चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० डिसेंबर २०२१

Date : 10 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा? आर काउंटमुळे ‘या’ शहरांची चिंता वाढली :
  • करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव देशात झाला असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कालच नव्यानं १० ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं होतं. याच दरम्यान महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात करोनाचा ‘आर काउंट’ १ च्या अगदी जवळ पोहोचला आहे. मुंबई-पुणे-ठाण्यात तर हा काउंट १पेक्षा पुढे गेलाय.

  • आर व्हॅल्यू किंवा आर काउंट हा करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संक्रमित झालेल्या लोकांची संख्या सांगते. सध्या, आर चा देशातील काउंट एकापेक्षा कमी आहे. परंतु काही मोठ्या शहरांमध्ये तो झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना आर काउंट वाढत आहे. कोणत्याही रोगाच्या प्रसाराच्या दराला री-प्रॉडक्शन नंबर म्हणजेच आर-व्हॅल्यू म्हणतात. एखादा आजार एखाद्या संक्रमित व्यक्तीद्वारे सरासरी किती लोकांमध्ये पसरू शकते, याची माहिती सांगणारा हा ‘आर’ क्रमांक असतो.

  • देशात महामारी संपण्यासाठी आर काउंट १ पेक्षा कमी असला पाहिजे. महाराष्ट्रात या आठवड्यात आर काउंट ०.९७वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये आर काउंट १पेक्षा जास्त आहे. पुण्यात तर हा काउंट १.१३वर पोहोचला आहे. तर मुंबई १.१०वर आणि ठाण्यात सर्वात जास्त १.१९ आहे. देशातील प्रमुख शहरांपैकी चेन्नई आणि बंगळुरूचा आर काउंट १.०४ वर आहे. तर राज्यांमध्ये कर्नाटक १.१२. जम्मू-काश्मीर १.०८ आणि तेलंगणा १.०५वर आहे.

ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढल्याने ब्रिटनमध्ये कठोर उपाययोजना जाहीर :
  • ब्रिटनमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उपप्रकाराचे आणखी १३१ रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या ५६८ झाली आहे. या पार्श्वभूमीवर; शक्य असेल तेथे घरून काम करणे, मुखपट्टीबाबतचे विस्तारित नियम, तसेच कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राचा वापर यांसारख्या अधिक कठोर उपाययोजना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी जाहीर केल्या.

  • दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या ओमायक्रॉन या अत्यंत संसर्गजन्य उपप्रकाराचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ब्रिटन सरकारचे तथाकथित ‘प्लॅन बी’ हिवाळी धोरण या शुक्रवारपासून टप्प्या-टप्प्याने अमलात येणार आहे. हा उपप्रकार दोन ते तीन दिवसांत दुप्पट वेगाने वाढतो, असे जॉन्सन यांचे म्हणणे आहे.

  • करोनाच्या यापूर्वी प्रबळ असलेल्या डेल्टा या उपप्रकारापेक्षा ओमायक्रॉनचा अधिक वेगाने प्रसार होतो, असे जॉन्सन यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

  • ‘नाट्यगृहे व चित्रपटगृहे यांसह सार्वजनिक अंतगृह स्थळी मुखपट्टी वापरण्यासारख्या कायदेशीर तरतुदी आम्ही शुक्रवारपासून लागू करू. घरून काम करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आम्ही पुन्हा लागू करू. सोमवारपासून तुम्हाला शक्य असेल तर घरून काम करा आणि आवश्यक असेल तर कामावर जा, पण शक्यतो घरूनच काम करा’, असे आवाहन जॉन्सन यांनी केले.

“याची किंमत चुकवावी लागेल”, चीननं दिली धमकी; अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनवर निशाणा :
  • करोनाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन वर्षांत चीन जगभरातल्या देशांच्या निशाण्यावर राहिला आहे. त्यासंदर्भात चीनला निर्बंध देखील सोसावे लागले आहेत. त्यानंतर तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांनी चीनविरोधात शड्डू ठोकले आहेत.

  • युद्ध झालं तर हे देश तैवानच्या बाजूने चीनविरोधात उभे राहतील असंच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता चीनमधील बिजिंग आणि शिनजियांग प्रांतात मानवाधिकारांचं प्रचंड उल्लंघन होत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जात असून त्यासाठी चीनला मोठा विरोध पत्करावा लागत आहे. पण आता याच संदर्भात चीननंच जगातील महासत्तांना आणि प्रगत देशांना उघड धमकीच दिली आहे.

  • मानवाधिकारांचं उल्लंघन - बिजिंग आणि शिनजियांग प्रांतामध्ये उग्यूर आणि तुर्की भाषिक मुस्लिमांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांकडून सातत्याने निषेध केला जात असून चीनला समज दिली जात आहे. मात्र, त्यानंतर देखील चीन याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचंच चित्र आहे.

  • या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने यासंदर्भात मोठं पाऊल उचलत २०२२ साली बिजिंगमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बॉयकॉट अर्थात आपले राजनैतिक अधिकारी या स्पर्धेला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं देखील अमेरिकेच्याच पावलावर पाऊल ठेवत डिप्लोमॅटिक बॉयकॉटचा मार्ग स्वीकारला आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन आणि कॅनडानंही बिजिंग ऑलिम्पिकवर धोरणात्मक बहिष्कार टाकला आहे.

मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन कुराणातील आयातींचं पठण करून झाले?; ‘त्या’ व्हायरल फोटोचं सत्य काय :
  • नाशिक येथे पार पडलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप काही दिवसांपूर्वीच झाला. यावेळी आयोजकांपासून विरोधकांपर्यंत सुरु असलेले वाद पाहायला मिळाले. भाजपाने संमेलनात सावरकरांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याचा आरोप करत आयोजकांवर टीका केली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनास शुभेच्छा देताना, या साहित्यनगरीला नाव देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

  • त्यानंतर आता महाराष्ट्रात पार पडलेल्या साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणमधील आयातींच्या पठणाने झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यासंदर्भात एक फोटो देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये  खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड दिसत आहेत.

  • अल्ट न्यूजच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील शंकराचार्य गुरुकुलच्या अध्यक्षा अर्पिता चॅटर्जी यांनीही हा फोटो शेअर करून हा दावा केला आहे. या ट्विटला चार हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत. यासोबत अनेकांनी हा फोटो शेअर करून महाराष्ट्र साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणातील आयतींच्या पठणाने झाली, असेच म्हटले आहे.

चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा - करोनामुळे भारताचे अभियान संपुष्टात :
  • संघातील एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय महिला संघाचे आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील अभियान संपुष्टात आले आहे. करोनामुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेला भारत हा मलेशियानंतर दुसरा संघ आहे.

  • करोनाची लागण खेळाडूला झाल्याने गतउपविजेत्या भारताचे गतविजेत्या कोरिया आणि चीनविरुद्धचे सामने रद्द करावे लागले होते. हे सामने अनुक्रमे बुधवारी आणि गुरुवारी होणार होते. त्याआधी, सोमवारी भारताचा मलेशियाविरुद्धचा स्पर्धेमधील सामनाही होऊ शकला नव्हता.

  • भारताने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात थायलंडचा १३-० असा धुव्वा उडवला होता. या सामन्या ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कोरने पाच गोल झळकावले होते. भारताचे स्पर्धेमधील आव्हान संपुष्टात आल्याचे गुरुवारी आशियाई हॉकी महासंघाने स्पष्ट केले. भारतीय संघ सध्या विलगीकरणात असून, करोना चाचणी सकारात्मक आलेल्या खेळाडूचे नाव जाहीर करता येणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले.

  • महिला आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा ही २०२०मध्ये होणार होती. परंतु करोनाच्या साथीमुळे ती अनेकदार पुढे ढकलण्यात आली.

१० डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.