चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० फेब्रुवारी २०२१

Date : 10 February, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुंबई मॅरेथॉन ३० मे रोजी :
  • जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात रंगणारी टाटा मुंबई मॅरेथॉन यंदा ३० मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. करोनामुळे या शर्यतीच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. फेब्रुवारीमध्ये या स्पर्धेचा घाट घालण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र संयोजकांनी भर उन्हाळ्यात ही स्पर्धा आयोजित करत खेळाडूंच्या अडचणीत वाढ केली आहे.

  • ‘‘सावधगिरीने पावले टाकत सर्वाशी चर्चा करून मोठय़ा आशेने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ आणि राज्य सरकार तसेच अन्य प्रशासकीय विभागांशी चर्चा करून एकत्रितपणे ही स्पर्धा आयोजित करण्याचे आम्ही ठरवले,’’ असे संयोजक प्रोकॅम इंटरनॅशनलने पत्रकात म्हटले आहे.

  • ‘‘केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रमाणित कार्यप्रणालीनुसार पूर्ण मॅरेथॉन, अर्धमॅरेथॉन तसेच १० किमी शर्यत या तीन गटांत होणाऱ्या या स्पर्धेत मर्यादित धावपटूंना प्रवेश देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धक, स्वयंसेवक तसेच पदाधिकारी यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल,’’ असेही या पत्रकात म्हटले आहे.

  • ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी असल्यामुळे सर्व धावपटूंना नवीन तारखेविषयीची माहिती देण्यात आली आहे. तसेच स्पर्धेविषयीची अधिक माहिती, स्वरूप, नोंदणी, सुरक्षेविषयीचे नियम याविषयीची माहिती नंतर देण्यात येणार आहे.

राज्य नाटय़ स्पर्धेतील विजेते पुरस्कार रकमेच्या प्रतीक्षेत :
  • ५९ व्या मराठी राज्य नाटय़ स्पर्धेसह संगीत, संस्कृत, बालनाटय़ स्पर्धा आटोपून वर्षांहून अधिक कालावधी उलटला, मात्र राज्य सरकारने अद्यापि स्पर्धेतील विजेत्या हौशी कलाकारांच्या पारितोषिकाची रक्कम आणि स्पर्धा झालेल्या नाटय़गृहांचे भाडे दिलेले नाही. सुमारे २ कोटीहून अधिक रक्कम थकली आहे. नाटय़क्षेत्रातील हौशी कलावंत व नाटय़गृह चालकांकडून वारंवार पाठपुरावा करूनही राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ही रक्कम त्यांना दिलेली नाही. याबद्दल नाटय़ वर्तुळातून संतापाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

  • करोना संकटकाळात आर्थिक फटका बसलेले हौशी कलावंत व नाटय़गृह चालकांना राज्य सरकारकडून वेळीच रक्कम मिळण्याची अपेक्षा होती, मात्र असा दिलासा मिळू शकला नाही. यामधून राज्य सरकार सांस्कृतिक क्षेत्राकडे उदासीनतेने पाहात असल्याची भावना व्यक्त होत आहे. नाटय़क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी  तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी या स्पर्धा सुरू केल्या. मात्र अडचणीच्या काळात सध्याच्या सरकारकडून उपेक्षा झाली आहे.

  • सांस्कृतिक कार्य विभागाने सन २०१९ च्या मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. १५ नोव्हेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२०  दरम्यान १९ शहरातील केंद्रांवर घेतली. ४५७ नाटय़संस्था सहभागी होत्या. त्यांची अंतिम फेरी दि. ३ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत औरंगाबादमध्ये झाली. त्यामध्ये ४६ नाटय़संस्थांचा समावेश होता. बालनाटय़ स्पर्धा १० केंद्रांवर  दि. ३ ते १८ जानेवारी २०२०  दरम्यान झाल्या. त्यात ३३७ संस्था सहभागी होत्या.

  • दिव्यांग बालनाटय़ स्पर्धा लातूर व नाशिक केंद्रांवर  दि. ३ ते १५ फेब्रुवारी २०२० मध्ये झाल्या, त्यामध्ये २४ संस्था, तर संगीत नाटकांची अंतिम फेरी इचलकरंजी केंद्रावर दि. १६ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२० दरम्यान झाली, त्यात २६ संस्था सहभागी होत्या. संस्कृत नाटय़स्पर्धेची अंतिम फेरी पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक या केंद्रांवर दि. १८ जानेवारी ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत झाली.

न्यूझीलंडचा म्यानमारला जोरदार दणका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय :
  • मागच्या आठवड्यात म्यानमारमध्ये लष्कराने उठाव करुन सत्ता ताब्यात घेतली. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला संधी देण्याऐवजी अशा प्रकारे सत्ता ताब्यात घेणाऱ्या म्यानमारच्या लष्करावर चहूबाजुंनी टीका सुरु आहे. न्यूझीलंडने फक्त शाब्दीक टीका करण्याऐवजी थेट कारवाईचे पाऊल उचलले आहे.

  • न्यूझीलंडने म्यानमार बरोबरचे सर्व उच्चस्तरीय संबंध स्थगित केले आहेत. त्याशिवाय म्यानमारच्या लष्करी नेत्यांना न्यूझीलंडमध्ये प्रवेशबंदी केली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी मंगळवारी ही घोषणा केली. “न्यूझीलंडकडून म्यानमारला जी मदत दिली जाते, त्याचा फायदा लष्कर आणि त्यांच्या प्रकल्पांना मिळणार नाही, हे सुनिश्चित करु” असे जेसिंडा आर्डन यांनी सांगितले.

  • “इथून न्यूझीलंडमधून आम्हाला जो, काही कठोर संदेश देता येईल, तो आम्ही देऊ. म्यानमारसोबत उच्चस्तरीय चर्चा बंद करु तसेच जो निधी आम्ही म्यानमारला देतोय, त्याचा फायदा म्यानमारच्या लष्कराला मिळणार नाही, याची काळजी घेऊ” असे आर्डन यांनी सांगितले.

  • २०१८ ते २०२१ या काळात न्यूझीलंडकडून म्यानमारला तीन कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत दिली जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. “न्यूझीलंड म्यानमारच्या लष्करी राजवटीला मान्यता देणार नाही. ताब्यात घेतलेल्या सर्व राजकीय नेत्यांना तात्काळ सोडून द्या” असे न्यूझीलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे.

4 Days Week आता भारतीय कंपन्यांनाही सुरु करता येणार; पण :
  • केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नवीन कामगार नियम (New Labour Codes) लागू करण्याची तयारी सुरु केली आहे. नवीन कामगार नियम  लागू झाल्यानंतर देशातील कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील चार दिवस कामावर बोलवण्याची मूभा असेल. म्हणजेच हे नियम लागू झाल्यानंतर परदेशाप्रमाणे भारतातही फोर डेज वीक सुरु करता येईल. त्याप्रमाणे कंपन्यांना राज्यस्तरीय विमा कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन घेण्याची मूभाही देण्यात येईल.

  • मात्र फोर डेज वीक म्हणजेच आठवड्यातून चारच दिवस काम करण्याची सवलत देण्यात आली तरी आठवड्यात किमान ४८ तास काम करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास आठवड्यातील चार दिवस काम करुन तीन दिवस सुट्टी हवी असेल तर दिवसाला १२ तासांची शिफ्ट करावी लागणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव अपूर्वी चंद्रा यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.

  • अपूर्वी चंद्रा यांनी, “आम्ही कामावर ठेवणाऱ्या कंपन्या किंवा कर्मचाऱ्यांवर दबाव आणू इच्छित नाही. त्यांना जो पर्याय योग्य वाटेल तो निवडण्याची मूभा त्यांना देण्यात आली आहे. कामाची बदलणारी पद्धत पाहून ही नवीन व्यवस्था उभारली जात आहे.

  • आम्ही काही बदल करण्याचे प्रयत्न केले आहेत. कामाच्या दिवसांसंदर्भात आम्ही काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे,” अशी माहिती दिली. नवीन नियमांप्रमाणे तयार करण्यात आलेल्या नियमांचा कच्चा मसुदा तयार असून अंतिम मसुदा लवकर तयार होईल असा विश्वास चंद्रा यांनी व्यक्त केला आहे. हा मसुदा तयार करण्यामध्ये अनेक मोठ्या राज्यांनी हातभार लावल्याचंही चंद्रा यांनी स्पष्ट केलं.

नवकरोनावर फायझरची लस प्रभावी :
  • कोविड १९ च्या ब्रिटन व दक्षिण आफ्रिकेतील नवीन विषाणूवर फायझर व बायोएनटेक यांची लस परिणामकारक असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.

  • ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस नवकरोनावर प्रभावी नसल्याने त्या लशीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले लसीकरण दक्षिण आफ्रिकेमध्ये थांबवण्यात आले असतानाच ही आशादायी बाब समोर आली.

  • ‘नेचर मेडिसीन’ या नियतकालिकातील शोधनिबंधानुसार ही लस करोनाच्या ‘एन ५०१ वाय’ व ‘इ ४८४ के’ या दोन उत्परिवर्तनांवर गुणकारी आहे. टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे की,  दोन नवीन विषाणू प्रकारांत काटेरी प्रथिनातील अमिनो आम्लांची रचना बदलली असून त्यावर फायझरची लस मात करू शकते.

  • देशात २४ तासांत ९,११० जणांना लागण देशात गेल्या २४ तासांत आणखी नऊ हजार ११० जणांना करोनाची लागण झाली, तर आणखी ७८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. या महिन्यात १० हजारांपेक्षा कमी जणांना करोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे.

१० फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.