चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० जुलै २०२०

Date : 10 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करण्याची भूमिका - उदय सामंत :
  • “सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. आता विद्यार्थ्यांच्या संभ्रमावस्थेत अधिक भर पडली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी आम्ही परीक्षा रद्द करण्याची आमची भूमिका मांडली,” असं मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

  • काही दिवसांपूर्वी राज्यातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानंतर यूजीसीनं सप्टेंबर अखेरिस परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. या संपूर्ण विषयावर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी झालेल्या चर्चेबद्दल आणि त्यांची मतं काय होती याबाबतही माहिती दिली.

  • “सप्टेंबरल महिन्याच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवता येणार नाही. ६ एप्रिल रोजी आमची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशा घ्यायच्या याची पडताळणी करण्यासाठी समिती स्थापन केली. सहा कुलगुरूंची एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि डॉ. सुहास पेडणेकर हे त्या समितीचे प्रमुख होतं.

  • त्यानंतर २९ एप्रिल रोजी यूजीसीच्या गाडईलाईन्स आल्या. त्यामध्ये करोनाच्या परिस्थितीत तिथल्या शासनानं निर्णय घ्यावा, तसंच करोनाची परिस्थिती पाहून तिथल्या शासनानं आणि विद्यापीठांनी गाईडलाईन्स ठरवण्याचं सांगण्यात आलं होतं,” असं सामंत यावेळी म्हणाले.

भारत-चीनमध्ये आज चर्चेची आणखी एक फेरी :
  • लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्याच्या पहिल्या फेरीत भारत आणि चीनने गोग्रा पोस्ट १७ ए, गलवान खोऱ्यातील पीपी १४ आणि हॉट स्प्रिंगमधील पीपी १५ येथून गुरुवारी आपले सैन्य दोन कि.मी. मागे घेतले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी, विशेषत: पांगाँग सरोवराबाबत, होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • पांगॉँग सरोवर, फिंगर ४ येथे चीनचे सैनिक अद्यापही मोठय़ा प्रमाणावर तैनात आहेत. दरम्यान, गलवान खोऱ्यावर चीनने सांगितलेला दावा भारताने पुन्हा एकदा सपशेल फेटाळल्याचे पीटीआयच्या बातमीत म्हटले आहे.

  • कमांडर स्तरावरील चर्चेनुसार भारत आणि चीनच्या सैनिकांनी गलवान खोऱ्यातून मागे हटण्याबाबत परिणामकारक पावले उचलली आहेत, भारत-चीन सीमेवरील एकूण स्थिती स्थिर आणि अधिक सुधारली आहे, असे बीजिंगमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी सांगितले.

भारतात उद्योगस्नेही वातावरण :
  • भारत ही आशियातील तिसरी मोठी आणि खुली अर्थव्यवस्था असून आमच्याकडे उद्योगस्नेही, स्पर्धात्मक व संधींनी परिपूर्ण असे वातावरण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करोनाकाळातील टाळेबंदीनंतर आता पुन्हा हिरवी पालवी दिसत असून परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘ग्लोबल वीक २०२०’ या कार्यक्रमात त्यांनी जगातील कंपन्यांना गुंतवणुकीकरिता भारतात येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सूचित केले.

  • ते म्हणाले, की सर्व जागतिक कंपन्यांचे आमच्याकडे स्वागतच आहे. आमची अर्थव्यवस्था जगातील जास्तीतजास्त खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात ज्या संधी उद्योगांना आहेत त्या क्वचितच इतरत्र दिसून येतील. अलीकडच्या काळात कृषी, अवकाश व संरक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. जागतिक भांडवलाला भारताकडे वळवण्यासाठी त्यांनी परदेशी कंपन्यांना आवाहन केले.

  • आम्ही अर्थव्यवस्था जास्त उत्पादक, गुंतवणूकस्नेही व स्पर्धात्मक करीत आहोत. भारतात अनेक शक्यता व संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील सुधारणांमुळे साठवणूक व रसद पुरवठा क्षेत्रात गुंतवणुकीला संधी आहेत. कंपन्यांना आम्ही थेट गुंतवणुकीची संधी दिली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातही सुधारणा करण्यात आल्या असून त्या मोठय़ा उद्योगांना पूरक आहेत. संरक्षण उत्पादनाचे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले करण्यात आले असून त्यात सुटय़ा भागांची निर्मिती या कंपन्या करू शकतील. यातही गुंतवणुकीला संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्सचं प्रसारण बंद, हे आहे कारण :
  • नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्स बंद करण्यात आली आहेत. नेपाळ सरकारने ही बंदी घातल्याचं बोललं जातं आहे. मात्र ही चॅनल्स नेपाळमधल्या केबल प्रोव्हायडर्सनी बंद केली आहेत. यासाठी नेपाळ सरकारने काही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही. सध्याच्या घडीला दूरदर्शन सोडून एकही भारतीय न्यूज चॅनल नेपाळमध्ये दिसत नाही. आम्ही या चॅनल्सचं प्रसारण बंद केल्याचं नेपाळच्या केबल प्रोव्हायडर्सनी म्हटलं आहे.

  • नेपाळमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळचे माजी उपपंतप्रधान आणि सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ म्हणाले की, नेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्या विरोधात भारतीय माध्यमं विनाआधार प्रचार करत आहेत. त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतीय माध्यमांनी अशा प्रकारे वृत्तं देणं बंद करावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

  • नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या काही निर्णयांमुळे देशाच्या संसदेपासून अगदी नेपाळमधल्या रस्त्यांपर्यंत त्यांना विरोध दर्शवला जातो आहे. मात्र भारतीय न्यूज चॅनल्स आपल्या मर्यादा सोडून वृत्तांकन करत आहेत असंही काही नेते म्हणाले असल्याचं समजतंय. दरम्यान सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही मात्र आम्ही भारतीय न्यूज चॅनल्स दाखवणं बंद करतो आहोत असं नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

करोनाचा उद्रेक; देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ :
  • देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची झपाट्यानं वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २६ हजार ५०६ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या २१ हजार ६०४ इतकी झाली आहे.

  • देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आठ लाखांच्या जवळ पोहचली आहे. गेल्या २४ तासांत वाढलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्ण सात लाख ९३ हजार ८०२ इतके झाले आहेत. दोन लाख ७६ हजार ६८५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर चार ९५ हजार ५१३ जणांनी करोनावर मात केली आहे.

  • दररोज २० हजारांच्या पुढे करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण आधिक आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० टक्केंपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

१० जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.