चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० फेब्रुवारी २०२3

Date : 10 February, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल मोठी अपडेट; ‘या’ तारखेला खेळला जाणार अंतिम सामना

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर ७ ते ११ जून २०२३ दरम्यान दुसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. याबाबत आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. यावेळी या फायनलसाठी १२ जून २०२३ हा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.
  • सध्या, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये अव्वल दोन संघ आहेत. तरी ते अव्वल स्थानावर राहतील की नाही, हे बॉर्डर गावस्कर मालिका आणि न्यूझीलंड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून असेल.
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावसकर मालिका या फायनलमध्ये खेळण्याची भारताची शक्यता ठरवेल. कोणत्याही अडचणीशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत थेट पोहोचण्यासाठी, भारताला बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला ४-० ने हरवणे गरजेचे आहे. यजमानांनी ३-० असा विजय मिळवला किंवा ३-१असा विजय मिळवला, तरीही भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यासाठी त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून रहावे लागेल.
  • फायनल कोण खेळणार अजून ठरले नाही – अंतिम सामना डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघांमध्ये होईल आणि ऑस्ट्रेलिया सध्या ७५.५६ च्या विजयी टक्केवारीसह नऊ संघांच्या गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो, ज्यांच्या खात्यात ५८.९३ टक्के विजयाचे गुण आहेत. नागपुरात ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या मालिकेनंतर अंतिम फेरीतील संघ निश्चित होईल.

Tech Layoffs: गुगल मायक्रोसॉफ्टनंतर आता ‘ही’ टेक कंपनी १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार!

  • सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. सगळीकडे कर्मचारी कपातीचे लोणं आले आहे. आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. आता आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे. आता ही कोणती कंपनी आहे आणि ती आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे ते जाणून घेऊयात.
  • Yahoo Inc कंपनीने टाळेबंदीची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. जाहिरात तंत्रज्ञान विभागाची मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
  • याहू कंपनी एका युनिटमधून तिच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते. म्हणजेच कंपनी १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. या कपातीमुळे Yahoo च्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त परिणाम हा जाहिरात तंत्रज्ञान विभागाच्या होणार आहे.
  • गुरुवारी याहूमध्ये काम करणाऱ्या सांगण्यात आले होते की, १२ टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजे जवळजवळ १,००० जणांना कामावरून कमी केले जाणार आहे. तसेच येत्या ६ महिन्यांत कंपनी उर्वरित ८ टक्के म्हणजे ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल.

अजित डोभाल-पुतिन यांच्यात चर्चा

  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गुरुवारी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. भारताच्या रशियामधील दूतावासाने ट्वीट करून ही माहिती दिली. या भेटीमध्ये द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरू ठेवण्याविषयी सहमती झाली.
  • रशियाने सुरक्षा परिषदांचे सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये डोवाल सहभागी झाले. दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जाऊ नये, या भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला, तसेच भारत कायम अफगाण नागरिकांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही डोभाल यांनी दिली. या बैठकीला भारत आणि रशियासह इराण, कझाकस्तान, किरगिझस्तान. चीन, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित होते.
  • अजित डोभाल यांचा दोनदिवसीय रशिया दौरा बुधवारी सुरू झाला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तीन महिन्यांपूर्वी रशियाचा दौरा केला होता. त्या वेळी दोन्ही देशांनी रशियाने भारताला पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करण्यासह आर्थिक व्यवहाराचा विस्तार करण्याचे मान्य केले होते. भारतामध्ये लवकरच जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डोवाल यांनी रशियाचा दौरा केला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरही भारत आणि रशियाचे संबंध मजबूत राहिले आहेत.
  • भारताने अद्याप या हल्ल्याचा निषेध केलेला नाही. मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून या संकटावर मात करावी, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. तसेच भारताची रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात गेल्या काही महिन्यांमध्ये लक्षणीयरीत्या वाढली आहे.

युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास युरोपीय महासंघ अनुकूल

  • रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करत असलेल्या युक्रेनला लढाऊ विमाने आणि अधिक लष्करी साहाय्य पुरवण्यास युरोपीय महासंघाने अनुकूलता दर्शवली आहे. युरोपच्या दौऱ्यावर असलेले युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युरोपीय महासंघाच्या संसदेमध्ये भाषण करताना लढाऊ विमानांची मागणी केली तसेच रशिया युरोपची जीवनपद्धती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला. या भाषणाच्या आधी, भाषण सुरू असताना आणि भाषण संपल्यानंतर खासदार त्यांना उभे राहून मानवंदना देत असल्याचे चित्र दिसले.
  • युरोपीय महासंघाच्या संसदेचे अध्यक्ष रॉबर्टा मेटसोला यांनी युक्रेनवरील रशियाचा हल्ला हा युक्रेनच्या अस्तित्वासाठीच धोकादायक आहे, अशी टीका करत त्याला प्रतिसादही त्याच पद्धतीने दिला पाहिजे, असे आवाहन केले. युरोपीय महासंघातील सर्व २७ देश या संकटसमयी युक्रेनच्या पाठीशी असल्याची ग्वाही झेलेन्स्की यांना देण्यात आली.
  • रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला २४ तारखेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रशिया युक्रेनवरील हल्ला अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेलेन्स्की यांनी युरोपला मदत वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्यांना दोन दिवसांच्या युरोप दौऱ्यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाठिंबा मिळवण्यात यश मिळाले. ब्रिटनचे रणगाडे पुढील महिन्यात युक्रेनमध्ये पोहोचतील, तसेच युक्रेनच्या लढाऊ वैमानिकांना अद्ययावत प्रशिक्षणही देणार आहे.

जागतिक मंदीच्या तोंडावर ब्लू स्टारची ३५० कोटींची मोठी गुंतवणूक, सामान्यांना असा होऊ शकतो फायदा

सध्या संपूर्ण जग जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. जगभरातील अनेक बड्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत असताना एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कंपनी ब्लू स्टार लिमिटेडने आंध्र प्रदेशातील श्री सिटी (Sri City) येथे एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात तीन लाख रुम एसी युनिट्सची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार वाढण्याची शक्यता आहे. ब्लू स्टारने आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत हे उत्पादन १२ लाखांपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

“सध्या आम्ही दरमहा २५ हजार एसी युनिट्सची निर्मिती करत आहोत, तिसऱ्या टप्प्यापर्यंत दरमहा सुमारे एक लाख युनिट्सचं उत्पादन करण्याचं आमचं लक्ष्य आहे,” असे ब्लू स्टार लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी त्यागराजन (B Thiagarajan) यांनी सांगितलं आहे.

 

 

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० फेब्रुवारी २०२२

 

ग्रँडमास्टर युरी यांचे शतक :
  • जगातील सर्वात वयोवृद्ध बुद्धिबळ ग्रँडमास्टर युरी अवेरबाख यांनी मंगळवारी वयाची शंभरी गाठली. मागील वर्षी करोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे समजते.

  • रशियाची राजधानी मॉस्कोपासून साधारण १८० किलोमीटर अंतरावर असलेल्या कालुंगा शहरात युरी यांचा ८ फेब्रुवारी १९२२ रोजी जन्म झाला होता. वयाची शंभरी गाठणारे ते पहिलेच ग्रँडमास्टर ठरले आहेत. मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहण्यासाठी युरी अजूनही जगभरातील बुद्धिबळ सामन्यांवर अधूनमधून लक्ष ठेवून असतात.

  • ‘‘वयोमानाचा माझ्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. परंतु मी अधूनमधून सामन्यांवर लक्ष ठेवतो. मला विशेषत: इयान नेपोम्निशीचा खेळ खूप आवडतो. तो यंदा जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत खेळला याचा मला आनंद आहे,’’ असे युरी एका मुलाखतीत म्हणाले.

  • रशियाचे बुद्धिबळपटू युरी यांनी १९५२ मध्ये ग्रँडमास्टर किताब पटकावला होता. त्या वेळी ते जगातील ३५वे ग्रँडमास्टर ठरले होते. बुद्धिबळ खेळण्याव्यतिरिक्त त्यांनी १९७३ ते १९७८ या कालावधीत यूएसएसआर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्षपदही भूषवले. तसेच त्यांनी बुद्धिबळ खेळाशी निगडित अनेक मासिकांचे संपादक म्हणूनही काम केले.

उत्तर प्रदेशात आज पहिल्या टप्प्याचे मतदान :
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी होणार आहे. राज्याच्या पश्चिम भागाच्या ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघात मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या ५८ मतदारसंघातील प्रचार बुधवारी थंडावला.

  • मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात होणार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिलदेव अगरवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण हे मंत्री पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आहेत.

  • या ५८ मतदारसंघात एकूण ६२३ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून दोन कोटी २७ लाख मतदार आहेत. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत या ५८ मतदारसंघांपैकी ५३ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी दोन जागा मिळवल्या, तर एका जागेवर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवाराचा विजय झाला होता.

  • जाट मतदारांचा प्राबल्य असलेल्या या भागांत मतदान होणार असून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना या भागांतील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे यंदा भाजपला या मतदारसंघात कसा प्रतिसाद मिळतोय याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

देशहितासाठी शेती कायदे मागे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  स्पष्टीकरण :
  • शेती कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात आले, मात्र लोकांच्या हितासाठी ते मागे घेण्यात आले, असे उत्तर प्रदेश विधानसभेसाठी गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

  • आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम केले असून, त्यांनीही आपल्याला पाठिंबा दिला आहे असे मोदी म्हणाले. पाचही राज्यांमध्ये भाजप विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने नेहमीच स्थैर्यासह काम केले असून, लोकांकडून पक्षाला ‘अँटी- इन्कमबन्सी’ ऐवजी ‘प्रो- इन्कम्बन्सी’चे वातावरण लाभले आहे, असेही त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

  •  ‘घराणेशाहीच्या राजकारणावर’ कडाडून हल्ला चढवताना, हा ‘मोठा धोका’ आणि ‘लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू’ असल्याचे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशातील ‘बनावट समाजवादी’ या कोटीबाबत स्पष्टीकरण देताना, या पक्षांना केवळ ‘परिवारवादाची’ काळजी असल्याचे त्यांनी सांगितले.

  •  सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी अमान्य केला. ते म्हणाले की, निवडणुका असल्या तरी या यंत्रणा त्यांच्या निकषांनुसार काम करत असतात. या यंत्रणा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई करून राष्ट्रीय संपत्तीची वसुली करत असल्याने सरकारचे कौतुक करायला हवे.

पाकिस्तानातून आलेल्या ड्रोणमध्ये स्फोटके :
  • पाकिस्तानातून आलेल्या एका ड्रोनमधून दोन पाकिटांमध्ये पंजाब सीमेवरील एका शेतात टाकलेले चार किलोग्रॅमहून अधिक आरडीएक्स, एक पिस्तूल व बॉम्ब तयार करण्याचे साहित्य सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी जप्त केले.

  •  दुपारी १ वाजताच्या सुमारास गुरदासपूर सेक्टरच्या पंजग्रेन भागात पाकिस्तातून भारतीय बाजूला येणाऱ्या संशयित उडत्या वस्तूचा आवाज ऐकल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला, असे या निमलष्करी दलाच्या एका प्रवक्त्याने सांगितले. यानंतर सीमेलगतच्या घग्गर व सिंघोक खेडय़ांमधील शेतांमध्ये शोध घेतला असता बीएसएफच्या पथकाला दोन पिवळय़ा रंगाची पाकिटे ओल्या मातीत फसलेली आढळली.

  • या पाकिटांमध्ये अमली पदार्थ असावेत असे आधी वाटले, मात्र ती उघडली असता ४.७ किलो आरडीएक्स, एक चिनी बनावटीचे पिस्तूल, २२ काडतुसांसह दोन मॅगझीन, तीन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, टायमर उपकरण इत्यादी वस्तूंसह १ लाख रुपये रोख सापडले, असे हा प्रवक्ता म्हणाला. सीमेवरील कुंपणापासून भारतीय हद्दीत सुमारे २.७ किलोमीटर आत ही पाकिटे टाकणारे ड्रोन नंतर पाकिस्तानात परत गेल्याचा संशय आहे.

तीन वर्षांत २५ हजार आत्महत्या; २०१८ ते २० या कालावधीत कर्जबाजारीपणा, बेरोजगारीचा परिणाम :
  • एकीकडे भविष्यातील विकासाचे चित्र सरकारकडून रंगवून सांगितले जात असताना करोनापूर्व आणि उत्तर काळात आर्थिक अडचणींनी सामान्य नागरिकांचे जिणे किती अवघड झाले होते, याचे चित्रच समोर आलेल्या आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

  • देशात २०१८ ते २० या तीन वर्षांत बेरोजगारीमुळे ९ हजार १४० तर, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार ९१ अशा २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या आकडेवारीच्या आधारे केंद्राने आत्महत्यांसंदर्भातील माहिती वरिष्ठ सभागृहात मांडली.

  • केंद्र सरकार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवत असून त्याद्वारे देशातील ६९२  जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाला साह्य करत आहे. मानसिक आरोग्य सुधारणा कार्यक्रम व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून आत्महत्या रोखण्याचा केंद्र प्रयत्न करत असल्याचे राय यांनी  सांगितले.

१० फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.