले दोन सेट सहजपणे जिंकल्यानंतर बेरेट्टिनीला तिसऱ्या सेटमध्ये हुर्काझच्या कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले.

१० जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)